मी एकटी राहते म्हणून मला माझ्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी सोप्या कशा होतील याकडे फार लक्ष द्यावं लागतं.
उदाहरणार्थ, पार्सल येणार असेल आणि मी नेमकी अंघोळीला असेन किंवा बाहेर जाणार असेन, तर मला डिलिव्हरीवाल्याला फोन करून सांगावं लागतं – "पार्सल सिक्युरिटीकडे ठेव", "शेजारी दे" वगैरे. त्याला हे आधीच कळवणं गरजेचं असतं, कारण मी बाहेर गाडी चालवत असेन आणि त्याच वेळी त्याने मला फोन केला, तर तो गोंधळेल आणि त्याचा वेळ वाया जाईल – हे टाळणं हेच माझं उद्दिष्ट असतं. मग शेजाऱ्याला सांगणं, डिलिव्हरीवाल्याला नेमकी वेळ विचारणं – यात बराच वेळ जातो.
रिटर्न पार्सल असेल तर मी ऑर्डर कॅन्सल करतानाच ते पार्सल चपला ठेवायच्या कपाटात ठेऊन देते. मग मी घरी असो वा नसो, अमेझॉन, मिंत्रा अशा सर्व डिलिव्हरीवाल्यांना माहिती असतं की रिटर्न पार्सल शू-रॅकमध्ये आहे. आतापर्यंत एकदाही चूक झालेली नाही – सुदैवाने!
भाजीसाठी मी कधी कधी माझ्या शेजारणीवर अवलंबून असते. ती मुलाला क्लासला सोडायला जाते तेव्हा येताना माझ्यासाठी भाजी आणते. तिच्यासाठी ते स्ट्रेस बस्टर असतं. पण तिला त्रास नको म्हणून मी आठवडाभराच्या भाज्या – काकडी, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे – 'किसान कनेक्ट' वरून ऑर्डर करते.
आजही मी ऑर्डर टाकली. डिलिव्हरीची वेळ होती संध्याकाळी ४ ते रात्री ८. मी ऑफिसहून सहा वाजता परतले, पण भाजी आली नव्हती. बाई आली, काम करून गेली. मी उरलेली कामं करत होते आणि भाजीची वाट बघत होते.
७:१० झाले आणि एक मेसेज आला – "तुमची भाजी डिलिव्हर झाली आहे आणि तुम्ही काहीही रिटर्न केलेलं नाही."
माझा पारा चढला. मी कॉल सेंटरला फोन केला – "डिलिव्हरी न करताही कशी म्हणता की डिलिव्हर झाली?" एक वेळ बेल तरी वाजवायची, ती नाही तर निदान फोन तरी करायचा! मी भराभर बोलत गेले. समोरच्याने शांतपणे ऐकून घेतलं, "मी रायडरला सांगतो" असं सांगून फोन ठेवला.
तेवढ्यात माझी शेजारिण म्हणाली, "मी जरा घरी जाऊन येते" आणि माझ्या दारातून बाहेर गेली. तेव्हा दिसलं – शू रॅकवर सगळी भाजी रचून ठेवलेली होती. मी बेल तपासली – बटण बंद होतं. मनात म्हटलं, "रायडरने तरी फोन करायला हवा होता!" पण कॉल हिस्ट्री तपासली तर दोन मिस्ड कॉल्स होते.
माझ्या अंगावर शहारे आले. अपराध्यासारखं वाटायला लागलं. मी लगेच डिलिव्हरीवाल्याला फोन केला – फोन बिझी. कॉल सेंटरचं वेटिंग! जीव कासावीस झाला. मी इतकी बिझी आहे, पण निव्वळ डिलिव्हरीचं काम करतो म्हणून त्याला माझ्या चुकीमुळे बोलणी खावी लागली असतील, या विचाराने मन खूप अस्वस्थ झालं.
शेवटी एकदाचा कॉल लागला. मी त्या एक्झिक्युटिव्हला स्पष्ट सांगितलं – "मी कम्प्लेंट केली, पण ती माझ्या चुकीमुळेच होती. कृपया रायडरला काहीही बोलू नका. माझा फीडबॅक नोंदवा आणि त्याचं रेटिंग कमी करू नका."
नंतर डिलिव्हरी बॉयला फोन करून मनापासून माफी मागितली. तो म्हणाला, "मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. इट्स ओके." तेव्हा कुठे मला शांत वाटलं.
हा प्रसंग मी सांगतेय त्यामागे काही मोठेपणा मिरवायचा हेतू नाही.
पण एखाद्याबद्दल सहानुभूती, जाणीव ठेवणं – त्यांचं काम लहान असो वा मोठं – ही संवेदनशीलता आपल्यात असली पाहिजे. त्यांना हे जाणवलं की त्यांच्या कष्टांची आपल्याला जाणीव आहे, तरी ते आपल्यासाठी जीव ओतून काम करतात. आणि ही ‘स्पेशल ट्रीटमेंट’ आपण केवळ शब्द वापरून देऊ शकतो – त्यासाठी कुठलाही खर्च येत नाही.
पण आपण हे शब्द जपून वापरतो – जणू काही वापरले तर झिजतील!
मी 'मीशो' वरून अनेक ऑर्डर्स करते. त्यामुळे त्या डिलिव्हरी पार्टनरला माझ्या टाइमटेबलची कल्पना आहे. तो येण्यापूर्वी मला फोन करतो, मी घरी नसेन तर सिक्युरिटीकडे किंवा शू कपाटात ऑर्डर ठेवतो, नंतर मला कॉल करून ओटीपी विचारतो.
या समन्वयामुळे दोघांचं आयुष्य सोपं झालंय.
उन्हात, पावसात, थंडीत हे लोक आपल्यासाठी वस्तू दारात आणून देतात. स्विगी, झोमॅटो वाले दारात पोहोचले की अॅपवर दिसतं. मी दार उघडून, लिफ्टजवळ जाऊन, ओटीपी तयार ठेवते आणि लगेच ऑर्डर घेते. कारण आमच्या सोसायटीची लिफ्ट एकदा आली की जात नाही आणि हवी तेव्हा येत नाही – हे मला माहिती आहे.
त्यांच्यावर वेळेचं बंधन असतं – धावपळ, गाडी लावणं, एंट्री करणं, वर येणं, डिलिव्हरी करणं – आणि आम्ही राहतो दहाव्या मजल्यावर! परत लिफ्टची वाट बघा… किती त्रासदायक असतं हे मला चांगलंच माहिती आहे.
आपल्याला जसं कोणीतरी छोटीशी मदत करून आयुष्य सोपं करावं असं वाटतं, तसंच आपणही एखाद्याचं आयुष्य छोटीशी गोष्ट करून सोपं करू शकतो – ही जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे, असं मला वाटतं.
शेवटी, आपण सगळेच आपला स्ट्रेस कमी कसा करावा याच्या मागे असतो.
पण समोरच्याचा स्ट्रेस कमी होईल अशी कृती जर सहज करता येत असेल, तर ती आपली जबाबदारी असावी.