मैत्रीणींनो, माझी शालेय वर्ग मैत्रीण गायत्री पाठक- पटवर्धन ही पुण्यात सनाथ फाउंडेशन साठी काम करते. सनाथ ही १८ वर्षांवरील अनाथ मुलांच्यासाठी काम करते ह्या मुला मुलींना १८ झाल्यावर अनाथलयातून बाहेर पडावं लागतं. गायत्री बरेच उपक्रम सनाथसाठी राबवते त्यात सध्या पुस्तक डोनेशन उपक्रम आहे. इथल्या काही मैत्रीणी नक्कीच पुस्तक डोनेशन करु शकतात म्हणून इथे तिची पोस्ट देते आहे.
गायत्री ही स्वतः पाठक अनाथ आश्रमात वाढलेली आहे, त्यामुळे तिच्यापेक्षा जास्त कोण ह्या मुलांच्या भावना समजून घेऊ शकणार? त्यामुळे ती जे काम करते आहे ते अगदी तळमळीने करते आहे. त्यामुळे तुम्ही जी पुस्तके द्याल त्याचा योग्य उपयोग सनाथ मुलींसाठी नक्की होईल ही खात्री.
तिचा मेसेज खाली देते आहे. तिचे बाकी उपक्रम पण इथे शेअर करत जाईन. कोणाला मदत करायची असेल तर नक्की करा.
8 मार्च 2024 महिला दिनाच्या निमित्ताने महिनाभर आधी सनाथ वेलफेअर फाऊंडेशन,पुणे ' 'ती' ला देऊयात वैचारिक बळ...' हा एक अनोखा उपक्रम आयोजित करीत आहोत. यामध्ये आपण बालगृहातील माजी संस्थाश्रयी मुलींच्या, महिलांसाठी पुस्तक भेट देऊ शकता.
'इच्छा आकांक्षांना लगाम घालून
कधीही न व्हावी मनाची तडजोड
आव्हानांना पायदळी तुडवून
अविरत सुरू रहावी,
'ती' ची घोडदौड.
समाजात अशा अनेक महिला, मुली आहेत की ज्यांना अजून निराश्रितासारखे एकाकीपणाने जीवन जगावे लागते. विशेषतः बालगृहातून / अनाथालयातून बाहेर पडलेल्या अशा अनेक मुली महिला आहेत ज्यांना आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक कलाहांना सामोरे जावं लागतं. अनेक आव्हानांना त्या तोंड देत असतात. त्यांचा एकाचवेळी स्वतःचा स्वतःशीच आणि समाजाशीही एकाकी लढा चालू असतो.
अशावेळी त्यांना आपण सर्वांनी त्यांच्या आयुष्यात संवेदनशील, प्रोत्साहनपर पुस्तकांशी त्यांची मैत्री घडवून आणली तर...!!! या महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना आयुष्यात लढण्याची भावनिक, वैचारिक ताकद मिळावी म्हणून आपण सर्वांनी प्रत्येकीला दोन पुस्तक भेट दिली तर!!! असं म्हणतात 'वाचाल तर वाचाल'. हे वाक्य त्यांच्या आयुष्याला नक्कीच आधार देतील.
सनाथ वेलफेअर फाऊंडेशन,पुणे गेली 8 वर्षे महाराष्ट्रातील 18 वर्षावरील निराश्रित, अनाथ मुलेमुलीं तसेच बालगृहातून बाहेर पडलेल्या विधवा, परितक्त्या महिलांसोबत यांच्या शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि अधिकारांबाबत राज्यात कार्यरत आहे.
राज्यातील साधारणपणे 150 ते 200 मुली व महिलांना पुस्तक भेट देता यावी म्हणून या महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही संस्थेच्यावतीने अवांतर वाचनासाठीची समाजातील विविध स्तरातून पुस्तके संकलित करणार आहोत.
आपल्याकडून अपेक्षा
1) देणगी म्हणून देताना आपले पुस्तक शक्यतो 'महिला'या विषयावर आधारित असावीत. त्यामध्ये आत्मचरित्र, ललित, कविता, कांदबरी, कथा, स्त्री विषयक माहितीपर आदी पुस्तक प्रकार चालतील.
2) इच्छुक देणगीदाराने प्रत्येकी किमान दोन पुस्तक भेट द्यावी( दोन पेक्षा अधिक चालेल) . संस्थेच्या अनेक उपक्रमात मुली, महिला येत असतात. संस्थेच्या ग्रंथालयात आपन दिलेल्या देणगीची पुस्तकं या मुलींना नक्की उपयोगी पडतील.
3) आपले देणगी पुस्तक जुने, नवे असले तरी चालेल. जुनी पुस्तक असल्यास शक्यतो फाटलेले, निखळलेले असू नये. वाचनीय अवस्थेत पुस्तकं असावीत
4) आपण संस्थेस देणगी देत असलेले पुस्तकामध्ये आपले नाव व त्याखाली ' सनाथ माहेरवाशिणीस सप्रेम भेट' असे लिहून द्यावे. म्हणजे आपली एक आठवण तिच्याकडे विचारांच्या रूपाने कायमस्वरूपी राहील.
5) आम्ही हे सर्व पुस्तक 8 मार्च महिला दिनापूर्वी एकत्रिपणे संकलित करणार आहोत. संस्थेच्या खालील पत्त्यावर आपण अवांतर वाचनाची पुस्तकं पाठवू शकता.
6) काही शंका किंवा सूचना असल्यास आपण आम्हाला थेट संपर्क करू शकता.
संपर्क - सौ. गायत्री पाठक- पटवर्धन
संचालिका
सनाथ वेलफेअर फाऊंडेशन,पुणे
मोबाईल- 7776043131
पुस्तकं पाठवण्यासाठी पत्ता :
गायत्री पटवर्धन
पवन D, ६०६
DSK विश्व
धायरी, पुणे.