सोहोळा

एके रात्री उशिरा चित्रपट बघून मॉल मधून बाहेर पडलो. गाडीतून रस्त्यापलीकडची झाडं पूर्ण आणि नीट दिसत होती. दोन मिनिटं कळलंच नाही काय बघतोय आणि मग मन थाऱ्यावर आलं तेव्हा जाणवलं काय पाहिलं. ऊंचंच उंच झाडांवर चांदण्या लगडल्या होत्या. अगदी बहरलेल्या. झुंबरा सारख्या. अंधारात उजळून निघालेल्या. सगळी झाडं सोहळा साजरा करत होती. त्यांच्या आगमनाचा आणि असण्याचा. मी भान हरपून आणि मागे वळून बघत राहिले.

बुचाचं झाडं पहिल्यांदा seepz मध्ये पाहिलं. खूप झाडं पहिल्यांदा seepz मध्येच पहिली. पण बुचाच झाड खरंतर पहिल्यांदा जाणवलं मग पाहिलं. संध्याकाळी मंद सुगंध आला आणि नाकाला जाणवलेलं सौंदर्य डोळे शोधायला लागले. पायांखाली पांढऱ्या फुलांचा खच होता. लांब दांडा असलेली पांढरी फुलं. गुगल बाईने नाव, गाव, पत्ता सांगितला आणि मैत्रिणीने आठवण. बुचांच्या गजऱ्याची. माझी एक आठवण रुजली. नोव्हेंबरच्या आसपास. पण हि फुलं पायाखालीच दिसत राहिली. मान वर करून पाहिलं तरी फारशी दिसायची नाहीत.
असच एकदा नणंदेकडे जाताना तिच्या इमारतीच्या आवारात हि झाडं दिसली फुलांनी लगडलेली. झाडांचं छान असत एकदा का दिसली आणि ओळख झाली कि आपली होऊन जातात. कधीही, कुठेही, कशीही भेटली तरी आप्त भेटल्याचा सुख मिळत. इतकी बुचाची झाड बघून मला भरून यायचं बाकी होत.
आणि मग त्या रात्री तो सोहळा दिसला. किती सुंदर आणि निर्मळ. नुसताच बघत राहावा असा. शुभ्र सोहळा. आणि असे एक एक सोहळे आठवत गेले. वसंता पासून ग्रीष्मात पर्यंत चालणारे. आणि त्या आधी आणि त्यानंतरही.
माणसांचे कसे वेगवेगळे सण समारंभ साजरे होतं असतात तसे आजूबाजूला सोहळे चाललेले असतात. रोजच्या धबगाड्यातून लक्षात आले की आपण स्तब्ध होऊन ते बघत राहतो आणि दरवर्षी त्यांची वाट पहातो.
बहावा फुलाला की उन्हाळा संपत आल्याची चाहूल असते. तसा बहावा पण उशिराच कळला मला. बुचाची झाडं उंचच उंच त्यामुळे त्यांचा बहरण पायाखाली आधी दिसत आणि मग झाडावर. बहावा तसा उंच नाही आणि बुटकाही नाही. त्यामुळे त्याच बहरण दिसत लगेच. पण खरंच बहराव तर ते बहाव्यानेच. अमलताश किती मस्त नाव आहे ना !! अंधेरी मेट्रो सुरु झाल्या नंतरचा पहिला उन्हाळा. नवरंग टॉकीज समोर एक बहावा आहे. त्याला पानचं उरली नव्हती. नुसताच पिवळा सोहळा. आणि वरून बघताना खूप भाराने नम्र झालेला वाटत होता. किती किती बहरला होता. ओसंडून वाहत होता. आणि डोक्यावर सूर्य. बहाव्याच्या पिवळा रंग आणि सूर्यकिरणं. जी काय जुगलबंदी चालली होती वाटलं हि मेट्रो इथेच अशी थांबली पाहिजे. पण खरी गम्मत त्या क्षणातच असते. तासांत मिनिटात नाही. बहाव्याच फुलणं हा खरंच सोहळा असतो. दोन तीन आठवडे चाललेला. माझी एक मावशी म्हणते वर्ष भराचे आंबे मे महिन्यात खाउन घ्यायचे . तसा वर्षभराचा बहावा मे महिन्यात बघून घ्यायचा.
भर उन्हात ताम्हण बहारलेला पण असाच, एक सुंदर बघत राहाव अस दृश्य. पानापानात बहरलेला वेगवेगळ्या रंगाचा. गुलाबी, जांभळा आणि मग मोदकाच्या आकाराची फळं. seepz ने मला इकडे तिकडे बघायला शिकवलं.आणि हि सगळी झाडं ओळखीची झाली.
बहरलेला बकुळ टपटप पडत राहतो.आणि शांत शांत सोहळा साजरा करतो. बकुळीची फुलं एक वेगळा सुवास आणि रुपडं घेऊन येतात. ती उठून नाही दिसत. फक्त जाणवत राहतात आणि बोलावत राहतात. SNDT मध्ये रस्त्याच्या कडेला खूप झाडं होती. त्यामुळे बकुळ एकदम आवडती आहे.
फेब्रुवारी मार्च नंतर अंगावर एकही पान फुलं न घेता उभी असलेली झाडं दिसू लागतात. फक्त काटे अंगावर घेऊन उभी असलेली. उष्ण कटिबंधात असल्याने १२ माही अंगावर पालवी ल्यायलेल्या झाडांची सवय असते आपल्याला . फार कमीदा निष्पर्ण झाडं दिसतात. पण हे झाड असतं. शांत उभं. काटे अंगावर घेऊन. निष्पर्ण. शंकराची आठवण करून देणारा. आणि मग अचानक गुलाबी गुलाबी धुमारे दिसू लागतात. मऊ मऊ फुलं. त्यांचा मऊपणा डोळ्यांना पण जाणवतो. शाल्मली. किती बहरते ती. पान नाही फक्त फक्त फुलं. नजरेला सुखावणारी. भर उन्हात शांत शांत करणारी. काटेसावर. मग फळ, पानं आणि मग इकडे तिकडे उडणाऱ्या म्हाताऱ्या असा सुंदर सोहळा
बहर फक्त फुलांचा नसतो. पिंपळपान पाहिलंय? अहाहा… अगदी बालरूप ते सुंदर तारुण्य ते बहारदार वार्धक्य. सगळी रुप. आणि रंग तरी किती. तांब्याचा रंग ल्यायलेली झाडं हळू हळू रंग बदलत हिरवी होत जातात. सोनसळी रंग पण असतो. तस झाड बघणं भाग्य आणि शब्दात मांडणं अशक्य. पिंपळाची झाडं शोधून बघण्याचा छंद लावला मला त्या पालवीने. बहराव बहाव्याने तर पालवावं पिंपळाने. कधी तरी मला खरंच पिंपळ पानाचा फोटो फिचर करायचंय. एक झाडं आणि किती रूप.
शेकडो आंब्यांनी लगडलेलं झाड सगळ्यांनीच बघितलं असतं पण त्या आधीच आंबेमोहोर ह्या सोहळ्याची सुरवात आणि पिवळे धम्मक आंबे सांगता. काजू जांभुळीचा मोहोर पण असाच पण तो शांत न जाणवणारा. आजी फणसाला फणशीन म्हणायची. लेकुरवाळी, अंगाखांद्यावर फणस घेऊन मिरवणारी. किती समर्पक.
खरंतर असे कित्येक सोहोळे आजूबाजूला चालूच असतात. पहाटेच्या हि थोडं आधी त्याच्या आगमनाची तयारी सुरु होतं. आज कुठले रंग कुठे भिरकावयाचे कि सुंदर चित्र तयार होईल. ठरलेल असल्या सारखी मांडणी सुरु होते. आणि त्याच आगमन. आसमंत उजळून टाकणारं. सुरज चाचू असे तर चंदामामा अजूनच सुंदर. एक शीतलता घेऊन येणारे. उगवताना चंद्र पारदर्शक दिसतो, गुलाबी पिवळी छटा असलेले आणि मग शुभ्र होत जातो. सूर्याचा येणं जाणं सोहोळा तर चंद्रच स्वतः सोहोळा.
हे सगळे सोहोळे पंचेंद्रियांपैकी एक, दोन किंवा तीन सुखावणारे. पण एक वार्षिक सोहोळा असतो पंचेंद्रियांना सुखावणारा. खूप खूप वाट पाहिल्यावर अवचित येणारा. येताना चाहूल वगैरे नाही अगदी गाजत येणारा. रंगाची उधळण, आवाज आणि सुगंध. तप्त तप्त झालेली धरित्री आसुसून उठते. नगरे वाजतात. प्रकाश शलाका लाखाकते आणि मग तो येतो मेघ मल्हाराची धून वाजवत. सगळ्यांना तृप्त करत.
असे सोहोळे घडत राहतात. वर्षानुवर्षे रोज नवे. पाहत राहायचं आणि तृप्त होत राहायचं.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle