आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,
"इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु?
हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु?
मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना,
कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।"
- वृंदा टिळक
आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही.
सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते. हरहर महादेव!!
एका संस्मरणीय ट्रेक मध्ये असावे ते सगळे आज होते. चढ उतार होते, घनदाट जंगल होते, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज होते, वन्य श्वापदे येऊन गेल्याच्या खुणा होत्या, ऱ्होडोडेंड्रॉन तर होतेच शिवाय इतरही रानफुले होती, झरे, धबधबे, नदी सगळे सगळे होते. आजच्या दिवसाचे निसर्गवैभव काही खासच होते.
हा उतार देखील खूप तीव्र होता. पण कालच्या प्रॅक्टिस नंतर आज तो तितकासा त्रासदायक वाटला नाही.
अधूनमधून असे पाण्याचे प्रवाह दिसत होते.
आज जंगलातला रस्ता, फुलझाडे आणि जवळ असलेले पाण्याचे साठे ह्यामुळे बऱ्याच पक्ष्यांची चाहूल लागत होती. मध्येच किलबिलाट ऐकू येत होता. गेल्या तीन दिवसांत दिसली होती त्यापेक्षा वेगळी फुले दिसत होती.
ह्या फुलांचे नाव Himalayan Peony. हिमालयात रानटी फुल म्हणून वाढते. ह्याचे अनेक औषधी उपयोग असल्याने त्याला हिमालयन पॅरासिटामॉल पण म्हणतात.
इतक्या दिवसांत कुठे न दिसलेले बांबू देखील दिसले. हिरवे आणि पिवळे असे दोन प्रकारचे होते.
आजूबाजूच्या झाडांविषयी, फुलांविषयी, तिथे आढळणाऱ्या प्राण्यांविषयी लोकल गाईडकडून माहिती मिळत होती. अर्थात जेव्हा सर्वजण दोन मिनिटे थांबू शकतील असे ठिकाण असेल तेव्हाच बोलणे शक्य होते.
आज जलप्रवाहांची साथ होती. अधूनमधून असे झरे दिसत होते.
पाणी प्यायला पाणवठ्याशी येणाऱ्या प्राण्यांना लपायला घनदाट जंगल होते. त्यामुळे आम्हाला केवळ त्यांच्या झाडांच्या बुंध्यावर दिसलेल्या खुणांवर समाधान मानायला लागले. आणि समजा खरेच वन्य प्राणी समोर आले असते तर पळता भुई थोडी झाली असती..अक्षरश: !!! कारण तिथे जागाच कुठे होती पळायला!!!
तुंगनाथ चंद्रशिला मध्ये जिचा उगम आहे ती आकाश कामिनी नदी आम्हांला दिसली. दिसायच्या आधीपासूनच ऐकू येऊ लागली होती. जंगल, फुले, पक्ष्यांचे आवाज आणि ऐकू येणारा नदीचा खळखळाट .. सगळेच कसे मन शांत करणारे.
एका वळणावर ती सामोरी आली. अजून अगदी बालरुपात होती. अजून उन्हाळा वाढला की बर्फ वितळेल आणि मग आकाशकामिनीचे पाणीही वाढेल, रुप बदलेल.
पाण्यात एक झाडाचा बुंधा आडवा टाकून त्याला टेकून ओळीने ठेवलेले मोठाले दगड असा तो पूल होता. पाण्याच्या वेगाने आणि आम्ही पाय दिल्याने दगड हलत होते. पूल ओलांडण्याचा थरार वाढवत होते. इथे आम्हाला थोडा वेळ शांतपणे बसता आले.
पुढची वाट खुणावत होती. साधारण तासभर जंगलातून चालल्यावर अशी वाट आली की बाकी कसलाच आवाज येत नव्हता. आम्हीही सगळे अगदी शांतपणे चालत होतो. आवाज असेलच तर तो वाहणाऱ्या वाऱ्याचा, पानांच्या सळसळण्याचा, पायांखाली येणाऱ्या वाळलेल्या पानांचा आणि दूर कुठेतरी पाण्याचाही.
आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांजवळ बसलो होतो. केवळ झाडांची संगत अनुभवत होतो. श्वासातून येणारी जंगलातील ताजी हवा, डोळ्यांना दिसणारी जंगलातील हिरवाई, कानांना तृप्त करणारी जंगलातील शांतता अनुभवत होतो. जंगलातले वेगवेगळ्या वनस्पतींचे वास अनुभवत होतो. बसल्यावर होणारा मातीचा, पानांचा, दगडांचा स्पर्श अनुभवत होतो. शांत होतो. आसपासचे सगळे वातावरण स्वतःत मुरवून घेत होतो. मन संपूर्णपणे तिथेच होते. जागरूकपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. जपानी शिनरीन योकू - फॉरेस्ट बाथ सारखाच हा अनुभव होता.
तिथून निघालो तेव्हाही सगळेजण शांत होते. एक अनामिक भारावलेपण जाणवत होते. वाटेने दिसणारी वेगवेगळी रानफुले आपल्या सौंदर्याने मोहवत होती.
अनेक फुले, झरे लागलेली ती जंगलवाट अजून तासभर चालल्यावर एक मोठे पठार आले. ह्याचे नाव होते 'शामखुदी बुग्याल'. ऊन होतेच. तशी अगदी डोक्यावर सावली नव्हती. पण आजूबाजूच्या झाडांमुळे उन्हाचा तडाखा तितकासा जाणवत नव्हता.
तिथे जवळच गुराख्यांच्या दगडी झोपड्या होत्या. आत्ता त्या रिकाम्याच होत्या. पण उन्हाळ्यात आसपासचे गुराखी तिथे गुरे घेऊन येतात आणि राहतात असे कळले.
तिथून निघाल्यावर पुन्हा वाटेत अनेक लहान जलप्रवाह लागले. त्यांना ओलांडून पुढे जात होतो. आता पुन्हा अनेक फुललेली ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे दिसत होती.
त्यानंतर दहा पंधरा मिनिटांत आम्ही चक्क एक सडक ओलांडली. तीन दिवसांनी असा रस्ता पाहून काहीतरी वेगळेच वाटले. आता सडकेवरून चालायला कंटाळा येईल असेही मनात आले. पण सुदैवाने मिनिटभरातच पुन्हा जंगलवाट आली. आता आमचा कॅम्प जवळ आला होता. पण तिथे पोचण्याचा रस्ताही सोपा नव्हताच!!
आज समिट करून आलेला ग्रुप तिथे जेवणासाठी आणि सामान घेण्यासाठी आला होता. ते सगळे पुन्हा सारीला जायला निघाले होते. आम्हां २५ जणांखेरीज इतर कोणीदेखील आम्हाला तीन दिवसानंतर दिसले होते. समिट करून आलेला ग्रुप पाहून आनंद झाला. ह्यांना जमले तसे आपल्यालाही समिट जमेलच असेही वाटू लागले.
आज आम्ही सहा सात तास चाललो होतो. अल्टीट्युड गेन साधारण हजार फुटांचा होता. पण आज थकवा अजिबात जाणवत नव्हता.
आधीच्या सर्व कॅम्पसाईट प्रमाणेच बनियाकुंड कॅम्पसाईट देखील फार सुंदर ठिकाणी होती.
आम्ही पोचलो तेव्हा थेम्ब थेम्ब पडणाऱ्या पावसाचा वेग वाढला होता. पाहता पाहता एका कोपऱ्यातील पर्वतशिखरे ढगांनी झाकून टाकली.
पावसाने पलीकडचे दृश्य झाकून टाकले. उरली ती ओलेती झाडे आणि पावसात भिजत असलेले आमचे चिमुकले टेन्ट्स.
उद्याच्या दिवसाची खूपच उत्सुकता होती. उद्याचा दिवस स्वप्नपूर्तीचा होता असे मी म्हणणार नाही. कारण ट्रेकचा प्रत्येक दिवस आणि क्षण स्वप्नवतच होता. पण तरीही तुंगनाथ आणि चंद्रशिला पाहण्याची अतीव उत्सुकता आणि आतुरता होती हे देखील खरेच.
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. (कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! )त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.