असे राघवराव, मीराताई आणि मित्रमंडळ आपल्या देशांत हवे असतील तर त्यांना तयार करणारे बहिर्जी नाईक आधी हवे आहेत. ही कथा काल्पनिक आहे आणि जुनी आहे!
रहस्य - हस्तलिखित खलित्याचे
सगळे वाटसरु उतरणार तर ह्याच धर्मशाळेत. त्यांचे गावच असे मोक्याच्या ठिकाणी होते. आधीच्या गावाहून निघून, डोंगर ओलांडून इथे पोचेपर्यंत अंधार पडणार आणि पुढचा डोंगर ओलांडण्यासाठी उजेडाची वाट पाहत गावात मुक्काम करायला लागणार.
म्हणून तर बहिर्जी नाईकांनी ह्या गावातल्या तरुण पथकाला अगदी स्वतःच्या देखरेखीखाली तयार केले होते. त्यात तरुण, तरुणी इतकेच काय काही लहान चुणचुणीत मुले देखील होती. धर्मशाळेतील हरकाम्या देखील ह्याच पथकातील भिडू होता.
काल रात्री काही संशयास्पद वाटसरु धर्मशाळेत उतरल्याचे कळताच आज पहाटे चार वाजल्यापासूनच धर्मशाळेशेजारील मैदानावर गावातील काही मुलांनी व्यायाम आणि सूर्यनमस्कार सुरु केले. सूर्य उगवायची वाट न पाहताच!! बरे तर बरे .. त्या वाटसरूंच्या हे लक्षात आले नव्हते की सगळ्यांची तोंडे सूर्याकडे असण्याच्या ऐवजी धर्मशाळेच्या पडवीकडे आहेत.
ते चारी वाटसरू उंचेपुरे, धिप्पाड होते. त्यांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरचे भाव ह्यावरून नक्कीच ते सामान्य वाटसरू वाटत नव्हते. हरकाम्याने सांगितले होते की त्यांच्याकडे काही महत्वाचा ऐवज आहे आणि तो खानाकडे द्यायला ते निघालेले आहेत.
हे कळताच गावातील तरुण मावळ्यांचा अग्रणी असलेल्या राघवरावाला स्फुरण चढले. बहिर्जीकाकांनी शिकवलेल्या विद्येचा वापर करण्याची वेळ आली होती.
एकाला सामानाकडे लक्ष ठेवायला सांगून बाकी तिघे वाटसरु नदीवर स्नानाला गेल्याचे बघताच आता हीच संधी आहे हे त्याने ओळखले. हरकाम्याने सामानाकडे लक्ष ठेवणाऱ्या त्या वाटसरुला बोलण्यात गुंगवले होते. राघवराव त्यांचे सामान तपासण्यासाठी पडवीत गेला. पाहतो तर काय? चारी अगदी सारख्या थैल्या! आता प्रत्येक थैली शोधायची म्हटली तर वेळ जाणार.
इतक्यात त्याच्या लक्षात आले की त्याचा सूर्यनमस्कार घालणारा प्रत्येक मित्र अचानक ‘ओम सूर्याय नमः’ म्हणायला लागला आहे. इशारा राघवरावाला कळला. मित्रांनी व्यायाम करता करता पडवीकडे लक्ष ठेवले होते. आता ते सांगत होते सूर्यनमस्कारातील तिसरा मंत्र. त्याचा अर्थ होता तिसऱ्या थैलीत मुद्देमाल सापडेल. राघवरावाने तिसऱ्या थैलीत हात घालताच त्याच्या हाताला एक बटवा लागला. तो घेऊन राघवराव पटकन शेजारच्या मंदिरात गेला.
मंदिरात राघवरावांची भगिनी मीराताई आणि तिची सखी चित्ररेखा वाटच पाहत होत्या. बटवा उघडून पाहिला तो त्यात फणीच्या पेटीत ठेवलेला एक खलिता. कुणा वतनदाराने खानाला लिहिलेला तो खलिता वाचून सगळ्यांचेच रक्त संतापाने सळसळू लागले.
त्या खलित्यात लिहिले होते, “आदिलशाही दरबारच्या सेवेसाठी उतावीळ झालो आहोत. मर्जी व्हावी. भेटीसाठी तळमळत आहोत. इति लेखनसीमा.” आणि खाली काहीतरी अगम्य भाषेत लिहिलेले होते.
आता हा फितूर होऊ पाहणारा वतनदार कोण? ते कधी आणि कुठे भेटायला बोलावत आहेत हे कसे कळणार? महाराज नवरात्रीत अनेक वतनदारांकडे देवीच्या दर्शनास जात असत. तेव्हा दगाफटका झाला म्हणजे काय करायचे?
ते लोक स्नान करून यायच्या आत पत्र पुन्हा थैलीत जायला हवे होते. त्यांना गाफील ठेवूनच कार्यभाग साधायला हवा होता. चित्ररेखेने तो खलिता जसाच्या तसा एका कागदावर नकलून काढला. राघवरावांनी मूळ खलिता बटव्यात घालून परत धर्मशाळेच्या पडवीवरच्या थैलीत नेऊन ठेवला.
राघवराव तिकडे खलिता ठेवायला गेलेले असताना, इकडे मंदिरात हे अगम्य भाषेत काय लिहिलेले असेल ह्याचा विचार मीरा ताई आणि चित्ररेखा करत होत्या, पण ते गूढ काही केल्या उलगडत नव्हते. क्षण अन क्षण मोलाचा होता. इतक्यात वारा आला. तो नकलून काढलेले खलिता फडफडला आणि अचानक मीरा ताईंनी ‘जय भवानी’ म्हणून हात जोडले. काय झाले ते चित्ररेखेला कळेचना.
त्या म्हणाल्या, “हे बघ, सगळे रहस्य उलगडले.” वाऱ्याने फडफडल्याने, त्या खलित्याचे प्रतिबिंब शेजारच्या स्वच्छ घासलेल्या तबकात पडले होते आणि प्रतिबिंबात त्या अगम्य लिपीचा उलगडा झाला होता. तिथे वतनदाराचे नाव, दिवस, वेळ आणि एक ठिकाण लिहिलेले होते. आता सगळ्यांच्या लक्षात आले की तो खलिता स्त्रिया वापरत त्या फणीच्या पेटीत का ठेवला होता. त्या पेटीला असलेल्या आरशात हा गुप्त संदेश वाचता यावा म्हणून ती योजना केलेली होती.
राघवराव आणि त्याच्या मित्राने त्वरित घोड्यावर मांड ठोकली आणि ते निघाले. तो नकलून काढलेला खलिता लगोलग राजांपर्यंत पोचवायला हवा होता. इकडे खरा खलिता खानापर्यंत पोचण्याआधीच नकलून काढलेला खलिता राजांपर्यंत पोचला होता.
पुढच्या हालचाली फार वेगाने घडल्या. त्या वतनदाराच्या मुसक्या बांधण्यात आल्या. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी एका घनदाट जंगलात खानाची भेट तर झालीच पण ती त्या फितूर वतनदाराशी नव्हे तर राजांच्या शूर सेनापतींशी आणि मावळ्यांशी.
गनीम बेसावध होता. खानाची संपूर्ण तुकडी मावळ्यांनी कापून काढली. त्यांची शस्त्रे सरकारदरबारी जमा केली.
दसऱ्याचा दरबार भरला होता. तरुण मुलांना आपल्या तालमीत तयार केल्याबद्दल महाराजांनी बहिर्जी नाईकांचे विशेष कौतुक केले. राघवराव, मीरा ताई आणि चित्ररेखा ह्यांचा शौर्य आणि चातुर्यासाठी कडे आणि मानाची वस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. ह्या घटनेनंतर पुढे अनेक महिने आदिलशाही सरदारांची स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नव्हती.
-वृंदा टिळक
दिनांक चोवीस सहा चोवीस