आर्माडिलो (कथा)

माझी आई जराशी चिवित्र होती. प्रेमळ पण चिवित्रच.

एरवी ती एक कणखर, कष्टाळू आणि फटाफट तोंड चालवून कामं करून घेणारी बाई होती. माझ्या लहानपणी बाबा गेल्यावर सगळ्या जगाला तोंड देत तिने एकटीने कारखाना चालवला आणि वाढवला होता. पण घरी? बालवाडीपासून मी काढलेली सगळी चित्र चिकटवून तिने भिंती शिल्लक ठेवल्या नव्हत्या अन माझे क्राफ्ट प्रोजेक्ट्स घरभर पसरलेले होते. एवढंच नाही तर ती झाडांशी गप्पा मारायची. कॅन यू इमॅजिन? मागच्या अंगणात तीन झाडं होती. एक रसरशीत पिवळ्या लिंबाचं झाड, एक सिंगापूरी नारळ आणि एक गुलाबी चाफा. तिने चक्क त्यांना नावं ठेवली होती. राजस, तेजस आणि पिया.

झाडांशी गप्पा मारताना मी कधी हटकलं तर ती म्हणायची, "त्यांनाही प्रेमाची गरज असते बाळा."
कधी नवे कपडे घालून तयार झालो तरी ती मला झाडांशेजारी पोझ करायला लावायची. असो, वेगळी असली तरी होती माझी आईच. आम्ही दोघेच तर होतो एकमेकांना. पुढे मी कॉलेजसाठी हॉस्टेलला गेलो, नंतर नोकरी करता करता देशोदेशी भटकत आईपासून फारच लांब गेलो. व्हिडीओ कॉलमधून हळूहळू गोड सुरकुतलेली म्हातारी होणारी आई तिच्या झाडांसकट दिसत असायची. त्यांची सोबत असल्यामुळे मी आनंदी असते म्हणायची.

मोठी सुट्टी घेता घेता एक दिवस आईचीच बातमी आली. शेजारच्या मालीकाकूला आई चाफ्याच्या झाडाखाली पडलेली दिसली. स्ट्रोक! मी तिच्यापाशी पोचण्याआधीच आईला घेऊन गेला होता. सगळं कार्य करून अस्थी घेऊन मी घरी आलो. दोन दिवसांनी मेंदूवरचं धुकं जरा हटल्यावर मी तिचं कपाट उघडलं. तिच्या मऊ, सुती साड्यांमध्ये नाक खुपसून फ्रीशियाचा वास नाकात साठवून घेतला. लॉकरमध्ये तिचं मृत्युपत्र व्यवस्थित ठेवलेलं होतं. तिच्या पत्रात तिने शेवटी लिहिलं होतं की मागच्या अंगणातली झाडं वारसाहक्काने आता तुझीच आहेत त्यामुळे त्यांना एकटं न सोडता त्यांच्याशी बोलत जा, त्यांना गाणी ऐकव, त्यांच्यावर प्रेम कर.

फाईलमध्ये तळाशी तीन डेथ सर्टिफिकेट होती. माझ्या जन्मापूर्वीच्या तारखांची. तीन स्टिलबॉर्न मुलं. मुलगा, मुलगा, मुलगी. ओह!

मी सकाळी बाहेर जाऊन झाडांना पाणी घालून त्यांच्या खडबडीत खोडांवरून हात फिरवला. त्यांच्याशी गप्पा मारणं माझ्यासाठी अजूनही कठीण आहे. पण आईच्या अस्थींचं काय करायचं हे मला समजलंय. नर्सरीतला माणूस थोड्या वेळापूर्वीच एक बकुळीचं रोप देऊन गेलाय.

*** समाप्त ***

कधीतरी ही छोटीशी कथा लिहून ठेवली होती. शतशब्दकथेपेक्षा मोठी झाली म्हणून पडून राहिली. आज सापडली म्हणून पोस्ट केली. :)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle