शेतावरची साप्ताहिक फेरी झाली. आठवडा पुढे जाईल, तसतशी काहीनाकाही कामं पुढ्यात येतात. मग काहीवेळा शेतावर जाणं जमत नाही. म्हणून शक्यतो सोमवारीच जायचं असं ठरवलं आहे. घरापासून शेतापर्यंत जायला साधारण दीड तास लागतो. लांबचा रस्ता आहे. निरनिराळ्या प्रकारच्या ट्रॅफिकचा अनुभव मिळतो. त्या अनुभवांचं गाठोडं जरा जास्तच जड व्हायला लागलं, म्हणून आता जायची वेळ बदलून अलीकडे आणली आहे. सकाळी पावणेसात-सातच्या दरम्यान निघतो. तिकडून येताना साधारण पाच-साडेपाचपर्यंत घरात पोचता येईल, अशा बेताने निघतो. पुण्यातील रस्त्यांची, वाहतुकीची परिस्थिती बदलणं काही आपल्या हातात नाही. आपली वेळ बदलणं तेवढं आपल्या हातात आहे, ते करायचं ठरवलं आहे. पण त्यामुळे सकाळी तुंबळ घाई होते. डबे, लिंबू सरबत, प्यायचं पाणी एक ना दोन अशी बरीच तयारी असते. ते सगळं उरकून वेळेत निघालो.
आधी आपापल्या ऑफिसला निघालेली चाकरमानी मंडळी दिसायची. आता छान टापटीप आवरून, गणवेश घालून शाळेत जायला निघालेली मुलं दिसतात. त्यांची ने-आण करणाऱ्या पिवळ्या बसेसची लगबग चालू असते. त्या बसेसवरची नावं वाचून पुण्यात नव्याने सुरू झालेल्या शाळांची नावं कळतात आणि ज्ञानात भर पडते. महेश ड्राइव्ह करत असल्यामुळे त्याला इकडेतिकडे बघणं शक्य नसतं. पण मला निवांत वेळ असतो. कधीकधी मी माझं विणकाम करत असते, नाहीतर बाहेरच्या पाट्या वाचायचं आवडतं काम करते! त्यामुळे स्थानिक पुढाऱ्यांचे वाढदिवस, पुण्यातील मिरवणुका-उत्सव-सांस्कृतिक कार्यक्रम कधी आणि कुठे आहेत, असा बराच व्यासंग होतो. त्याबरोबर ‘जाहिरात-काव्य’ ह्या काव्य प्रकाराचा आस्वाद घेता येतो. ती अत्यंत मनोरंजक असतात, ह्याची कृपया नोंद घ्यावी. अशा पाट्यांवरचं शुद्धलेखन बऱ्याच वेळा अक्राळविक्राळ असतं. मनातल्या मनात मी तेही दुरुस्त करते.
तळेगावच्या पुढे शेतापर्यंत बरीच वर्ष ज्या रस्त्याने जायचो, त्या रस्त्यावर एक प्रचंड मोठी दगडांची खाण आहे. तिथले दगड, खडी, रेडी मिक्स काँक्रीट ने-आण करणाऱ्या डम्परमुळे रस्त्यावर विविध आकाराचे आणि खोलीचे खड्डे झाले होते. तिथून कार चालवणं फार त्रासदायक झालं होतं. सध्या त्या रस्त्याचे काँक्रीटीकरण चालू आहे. त्यामुळे आता आम्ही थोडा लांबच्या पण चांगल्या रस्त्याने जातो. कमी रहदारीचा, चांगला रस्ता आहे. हा रस्ता अगदी निसर्गरम्य आहे. फार वाहतूक नाही. पहिल्यांदा आले, तेव्हा पावसाळा होता.
नेहमीचा रस्ता नसल्यामुळे आणि दुथडी भरून वाहणारी नदी, धबधबे, हिरवे-काळे डोंगर, धरणाचं बॅकवॉटर, भाताची शेतं अशी दृश्य असल्यामुळे मला आपण कुठेतरी फिरायला जातो आहोत, असं उगीचच वाटत होतं! भाताची हिरवीगार शेतं, एरवी रुक्ष वाटणारे पण पावसामुळे ओलसर गोडी आलेले डोंगर बघून अगदी हरखून गेले होते. आता भाताची कापणी झाली. गवत वाळलं. हिरव्या रंगाऐवजी पिवळ्या-तांबूस रंगाचं प्राबल्य आहे. ह्या रस्त्यावर एक रेल्वे ट्रॅकसाठीचा अंडरपास आहे. त्याच्या आधी ‘पावसाच्या पाण्याची पातळी दोन फुटांच्या वर असेल, तर वाहन नेऊ पाण्यात नेऊ नये’ अशी सूचना आहे. पण प्रत्यक्ष जागेवर मात्र सेंटिमीटरच्या खुणा भडक लाल रंगात रंगवलेल्या आहेत!! मी बांधकाम क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळे सेंटिमीटरचं फूट-इंचात आणि उलट असं धर्मांतर झोपेतही करू शकते. तशी सवय नसलेल्या माणसाने नक्की काय करणं अपेक्षित आहे, ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाच ठाऊक. पूर आलेला असताना हे सगळं प्रकरण पाण्याखाली जाईल, हे एक उपकथानक आहेच म्हणा. शेवटचं वळण घेतल्यावर गावातल्या देवळाचा कळस, शाळेची इमारत दिसल्यावर ओळखीच्या खुणा दिसल्या.
तर, असा टाईमपास करत करत आम्ही शेतावर पोचलो.
जाताना रस्त्यातील शेतांची आणि तिथे पोचल्यावर शेजाऱ्यांच्या शेताची, झाडांची पाहणी आपोआपच होते. ह्यांनी कांदा लावलाय, त्यांचा हरभरा चांगला झाला आहे, अशी. शेताच्या गेटपासून ते सामान ठेवतो त्या शेडपर्यंत तर मी जवळपास प्रत्येक पावलाला थांबते. कुठल्या झाडाला नवीन पानं फुटलेली असतात तर कुठे मोहोर आलेला असतो. आंब्याला-काजूला मोहोर आलेला आहे. प्रत्येक झाडापाशी थांबून मन भरून वास घेत घेत पुढे जाते. गेल्या आठवड्यात बोटाएवढा असणारा फणस आता पंज्याएवढा झालेला असतो. घरी मायाळू न्यावा की अळू, असा विचार येतो. अशी सगळ्यांची खबरबात घेत मी शेडपर्यंत पोचते. शेताच्या आसपासच्या माळरानातलं गवत आता वाळलं. ते कापून नीट रचून ठेवायचं काम चालू आहे. गवत कापणी, पिकातली खुरपणी, हरभऱ्याचे शेंडे तोडणे ही कामं साधारणपणे बायका करतात. गवत कापणाऱ्या बायका गावातल्या असतील, तर, ‘ काय, बरंय का?’ ‘हो बरंय बरंय, तुमचं बरंय का?’ अशी वास्तपुस्त होते. शेतावर नियमित येऊ लागल्यावर मी बरंच काही शिकले. त्यात इथला ‘काय, बरंय का?’ हा संवादही आहे.
शेतावरची नेहमीची चक्कर मारली. निसर्गाचा सृजनाचा सोहळा सुरू झाला आहे. काजू, आंबा, फणस, बोरं, आवळा सगळ्या झाडांवर मोहोर दिसतो आहे. पेरू संपत आले. पुष्कळ दिवस शास्त्र असल्यासारखे आम्ही डबा खाल्ला की ताजा पेरू खात होतो. करवंदाला नवीन, चकचकीत पानं आली आहेत. आता थोड्या दिवसात पांढरी फुलं, मग हिरवी कच्ची करवंदं आणि नंतर डोंगरची काळी मैना तयार होईल. पाठोपाठ जांभळांचा नंबर लागेल. फिरताना अंबाडीची बोंडं चटणीसाठी, मायाळूची पानं भाजीसाठी घेतली. तीन-चार पपया मिळाल्या. अशी नैसर्गिक पपई घेतली, की नेणारे पुन्हा मागणी करतात. त्यामुळे प्रतीक्षा यादीतल्या लोकांना पपई आली आहे, असा निरोप कळवला.
सध्या आम्ही तण-नियंत्रण कार्यक्रम धडाक्याने राबवतो आहे. रानमारी, टणटणी, रानतुळस असं निरनिराळ्या प्रकारचं तण फारच फोफावलं आहे. निगुतीने लावलेल्या झाडांचं अन्न, पाणी, सूर्यप्रकाश घेऊन ह्या मंडळींनी आपल्या यजमान झाडांना अगदी वेढून टाकलं आहे. मी ज्या दिवशी शेतावर जाईन, त्या दिवशी दोघं मिळून हे तण कापायचं काम करतो. त्यासाठी एक भलं थोरलं कटर घेतलं आहे. पायात गमबूट, हातात मोजे, स्कार्फ, डोळ्यांना गॉगल, मास्क असा जामानिमा केला. पुण्यात अतिक्रमण विरोधी पथक जसं कारवाई करायला रस्तोरस्ती जातं, तसं आम्ही तण-नियंत्रणासाठी निघालो. रानमारीची झाडं कंपाउंडच्या किंवा झाडाच्या आधाराने उंच वाढतात. ते मुळापाशी कापायला एकजण आणि त्याच्या झाडाला लपेटलेल्या त्याच्या फांद्या ओढून काढायला दुसरा, अशी श्रम-विभागणी असते. थोड्या थोड्या वेळाने अदलाबदल. भरमसाठ उंच वाढत असलं, तरी रानमारीचं झाड तसं नाजूक असतं. लगेच सुकतं. आधीच्या आठवड्यात कापलेल्या रानमारीच्या ढिगांवरून चाललं की पायाखाली कडकड मोडतं. तेव्हा अगदी विकृत असा आनंद होतो! टणटणीला खूप काटे असतात. कापताना सावधपणे कापावं लागतं. कापलेलं झाड बाजूला रचतानाही नीट बघून करावं लागतं. नाहीतर आपल्या हातात कुसळ जातं, खरचटतं, कपडे काट्यात अडकून फाटतात. टणटणी लवकर सुकत नाही. आठवडा झाला तरी पानं हिरवी असतात. रानतुळशीला उग्र वास असतो. ह्याची मुळं फार खोलवर जात नाहीत. जमिनीत वरच्यावर असतात. त्यामुळे हे मुळापासून उपटता येतं. शेत-भेटीला येणाऱ्या लोकांना तिथे आल्यावर काहीतरी काम करायची इच्छा असते. त्यांच्यासाठी हे रानतुळस उपटण्याचं काम अगदी आदर्श आहे. कुठलंही उपकरण लागत नाही. शिवाय जितकं काम होईल, तेवढी आम्हाला मदत होते. करणारा खूश आणि आम्हीही.
सध्या चालू असलेल्या तण-नियंत्रण कार्यक्रमाचे तीन मुख्य सदस्य ही झुडपं आहेत. कंपाउंडच्या बाहेरून आवळ्याच्या झाडांवर आक्रमण करणारे वेल बरेच आहेत. पण तिथे पोचायला अजून अवकाश आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत न कंटाळता हे काम करायचं, असं ठरवलं आहे. असं तीन वर्ष न कंटाळता केलं, तर तण उगवणं कमी होतं, असं ऐकलं आहे. शेताच्या काही भागात मोठी झाडं ओळीने लावलेली आहेत. काही भागात भाजी किंवा धान्य लागवड होते. झाडांच्या तीन-चार ओळी आज तणमुक्त केल्या. लांब-लांब पसरलेल्या फांद्या ओढून काढताना नाकतोंडात धूळ जातेच. मास्क असला तरीही. त्या झाडांना एक उग्र असा वासही असतो. धुळीचा आणि झाडांचा वास तो दिवसभर जाणवत राहतो. घरी आल्यावरही रुंजी घालतो!!
शेताच्या सगळ्यात जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायचं तर पंधरा-वीस मिनिटे चालत जावं लागतं. गेल्या आठवड्यात त्या शेजाऱ्यांच्या म्हशीला पारडू झालं. त्यांनी आवर्जून चीक आणून दिला होता. निर्भेळ आणि खात्रीचा चीक शहरात मिळणं दुरापास्त. आम्ही आठवडाभर खरवसाची मौज केली. कल्याणला आम्ही वर्षानुवर्षे दूधनाक्यावरच्या ठरलेल्या दूधवाल्याकडून दूध घ्यायचो. म्हैस व्यायली की ते दूधवाले चीक विकत नसत. चीक विकला की म्हशीचं दूध आटतं, असा त्यांचा विश्वास. मग नेहमीच्या ग्राहकांच्या घरी चीक द्यायचे. भरपूर खरवस खायला मिळायचा. त्या दूधवाल्याची, चीक घरी आल्यावर आई त्याची उस्तवार करायची आणि आम्ही भरपूर खरवस खायचो, त्याची आठवण आली. आज शेजारच्या शेतकरी कुटुंबाकडे जायचं ठरवलं होतं.
तण-नियंत्रण झाल्यावर जेवलो आणि शेजाऱ्यांकडे पारडू बघायला गेलो. एकदम छोटंसं आणि गोंडस, गोडू पारडू बघायला इतकं छान वाटलं! त्याचे भरपूर लाड केले. मानेखाली खाजवलं, खूप कुरवाळलं. त्या बदल्यात त्याने गरम, खरखरीत जिभेने हात चाटून दिले. मधून मधून ओरडून ते दुसऱ्या गोठ्यात बांधलेल्या आपल्या आईला त्याच्या भाषेत ‘आई, कोणीतरी वेगळीच माणसं आली आहेत आणि माझे लाड करत आहेत,’ असं सांगत असावं. तिथल्या मावशींनी आमच्यासाठी गडबडीत सरबत करून आणलं. त्यांच्या ओसरीत बसून मग ‘तुम्ही काय लावलं , आम्ही काय लावलं, वगैरे गप्पा सुरू झाल्या. ‘तुम्ही खतं वापरत नाही, फवारण्या करत नाही. म्हणून तुमची पिकं मागास राहतात.’ वगैरे नेहमीची स्टेशनं संभाषणात आलीच. ते सगळं कुटुंब शेतीत सतत राबत असतात, पिढ्यांपिढ्यांचं शेतीचं वळण आहे आणि शिवाय खत-कीटकनाशकांची मात्रा. त्यामुळे खरोखरच त्यांची पिकं तजेलदार, हिरवीगार दिसतात. आम्ही साधारण २०२० पासून शेतीला पूर्ण लक्ष घातलं. त्याआधी काही वर्ष परदेशी वास्तव्य झालं. तेव्हा जे मदतनीस असतील, ते त्यांना हवी ती पिकं काढायचे. अर्थातच रासायनिक खतं, तण-कीटकनाशकं वापरून. आम्ही कारभार हातात घेतल्यापासून तो वापर बंद केला. तो आसपासच्या लोकांना विचित्रपणा वाटला, तर नवल नाही. अजूनही जे भेटतील ते, ‘आमचा शाळू बघा कसा जोरात आहे, आमच्या आंब्याला मोहोर किती भारी आलाय, गवत नाही त्यामुळे आमची शेतं बघा कशी स्वच्छ दिसतात’ ह्या वाक्प्रचारांचे वाक्यात उपयोग करून दाखवतात. आधी मी हिरीरीने आमची बाजू मांडायचे. आता हसून सोडून देते. रासायनिक औषधं वापरून पीक उत्तम येईल, ह्याचे खात्री नसते. उत्पन्नाला भाव काय मिळेल, ही तर पुढची गोष्ट. नैसर्गिक शेतीत खर्च कमी. उत्पादनाची प्रत चांगली. ते प्रकृतीलाही चांगलं. पुण्यात असलेल्या नैसर्गिक उत्पादनांच्या बाजारपेठेमुळे मालाला दर चांगला मिळतो. दुर्दैवाने पीक हाताला नाही लागलं, तरी पुण्यातल्या घरातली आमची चूल पेटणार असते. अशा परिस्थितीत तिथल्या शेतकऱ्यांनी काय करावं, हे सांगायचा मला काही अधिकार नाही. जोवर शेतकरी-ग्राहक ही साखळी मजबूत होऊन शेतकऱ्याच्या खिशात योग्य पैसे पडत नाहीत, तोवर बाजारावर रसायनयुक्त उत्पादनाचं वर्चस्व राहणार हे नक्की.
सगळ्या शेतातून सध्या घेवडा, वांगी, कांदा, हरभरा, ज्वारी दिसते आहे. येताना अजून एक शेतकरी दादा भेटले. त्यांच्या शेतात कांद्याची खुरपणी चालू होती. बियांसाठी लावलेल्या कांद्यातली थोडी पात त्यांनी भाजीसाठी दिली. आधीच्या शेतातून थोड्या मिरच्या, एक दुधी, थोडे टोमॅटो असा वानवळा मिळाला होता. त्यात ही भर. इथल्या लोकांशी बोलताना त्यांची आणि माझी बोलायची पद्धत कशी वेगळी आहे, ह्याची गंमत वाटते. म्हणजे प्रमाण भाषा आणि मावळी मराठी असा फरक नाही. तो असणारच. पण मी ‘आज थंडीमुळे उशीरा उठले.’ असं सांगेन. तिथले लोकं त्याच घटनेची मोठी गोष्ट करून सांगतात.,’ सकाळी जाग आली. आमच्या मंडळी म्हणाल्या ‘उठा’. पण पार गाराठलो हुतो. दोन गोधड्या घेतल्या तरी आवरना. शेवटी पोराला हाक मारली आणि त्याला बोललो का आज तूच जा बाबा धार काढायला. तो गेला आणि माझा परत डोळा लागला. पार तासाभराने उठलो’ असं काहीतरी. ऐकायला मजा येते.
पुण्यात शांतता दुर्मिळ झाली आहे. वाहनांचे, शेजारपाजारच्या टीव्हीचे, फोनचे, बोलण्याचे असे एक ना दोन आवाज सतत कानावर आदळत असतात. इथे अगदी निर्मळ शांतता असते. पक्षांची किलबिल चालू असते. लांबच्या वाहनांचे आवाज क्वचित येतात. पण आपल्या शांततेचा परिघ मोडून आत घुसत नाहीत. एकूणच इथल्या जगण्याला एक संथ, शांत पण ठाम अशी लय आहे. संथ लयीतलं संगीत जसं खोलवर भिडतं, तशी इथली लय वाटते. उन्हाळा ओसरला की भाताच्या लागवडीची तयारी करायची. पुढे चार-पाच महिने भात. नंतर कांदा-हरभरा-गहू-ज्वारी. कधी थोडा भुईमूग. तोवर उन्हाळा येतोच. पुन्हा तेच चक्र चालू. निसर्गापासून दार गेलेल्या आपल्या जीवनशैलीचा ताबा आपण ‘घाई’ ह्या भावनेकडे दिलाय असं वाटतं. सतत घाई. कुठेतरी जायची. कुठेतरी पोचायची. इथल्या निसर्गाचं, आयुष्याचं ब्रीदवाक्य ‘धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ होय. माझी सिंचे सौ घडा, ऋत आये फल होय’.
शेतावर जायला लागल्यापासून कणाकणाने ती शांतता, ती लय, तो ठेहराव, ती वाट बघण्याची शक्ती, योग्य वेळी योग्य गोष्ट घडेल अशी विश्वासू श्रद्धा माझ्यातही मुरते आहे. किंवा तशी मुरायला हवी आहे, ह्याची स्पष्ट जाणीव झाली आहे. माझ्या जीवाला इतकंही पुष्कळ आहे.
‘जीवनज्योती कृषी उद्योग’ ह्या शेतीच्या प्रयोगाशी संबंधित अजून काही लेख
जीवनज्योती कृषी डायरी
https://www.maitrin.com/node/4585
दिव्याखालचा अंधार
https://www.maitrin.com/node/4303
आम्रविक्री योग