घरची, दारची, सासरची, माहेरची सगळी माणसं, गुरं, प्राणी पक्षी सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा"..
गाऱ्हाण चाललं होतं. आणि डोळे भरून आले. घरी पालखी आली होती. ४ ५ वर्षांनंतर. इतकी वर्ष ऐकलेली आणि इतरांच्या रिल्स वर पाहिलेली पालखी आमच्या घरी आली होती. देव घरी आले होते. घाईत होते तरी थोडा वेळ थांबले. पाहुणचार करून घेतला, विसावले आणि मग पुढच्या घरी निघाले.
होळी झाली की कोकणातले देव निघतात भक्ताघरी जायला. कोकणातली माणसं, संस्कृती इतर गोष्टी सारखी साधी, भोळी. खूप थाट माठ दिखावा नसलेली. देव पण अगदी आपलें वाटावे असे. देवींची नाव आई सकटच येणारी. पावणाई, वाघजाई, विठ्ठलाई, चोपडाई. प्रत्येकाची साधी सोप्पी गोष्ट. साध्याच रीतीभाती पण मैला मैला वर बदलणाऱ्या आणि तितक्याच निगुतीने पाळल्या जाणाऱ्या. कोकणात दोन सण मोठ्या दिमाखाने साजरे होतात. गणपती आणि शिमगा. दोन्हीत देव घरी येतात. आणि दिमाख असतो तो घरोघरी. कारणाशिवाय कुठलाच भपका नसलेले सण. खरोखरी देवासाठीचे. ज्या ओढीने आणि भावनेने वारकरी वारीला जातात तीच ओढ आणि साधेपणा ह्या देवाच्या घरी येण्यात. गणपती ७ दिवस तर पालखी काही मिनिट. पण भावना तीच.
गावागावांत शिमग्याचे दिवस बदलतात. होळी आधी आठ दिवस ते होळी नंतर १५ दिवसांपर्यंत शिमग्याचा सण चालतो. नुसती पालखी, ते सोंग आणि पालखी, शंकासूर ते मांडा वरचे नमन अशा वेगवेगळ्या पद्धती. प्रत्येकाला राखून दिलेल काम. प्रत्येकाचा मान. सगळं ठरलेलं. शंकासुरापासून वेगवेगळी सोंग धारण करून घरोघरी फ़िरणारे गावकरी, पालखीचे भोई, ढोलकीवाले सगळेच देवमय झालेले.
फेब्रुवारी पासून होळी कधी आणि पालखी कधी येणार च्या चर्चा सुरु होतात. गणपती सारख्या तारखा ठरलेल्या नसतात. जमेल ते होळीनंतर ४ ५ दिवस गावी मुक्कामाला जातात. ज्यांना शक्य नसतं ते पालखीच्या तारखेची वाट बघतात. महिनाभर आधी तारखा येतात. गावाचे गुरव आणि वाडीतले लोक प्रत्येक वाडीत कुठल्या घरी पालखी कधी जाणार ह्याची यादी बनवतात आणि ती यादी फिरू लागते. प्रत्येक जण कामाला लागतो. घराची साफसफाई. असेल तिथे सारवण वगैरे सुरु होतं. ओसाड पडलेली कोकणची गाव किंवा फक्त म्हातारी माणसं असलेली घरं हळुहळू बहरू लागतात. ठेवणीतल्या बैठकापासून ठेवणीतले कपडे निघतात. प्रसादाच ठरत आणि गाव नांदायला लागत.
इतकी वर्ष मी फवत ऐकूनच होते. आजोळी यायची पालखी पण कधी पाहिली नव्हती.
का येतात देव घरी. म्हणजे गणपती गणेशोत्सव म्हणून सगळ्यांना माहीत आहे, पण हे गावचे देव का येतात काहीतरी कारण गोष्ट असेलच ना.
मला कळलेली दोन कारणं
३६४ आपण जातो देवाच्या दारी, १ दिवस तो येतो आपल्याकडे. माझी लेक म्हणाली आणि नणंद पण हेच म्हणाली. छान भावना. असेल कदाचित असच.
दुसर कारण
शेतीचा हंगाम संपलेला असतो आणि आंब्याचा आणि पावसाळी पूर्व काम सुरु व्हायची असतात. शेतकरी विसावलेले असतात. कोकणात भात नाचणी खरीप पिके आणि मग काजू आंबे. त्यामुळे मार्च तसा शांत असतो. वसंतांची चाहूल लागलेली असते. ह्या सालची शेती झालेली असते. म्हणूनच मग देव येतात सगळं नीट आहे ना बघायला आणि असली ईडा पीडा तर टाळायला. नवीन वर्ष सुखा समाधानाने सुरु होईल ह्याची खात्री करून घ्यायला.
आम्ही पालखीच्या दिवशी आमच्या घरी गेलो. साफसफाई झाली होती. गेल्या गेल्या माजाची तयारी केली. देव येणार मग स्वागत तर जंगी हव ना! रांगोळी, तोरण, हार, ओठी सगळं तयार करून झालं. मग वाट बघत बसलो. मी पहिल्यांदाच गेले होते आणि २०० २५० माणसं घरी येणार, नाही म्हटलं तरी दडपण आल होतं. म्हणता म्हणता २ वाजले आणि पालखी शेजारच्या घरून आमच्या घरी निघाली. मी तबक घेऊन उभी होते आणि पालखीच्या जरा आधी धावत मोठ्या वहिनी आल्या आणि मग एक एक गोष्ट दाखवत गेल्या. ओवाळण्या पासून ओठी पर्यंत. पूजे पासून नैवेद्या पर्यंत. अगदी प्रेमाने आई दाखवेल तस. मी ऐकत गेले आणि करत गेले. गाऱ्हाणं झालं. देव थोडा वेळ थांबले आणि निघाले. ऊन झाल होत. माणसं पण दमली होती. पण सगळं नीट झालं. मन प्रसन्न शांत झालं. मनाला एक समाधान वाटलं. माझा देव आईसारखा पालखी आधी धावून आला पालखी बरोबर थांबला आणि निघून गेला. न मागता ना सांगता पाठीराखा झाला.
असाच असतो ना देव. म्हणून वर्षाकाठी एकदा घरी येतो सकळ कुशल बघतो, आशीर्वाद देतो. ईडापीडा नाही ना ह्याची खात्री करतो आणि परत देवळात जातो. अगदी तसाच माणसांतही दर्शन देऊन गेला.