पूर्वतयारीचा वेळ:
१ दिवस
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) - दोन वाट्या
उकडा तांदूळ - दोन वाट्या
उडीद डाळ - एक वाटी
मेथीचे दाणे- अर्धा चमचा
चवीनुसार मीठ.
नेहमीच्या इडल्यांसाठी मी एक वाटी उडीद डाळीला चार वाट्या तांदूळ घेते. काही वर्षांपूर्वी आमच्या समोर एक तमिळ कुटुंब रहात असे. त्या काकूंच्या हातच्या इडल्या 'आहाहा' कॅटेगरीतल्या होत्या. सोबत चटणी किंवा सांबार, काहीही घेतलं नाही तरीही अतिशय चविष्ट लागायच्या. त्यांनी हे प्रमाण एकदा सांगितलं होतं आणि मी निष्ठेने (आणि प्रयोग करण्याच्या आळसाने) वर्षानुवर्षे याच प्रमाणाने इडल्या करते. माझ्या अर्थातच त्यांच्यासारख्या भारी होत नाहीत, पण नक्कीच चांगल्या होतात. त्यांच्याकडे वेट ग्राईंडर होता, माझ्याकडेही आहे. डाळ-तांदूळ वाटून ठेवले की त्याच पिठाचे एकदा डोसे, एकदा इडल्या, पीठ उरलंच तर उत्तप्पे करते. डोशासाठी आणि इडलीसाठी वेगवेगळं प्रमाण घेण्याचे कष्ट घेत नाही. Happy डोसे-इडल्या दोन्ही छान होतात.
मात्र वाटलेलं पीठ मुळातच वेगवेगळ्या प्रमाणात पाणी घालून वेगवेगळं ठेवते. म्हणजे डोशासाठी जरा पातळसर करून एका भांड्यात, इडलीसाठी जरा घट्ट दुसऱ्या भांड्यात.
तुम्ही मिक्सरमध्ये डाळ-तांदूळ वाटत असाल आणि वेगळं प्रमाण घेत असलात तर तसंच घ्या. फक्त तांदूळ नेहमी जेवढे घेत असाल त्याच्या निम्मे घेऊन उरलेली नाचणी घ्या.
याचेच डोसेही छान होतात.
क्रमवार पाककृती:
तुम्ही नेहमी इडल्या करत असलात तर कृतीत नवीन काहीही नाही.
डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवायचे. त्यातल्याच एका भांड्यात मेथीचे दाणेही घालून ठेवायचे. मी पाच तास ठेवते. तुम्ही नेहमी जेवढा वेळ ठेवता तेवढा वेळ ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे वाटून घ्यायचं. मी तांदूळ आणि नाचणी एकत्र वाटते. त्यामुळे नाचणी चांगली वाटली जाते.
सगळं वाटून झालं की नीट एकजीव करून, चवीनुसार मीठ घालून फुगण्यासाठी ठेवून द्यायचं. शक्यतो रात्री. म्हणजे सकाळपर्यंत पीठ छान फुगतं. नाचणीमुळे पीठ लवकर फुगतं असा माझा अनुभव आहे. शिवाय सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे पुरेशा मोठ्या भांड्यात पीठ ठेवलेलं चांगलं. नाही तर सकाळी उठल्यावर पीठ उतू गेलेलं दिसतं आणि वैताग येतो असा स्वानुभव आहे.
तर, पीठ पुरेसं फुगलं की डावेने हलक्या हाताने ते हळूहळू ढवळायचं. आतली थोडी हवा बाहेर जाते, पण पीठ चांगलं एकजीव, सरसरीत होतं. वाफवल्यावर इडल्या व्यवस्थित फुगतात. इडलीपात्रात पुरेसं पाणी घेऊन ते गरम करत ठेवायचं. इडलीच्या साच्याला प्रत्येक खळग्यात पुसटसा तुपाचा हात लावून त्यात पीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की स्टँड आत ठेवून झाकण लावून बारा-तेरा मिनिटं इडल्या वाफवायच्या. वाफेच्या वासावरून समजतं, इडल्या झाल्या की नाही ते. झाल्या की स्टँड बाहेर काढून, तिरका करून आत साठलेलं वाफेचं पाणी काढून टाकायचं. प्रत्येक ताटली वेगळी करायची. थोड्या गार झाल्यावर इडल्या काढून घ्यायच्या. चटणी किंवा सांबाराबरोबर खायच्या.
फोटोत टॉमेटो चटणी आहे. नीधपची कृती आहे मायबोलीवर. तशीच केली आहे.