कोलंबिया म्हटलं की सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यात लगेच काय येतं तर तिथली गुन्हेगारी आणि ड्रग्जसाठी ओळखला जाणारा एक बदनाम देश. कोकेन बनवणारा सगळ्यात मोठा देश आहे हा.
ते सगळं बाजूला ठेवून मला मात्र इथलं पक्षीजीवन बघायला जायची खूप इच्छा होती, काही वर्षांपूर्वी कॅनडाच्या एका फोटोग्राफरचा इथल्या पक्षीनिरीक्षणासंबंधातला व्हिडिओ बघितल्यापासून. भारतातून असे द. अमेरिकेत टूर घेऊन जाणारे फार नाहीयेत त्यामुळे ह्या टूर्स घेऊन जाणाऱ्याचं नाव कळल्यावर मी लगेच त्याचा नंबर शोधून त्याला मेसेज केला. त्याच्या कोलंबिया, कोस्टारिका, इक्वाडोर अशा वेगवेगळ्या टूर्स असणार होत्या. कोस्टारिकाच्या तारखा जमत नसल्याने मी कोलंबियाचा विचार करायला सुरूवात केली.
तसं म्हटलं तर दक्षिण व मध्य अमेरिकेतील बाकीच्या देशातही खूपच सुंदर व रंगीबेरंगी पक्षी बघायला मिळतात. कोस्टारिका हा देश या यादीत खूप वरच्या क्रमांकावर आहे. पेरू, ब्राझिल, इक्वाडोर या देशांमध्येही पक्षीनिरीक्षणाच्या खूप संधी आहेत.
कोलंबिया हा देश पक्षीनिरीक्षण करणाऱ्यांसाठी स्वर्ग आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. भूदृश्य (लॅंडस्केप्स) आणि हवामानाच्या(क्लायमेट) या विविधतेमुळे, कोलंबिया हा सर्वाधिक जैवविविधता असलेल्या देशांपैकी एक आहे. शिवाय, तज्ञांच्या मते, कोलंबिया हा जगातील सर्वाधिक पक्ष्यांच्या प्रजाती असलेला देश आहे, ज्यामध्ये १,९०० पेक्षा जास्त स्थानिक आणि स्थलांतरित प्रजाती आहेत.
ह्या टूर्स खूप खर्चिक आहेत त्यामुळे विचार करायला बऱ्यापैकी वेळ घेऊन जानेवारीतली टूर बुक केली. तुमच्याकडे अमेरिकेचा किंवा शेंगेन व्हिसा असेल तर कोलंबियाचा वेगळा व्हिसा काढायला लागत नाही. बऱ्याच एअरलाईन्स एकच चेक-ईन बॅग देतात किंवा मग काही एअरलाईन्स चेक ईन लगेज देतच नाहीत. मी टर्किश एअरलाईनचं तिकीट बुक केलं ज्यात मला २ चेक-ईन्स बॅग्ज न्यायला परवानगी होती. फक्त ह्यात एकच प्रॅाब्लेम होता की माझा इस्तांबुल एअरपोर्टवर २१ तासांचा स्टॅापओवर असणार होता.
नोव्हेंबरच्या आसपास तयारीला लागले. ड्रीम ट्रीपला जायचं म्हणून मी एक नवीन कॅमेरा व लेन्स घेतली. नवीन लेन्स प्राईम होती पण तिथे झूम लेन्सचीही गरज भासू शकते त्यामुळे ती ही जवळ असू देत असं माझ्या टूर ॲापरटेरने सांगितलं त्यामुळे त्याचंही ओझं उचलणं आलं. कॅमेऱ्याची सगळं कोडकौतुकं पुरवेपर्यंत जायचा दिवस आलाच.
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच सीमोल्लंघन केलं व विमानात बसले. मजल दरमजल करत दुसऱ्या दिवशी दुपारी कोलंबियाची राजधानी ‘बोगोटा’ ला पोचले. आमच्या टूरमधली बाकीची मंडळी रात्री पोचणार होती. रात्री ब्रिफींगच्या वेळेस कळलं की जी आयटनररी दिली गेली होती तशी बिलकूल नसणार आहे. जिथे शेवटच्या दिवशी जायचं होतं तिथे उद्याच पोचायचं आहे आणि त्यासाठी उद्या सकाळी मेडेलिन ह्या शहरात जायची डोमेस्टिक फ्लाईट घ्यायची आहे. तिथून मग पुढे सगळा बसने प्रवास असणार होता.
सकाळी उणीपुरी अर्ध्या तासाची फ्लाईट घेऊन मेडेलिनला पोचलो. तिथे बस व ड्रायव्हर तयारच होता. ह्याच बसने आम्ही अगदी काली/कॅली हे शहर सोडून बोगोटाला परत येईपर्यंत फिरत होतो. आम्हांला इथून ३ एक तास प्रवास करून हमिंगबर्ड्स तसंच टॅनेजर्स बघायला एका फार्महाऊसला जायचं होतं. हे फार्महाऊस एका वयस्कर आजींचं होतं. ती पक्षांसाठी फळं वगैरे ठेवायची आणि बघता बघता ती फळं खायला बरेच पक्षी येतायत हे तिच्या लक्षात आलं. मग तिने तिथे बाहेरच्या लोकांनाही बघायला/फोटो काढायला परवानगी दिली. आम्ही तिथे पोचलो ते जेवायची वेळ झालीच होती. समोरच हमिंगबर्ड्स बागडत होते.
हा वरचा ग्रीन जे (Green Jay किंवा Inca Jay) व डाव्या बाजूचा खालचा ‘कोलंबियन चाचालाका‘ (Colombian chachalaca) व उजवीकडचा ‘ॲंडीयन मॅाटमॅाट‘ (Andean Motmot)
ह्या ट्रीपमध्ये अनेक पक्षी असे होते की जे फक्त कोलंबियातच दिसतात किंवा काही फक्त द. अमेरिकेपुरतेच मर्यादित आहेत. त्यामुळे ते जास्त स्पेशल होते. ह्या यादीत आंटपिट्टा, माऊंटन टुकान, कॅाक ॲाफ द रॅाक, टॅनेजर्स असे अनेक पक्षी होते. ह्यातले काही दिसले तर काही नाही दिसू शकले. आमची बर्डिंग ट्रिपही मध्य व उत्तर-पश्चिम कोलंबियातल्या काही भागात असणार होती.
हमिंगबर्ड्सच्या जगात ज्या काही ३६६ च्या आसपास जाती दिसतात त्यातल्या जवळपास १५०-१६० तर फक्त कोलंबियातच दिसतात. हमिंगबर्ड्स साधारण सेकंदाला ८० वेळा त्यांचे पंख फडफडवतात त्यामुळे त्यांचा मेटॅबोलिझम खूपच असतो. ह्यांचं मुख्य अन्न म्हणजे फुलांमधला मध. ह्या हाय मेटॅबोलिझममुळे त्यांना सतत साखर लागते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी साखरेचं पाणी घातलेले फीडर्स लावले की हमिंगबर्ड्स हमखास येतातच. मी ह्या हमिंगबर्ड्सच्या बाबतीत असंही वाचलं की ह्याच हाय मेटॅबोलिझममुळे हे पक्षी रात्रीही खायला लागू नये म्हणून त्यांच्या शरीराच्या सगळ्या क्रिया रात्रीपुरत्या बंद करतात व हायबरनेट होतात व त्यांचा मेटॅबोलिक रेट त्यांच्या नॅार्मल मेटॅबोलिझम रेटपेक्षा १/१५ ने कमी करतात.म्हणजेच प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी ‘फिरूनी नवी जन्मेन मी‘ असा असतो. हे पक्षी इतके छोटे आणि हलके असतात की अगदी मुठीतही मावतात. काहींचे रंग अतिशय चमकदार असतात. एकाच पक्षात रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स दिसतात.
कोलंबियामध्ये आमची बरीच फोटोग्राफी ही फीडर्सवर असणार होती. म्हणजे काय तर…हमिंगबर्ड्ससाठी साखरेचं पाणी घातलेले फीडर होते तर टॅनेजर्ससाठी फळं ठेवलेली असायची. अर्थात फक्त फीडर्सवरच येणाऱ्या पक्षांचेच फोटो आम्ही काढणार होतो असं नव्हतं तर काही ठिकाणी जंगलातही फोटो काढायचे होते. दुसरा दिवस हा असाच हमिंगबर्ड्ससाठी राखून ठेवला होता. काढा किती फोटो काढायचे ते. नंतर नंतर तर फोटो काढायचा पण कंटाळा आला मला. ट्रायपॅाड वापरत नसल्याने कॅमेरा धरून हाताला रग लागली.
हमिंगबर्ड्स सारखेच इथे दिसणारे टॅनेजर्स व माऊंटन टॅनेजर्स हे पक्षी. ह्यातील टॅनेजर्स हे मध्य व दक्षिण अमेरिकेत दिसतात तर माऊंटन टॅनेजर्स हे ॲंडीज पर्वतराजींमध्ये दिसतात. हे ही हमिंगबर्ड्ससारखेच इतके चमकदार रंगांचे असतात की अक्षरश: त्यांच्या रंगसंगतीकडे बघतच रहावं. देवाने ह्यांना सुंदर रंग देऊन जगाच्या ह्या भागात पाठवलं आहे. ह्या पक्षांचं मुख्य अन्न म्हणजे फळं. त्यामुळे इथे समोर ठेवलेल्या केळ्यावर/पपईवर टॅनेजर्स यथेच्छ ताव मारत होते.
हे टॅनेजर्स :-
द. अमेरिकेत दिसणारा अजून एक स्पेशल पक्षी म्हणजे - ॲंडियन कॅाक ॲाफ द रॅाक. हा पक्षी प्रामुख्याने फक्त द. अमेरिकेतच बघायला मिळतो. ह्या कॅाक ॲाफ द रॅाकच्या चार जाती द. अमेरिकेत बघायला मिळतात. तसंच हा पेरू ह्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. ह्या पक्षाचं डोकं वरच्या बाजूने गोल डिस्कसारखं असतं. पटकन बघताना चोच कुठे आहे तेच लक्षात येत नाही. हा पक्षी इथे चटकदार लाल रंगाचा होता. ब्राझिलमध्ये याचा हाच लाल रंग भगव्या रंगाकडे झुकलेला असतो.
आंटपिट्टा हा याच भागात दिसणारा पक्षी. याचं दर्शन तसं दुर्लभच म्हणायचं. पण इथे आता त्यांना प्रेमाने हाका मारून खायला बोलावतात त्यामुळे लोकांनाही तो बघायला मिळतो. मध्य व द. अमेरिकेत मिळून याच्या साधारण ६८ जाती बघायला मिळतात, आम्हांला त्यातील ८ जाती बघायला मिळाल्या. जसं वर मी म्हटलं की त्यांना हाका मारून बोलावतात व ते आल्यावर त्यांना किडे खायला देतात.
आमच्या ट्रीपच्या पाचव्या दिवशी आम्ही जिथे जाणार होतो तिथे ४ आंटपिट्टा दिसतील असं गाईडने सांगितलं. तिथला पहिला आंटपिट्टा सकाळी ७ वाजता येतो असं सांगितलं. पण तो काही त्या दिवशी आलाच नाही. दुसऱ्या आंटपिट्टाची मजा म्हणजे तो जंगलात जायच्या वाटेच्या कडेला उभाच होता, जणू काही लोकांची वाटच बघत होता. आले का सगळे? असं वाटल्यावर तो त्याच्या नेहमीच्या जागी गेला, आम्ही सगळे त्याच्या मागोमाग. सगळे आले हे बघितल्यावर तो त्याच्या नेहमीच्या पर्चवर (फांदीवर) आला. त्याला रोज खायला देणारा मुलगा त्याच्याशी बोलत होता व खायलाही देत होता. आता ह्या बाजूला वळ, त्या बाजूला वळ असं तो त्याला स्पॅनिशमध्ये सांगत होता व तो ही खरंच तशा पोझ देत होता
मनासारखे फोटो मिळाल्यावर आम्ही निघालो व तो ही गेला झाडीत. खालच्या फोटोतला खालच्या ओळीतला मधला आंटपिट्टा.
फक्त द.अमेरिकेत आढळणाऱ्या पक्षांपैकीच अजून एक पक्षी माऊंटन टुकान व टुकानेट. माऊंटन टुकान ह्या पक्षाच्या फक्त चार जाती आहेत व त्यातल्या तीन कोलंबियात दिसतात. टुकानेट्स आकाराने टुकानपेक्षा थोडे छोटे असतात.
ह्यातील सगळ्यात उजवीकडचा ‘ग्रे ब्रेस्टेड माऊंटन टुकान’(Gray-breasted Mountain Toucan), डावीकडचा वरचा ‘क्रिमसन रम्प्ड टुकानेट’(Crimson-rumped Toucanet) व डावीकडचा खालचा ‘टुकान बार्बेट‘(Toucan Barbet).
मधले दोन दिवस आम्ही रेन फॅारेस्टमध्ये जाणार होतो. तिथेही फीडर + जंगलात असणार होती फोटोग्राफी. नावाप्रमाणेच दोन्ही दिवस संध्याकाळी पाऊस होताच पण नशिबाने दिवसा पावसाने त्रास नाही दिला. ही जागाही बर्डर्समध्ये पॅाप्युलर आहे कारण बरीच लोकं होती आलेली. पण मला तिथलं फीडर्सचं सेटिंग फार काही आवडलं नाही पण काही वेगळे पक्षी बघायला मिळाले ही त्यातली जमेची बाजू.
आमच्या ट्रीपमधले शेवटचे दोन दिवस तसे नॅाट सो हॅपनिंग होते. त्या आधी दोन दिवस काली/कॅली शहरातच दोन ठिकाणी फीडरवरच होती फोटोग्राफी, पण एकदम बिझी दिवस होते. त्यातल्या पहिल्या दिवशी एका ठिकाणी हा ‘ॲंडीयन कॅाक ॲाफ द रॅाक‘ त्यांच्या लेकमध्ये मिळेल असं आमच्या लोकल गाईडने सांगितलं. लेक म्हणजे काय तर जिथे नर मेटींगसाठी डिस्प्ले व कोर्टशीप रिच्युअल्स करतात ती जागा (इंग्लिश शब्दांसाठी माफी). ती जागा जंगलात होती पण फार काही उतरायचं नाहीये असं सांगितलं त्याने. ह्या पक्षाचे फोटो मिळाले असले तरी त्याच्या सांगण्याने सगळ्यांनाच मोह झाला आणि तिथेच आम्ही फसलो. एकतर तिथे ह्या पक्ष्याला बघायचं तर लवकर पोचायचं होतं कारण हे नर पक्षी ह्या जागेवर अगदी सकाळी असतात, नंतर दिवसा ते दिसत नाहीत.
त्यामुळे अगदी पहाटे आम्ही हॅाटेल सोडलं. तासभर प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी पोचलो व जंगलात जाण्यासाठी उतरायला सुरूवात केली. ७० एक मीटरच उतरायचं आहे असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र बरंच खाली जायचं होतं. वाट अगदी निसरडी होती, त्यात कॅमेरे सांभाळत व स्वत:ला सांभाळत उतरा. सगळेच गाईडवर वैतागले.मला तिथे फार काही फोटो मिळालेच नाहीत, कारण माझ्या लेन्ससाठी अंतर कमी होतं आणि क्लाऊड फॅारेस्ट असल्याकारणाने डास खूप होते. पंधरा एक मिनीटं थांबून मी तिथून काढता पाय घेतला. वर येताना वाटेत पक्षी बघत बघत मुख्य ठिकाणी पोचले. इथेही फीडर्स लावले होते, जरा उजाडल्यावर पक्षांची फीडरवर झुंबड सुरू झाली. हे ठिकाण पक्षांची फोटोग्राफी करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दुपारच्या जेवणापर्यंत तिथे फोटोग्राफी केली व हॅाटेलवर परतलो. हमिंगबर्ड्स व टॅनेजर्सचे छान फोटो मिळाले.
कालीमध्येच दुसऱ्या दिवशीही वेगळ्या ठिकाणी फीडरवर फोटोग्राफी असणार होती. इथे आम्हांला अजूनपर्यंत न बघितलेले ‘क्रिमसन-रम्प्ड माऊंटन टुकानेट’ (Crimson-rumped Toucanet) व मल्टिकलर्ड टॅनेजर दिसतील असं गाईडने सांगितलं. हे ठिकाण खूपच सुंदर होतं. फीडर्स लावले होते ती जागाही फोटो काढण्यासाठी परफेक्ट होती कारण लाईट छान होता व फोटो काढायला अंतरही व्यवस्थित होतं. तिथे गेल्या गेल्या अर्ध्याच तासात आम्हांला दोन्ही पक्ष्यांनी दर्शन दिलं. इथेही आम्हांला छान फोटो मिळाले. आज आम्हांला दुपारी बोगोटाची परतीची फ्लाईट पकडायची होती त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर निघायचंच होतं पण आज इथून पायच निघत नव्हता. नाश्ता, दुपारचं जेवण सगळंच बेस्ट होतं, नाव ठेवायला जागाच नव्हती.
हा रेड-हेडेड बार्बेट (नर व मादी)
हा कोलंबियातला सगळ्यात रंगीबेरंगी आणि आवडता पक्षी - मल्टिकलर्ड टॅनेजर
वर म्हटल्याप्रमाणे शेवटचे दोन दिवस जरा बोअरच होते. बर्डिंग काही एक्सायटिंग नव्हतं. शेवटच्या दिवशी जाताना लागलेली वाट, ते जंगल व तिथे असलेली फार्मस खूपच आवडली मला. पण याच दोन दिवसात आम्हांला अस्वलाचं पिल्लू अगदी जवळून बघायला मिळालं. आमचा गाईड इतका खुश झाला कारण त्याचीही अस्वल बघायची पहिलीच वेळ होती.
तर….अशा प्रकारे माझी ही पक्षीनिरीक्षण स्पेशल ट्रीप काही अडचणी न येता पार पडली. कोलंबियातच रोड प्रवास बराच झाला. त्यावेळेस बाहेर दिसणारी घरं, झाडं बघून मला कोकणातच प्रवास करतोय असं सारखं वाटायचं (कुठ्ठे म्हणून न्यायची सोय नाही) म्हणूनच की काय कोलंबिया मला परकं वाटलंच नाही. आता परत अशी संधी कधी मिळेल याची वाट बघायची. तोवर……आदिओस.