प्रत्यक्षासम प्रतिमा उत्कट - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - रणदीपनं यशस्वीरीत्या पेललेलं आव्हान.
मी स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे पारतंत्र्याच्या अनुभवातून होरपळून निघालेले नाही. तरीही बालभारतीच्या पुस्तकात वा इतिहासविषयक ग्रंथांत तत्कालीन भारताबद्दल वाचनात आलेलं. त्यामुळे स्वा. सावरकर हे नाव तेव्हापासून परिचित. मराठीच्या पुस्तकात 'माझी जन्मठेप' मधले एक- दोन प्रसंग होते. त्या संदर्भात पुढे मूळ पुस्तक वाचलं. 'काळे पाणी' व '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' अशी पुस्तकं वाचल्यानंतर मग वीर सावरकरांची लेखनशैली व एकंदर देशकार्य व तत्संबंधी लेखनाचा सूर आणखीन थोडा उमगत गेला.
अर्थात् वाचकांचा गोंधळ उडाला असेल, की हे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल लेखन आहे कि त्यांच्या लेखनाबद्दल.. हो ना?
तर लेख चित्रपटाबद्दलच आहे. परंतु मी हा चित्रपट बघण्यासाठी प्रवृत्त कशी झाले, याचा थोडा धांडोळा घेतला, एवढंच. स्वा. सावरकर हे नाव आणि कलाकार रणदीप हुडाच्या यातील कामाबद्दल कानांवर आलेले प्रशंसोद्गार ह्या दोन्ही कारणांमुळे आज चित्रपट पाहिला.
वीर सावरकर ही व्यक्ती, तिचे व्यक्तिगत गुणविशेष व तिची देशभक्ती यांपैकी - देशभक्ती हा पैलू , (ज्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार नव्हे तरीदेखील) तो अतिशय प्रभावीपणे या चित्रपटात मांडलेला आहे आणि वर नमूद केल्याप्रमाणे, पूर्वी वाचन केल्यावर वीर सावरकर या जाज्वल्य देशभक्ताचं जे व्यक्तिमत्त्व मनात नोंदलं गेलेलं, ते प्रस्तुत चित्रपटात अतिशय मेहनतीने रणदीप हुडा नं साकारलेलं आहे. किंबहुना, ते इतकं भावलं, त्यायोगे लेखणी हाती घेतली आहे.. (या सदरात लिहिण्याचा फारसा अनुभव नाहीये हं)
वीर सावरकरांच्या जीवनाचा, चरित्राचा आणि त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा असा वेगवेगळा आढावा घेणं अर्थातच अवघड आहे, इतकं ते देशाप्रति समर्पित जीवन जगले होते.
इथे त्यांच्या अगदी जन्मापासून नव्हे, तर त्यांच्या वडिलांच्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. कोविड काळात आपल्याला ऐतिहासिक, स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगमुळे काय नि कसा हाहाकार उडाला होता, याबद्दल वाचायला मिळालं होतं. टिळकांवरील काही लेख व चित्रपटातही याचा संदर्भ आलेला आहे. म्हणजे हा काही नवीन विषय नाही. तरीही इथल्या दृश्यांचा मनावर परिणाम झाला. कदाचित संपूर्ण चित्रपट एका विशिष्ट रंगछटेचा तंत्रात्मक वापर करून चित्रित केल्यामुळे असेल. मला या क्षेत्रातील काही गंध नसला तरी, दृश्यात्मक परिणाम साधण्यासाठी किंवा विशिष्ट विचार वा व्यक्तीची भव्यता दर्शविण्यासाठी, गांभीर्य ठसविण्यासाठी, सेपिया - गडद तपकिरी - राखाडी छटा /अंधाराच्या पार्श्वभूमीवर कालानुरूप योजलेले प्रकाशाचे माफक स्त्रोत इ. तांत्रिक गोष्टी संपूर्ण चित्रपटभर जाणवल्या. तिन्ही सावरकरबंधूंचं सक्रिय आणि येसूवहिनी व माई सावरकरांचं अबोलपणे, अप्रत्यक्षपणे क्रांतिकार्यास जोडून घेणं, वि. दां चं लंडनला कायद्याच्या अभ्यासाकरता प्रयाण, तिथून भारतीय क्रांतिकार्यास प्रेरणा व सहाय्य, पुढे प्रसिद्ध अशी मार्सेय ची उडी, काळ्या पाण्याची शिक्षा इ. गोष्टी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहिल्या. अर्थातच ते दीर्घकाळ अंदमानला कारागृहात राहिल्याने तिथलं जीवन अधिक तपशीलांसह दाखवलंय. कोलू, बारी साहेब, खोड्याची शिक्षा, काथ्याकूट, मारहाण जिवंत अळ्यांसहित निकृष्ट दर्जाचं (किमान माणुसकीही न दाखवता) जेवण, (मूळ पुस्तकात तर गोम, पाल, इ. चा उल्लेख वाचलेला) विशेषतः राजकीय कैदी असूनही तशा दर्जाची वागणूक न देणं इ. वाचणं जितकं क्लेशदायक होतं त्याहून अधिक त्रास ते इथे बघताना झाला.. म्हणजे काय कि , ते देशाच्या न्याय्य स्वातंत्र्यासाठी लढत असताना अशी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणं दिली जाणारी वागणूक सहन करणं, अनन्वित छळ होऊनही मनाचं खच्चीकरण होऊ न देणं.. हे पाहताना सतत "अनादि मी, अवध्य मी.." या त्यांच्या ओळी आठवत होत्या, नव्हे, ते अशाच भावनेनं अंदमानमधल्या छळातून टिकून राहिले असतील, असं वाटलं.
(स्पॉयलर टाळण्यासाठी) सगळ्याच घडामोडी लिहीत नाही.
दिग्दर्शक म्हणून रणदीप हुडा चं हे पदार्पण असलं, तरी कलाकार म्हणून मला त्याचे काही चित्रपट आधीही आवडलेले आहेत. पण वीर सावरकर साकारताना त्यानं जी मेहनत, गृहपाठ केलाय आणि जी देहबोली साधलेली आहे, ती अतिशय कौतुकास्पद आणि आश्चर्यकारक आहे . म्हणजे ते वीर सावरकर म्हणून दिसत राहतात, हुडा म्हणून नव्हे..फक्त मराठी उच्चारांवर जरा अधिक काम केले असते तर अधिक अचूकता आली असती.
रंगभूषाकारानंही कमाल केली आहे. त्या मानाने अंकिता लोखंडेला फूटेजही कमी आहे आणि रंगभूषाकारानं तिच्या बाबतीत तितकं बारीक काम केलेलं जाणवलं नाही. तरीही लक्षणीय गोष्ट म्हणजे माई व येसूवहिनी कोरीव भुवयारहित व अगदी साध्या परिधानात (वस्तुनिष्ठपणा जपलेला आहे) वावरताना दिसतात. इथे नीधप सारखे तज्ज्ञ लोकांना याबद्दल अधिक सांगता येईल कदाचित.
तो काळ उभा करताना काही तपशिलांवर लक्ष दिलेलं आहे. उदाहरणार्थ कंदील, भारतातील ब्रिटिशांची चैनीची राहणी (पायपंखे? चालवणारा एतद्देशीय माणूस), लेखणी, शाई वाळवण्याची पद्धत, इ.
मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मणी कुटुंबातील पती-पत्नींची संवाद साधण्याची पद्धत थोड्या दिग्दर्शकीय स्वातंत्र्यानं दाखवली असली तरी अगदी 'तान्हाजी' मध्ये दाखवल्याप्रमाणं पारावार गाठलेला नाही. भावाभावांमधले प्रसंग अतिशय ह्रद्य आहेत. (अवांतर - माझ्या +१ चं भावंडांशी असलेलं बॉन्डिंग आता मला अधिक उमगेल)
एकुणात चित्रपट प्रभावशाली वाटला, घरी आल्यावर पुन्हा एकदा 'माझी जन्मठेप' उघडून बघण्याची उत्कंठा वाटली, पण...
"रणाविण स्वातंत्र्य कोणास मिळाले" हे खरं असलं तरी नेसत्या वस्त्रानिशी माई व येसूंना घराबाहेर पडताना पाहून कळवळायला झालं. सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबाची त्या वेळी थोड्याफार फरकाने अशीच दुरवस्था झाली असणारे, याचा विषाद वाटला.
त्यामुळे लेखाच्या शेवटास येता येता, एवढं नक्की म्हणावं वाटतंय, की हा चित्रपट पाहण्यासाठी वीर सावरकरांचे अगदीच भक्त असण्याची आवश्यकता नाही. पण देशभक्तीचा इतका उत्कट प्रत्यय अनुभवण्यासाठी, स्वातंत्र्याच्या मूल्याची पुनः जाणीव होण्यासाठी, किंवा किमान रणदीप हुडा याच्या चांगल्या अभिनयासाठी तरी चित्रपट पहाण्यास हरकत नसावी.
इति अलम् |

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle