देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5 - अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

१५ एप्रिल, त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.
उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.
इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत जाग आणत असावा!!
पहाटे पावणेदोनलाच उठले. टेन्टमेंटला त्रास होऊ नये म्हणून अगदी आवाज न करता टेन्ट उघडला. स्नेहाच्या टेन्टशी जाऊन तिला हाक मारली. ती पण जागी झालेलीच होती. मग आम्ही दोघी निघालो बायो टॉयलेट्स च्या दिशेने. कॅम्पसाईट्स वर सगळीकडे बायोटॉयलेट्सच होती आणि ती कधीच आमच्या टेन्ट्सच्या जवळ नसायची. थोडे चालून गेल्यावर, एखादा चढ चढल्या अथवा उतरल्यावर टॉयलेट्सचे टेन्ट असायचे. बनियाकुंड कॅम्पसाईट देखील त्याला अपवाद नव्हती. त्यात काल झालेल्या पावसाने झालेला थोडा चिखल, पहाटे पावणे दोनचा गडद अंधार, थंडी, आमच्या हेडलॅम्प्सचाच पडेल तितकाच उजेड अशा सगळ्या वातावरणात आम्ही टॉयलेट्स टेन्ट्सला जाऊन आलो. स्नेहाला झाडांमध्ये काहीतरी चमकल्यासारखे वाटले. पण पुन्हा पाहिले तर काही दिसले नाही. तसेही इतक्या अंधारात आणि आजूबाजूला असलेल्या दाट जंगलझाडीत काही असते तरी लक्षात येणार नव्हतेच.
दोन वाजता वेकप कॉल झाला. सगळेजण जण उठून आवरू लागले. ब्रेकफास्ट झाला. आता निघायच्या आधी टॉयलेटला पुन्हा जाऊन यावे म्हणून गेलेल्या दोन मैत्रिणी मेन डायनिंग टेन्ट मध्ये आम्ही सगळे होतो तिथे पळतच आल्या. इतके अंतर पळत आल्याने त्यांना धाप लागली होती. त्यांना चमकणारे डोळे आणि काही प्राणी दिसले होते. ट्रेक लीडर सांगत होता, प्राणी काही करणार नाहीत. आपण त्रास दिला नाही तर तेही काही करत नाहीत. मग मोठा घोळका आणि ट्रेक लीडरची मिरवणूक टॉयलेट्स च्या दिशेने निघाली. जवळच्या झाडीत, खरेच होते दोन/तीन प्राणी. पण काय आहे ते मात्र आमच्या हेड टॉर्च च्या अपुऱ्या उजेडात दिसले नाही. अशा तऱ्हेने वन्य प्राणी बघण्याची हौस देखील भागली!!
सगळ्यांचे आवरून तीन/ सव्वा तीन वाजता आम्ही निघालो. आमच्या हेडलॅम्पचा उजेड पायापुरता पडत होता. असे स्वयंतेजाने उजळलेले आम्ही अंधारात चालत होतो. इतके पंचवीस जण सोबत होतो, ओळीने चालत होतो म्हणूनच धीर वाटत होता. नाहीतर रस्ता दिसत नव्हता, डोंगरातला चढ, कडे, ओबडधोबड दगड, मध्येच डावीकडे आलेली दरी, एकट्यादुकट्याची अजिबात हिंमत झाली नसती.
आज आम्हाला वेळेची मर्यादा घातलेली होती. हिमालयात आणि इतक्या उंचीवर तर मोसम कधी बदलेल सांगता येत नाही. खूप पाऊस आला, वादळ झाले किंवा बर्फ पडायला लागला तर आम्हाला चालायला जास्त वेळ लागला असता. आम्हाला सांगितलेले होते की साडेनऊपर्यंत आम्ही चंद्रशिलाला पोचलेलो नसलो तरी जिथे असू तिथून परतीचा प्रवास सुरु करायचा. त्यामुळे आज कोणीच रेंगाळत नव्हते. मी अगदी दुसऱ्या नंबरला चालणार होते. म्हणजे ट्रेक गाईड पहिला आणि त्याच्या मागे मी. त्यामुळे मला तर भराभर चालण्याची विशेष ओढ वाटत होती. जितके लवकर पोचू तितका समिटवर जास्त वेळ मिळणार होता.
भरपूर चढ चढल्यावर, तासाभराने आम्हाला दोन मिनिटे बसता येईल, विश्रांती घेता येईल अशी जागा आली. कधीचा एक कुत्रा आमच्या सोबत चालत होता. तो देखील थांबला. आता पहाटेचे सव्वाचार वाजले होते.
इतक्यावेळ आम्हाला आजूबाजूचे काहीही दिसत नव्हते. कारण आम्ही डोंगरातूनच चालत होतो. पण आता इथून चोपटा शहराचे लाईट्स दिसले.
मिनी स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध असलेले चोपटा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. चोपटा इथे जाण्यासाठी रुद्रप्रयाग हून गाडीचा रस्ता आहे. त्यामुळे तिथे सगळेजण जाऊ शकतात. अनेक रिसॉर्ट्स, हॉटेल्स आहेत. अनुपम सृष्टीसौंदर्य आहे.
थोड्या वेळात आम्ही चोपटा क्रॉस केले. घरे, हॉटेल्स लागली आणि भरपूर कचरा देखील दिसला. तीन चार दिवस जंगलात चालत होतो तेव्हा कचरा बघायची सवय मोडली होती. माणूस जिथे जाईल तिथे घाण करतो हे पुन्हा एकदा लक्षात आले.
चोपटाच्या पुढील तुंगनाथ पर्यंतचा रस्ता दगडांनी बांधलेला होता. त्यामुळे जरी चढ असला तरीही रानवाटांपेक्षा तुलनेने सोपा वाटला.
आता साडेपाच होत आले. दिशा उजळल्या होत्या. पर्वतशिखरांचे, झाडांचे आकार दिसू लागले.
एरवी इतके लक्षात येत नाही. पण आता अक्षरशः मिनिटामिनिटाने प्रकाश वाढत होता. आजूबाजूचे दृश्य त्या प्रकाशात एखाद्या जादुई विश्वासारखे दिसत होते.
आता सहा वाजत आले. आता पर्वतांची शिखरे प्रकाशाने उजळू लागली होती. अजून आम्हाला सूर्यदर्शन झालेच नव्हते.
आता आम्हाला पाच मिनिटे विश्रांतीसाठी मिळाली. आजूबाजूचे अद्भुत दृश्य डोळे भरून पाहता आले. धुके आणि ढग दोन्हीही सतत येत जात होते. संपूर्ण रस्ता सतत चढाचाच होता. फक्त तो तीव्र चढ नव्हता इतकेच.
आता अधूनमधून थोडा बर्फ दिसू लागला. आम्हाला हिमालयन मोनाल पक्ष्यांची जोडी देखील दिसली. सुंदर रंगांची उधळण असलेला नर आणि तपकिरी एकरंगी मादी असे मोनाल पक्षी असतात. मी तरी ते पक्षी पहिल्यांदाच पाहिले.
मोरपिसाऱ्याची आठवण करून देणारे त्याचे अंग, मानेला आणि शेपटीला अजूनच वेगळे रंग, सगळीच झळाळती रंगसंगती नजर वेधून घेणारी होती. फोटो तितकासा स्पष्ट नाही. कारण एकतर तो पक्षी खूप दूर होता आणि खूप वेगात जात होता.
आता तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला दिसू लागले.
अजूनही हा आमच्यासोबत होता. प्रत्येक दिवशी किती फेऱ्या करत असेल कोण जाणे!! तुंगनाथच्या रस्त्यावर आता इतर लोकदेखील दिसू लागले होते. कचरा देखील होताच. अन्नपदार्थांची रिकामी पॅकेट्स, टिश्यू पेपर्स, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणखी कितीतरी गोष्टी आजूबाजूला फेकलेल्या होत्या. तरी अजून तुंगनाथ मंदिर बंद होते. बहुतेक सगळी दुकाने बंद होती. येणारे लोक म्हणजे पर्यटक आणि ट्रेकर्स इतकेच. तरी एवढा कचरा दिसत होता. जेव्हा म्हणजे मे मध्ये मंदिर उघडेल, तेव्हा दुकानेही उघडतील. लोकांची गर्दी वाढेल. तेव्हा किती कचरा असेल?
तुम्ही फोटोत आमच्या सगळ्यांच्या कमरेला पिवळ्या बॅग्स लावलेल्या पाहत असाल. त्या होत्या इंडियाहाईक्सने दिलेल्या इको बॅग्स. वाटेत कचरा दिसला की त्यात गोळा करायचा आणि कॅम्पसाईटवर वेगवेगळी पिंपे ठेवलेली असायची. त्यात तो वर्गवारी करून टाकायचा. इंडियाहाईक्सने आत्तापर्यंत असा कित्येक टन कचरा गोळा केला आहे. हिमालयाच्या डोंगर दऱ्यात, कचरा नेण्यासाठी, तिथे काही नगरपालिकांची व्यवस्था नाही! तिथून मग साधारण महिनाभराने एक संस्था तो गोळा करून घेऊन जाते. इंडियाहाईक्सच्या जागरूकतेची आणि पर्यावरण स्नेही धोरणांची ही झलक होती. आम्ही जो वैयक्तिक कचरा तयार करू तो मात्र आपापल्या बॅगमधून आपापल्या शहरात घेऊन जायला सांगितले होते.
आता पावणेसात वाजले होते. खूप चढ चढून झाला होता. आम्हाला स्नॅक्स साठी वेळ दिला होता.
आता आजूबाजूला दिसणारा बर्फ वाढला होता.
उंच चढाचे, वळणाचे रस्ते, विरळ होत जाणारी हवा ह्यामुळे आमच्या टीममधल्या काही जणांना हाय अल्टीट्युड सिकनेसची सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यांचे डोके दुखू लागले. एकाला पोटदुखी आणि मळमळण्यामुळे आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच परत जावे लागले. त्या आमच्या टीममेटची आठवण आम्हाला सगळ्यांनाच सतत येत होतीच. इतके दिवस ट्रेक केल्यावर आजच्या समिटच्या दिवशी त्याला येता आले नाही ह्याचे वाईट वाटत होते. पण करेल तो ही पुन्हा कधीतरी हा ट्रेक पूर्ण, असे म्हणून आम्ही मनाचे समाधान करून घेत होतो.
अजून चढ चढणे चालूच होते. दगडांनी बांधलेला रस्ता चढायला सोपा की डोंगरवाटांनी नेणारा चढ सोपा ह्यावर मनात चर्चासत्र चालू होते. त्यात असे ठरले की डोंगरवाटा चढायला अवघड असल्या तरी जास्त इंटरेस्टिंग असतात. तर दगडी वाटा चालायला सोप्या पण कंटाळवाण्या वाटतात. अर्थात भवताल इतका सुरम्य होता की कंटाळा यायला वावच नव्हता. आमच्या नजरेच्या पातळीच्याही खाली बर्फाच्छादित शिखरे दिसत होती. इतका विस्तीर्ण, भव्य प्रदेश दृष्टीच्या टप्प्यात येत होता. इतक्यात सूर्यदर्शन झाले.
ह्या सुंदर फोटोत आता सूर्य, तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला शिखर तिन्ही एका ओळीत दिसते आहे. हवा क्षणाक्षणाला बदलत होती. कधी धुके, कधी ढग, त्यामुळे फोटो तितकेसे स्पष्ट येत नव्हते. पण निदान पाऊस किंवा बर्फ पडत नव्हता, वादळ नव्हते हे चांगले होते. आम्हाला शिखरावर थोडा जास्त वेळ थांबता येण्याची आशा वाटत होती. आधीच्या एका टीमला विपरीत हवामानामुळे केवळ मिनिटभर शिखरावर थांबता आल्याच्या कथा आम्ही ऐकल्या होत्या.
आता साडेसात वाजले होते. आम्ही चालायला सुरुवात करून चार तास होऊन गेले होते. पण आता तुंगनाथ मंदिर अगदी जवळ दिसू लागले होते. त्यामुळे उत्साह टिकून होता.
आमचे ट्रेक गाईड प्रमोदजी ह्यांचा देखील आमचा उत्साह टिकवून ठेवण्यात मोठा वाटा होता. ते सतत " चलते रहो, चलते रहो, खुद को पुश करो, अभी थोडाही बाकी हैं " असे सांगत प्रेरणा देत होते. प्रमोदजी, ट्रेक लीडर साहिल आणि दुसरे ट्रेक गाईड अमितजी ह्या तिघांनी आमच्या टीमला वेळोवेळी जे मार्गदर्शन आणि मदत केली त्याला तोड नाही. आमचा ट्रेक निर्विघ्न पार पडावा म्हणून त्यांनी अत्यंत तळमळीने आणि मनापासून प्रयत्न केले.
आता सगळ्यांचेच श्वासांचे मस्त आवाज येऊ लागले होते. कारण चढ खूप तीव्र होऊ लागला होता.
जाताना आम्ही मंदिरात न थांबता सरळ चंद्रशिला ला जाणार होतो. हवेचा मूड बदलायच्या आत तिथे पोचणार होतो. आत्तापर्यंतचा प्रवास अगदी वेळेत झाला होता. आता पुढचाही नक्की चांगला होईल असे वाटू लागले. दगडी रस्ता संपून आता डोंगरवाट आली. पण ती वाट तशी दिसत नव्हती. कारण सगळीकडे बर्फ होता!
तुम्ही फारच हळू चालता, मी कधीच पुढे आलो आहे. आता थोड्या वेळ सृष्टीसौंदर्य न्याहाळतो. असे तर म्हणत नसेल ना हा? हा तोच पायथ्यापासून आमच्यासोबत येणारा की हा वेगळा? कसे कळणार? सगळ्यांचेच काळे कोट सारखे!!
सगळीकडे दिसणारी बर्फाच्छादित शिखरे, आभाळाचे आणि धरतीचे अथांगपण, विस्तीर्ण अवकाश, स्वतःचे खुजेपण सगळे सगळे जाणवणारी दृश्ये आता दिसत होती. चंद्रशिला वरून दिसणारे दृश्य नक्कीच अप्रतिम आहे. पण तिथे जाणारी वाट देखील अशा दृश्यांनी विलक्षण सुंदर झाली आहे.

पण काही क्षणातच आमची दृष्टी फक्त पायांखाली राहू लागली. कारण आता बर्फ़ातूनच चालायचे होते. जिथे पावलांच्या खुणा दिसतील त्यात सावधपणे पाय ठेवत जायचे होते.

लांबून बघताना रम्य वाटणारा बर्फ त्यावरून चालताना मात्र परीक्षा घेतो. माझ्यासारख्या उष्ण आणि दमट प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तीला बर्फावर चालण्याचा अनुभव क्वचितच घेता येतो त्यामुळे मजाही येतेच. मात्र बर्फावर चालताना आपोआप चालण्याची गती थोडी कमी झाली. आता ९ वाजत आले. आता चढ खूपच जास्त झाला होता. पण काही मिनिटांतच आम्ही शिखरावर पोचलो.

https://youtube.com/shorts/wKBO6gIAjrE?feature=share

तिथून दिसणाऱ्या दृश्याचे केवळ अद्भुत असेच वर्णन करू शकतो. जिथून ३६० अंशातून आपण हिमालय पाहू शकतो अशा अगदी मोजक्या जागांपैकी एक असे हे शिखर. इथून गढवाल आणि कुमाऊ च्या पर्वतरांगा दिसतात. अनेक सुप्रसिद्ध शिखरे दिसतात. नंदादेवी, चौखंबा, द्रोणागिरी, नीलकण्ठ, त्रिशूल, केदारकंठा, गंगोत्री रेंजेस आणि आणखी कितीतरी.
तिथे पोचल्याचा प्रचंड आनंद होईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर दिसणाऱ्या दृश्याने अवाक व्हायला झाले होते आणि मनही अतिशय आनंद, जिंकल्याची भावना ह्या सगळ्याच्या पार गेले होते. कपालभाती करुन झाल्यावर सेकंदभर श्वासविरहित अवस्था अनुभवता येते तसे काहीसे झाले होते मनाचे. थोडे भानावर आल्यावर मग ह्या दृश्याचा अनुभव घेता आला ह्याबद्दल मनात अपार कृतज्ञता होती.
आता अर्थातच होता फोटो टाइम. दिनांक १७ ला रामनवमी होती म्हणून आठवणीने नेलेला श्रीराम आणि रामजन्मभूमी प्रतिमा असलेला टी शर्ट घालून चंद्रशिलाला जिथे रामाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात, तिथे फोटो काढता आला.
आम्ही सुदैवी होतो. आम्हाला चंद्रशिला शिखरावर जवळपास सव्वा तास मिळाला. पण आता निघायची वेळ झाली होती. एकेक करून उतरायला सुरुवात केली. चढताना माझा पहिला नंबर होता त्यामुळे अर्थातच उतरले देखील मीच आधी. उतरल्यावर 'माता ने ' ( जपानी वाक्प्रचार - अर्थ - पुन्हा भेटेपर्यंत, पुन्हा भेटू या !) म्हणत मागे वळून एक फोटो काढून ठेवला.
खाली उतरून चालायला सुरुवात झाली.
थोड्या वेळाने रस्ता असा होता. ती बारीक रेघ म्हणजे रस्ता आहे आणि त्यावरचे ठिपके म्हणजे आम्ही आहोत!!
तुंगनाथ मंदिरात गेलो. पंचकेदारांपैकी तृतीय केदार असलेले हे मंदिर हजार वर्षांपूर्वीचे आहे. मूळ मंदिर पांडवांनी बांधले होते असे म्हणतात. जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले मंदिर आहे हे.
आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. केदारनाथ प्रमाणेच हिवाळ्यात हे मंदिरदेखील बंद असते. सर्वत्र बर्फच असतो. त्यावेळी तुंगनाथमधील विग्रह मक्कुमठ इथे हलवलेला असतो. ह्यावर्षी मंदिराची कपाटे १० मे ला उघडली जातील.
तिथून खाली उतरायला सुरुवात केली. ऊन चांगलेच तापले होते. पण आता दगडी रस्त्याने उतरायचे होते, त्यामुळे तसे अवघड वाटत नव्हते.
वाटेत भेटणाऱ्या लोकांना," बस, अभी थोडा ही बाकी है।" सांगताना मस्त वाटत होते.
सकाळी चढताना हा रस्ता आम्ही मिट्ट काळोखात चढलो होतो. तेव्हा नुसते झाडांचे बाह्याकार दिसत होते. ती सर्व झाडे बुरांशच्या फुलांनी बहरलेली होती. किती सुंदर रंगछटांची फुले होती!! एखाददुसरे झाड नव्हे तर अशी शेकडो झाडे बहरलेली. रस्त्यावर, दरीत, डोंगरउतारावर..सगळीकडे फुललेली झाडे. डोळ्यांचे पारणे फिटावे असेच दृश्य होते ते.

https://youtu.be/RGTpzUbdKuM

आता परतीच्या प्रवासात नेहमीच वाटते तशी हुरहूर लागलेली होती. संध्याकाळी सारी बेसकॅम्प ला आलो आणि दुसऱ्या दिवशी तेथून निघालो, ऋषिकेश किंवा परतीच्या आपापल्या प्लॅननुसार त्या त्या गावाला.
निघण्याआधी टीशर्ट्स विकत घेऊन फोटो तर काढायलाच हवा होता ना!!
आम्ही सगळे पाच दिवसांपूर्वी एकमेकांना ओळखत नव्हतो असे सांगितले तर आश्चर्य वाटावे इतकी छान मैत्री झाली होती. खूप मस्त, तरुण, उत्साही टीम होती आमची.
आता पुन्हा चंद्रशिलाला कधी जाणे होईल माहिती नाही. पण ट्रेक करत राहण्याची प्रेरणा मात्र आदल्या रात्री बक्षीस मिळालेल्या बॅजमूळे मिळाली. टीममधील 'ट्रेकर फॉर लाईफ' चा बॅज मला दिला गेला. तो बॅज मला सतत आठवण करून देत राहील..हिमालयाची आणि ट्रेकिंगची.
ह्या लेखमालिके मध्ये अनेक फोटोज आहेत. इतके इथे अपलोड करणे शक्य नाही. माझ्या ब्लॉगवर ते आहेत. कृपया माझ्या ब्लॉगची जाहिरात करते आहे असे समजू नका!! Wink त्याची लिंक सोबत देते. ज्याना उत्सुकता असेल त्यांना फोटोज पाहता येतील.

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle