चेबुराश्काची आणि माझी पहिली भेट झाली ती रशियन क्लासमधे. अगदी पहिल्याच दिवशी.
'मला ना नाव-गाव, माझ्याकडे तर कुणी वळूनही बघत नाही' असं गोड-गोंडस बिच्चार्या आवाजात गाणारा... चेबुराश्का...
डोळ्यात भोळा आशावाद लुकलुकवणारा... चेबुराश्का...
दिशाहीन उत्साहात फिरणारा ...चेबुराश्का...
असहाय्य खटपट करणारा ...चेबुराश्का...
त्याच्या गंभीरतेतही कमालीचा गोंडसपणा भरलेला... चेबुराश्का
सोव्हिएत युनियन ऐन बहरात असताना जन्मलेला आणि त्यामुळेच की काय निराशेत आशावाद घेउन फिरणारा.. चेबुराश्का...
आणि बघताच क्षणी प्रेमात पाडणारा... चेबुराश्का...
चेबुराश्का 'Gena the Crocodile and His Friends' (१९६५) या पुस्तकातलं प्रसिद्ध पात्र. माकडासारखे मोठ्ठे कान, मांजराच्या पिल्लाएवढं शरीर. चेबुराश्काचा जनक लेखक एदुआर्द उस्पेन्स्कीने वर्णन केल्याप्रमाणे मोठ्या कानाचा "विज्ञानालाही माहीत नसलेला प्राणी". कुठल्याश्या उष्ण प्रदेशातल्या जंगलातला अनामिक प्राणी असावा. रशियात कसा पोचला माहीत नाही, नाव काय ..कुणास ठाऊक?
एकदा संत्री खाता खाता पेटीत अडकला. जरासा खादाडच. चुकून संत्र्याच्या पेटीत गेला, पोटभर खाऊन झोपला. इतर पेट्यांसोबत हा अडकलेला ती पेटी कुठल्याश्या रशियन शहरात पोचली. बहुदा मॉस्को असावं. सगळ्या पेट्या एका किराणा मालाच्या दुकानात उतरवल्या जातात. तिथून सुरु होतो चेबुरश्काचा प्रवास.
संत्र कवटाळून गाढ झोपलेला हा पठ्ठ्या दुकानदाराला सापडतो. कळकट्ट-मळकट्ट, झिपरडं अशा या अनोळखी प्राण्याचं गाठोडं दुकानदार लहान बाळासारखं पेटीच्या कडेवर बसवतो. आता इतका वेळ पेटीत पडून राहिल्याने याचे पंजे सुन्न झालेले असतात. तो धपक्कन पेटीत कोसळतो. रशियन भाषेत एक क्रियापद आहे, 'चेबुरानोस्च्य्' म्हणजे 'गडगडत खाली पडणे'. या लडबडणार्या, कलंडणार्या गोल-गुबगुबीत गोंडस प्राण्याला दुकानदार नाव देतो, 'चेबुराश्का' - वांका-व्स्तांका (Vanka-Vstanka) बाहुलीसारखा डुलणारा. मी एक विचित्र खेळणं ज्याच्याकडे कुण्णी बघत नाही, पण आता मी आहे चेबुराश्का.
आता या गाठोड्याचं काय करायचं विचारात दुकानादार लहानग्या चेबुला प्राणीसंग्रहालयात नेतो. प्राणीसंग्रहालयाने 'आम्हाला नको बाबा हा विचित्र प्राणी' म्हणून नाकारल्यानंतर, चेबुराश्का एका दुकानात विंडो डिस्प्ले म्हणून कामाला लागतो. काम काय तर फोन बूथमध्ये दिवसभर बसणं आणि गिर्हाईक जमवायला भोवरा फिरवणं. खायला एक संत्र. तिथून पुढे मग बूथमधून सुटका आणि गेनाचा शोध.
गेना हा मगर. बो टाय, कोट, डोक्यावर टोपी, तोंडात पाईप असा जामानिमा करुन फिरणारा. प्राणीसंग्राहलायत काम करणारा. संध्याकाळी एकटाच बुद्धीबळ खेळून कंटाळलेला. मित्राच्या शोधात. गेना 'मित्र हवा' अशी जाहीरात शहरभर लावतो. जाहीरात बघून प्राणी, माणसं जमतात. त्यात एक असते 'गाल्या' आणि कुत्र्याचं अनाथ पिल्लू 'तोबिक'. तिच्यानंतर पोचतो तो चेबुराश्का.
यांच्या गोतावळ्यात असते म्हातारी 'शापोक्ल्याक'. गेना आणि चेबुराश्काला त्रास देणारी. उंच, बारीक, गोल टोपी, काळे कपडे आणि चेटकीणीसारख्या नाकाची. तिचा छंद अशुभ गोष्टी गोळा करणं. तिच्या मते लोकांना मदत करणं म्हणजे वेळ वाया घालवणं. "चांगलं काम करुन कोणाला प्रसिद्धी मिळाली आहे का कधी?" हे तिचं ब्रिदवाक्य. शापोक्ल्याकच्या पर्स मधे असतो एक छोटा उंदीर - लारीस्का. शापोक्ल्याक आणि लारीस्का शहरभर लोकांच्या खोड्या काढत हिंडत असतात. असं म्हणतात, उस्पेन्स्कीने शापोक्ल्याकचं पात्र लिहितांना आपल्या पहील्या बायोकाला डोळ्यासमोर ठेवलं होतं तर शापोक्ल्याक चितरणारा चित्रकार लिओनिड श्वार्ट्समने आपल्या सासूवरुन प्रेरणा घेतलेली.
पुस्तकातल्या गोष्टीवरुन स्टॉप मोशन अॅनिमेशनच्या सहाय्याने चार भांगांची कार्टून मालिका तयार करण्यात आली.
१. Gena the Crocodile (1969) -
२. Cheburashka (1971)
३. Shapoklyak (1974)
४. Cheburashka Goes to School (1983)
लाचखोर व्यापारी आणि सरकारी कंपन्या, नद्या प्रदूषित करणारे कारखाने, तात्कालीन अनागोंदी सोव्हिएत व्यवस्थेवर चेबुराश्का, गेना आणि मित्रमंडळ निष्पाप भाष्य करतात, चेबुराश्का खरं तर सोव्हिएत युनियनचा मिकी माऊस. चार वेळा सोव्हिएत रशियाचा ऑलिंपिक मास्कोट. पण जन्म झाला तो लोखंडी पडद्याआड. पलीकडच्यांना दिसला बराच उशीराने. सोबतीला सोव्हिएत इतिहास चिकटलेला. १९९१ मध्ये जेव्हा सोव्हिएत युनियनचा पाडाव झाला तेव्हाच्या अनागोंदीत 'चेबुराश्का कोणाचा?' यावरुन ज्या न्यायालयीन लढाया चालू झाल्या, त्या अजूनही चालूच आहेत. गेना, चेबुराश्का आणि इतर मंडळी एका परीने गतकाळाचे साक्षीदार. रशियाच काय जगही आज बर्याच अर्थाने पुढे गेलंय, वेगळं वळण घेतय. पण गेनाच्या सकारात्मक दृष्टीकोनातून बघायच तर...Лучшее, конечно, впереди. सर्वोत्तम काळ तर पुढे आहे..