मला भाकरी करायला जमत नाहीत. एका मैत्रीणीने उकड काढून लाटून करायला शिकवल्या. प्रयोग म्हणून केल्या, जमल्या. आजकाल ईन्स्टाग्राम वर छान छान प्लेटींग केलेले पदार्थ दिसत असतात, म्हणून माझाही एक प्रयत्न. असंच मज्जा.
आता भाकरी: मोदकाची उकड काढतो तसं १ कप ज्वारीच्या पिठासाठी १.५ कप पाणी उकळत ठेवायचं, एक चमचा तेल आणि चिमुट्भर मीठ घालून उकळी आली की पीठ घालून ढवळून झाकून ठेवून गॅस बंद करायचा. (मी सोहम चं पीठ वापरलं). १० मी नी मळून, लाटून भाकरी करायच्या. मी टॉर्टीया प्रेस/ पुरी प्रेस वापरला. छान भाजून घ्यायच्या. चक्क मस्त फुगल्या माझ्या! या प्रमाणात टाको च्या आकाराच्या १२ झल्या. येस १२.
नेहमीच्या पळीवाढ पिठल्यापेक्षा थोडंसच घट्ट पिठलं केलं. मला झुणका कंसीस्टंसी आवडत नाही. तोठरा बसतो.
मेथीची पानं खुडून घेतली. सॅलड म्हणून हेच वापरलं. कांदा बारीक उभा चिरून घेतला, हा झाला सालसा :)
हिरवी मीर्ची, लसूण, मीठ ठेचून ठेचा केला आणि थोड्या दह्यात मिसळून "ठेचा क्रेमा" केला :) नेमकी कोथींबीर संपलेली. ती राहून गेली.
दाण्याची चटणी आणि अंगणातलं डाळींब टॉपींग म्हणून वापरले आणि झाले पिठलं भाकरी टाको तय्यार.