कोकणात आंब्याच्या मोसमात आमच्याकडे कोयाडे खूपदा केले जाते, पण त्याचा हा गोवन चुलतभाऊ एकदा करून बघायचा होता. 'घोट ' म्हणजे रायवळचे लहान गोलसर आंबे. पिकल्यावर आंबटगोड चव लागणारे आणि बाठीला भरपूर रेषा असणारे कुठलेही लहान गावठी आंबे चालतील. हापूस चुकूनही नको. (तोतापुरी तर नकोच नको, त्याला मी आंबाच म्हणत नाही. आंब्याच्या बाबतीत आहे बाबा मी रेसिस्ट!!)
सध्या घरी मला आवडतात म्हणून आलेली एकच पायरीची पेटी सगळ्या हापूसमधून टुकटुक करत होती. मग त्यातलेच तीन आंबे घेतले. खाणारी दोनच माणसं म्हणून!
साहित्य:
रायवळ/गावठी आंबे - ३
खवलेला ओला नारळ - पाऊण वाटी
मोहोरी - १ टी स्पून
हिंग - अर्धा टी स्पून
मेथी - अर्धा टी स्पून
सुकी लाल मिरची - दोन (मी चिली फ्लेक्स घातले!)
हळद - अर्धा टी स्पून
गूळ - पाव वाटी
चिंच - एक बुटुक (गरज असल्यास)
खोबरेल खाद्यतेल - दोन चमचे
कृती:
१. आंबे धुवून, पुसून त्याचे डेख नखाने काढून, डेखापाशी किंचित पिळून चिक काढून टाका. (गावठी आंब्यात चिक भरपूर असतो, तो पिळून टाकला नाही तर तोंड आणि घसा खवखवतो.) मग आंबा हाताने सगळीकडून दाबून मऊ करा आणि कोय रसासह पातेल्यात टाका. त्यावर उरलेला सालातला रस पिळून घ्या.
२. एका तडका पॅन मध्ये अर्धा टी स्पून मोहरी नुसतीच जरा भाजून घ्या. जळू देऊ नका. ती काढून त्यातच हिंग भाजून घ्या.
३. आता मिक्सरमधे खवलेला नारळ, लाल मिरची, भाजलेली मोहरी आणि अर्धा टी स्पून हळद आणि जरा पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्या.
३. आता कढईत दोन चमचे खायचं नारळ तेल घाला. (ते नसेल तर तीव्र वास नसणारे कुठलेही तेल.) त्यात मोहरी तडतडली की त्यात मेथी दाणे आणि भाजलेला हिंग घालून वर आंब्याच्या कोयी आणि रस घालून नीट ढवळा. त्यात अर्धी वाटी पाणी घालून, झाकण ठेऊन दोन तीन मिनिटं शिजू द्या.
४. आता त्यात वाटण घालून नीट ढवळा. चव बघून हवं असल्यास थोडं लाल तिखट घाला, आंबा कितपत गोड आहे बघून गूळ घाला. आंबा अजिबात आंबट नसेल तर थोडा चिंचेचा कोळ घाला. चवीनुसार मीठ घालून पुन्हा अर्धी वाटी पाणी घालून, झाकण ठेवून पाच मिनिटे शिजत ठेवा. बास, आपलं नाजूकसाजूक, चटकदार सासव तयार! पोळीपेक्षा गरम भाताबरोबर ओरपायला जास्त मजा येते!!