पानगळ - माझ्या आठवणीतली

छान छान लॅंडस्केप्स बघायला मला आधीपासूनच आवडायचं. कॅालेजमध्ये असताना मला परदेशातल्या चित्रांचं एक कॅलेंडर मिळालं होतं. त्यातले फोटोज मला इतके आवडायचे की वर्ष संपल्यावर मी भिंतीवर लावायला त्या कॅलेंडरची एक फ्रेम केली. दर थोड्या दिवसांनी त्या फ्रेममधली चित्रं आम्ही बदलायचो.

बहिण जपानमध्ये गेल्यावर तिथल्या वसंत ऋतूतल्या साकुराबद्दल (चेरी ब्लॅासम) कळलं. त्याचं तिथे भरभरून होणारं स्वागत ऐकलं आणि नंतर स्वत: तिथे गेल्यावर बघितलंही होतं. पण पानगळीच्या/फॅाल/अॅाटमचं असं कौतुक मी ऐकलं नव्हतं. आठवायचं म्हटलं तर मला ह्या ऋतूचं वेड कोरियात बघितलेल्या रंगांनीच लावलं असं म्हणायला हरकत नाही. त्याआधी मी कुठे असे फोटो वगैरे बघितल्याचंही काही आठवत नाही.

त्याचं असं झालं….२००९ ला आम्हांला दक्षिण कोरियाला जायची संधी मिळाली. त्या वर्षीचा पानगळ ऋतू संपून तिथे थंडी सुरू झाली होती त्यामुळे त्या वर्षीचे पानगळीचे रंग बघायची संधी तर हुकली होती. तर….कोरियात जाऊन जवळपास वर्ष होत आलं आणि मला वेध लागले ह्या ऋतूचे. यथावकाश झाडांनी आपला हिरव्या रंगाचा वॅार्डरोब बदलून रंगीबेरंगी कपडे परिधान करायला सुरूवात केली. ते रंग बघून इतकं हरखून जायला झालं होतं की बास. मग एका विकेंडला आम्ही एका पार्कमध्ये गेलो तिथेही छान रंग बदलायला सुरूवात झाली होती. संध्याकाळच्या त्या मावळत्या उन्हात ती रंगीबेरंगी झाडं अजूनच चमकत होती. केबल कार घेऊन खाली आलो त्यामुळे मस्त एरियल व्ह्यू मिळाला. आता हा सिझन असेपर्यंत दर विकेंड कारणी लावायचा असं ठरवलं व ‘नामी आयलंड’ नावाच्या ठिकाणी गेलो. नामी आयलंड इतकं रंगीत झालं होतं की त्याच वेळेस मी ह्या ऋतूच्या अक्षरश: प्रेमात पडले.

img_1679.jpeg

img_1680.jpeg

img_1681.jpeg

सगळ्यांनाच त्या रंगांनी भुरळ घातली असावी कारण त्याच्या पुढच्या विकांताला आम्ही ‘तेदुनसान/देदुनसान’ नावाच्या एका डोंगरावर जायचा प्लॅन बनवला. तिथे दिसलेले रंग तर इतके व्हायब्रंट (मराठी प्रतिशब्द काय?) होते की अक्षरश: नि:शब्द व्हायला झालं. तिथून निघालो तरी मन मात्र तिथेच रेंगाळत होतं. बाकी कुठेही ॲाटमचे हे रंग बघायला गेलो नाही तरी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांनी वेगवेगळ्या रंगाचा साज चढवला होता. मला तर त्या रंगांनी इतकं वेड लावलं होत की घरी परतायची इच्छाही नसायची.

img_1694.jpeg

img_1682.jpeg

img_1683.jpeg

त्यावर्षीचा ऋतू संपला आणि थंडी सुरू झाली. पुढच्या वर्षी आपण इथे असू कां? आपल्याला परत हे रंग पहायला मिळतील कां असे प्रश्न मला पडले होते. नशीब चांगलं होतं आमचं म्हणून आम्हांला पुढचं वर्षही तिथे रहायला मिळालं. त्यावर्षी आम्ही अॅाटम बघण्यासाठी थोडा लांबचा पल्ला गाठायचं ठरवलं. सोलपासून बसने दीड-दोन तासांवर असलेल्या ‘सॅाराकसान’ नावाच्या एका डोंगरावर जायला निघालो. एका मैत्रिणीच्या नवऱ्याने काढलेले फोटो मी आधीच बघितले होते त्यामुळे तिथे केव्हा एकदा पोचतोय आणि ते बघतोय असं झालं होतं. तिथे त्या आणि दुसऱ्या दिवशी ढगाळ होतं पण त्या ठिकाणाने आम्हांला अजिबात निराश नाही केलं. इतके सुंदर रंग बघायला मिळाले की विचारता सोय नाही.

img_1684.jpeg

img_1685.jpeg

img_1686.jpeg

img_1687.jpeg

त्यानंतर मात्र मधली काही वर्ष अॅाटमच्या आठवणी काढण्यातच गेली. २०१९ मध्ये परत एकदा जपानला जायची संधी मिळाली आणि आपल्याला परत एकदा चेरी ब्लॅासम व फॅाल कलर्स दिसतील याचा आनंद झाला. ऋतू सुरू व्हायच्या आधीच तोक्योच्या आसपास कुठे जाता येईल ते गुगलवर शोधून ठेवलं. सिझन सुरू झाल्यावर एकदा माऊंट ताकाओला जाऊन बोहनी केली. नंतर आम्ही रहात होतो तिथून थोडं लांब एक पार्क होतं तिथे गिन्कोची झाडं लायनीत होती व ते बघायला खूप गर्दी असते असं कळलं. शोवा किनेन पार्कला त्या गिन्को झाडांच्या इथे फार गर्दी होतीच. शोवा किनेन फारच मोठं आहे. तिथेही छान दिसत होते फॅाल कलर्स. एका फेरीत समाधान झालं नाही म्हणून मग मी मधल्या वारी एकटीच गेले उंडारायला. मस्त वाटत होतं असं एकटंच निवांत फिरायला. छान उन्हात ते रंगही इतके चमकत होते. मधला वार असला तरी आजी-आजोबांची गर्दी होतीच. गारवा चांगलाच होता . त्या गारव्यातही काही आजी-आजोबा मस्त मेपलच्या झाडाखाली ऊन शेकत बसले होते. ७-८ जणं झाडाखाली बसून पेंटिंग करत होते. चालून चालून पायही थकले तसं शेवटी दुपारी स्वत:ला कसंबसं पार्कच्या बाहेर ढकललं.

img_1692.jpeg

img_1690.jpeg

img_1691.jpeg

img_1693.jpeg

नंतरच्या वर्षी कोरोनामुळे साकुरा बघायला जाता नाही आलं कुठेच पण अॅाटम येईपर्यंत बंधंनं थोडी शिथिल होऊन सगळं उघडायला सुरूवात झाली होती. भारतात परतायची तारीख नक्की झाली होती मग म्हटलं आता आपण कारूईझावाला जायचंच. कारूईझावाबद्दल इतकं ऐकलं होतं की तिथला फॅाल बघायच्या उत्सुकतेबरोबरच ते ठिकाणही बघायची उत्सुकता होती. ठरल्यावर सगळं बुकिंग वगैरे करून बुलेट ट्रेनने कारूईझावाला पोचलो. बघितल्याक्षणीच मला ते फार आवडलं. स्टेशनच्या आसपासच रंगांच्या वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. थोडा वेळ तिथे फोटो काढून आम्ही हॅाटेलवर सामान टाकलं आणि आसपासच्या जागा बघायला बाहेर पडलो. कुमोबा पॅांडला पोचलो. तिथे लोकांची गर्दी होतीच. लेकच्या सभोवताली असलेल्या झाडांनी नेहमीचा हिरवा रंग सोडून लाल, पिवळा, नारिंगी असे भडक रंग परिधान केले होते. तरीही ते डोळ्यांना इतके सुखावत होते.

img_1688.jpeg

दुसऱ्या दिवशी शिराइतो वॅाटरफॅालला गेलो. बसने जातानाच मला असं वाटत होतं की याचा आनंद घ्यायचा तर एकतर चालत जायला हवं किंवा मग आपली गाडी हवी. जाताना चांगलाच चढ होता मग आम्ही येताना पूर्ण उतरत यायचं ठरवलं. १० किमी अंतर होतं जवळपास पण त्या रंगांचा आस्वाद घेत घेत उतरायला इतकं भारी वाटलं की काय सांगू.

त्यानंतर आम्ही तोक्योच्या जवळपास असणाऱ्या २-३ ठिकाणी जाऊन फॅाल बघायची इच्छा पूर्ण केली. आता परत कधी आणि कुठला फॅाल सिझन बघायला मिळेल याचीच वाट बघतेय.

img_1689.jpeg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle