या गेल्या तीन चार महिन्यात जिझेल पेलिकॉट ही ७२ वर्षांची 'साधीसुधी' आजी फ्रान्सच्या (आणि इतर जगाच्याही) पुरुषसत्ताक कायद्यांना आव्हान ठरली आहे. तिने तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर तिने एक महत्त्वाचं (आणि तसं साधंच) मत मांडलं - की शरम पलिकडच्या बाजूला वाटायला हवी - ज्याने अत्याचार केला, बलात्कार केला त्याला. शरम नाहीच, पण तिने दाखवली ती बिनतोड हिंमत.
जिझेलवर, तिच्या नवर्याने साधारण दहा वर्षे म्हणजे तिच्या वयाच्या साधारण ६० ते ७० काळात, तिला झोपेच्या गोळ्या किंवा इतर गुंगीची औषधे देऊन बलात्कार केला. काही वेळा त्याने याचं चित्रण केलं आणि कोको नावाच्या एका स्थळावर ते अपलोड केलं. तिथे त्यानं इतर पुरुषांना त्याला सामील व्हायला बोलावलं. आणि किमान ८३ वेगवेगळ्या लोकांनी जिझेलवर या काळात तिच्या नवर्याबरोबर बलात्कार केला. म्हणजे ८३ लोकांचं चित्रण केलेलं पोलिसांना सापडलं. एकूण किती असतील काय सांगावं! ८३ पैकी ५१ लोक पोलिसांना नक्की ओळखून सापडले, त्यांच्यावर सप्टेंबर ते डिसेंबर खटला चालू होता.
जिझेलने खटल्याच्या सुरुवातीला आपला अनामिक राहण्याचा हक्क झुगारला. "मला कशाची शरम, शरम तर विरोधी बाजूला वाटायला हवी" अश्या अर्थाचं तिचं वाक्य जगभरातल्या स्त्रियांना भिडलं आहे.
खटल्यातून धक्कादायक घटना तर बाहेर आल्याच, पण त्या निमित्ताने फ्रेंच समाजाला खोलवर आत्मचिंतन करणं भाग पडलं. बलात्काराचा खटला नक्की कसा चालतो ते एकदम उघडंवाघडं समोर आलं. काय प्रश्न विचारले जातात आणि कायद्यात कोणत्या पळवाटा असतात ते दिसलं. कायद्यानुसार जिझेलवर बलात्कार होतानाची क्लिप पुरावा म्हणून सादर होत होती, पण बलात्कार्याच्या वकिलाने जर क्लिप दाखवण्यावर आक्षेप घेतला तर तो आक्षेप मान्य होत होता. म्हणजे आरोपी पुरुषाची प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची. अनेक आरोपींनी, 'हा बलात्कार नाही कारण जिझेलच्या नवर्याने त्यांना बोलावले आणि तिचे शरीर वापरायला देऊ केले' असा बचाव केला. ती झोपलेली किंवा गुंगीत आहे याचं त्यांना काही विशेष वाटलं नाही. तिची परवानगी आहे की नाही याची खात्री करायची गरज वाटली नाही - किंबहुना तशी गरज नाहीच असा त्यांच्या वकिलाचा प्रतिवाद होता. यावरून फ्रेंच कायदे, फ्रेंच संस्कृती आणि बलात्कार म्हणजे नक्की काय यावर मोठंच मंथन फ्रान्समधे चालू झालं आहे. ते हळूहळू इतर युरोपात आणि जगभरात पसरत चाललं आहे.
जिझेल आणि तिचा नवरा पन्नासेक वर्षे एकत्र संसार करत होते. तीन मुलं आणि पुष्कळ नातवंडं, निवृत्तीनंतरचं छोट्या गावातलं निवांत आयुष्य असं वरवर पहात चित्र दिसत होतं. पण साधारण २०१० पासून तो रोज रात्री तिला गुपचुप गुंगीचं औषध देत होता आणि कोणाकोणाला बोलावून बलात्कार करत होता. ड्रग्जच्या अतिवापरानं तिला विस्मरण होऊ लागलं, पुंजक्यांनं केस गळायला लागले होते; म्हणून मेंदूच्या तपासण्या, अल्झायमर तर नाही ना, कुठे मेंदूत गाठ तर नाही ना म्हणून ती डॉक्टरच्या वार्या करत होती. नवरा तिच्या बरोबर हॉस्पिटलात वगैरेही जात होता. डॉक्टरांनाही हे लक्षात आलं नाही आणि ८३+ लोकांपैकी एकानेही पोलिसांना कळवायचं किंवा गेला बाजार तिला ती जागी असताना सांगायचं मनावर घेतलं नाही. जिझेलच्या नवर्याने आपल्या लेकीसुनांचेदेखील चोरून फोटो काढले होते; गर्दीच्या सुपरमार्केटात हळूच स्कर्टच्या खालून फोटो काढण्याचे उद्योग तो करत असे, त्यात एकदा पोलिसांनी पकडून १०० युरो दंड करून सोडून दिले होते. काही वर्षांनी दुसर्यांदा पकडल्यावर त्याच्या फोनची, लॅपटॉपची तपासणी करताना जिझेलचे व्हिडियो पोलिसांना सापडले. आणि पोलिसांनी सांगेपर्यंत तिला यातल्या कुठल्याच गोष्टीची सुतराम कल्पना नव्हती!
दोनेक आठवड्यांपूर्वी खटल्याची सांगता झाली. डॉमिनिक पेलिकॉटला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्याच्या तालमीत तयार झालेल्या त्याच्या एका शिष्याला १२ वर्षे. (याने जिझेलवर बलात्कार केला नाही, पण स्वतःच्या पत्नीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर डॉमिनिकबरोबर बलात्कार केला.) एकूण यादी पहाता सगळ्या थरातले, रंगा/धर्माचे, वयाचे पुरुष आहेत त्यात. बहुतेकांना मुलंबाळं, संसार आहेत. सापडलेले सगळे ४०/ ५० किमीच्या परीघातले, आसपासच्या छोट्या गावातले लोक आहेत. पाचेक लोकांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप आहेत. पण बहुतांश लोक सरळ, पापभीरू वाटावेत असे आहेत. इंटरनेटवर डॉमिनिकचे व्हिडियो पाहून, दोन घटकांची करमणूक म्हणून त्याचं आमंत्रण स्वीकारलेले. इतरही अनेक असतील ज्यांनी व्हिडियो पाहिले पण तिकडे गेले नाहीत. शेकडो, हजारो असे असतील. पण एकानेही पोलिसांना कळवलं नाही. सगळ्यात धक्कादायक गोष्ट हीच आहे की यात काही विशेष, चुकीचं, अन्यायकारक आहे असं एकाही कोको सदस्याला वाटलं नाही. पोलिसांना चुकून डॉमिनिकचा लॅप्टॉप सापडला नसता तर हे प्रकरण असंच बिनबोभाट सुरू राहिलं असतं.
पुरुष म्हणजे असेच असतात, आग/ लोणी किंवा 'त्यात काय एव्हढं' अश्या प्रतिक्रिया सुरुवातीला फ्रान्सभर होत्या. जिझेलच्या गावाच्या महापौरांनी 'कोणी मृत्युमुखी पडलेलं नाही की काही नाही.' अशी किरकोळीत काढणारी प्रतिक्रिया दिली; एका आरोपीच्या वकिलाने 'बलात्कार हा नेहमीच बलात्कार नसतो' असं एक समजायला कठीण विधान केलं. काही पुरुष मंडळींनी #नॉटऑलमेन असा बचावात्मक धागा सुरू केला. सुरुवातीला जिझेलही भांबावलेली होती, दु:खातिरेकानं शब्द फुटत नव्हता तिच्या तोंडून. पण शरम 'त्यांना' वाटायला हवी हे तिनं ठामपणे स्वतःला आणि कोर्टाला सांगितलं आणि त्यातून आता फ्रान्समधे कायदे सुधारायची, स्त्रीविषयीचा दृष्टीकोन बदलायची आणि शरमेनी बाजू पालटायची चळवळ सुरू झाली आहे.
जिझेलच्या हिंमतीला माझा आदरपूर्वक नमस्कार!