मळभ आलेला, अंधारलेला असा तो दिवस होता. काहीसा विषण्ण, खिन्न करणारा. अश्या दिवशी मनालाही काहीतरी विचित्र, अस्वस्थ वाटणारे विचार सुचतात. तेच झालंय आज माझं. कोणाकोणाचे विचार मनात येत राहिलेत, आठवणी दाटून येत राहिल्यात. इतक्या तरलपणे की जणू काही सारं समोर घडतंय. मनाची खिन्नता अजूनच वाढवतायंत या आठवणी - जुन्या मित्रमंडळींच्या, ओळखी-पाळखीच्यांच्या. त्यातले काही खरं तर या जगात देखील नाहीत...!
आता हेच पहा ना. सचिन! माझा अगदी पहिला-वहिला मित्र! मी ३ वर्षांचा असताना बाबांची बदली धुळ्याला झाली. तिथे आम्ही ज्या कॉलनीत रहायला गेलो, तिथे समोराच्या घरात रहात असलेलं काळे कुटुंब - त्यांचा चार वर्षांचा मुलगा - सचिन. आम्ही दोघे असे साधारण बरोबरीचे असल्याने आमची लगेचच गट्टी जमली आणि आम्ही अगदी घट्ट-मुट्ट मित्र झालो. पुढची पाच वर्षं आमची जोडगोळी म्हणजे - शाळेत फक्त इयत्ता वेगळ्या असल्याने वेगळ्या वर्गात बसायचो. बाकी शाळेत जाणे बरोबर आणि इतर वेळीही सतत गळ्यात गळे घालून दंगा-मस्ती, खेळ चालू असायचे. आणि मग ते आक्रीत घडलं. साध्या तापाचे निमित्त झाले आणि सचिन हे जग सोडून गेला. त्या वेळी मी आठ वर्षांचा होतो. त्या घटनेचा माझ्यावर इतका परिणाम झाला की मी कोणाशी बोलणे-चालणे बंद केले. २-३ महिने तर मी शाळेत पण जात नव्हतो. माझी एकंदरीत परिस्थिती पाहून बाबांनी त्यांची बदली करून घेतली आणि आम्ही कल्याणला रहायला गेलो. कल्याणला गेल्यावर हळू-हळू मी सावरू लागलो. त्या घटनेला मागे सारले. तरी मनाच्या कोपर्यात ती राहिलेलीच होती...अधून मधून उसळ्या मारून बाहेर यायची आणि आजच्या उदास दिवशी तर ती आठवण इतकी आर्ततेने आली की जणू माझा बालमित्र माझ्या समोरच उभा आहे, मला मिठी मारतोय.
सचिनची आठवण बाजूला सारतोय तर लगेच पुढची आठवण येऊन भिडली. कल्याणमध्ये नविन वातावरणात आम्ही रूळत होतो. माझी नविन शाळा चालू झाली. पण सचिन सारखा मित्र गमावल्या नंतर नविन मित्र करण्याची इच्छा बहुतेक माझ्यात राहिली नव्हती. मी फारसा कोणात मिसळत नसे. एकटा-एकटा रहायचो. आमच्या शाळेतल्या मराठीच्या बाईंना काहीतरी वाटलं असावं. त्या माझ्याकडे विशेष लक्ष देत. माझी विचारपूस करत, वर्गात मुद्दाम मला प्रश्न विचारून बोलतं करत. हळू हळू मी सुद्धा बदलत गेलो आणि पाटील बाई माझ्या आवडत्या शिक्षिका बनल्या. बाईंच्या प्रोत्साहनाने मग मी विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. पुढची ३-४ वर्षं कशी छान गेली! पण बाबांच्या बदलीची ऑर्डर आली आणि आम्ही सगळे गेलो कोल्हापूरात. कल्याणशी, शाळेशी संपर्क तुटला आणि पाटीलबाई आठवणीत जमा झाल्या. इतक्या वर्षांत अधून-मधून त्यांची आठवण यायची पण आजची आठवण इतकी तीव्र होती की जणू काही बाईच समोर आल्यात. इतकी जिवंत आठवण की मी त्यांना बघून पाया पडायला वाकलो आणि बाईंनी डोक्यावरून हात फिरवल्याची अगदी गडद जाणीव! काय तरी एकेक मनाचे खेळ!
कोल्हापूरात आमचं बस्तान बसलं. मी त्यावेळी ८ वी त होतो. आमची मस्त बंगल्यांची कॉलनी होती, टुमदार! शेजारच्या घरात रहाणार्या खरे काका-काकूंचा आणि आमचा एकदम घरोबा झाला. खरे काका-काकूंना मुल-बाळ नव्हतं. म्हणून की काय, ते दोघं माझ्यावर खूप प्रेम करीत. त्यांच्या घरी केलेला कुठलाही खास पदार्थ माझ्याकरीता काकू पाठवायच्याच. शिवाय माझ्या आवडीचा एखादा पदार्थ आठवड्यातून एकदा तरी बनवून काकू मला बोलावून खाऊ घालायच्या. याच काळात मी काकांकडून चेस खेळायला शिकलो. मग काय, आमचे चेसचे गेम्स रंगत असत. एवढंच काय, एकदा घरच्या एका कार्यानिमित्त आई- बाबांना चार दिवस पुण्याला जायचं होतं. माझी परिक्षा जवळ आल्याने मला जाणं जमणार नव्हतं. तेव्हा काका-काकूंनी आनंदाने मला त्यांच्याकडे रहायला येण्याचं आमंत्रण देऊन आई-बाबांची मोठी काळजी दूर केली होती. ते चार दिवस काका-काकूंबरोबर फार मजेत घालवले होते मी.
१२ वी नंतर मी इंजिनीअरिंग करायला पुण्यात गेलो. आई-बाबा कोल्हापूरात होते. सुट्ट्यांमध्ये मी कोल्हापूरला गेलो की काका-काकूंशी भेट व्हायचीच. माझं इंजिनीअरिंग झालं आणि बाबांनी लवकर स्वेच्छानिवृत्ती घेऊन कोकणात, आमच्या वडीलोपार्जित घरात जाऊन रहाण्याचा निर्णय घेतला. आमच्या तिथल्या जमिनीवर शेती करण्याचं बाबांचं कित्येक वर्षाचं स्वप्न साकार होणार होतं. ते कोकणात गेल्यावर काका-काकूंशी संपर्क कमी होत गेला. ते दोघं एकदा आवर्जुन आमच्या कोकणातल्या घरी येऊन ४ दिवस राहूनही गेले पण नंतर मात्र संपर्क कमी होत, थांबलाच.
आज अचानक काका आठवणीतून सामोरे आले. मला बघून प्रेमभराने पुढे आले. माझ्या पाठीवरून हात फिरवीत पुटपुटले, "एवढी कसली रे परत चेसचे डाव मांडायची घाई!" किती मस्त वाटलं इतक्या वर्षांनी काकांना पाहून!
किती उत्कटतेने ह्या माझ्या प्रेमाच्या लोकांच्या आठवणी येत होत्या...जणू काही ते सगळे खरोखरंच भेटतायंत! तेवढ्यात माझी नजर गेली ती तनुजासारख्या दिसणार्या मुलीवर. तनुजासारखी कशाला? तनुजाच तर होती ती! इतक्या वर्षांनी तिची आठवण होऊन सुद्धा माझ्या अंगावर गोड शिरशीरी उमटून गेली, हृदयात कळ उठली.
तनुजा! माझी एकेकाळची प्रेयसी! इंजिनीअरिंग करत असताना तनुजाशी माझी ओळख झाली. ती माझ्याच बॅचला होती पण मी सिव्हील इंजिनीअरींगला तर ती इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचला. पण पहिल्या वर्षी काही विषय सामाईक असल्याने आमचे काही वर्ग एकत्र होते. त्यातून आमची ओळख झाली, मैत्री झाली, वाढली आणि कॉलेजच्या चौथ्या वर्षापर्यंत त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं.
रोजचे कॉलेजचे तास संपले की मग आम्ही एकत्रच असायचो. अभ्यास एकत्र, भटकंती, खादाडीनिमित्त एकत्र फिरणं! एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो आम्ही. दोन्ही घरच्यांनासुद्धा याची कल्पना होती आणि दोन्ही घरून न म्हणण्याचं काही कारणच नसल्याने शिक्षण संपवून दोघांचा जम बसला की लग्न - हे ठरल्यातच जमा होते.
पण दैवाच्या मनात वेगळाच क्रूर खेळ होता. बी.ई. च्या परिक्षेनंतर एक दिवस तनुजा स्कूटरवरून कुठेतरी जात असताना तो रोरावता ट्रक तिच्या स्कूटरला उडवून गेला. एका क्षणात माझी तनुजा मला, आम्हा सगळ्यांना सोडून गेली. तिच्या आई-वडीलांकरीता, माझ्याकरीता हा प्रचंड मोठा आघात होता.
३-४ वर्षं गेली, मला हे दु:ख पचवून आयुष्याला परत सामोरे जायला. मला नोकरी लागली. आई-बाबा मागे लागले लग्नाकरीता. त्यांचं म्हणणं, लग्न करून मी संसाराला लागलो की माझं दु:ख हलकं होईल. तनुजाला विसरणं तर शक्य नव्हतं. पण जगरहाटीप्रमाणे पुढे जाण्याकरीता मी लग्नाला तयार झालो. आणि खरोखरंच सीमाबरोबर संसारात गुंतत गेलो तशी तनुजाच्या दु:खाने हळूहळू खपली धरली.
आज अचानक तनुजा अशी आठवणीत आली. खरंच ही फक्त आठवणीत दिसतेय का? इतक्या तीव्र असतात का आठवणी की अगदी खर्याचा भास व्हावा? मी कान देऊन ऐकतोय, तनुजा काय म्हणतेय ते! "इतकी काय घाई होती रे तुला मला भेटण्याची?"
अरे! ही पण काकांचंच वाक्य काय बोलतेय! कसली घाई?
आठवणींच्या दालनातून मी वळून मागे बघितलं...सारं कसं धूसर दिसतंय! लांबवर आमच्या पलंगापाशी सीमा, आई-बाबा दिसतायंत, उदास-हताश का वाटतायंत ते? रडतायंत का? आठवणी बाजूला करून मी त्यांच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय....पण...पण...जमतच नाहीये. जणू काही या आठवणींच्या जगातच मी सामावलो गेलोय. सीमा, आई- बाबा अजून-अजून धुसर होताना दिसतायंत आणि माझे जुने जीवलग, ओळखीचे वेढून टाकतायंत मला!