परभणीजवळ आहे साडेतीन हजार वस्तीचे केरवाडी गाव. इथे आहे सूर्यकांतकाका कुलकर्णी व माणिकताई कुलकर्णी यांच्या स्वप्नातून उभी राहीलेली ‘स्वप्नभूमी’! शेकडो अनाथ मुलांना आत्तापर्यंत सांभाळून, पालनपोषण करून स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत करणारा.. अनाथाश्रम? नव्हे नव्हे हे तर घर आहे, त्या मुलांसाठी ही आहे स्वप्नभूमी!
(तुम्हा सगळया मैत्रीण सदस्यांपर्यंत त्यांचे कार्य पोचवावं असं वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. माझे आईबाबा नुकतेच तिकडे जाऊन सर्व पाहून अनुभवून आले, तेव्हा त्यांनी माणिकताई व सूर्यकांतकाकांशी संवाद साधला – तो असा.)
माणिकताई: मी माणिक सबनीस. मूळची पुण्याची. चिमण्या गणपतीजवळ काकूकडे राहात होते. माझे मिस्टर तेव्हा काकूच्या घरासमोर राहायचे. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. कॉलेजेसमधून मुलांसाठी नाटकं होत नाहीत हे कळल्यावर त्यांनी १९७४ला इंटरकॉलेजिएट नाटक स्पर्धा सुरू केल्या. त्यासाठी त्यांना मदत मिळाली एच के फिरोदिया यांची, तोच हा फिरोदिया करंडक. माझी भावंडं शाळेत गेल्यावर मला दुपारी वेळ असायचा, तेव्हा मी काकूला म्हटले मी फिरोदिया करंडकासाठी मदत करायला जाऊ का? काकूचा होकार मिळाल्यावर मी फिरोदिया ग्रुपमध्ये जॉइन झाले. दोन एक वर्ष झाली आणि माझे दीर म्हणाले की सूर्यकांत यांच्या लग्नासाठी बघतायत, तर तू तयार आहेस का? मी विचारात पडले. माझे शिक्षण मॅट्रिक पर्यंत. हे फर्ग्युसनमधून एमए झालेले. त्यांचा शिक्षणाचा, कामाचा आवाका खूप होता. मी म्हटले ते तयार असतील तर मी तयार आहे. सूर्यकांत म्हणाले मी आत्ता जरी कायनेटिकला सेल्स एक्झिक्युटिव्ह असलो तरी माझं स्वप्न आहे, केरवाडी हे माझे गाव, जिथे माझे आईवडील राहतात, तिथे जाऊन मला सामाजिक काम करायचे आहे. माझी अट आहे की खेड्यात राहायची, काम करायची तयारी असेल तरच लग्नाला हो म्हण. मी म्हटले चालेल, मी तयार आहे. माझ्या पाहण्यातली खेडी तेव्हाची म्हणजे सातारा, सांगली, इस्लामपूर. कारण माझे आजोळ तिकडे. केरवाडी कसे असेल काही माहीत नव्हते. आमचे लग्न ७८ला झाले, आणि ८०ला यांनी नोकरी सोडली. आमचा मुलगा तेव्हा ३ महिन्याचा होता. यांनी १ मार्च नोकरी सोडली आणि तो ७ मार्चला जन्मला. १० मेला संस्थेची स्थापना झाली. ट्रस्टी सगळे पुण्यातले, फिरोदिया ग्रुपमधलेच होते. कारण तिथूनच ती संकल्पना उदयास आली. सोशो-ईकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट (SOCIO ECONOMIC DEVELOPMENT TRUST) हे संस्थेचे नाव, आणि ‘स्वप्नभूमी’ हे मुलांसाठीच्या प्रकल्पाचे नाव. मुलांची ड्रीमलॅंड - स्वप्नभूमी.
इकडे आलो तेव्हा आम्ही गावात गोदामात राहात होतो. आम्हाला खरंतर गंगाखेडला, तालुक्याच्या गावाला चालू करायचं होते. पण इथले पोलीसपाटील म्हटले की “साहेब आम्ही तुम्हाला इथली जागा देतो.” म्हणून त्यांनी ही जी सध्याची जागा आहे ती डोनेशन म्हणून दिली. ते सगळे शेत होते तेव्हा. मग आम्ही गोदामात राहून काम चालू केले. ते गोदाम म्हणजे तरी कसे, सगळीकडे खालीवर दगडं, एका कोपऱ्यात आम्ही चूल लावली. संडास बाथरूम काहीच नाही. बाहेर कुडाचे बाथरूम बांधले. खेडेगावात काम करायचे म्हणजे अगदी जसं आपण सिनेमात बघतो, तसा लोकांचा विरोध. कारण आम्ही ब्राम्हण आणि गावातील लोकं ब्राह्मणद्वेष्टी. इतका त्रास दिला आम्हाला. आमच्यावर दगडफेक केली, मारामारी केली. सासरे मात्र खंबीर होते माझे. कायम पाठीशी उभे असायचे. म्हणायचे, “या, कोण मारायला येतंय?” आमच्यावर तेव्हा खूप केसेस होत्या. त्या सगळ्या त्रासाला पुरुन आम्ही सगळ्या केसेस जिंकलो. आणि गाववाल्यानी मग आमच्याबरोबर कॉम्प्रमाइझ केले पण गोदामातून हाकलून दिले. मग आम्ही आत्ता जिथे आपण राहतोय तिथे परत झोपडीत राहायला चालू केले. पाऊस आला की सगळं उडून जायचे, कुठेतरी पत्र्याच्या आडोशाला थांबायचे. मग हळूहळू दिवस बदलत गेले, काम सुरू झाले. मग नंतर जेव्हा नेदरलँडचे मित्र बाळाला दत्तक घ्यायला आले, तेव्हा ते म्हणाले “अरे, तुम्ही किती चांगले काम करत आहात. तुम्ही ग्रामविकासाचे काम नाही का करत? फक्त मुलांसाठीच नाही तर खेडेगाव विकासाचे, प्रौढ शिक्षणाचे काम चालू करा. मी त्या कामासाठी/बांधकामासाठी पैसे देईन.” मग आम्ही दहा गावांमधून दहा बालवाड्या सुरू केल्या, रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. ८४ सालापासून दर वर्षी ते मदत करत आले आहेत ज्यामुळे स्वप्नभूमी साकारणे शक्य झाले. फक्त मुलांसाठीच नव्हे तर तेथील सर्व बांधकाम, गेस्टरुम्स अशा बऱ्याच गोष्टींसाठी त्यांचा खूप मोठा हातभार लागला. त्या दहा गावांची मग २० गावं झाली, २५ झाली, असं करत करत आता ९० गावांसाठी हे काम चालू आहे.
इथली अनाथ मुलं सांभाळतानाचे विलक्षण अनुभव आहेत. अगदी ५ दिवसांचे बाळही सांभाळले आहे. ते इतकं रडायचे, वरचं दूध, त्याचे आजारपण सगळे घरातील मदतनीस बाईच्या मदतीने केले. बाळ आजारी पडले की एसटीतून त्याला परभणीला चिल्ड्रन्स स्पेशलिष्टकडे घेऊन जायचे. आता ते बाळ (३८-४० वर्षाचे असेल) अमेरिकेमध्ये आहे. इथलीही बरीच मुलं इंजिनिअर झाली, पुण्याला आयटी कंपनीत काम करत आहेत, एक जण बेल्जियमला आहे. तीन चार वर्षापूर्वी आम्ही त्याच्याकडे गेलो. त्याने सगळा युरोप दाखवला. एक मुलगा एरोनॉटिक इंजिनिअर झाला. काम करताना आता स्कॉलरशिप मिळून एमएस करायला चाललाय. त्याचा भाऊ वेल्लोरला इंजिनिअरिंग करतोय. ही सगळी अनाथ मुलं आहेत - जेव्हा स्वत:च्या पायावर उभं राहतात तेव्हा मात्र कुठून कुठून नातेवाईक येतात. मी याची मावशी आहे सांगत वगैरे. असे अनुभव विरळा, पण येतात खरं. नातेवाईक नसल्याने मुलांचे शिक्षण तर आम्ही पाहतोच पण एका मुलाचे लग्नही आम्ही लावलं, पुण्याला आनंद मंगल कार्यालयात.
एका गुरे राखण करणाऱ्या मुलीला तर तिची म्हैस आमच्या समोर आली तेव्हा भेटलो. तेव्हा हे तिला म्हणाले - का शिकत नाहीस? ती म्हणाली तुम्ही शिकवता का, तर मी शिकते. मग तिला सांभाळले, शिकवले. आता ती पुण्याला पोस्ट graduate झाली, हैदराबादला छान घर आहे.
आमच्याकडे सध्या ६२ मुलं आहेत. जी हुशार असतात, ८०% च्या पुढे मार्क पडतात ती पुण्याला जातात. पुण्यात श्रीपाद घोडके म्हणून आमचा मित्र आहे, तो असाच स्वप्नभूमी बघायला आला आणि प्रेमात पडला. त्यालाही आपण अनाथ मुलांसाठी काम करावे असे वाटू लागले. मग स्वप्नभूमीतून १०वी पूर्ण झालेली कित्येक मुलं त्यांच्याकडे जातात, ते सांभाळतात व पुढील शिक्षणाचे बघतात. सध्या त्यांच्याकडे १८ मुलं आहेत. घोडके वर्षातून दोन तीन वेळेस येऊन मुलांचे काउन्सेलिंगही करतात. अभ्यास कसा करावा, का केला पाहिजे, पुढील शिक्षण इत्यादी विषयांवर.
इथे वाढलेली मुलं उत्तम संस्कारात वाढतात. पहाटे ५:३०ला उठून आपले आवरणे, ६ला रनिंग, सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम. मग दूध-बिस्कीट, बोर्नव्हिटा. मग या परिसराची स्वच्छता, एकत्र प्रार्थना – २५ मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष असे सकाळी म्हणतो. संध्याकाळच्या प्रार्थनेत भीमरूपी. सगळेजण एकत्र जेवतो. सगळे सणवार एकत्र साजरे करतो. दिवाळीत पहाटे पाचला उठून आमच्या सुना-नातवंडे सर्व विद्यार्थांना तेल लावतात.. ओवाळतात. सगळा फराळ मी करते. दिवाळीच्या भाकड दिवसात कधी मुद्दाम ठरवून मिसळपाव केशरी दुधाचा बेत होतो. कधी पावभाजी होते. आमचं सगळ्यांचे एक ६० जणांचे मोठं कुटुंब झाले आहे. सुदैवाने मुला-सुनानांही आवड आहे या कामाची. त्यातली एक सून, सावनी दातार ही प्रसिद्ध गायिका आहे, तिलाही या कामाची खूप आवड आहे. माझी मुलं १-२रित असताना पुण्याला शिकायला ठेवली होती. त्यांनी एकदा प्रश्न विचारला की आम्हालाही तिथे राहायचे आहे. आम्हाला पुण्यात ठेवणार तर मग केरवाडीतली सगळीच मुलं का येत नाहीत पुण्याला? मग अशा रीतीने ती दोघंही केरवाडीला आले व १०वी पर्यंतचे शिक्षण इकडेच पूर्ण केले. अशा रीतीने मुलांना या कामाबद्दल आपुलकी व जिव्हाळा वाटत व वाढत गेला आणि आता पाहाल तर इथले सायन्स सेंटर अशा सारख्या नवनवीन सुधारणा मुलांनी केल्या आहेत.
आता सायन्स सेंटर तसेच इतर प्रकल्पांबद्दल काकांशी बोलूया –
सूर्यकांतकाका: सायन्स सेंटर ही संकल्पना आम्ही विकसित केली कारण विज्ञानाचे प्रयोग करत करत ते शिकणे महत्त्वाचे आहे. परदेशातील सायन्स सेंटर्स बघितले असल्याने, ते जे उत्तम एक्स्पोजर मिळते ते महत्त्वाचे आहे असे वाटल्याने हे चालू करायचे ठरवले. मग मंत्र्यांना भेटणे वगैरे. नेदरलॅण्डचे मित्र, त्यांनी तिकडच्या मंत्र्यांना भेटून ५०लाख डोनेशन दिले. मुलांनी आपल्या हाताने प्रयोग करावेत म्हणून विविध एक्झिबिट्स तयार केले. पाण्यापासून टर्बाईनने वीज तयार करणे असे विविध प्रयोग त्यात आहेत. स्वतः केलेल्या गोष्टी, कन्सेप्टस कोणी कधी विसरत नाहीत. विद्यार्थी ते नीट लक्षात ठेवतात. या सेंटरमध्ये १००-१५० प्रयोग आहेत. एक एक एक्झिबीट विद्यार्थी स्वतः हाताळतात. त्यामुळे त्यांची सायन्सची भीती जाते. एंजॉय करतात. आता १५ वर्ष झाली. हे मेन सायन्स सेंटर खूप मोठे आहे – २८,००० स्क्वे फूट. शासकिय लोकांनी बघितले व सांगितले की शाळेसाठी लहान करा. साधारण २-३ वर्गात मिळून बसेल असे. मग शासनाने देणगी दिली व आत्तापर्यंत १४० सेंटर्स विविध शाळांमधून उभी केली आहेत. एक्सेल फाउंडेशनतर्फे चेन्नई, मदुराई, लखनऊ इत्यादी ठिकाणे देखील सेंटर्स उभी केली आहेत. दरवर्षी लाखो मुलं अशा सायन्स सेंटर्सना भेट देतात आणि सायन्स समजून घेतात. इथले जे मोठे सायन्स सेंटर आहे, तिथे भेट द्यायला नांदेड, लातूर अशा शाळा येतात. त्यांचे विद्यार्थी जास्त संख्येने असतील उदा: २०००, तर ते २०-२० दिवस बुक करतात कारण एका वेळेस केवळ १०० मुलंच पाहू शकतात. या सगळ्या प्रयत्नांमुळे मुलांची सायन्सची भीती दूर होईल, गोडी लागेल, आणि ते चांगला अभ्यास करतील अशी आमची आशा-अपेक्षा आहे.
दुसरे एक काम आमचे चालू आहे ते म्हणजे महिलांबाबत. आम्ही इकडे ८४-८५ पासून आहोत, कुठेही कुठल्याही घरी जा, महिला कधी समोर येणार नाहीत. जेवण वाढायला देखील पुरुषच पुढे. महिलांच्या मिटिंग्स, त्यांच्याबद्दल काही कामं होत नव्हती. आम्ही ते काम हातात घेतले. आता आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो आहोत. १०एक वर्ष लागली, आता गावगावातून महिलांसाठी मिटिंग्ज होतात. १०-१५ हजार महिलांचे संघटन करू शकलो आहोत. हजारांच्यावर बचतगट आहेत. मग त्यातून त्यांचे स्त्री-स्वातंत्र्य, सबलीकरण, त्यांचे अधिकार अशा विविध विषयांवर काउन्सेलिंगही होते. शिबिर म्हणतो आम्ही त्याला. आता याचा पुढील भाग, पुढचे पाऊल - आम्ही ५-७ वर्षापूर्वी चालू केले ते म्हणजे ‘किशोरी विकास’. महिलांसाठीचे काम करताना आमच्या लक्षात आले की शाळेतील विद्यार्थिनींना काहीच एक्सपोजर नाहीये. ११-१२वीतील मुलींना देखील सॅनिटरी नॅपकिन्स माहितच नाहीत. वापरणे तर दूरची गोष्ट. मग त्यावर आम्ही काम चालू केले. आता सर्व मुलींना ह्याचे ज्ञान आहे व त्या ते वापरतात. मग हे सगळं शिकवताना ह्याच बरोबर स्वच्छता, आरोग्य, न्यूट्रिशस फूड असेही मुद्दे ऍड होतात. इकडे आसपास सगळी सोयाबीनची शेती आहे, पण कोणालाच ठाऊक नाही की सोयाबीन खातात (किंवा कसे खातात). मग आम्ही परभणीतील विद्यापीठातून न्यूट्रीशन स्पेशलिस्टना बोलावून गावोगावी मिटिंग्ज, शिबिर घेतली.. काय काय करता येईल सोयाबीनचे? ते प्रयोग करून दाखवायचो किंवा पनीर करून दाखवले. की हे असं करा आणि खात जा. ह्या इतक्या हुशार मुली आहेत, पण एक्स्पोजरच नाही. साधं हे गाव सोडून तालुक्याच्या गावी पण कोणी गेलेले नसते. समुद्रही पहिला नसतो त्यांनी. समुद्राची विशालता त्यांना माहित नसते. मग आम्ही त्यांना समुद्रावर घेऊन जातो, आता ५०-५० च्या बॅचने जवळपास २००-३०० मुलींना घेऊन गेलो आम्ही. वय वर्षे १६ झाले की लग्न करून टाका, लग्न झाले की मुलबाळ पाहिजेच. ह्या विचारधारेतून त्यांना जरा बाहेर काढून, एम्पोवर करणे चालू केले, किंवा वर सांगितले तसे अशा पद्धतीने आरोग्याबाबत काम चालू केले, आता ५००० महिलांसोबत काम करतोय.
आम्हाला बऱ्याचदा हा प्रश्न विचारतात की सर्वसामान्य माणूस या कार्यात काय मदत करू शकतो? देणग्या द्यायला खूप लाखो पैसे नसतील तर काय. तर माझे म्हणणे आहे - लाख रुपये कुठून येतात? १०० हजार म्हणजे लाख. तुम्ही १००० रुपये द्या. अधिकाधिक लोकांना आमच्याबद्दल कळवा. अशी १०० लोकं जमली की होतातच की लाख. आम्ही इथे शिकणाऱ्या मुलांचे खर्च तपासला तर एका दिवसाला ६००० खर्च येतो. तुम्ही एक दिवसाचा खर्च भागवू शकता. इथे असेच थेंबे थेंबे तळे साचे करत निधी जमा होतो. हे जे सगळे चालू आहे ते फक्त शासकिय मदतीवर नाही भागू शकत, ह्यात इतर सर्व देणगीदारांचा खूप हातभार आहे. इथे आम्ही मुलांचे वाढदिवस साजरे करतो. त्या दिवशी केक आणि नवे कपडे मिळतात. माझ्या एका मुलाने हे सगळे स्पॉन्सर केलेय – की वाढदिवसाचे केक व नवे कपडे माझ्या तर्फे. ५०० रुपयाचे कपडे, २०० रुपयाचा केक – ७०० रुपये बजेट. मुलांना खूप आनंद मिळतो. आम्ही मुलांशी या सगळ्याबद्दल बोलतो. की हे कोणी स्पॉन्सर केले, आजचे देणगीदार कोण? यातून एक gratitude म्हणतो ती भावना देखील वाढीस लागते.
कोणी आम्हाला विचारतो, तुम्ही या मुलांना भेटला नसता तर काय झाले असते? गंभीर आहे खरा हा प्रश्न. जर शिक्षणाचे महत्त्व नसेल, स्वत:च्या पायावर उभे राहायचे संस्कार किंवा वातावरण नाही मिळाले तर काय होणार? मूळप्रवृत्तीनुसार ती व्यक्ती एकतर चोर होईल नाहीतर भीक मागेल. पण असं नाही व्हायला पाहिजे. प्रत्येकाला स्वत:च्या पायावर उभं राहताच आले पाहिजे. आता इथे शिकून पुढे पुण्यात, सीइओपीला टॉपर झालेली मुलं आहेत. त्यांना ते वातावरण नसतं मिळाले तर काय झाले असते? हे सगळे टॅलेंट वाया नको ना जायला? योग्य वेळी योग्य ती मदत मिळायलाच पाहिजे. हुशार मुलं आहेत, त्यांना केवळ एक टेकू लागतो, push लागतो. तो मिळाला की त्यांचे ते अभ्यास करतात, स्वबळावर पुढे जातात. तो टेकू देणे आम्हाला जितके शक्य आहे ते आम्ही करतो याचा नक्की आनंद आहे.
तुम्हाला या कार्यात मदत करायची असेल, एका मुलाला स्पॉन्सर करायचे असेल, एका वर्षाचा किंवा एका दिवसाचा खर्च उचलायचा असेल, एखाद्या प्रोजेक्टला सपोर्ट करायचे असेल तर जरूर करा. खाली वेबसाईटची लिंक आहे जिथे तुम्ही डोनेशन देऊ शकता, व्होलेंटियरिंग करायचे असेल तर करू शकता. आमची स्वप्नभूमी पाहायला नक्की या, आणि या मुलांची स्वप्नं पुरी करायला जरूर मदत करा! धन्यवाद!
संस्थेची वेबसाईट: https://sedtindia.org/
देणगी द्या: https://sedtindia.org/donatenow/
स्वयंसेवक व्हा: https://sedtindia.org/volunteer-form/
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप: ही मुलाखत माझ्या आईने (मैत्रीण सदस्य ‘रेखा’) घेतली आहे, तर मी तिचे शब्दांकन केले आहे. मैत्रीण.कॉम हे केवळ या संस्थेची माहिती पोचवण्याचे एक माध्यम आहे. सदस्यांनी संस्थेबरोबर केलेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी मैत्रीणचा संबंध नाही.