“मेंटेनन्स मोड”

साध्या शब्दांत सांगायचं तर, मशीनच्या बाबतीत मेंटेनन्स मोड म्हणजे नवीन काही तयार करणं, वेगाने धावणं, सतत सिद्ध करत राहणं थांबवणं.
नवीन अपडेट्स थांबवणं. फक्त आवश्यक तितकंच काम करणं. काही बिघाड झाला असेल तर तो तपासणं. जुन्या फाईल्स मेमरीतून काढून टाकणं आणि स्वतःला स्थिर कसं ठेवायचं हे पावलोपावली ठरवणं.
माणसाच्या आयुष्यातसुद्धा असा एक मेंटेनन्स मोड येणं गरजेचं असतं ....... आणि तो येतोच.

एका विशिष्ट वयात सतत “आता काहीतरी मिळवायचं आहे” या धावपळीपासून स्वतःची सुटका करून घेणं आवश्यक ठरतं. स्वतःला विचारावंसं वाटतं कि मी आतापर्यंत जे करत आलेय, ते करून थकलेय का?
तेव्हा एखाद्या गोष्टीकडे अधिक समजूतदारीने पाहायला सुरुवात होते.

अपेक्षा कमी होतात. नात्यांकडे, शरीराकडे, आणि मनाकडे शांतपणे पाहून त्याचं विश्लेषण केलं जातं. या सगळ्या प्रक्रियेत इतरांना खूश ठेवण्याकडून लक्ष हळूहळू स्वतःकडे वळतं.
पण बऱ्याचदा हा बदल घडतो तेव्हा आपण स्वतःलाच सांगतो कि मी हरलेय.

ही हार नसते.
हा आपल्या दुरुस्तीचा काळ आहे हे आपण सोयीस्करपणे टाळतो.
कारण त्या रेसमध्ये धावणं आपल्याला सवयीचं झालेलं असतं.
ती रेस सोडून काही वेगळं करणं अचिव्हमेंट नाही, असं आपण स्वतःशीच ठरवून टाकलेलं असतं.
वेगाची सवय आपल्याला त्या रेसमधून बाहेर पडू देत नाही.
लहानपणी आपल्या घरातली किंवा आजूबाजूची काही माणसं आपल्यासाठी रोल मॉडेल्स असतात. त्यांच्यासारखं व्हायचं असतं, त्यांच्यासारखी यशाची शिखरं गाठायची असतात.
पण कधीतरी यालाही अंत येतो. त्यांच्या जागी आपण येतो आपल्या अनुभवांमुळे.
आणि तरीही, आपल्यालासुद्धा रिप्लेस करणारी पुढची पिढी तयार होतेय
हे सत्य आपण हळूच नाकारत राहतो.

पण सत्य नग्न असतं. आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
काही वर्षं आयुष्य पूर्ण वेगात धावत असतं. स्वप्नं गाठायची असतात,
लोकांना खूश करायचं असतं, स्वतःला सतत सिद्ध करत राहायचं असतं.
आणि मग हळूहळू… एक दिवस लक्षात येतं......
थकवा आहे, पण सांगता येत नाही.
मन भरलेलं आहे, पण कारण सापडत नाही.
तेव्हा माणूस मागे सरकत नाही. तो फक्त मेंटेनन्स मोडवर जातो.

या मोडमध्ये आयुष्य शांत होतं. मोठे निर्णय थांबतात.
नवीन स्वप्नं नसतात, मोठी धावपळ नसते.
फक्त स्वतःकडे पाहण्याइतकी हिंमत असते.
या काळात माणूस जुन्या जखमा तपासतो, काही अपेक्षा delete करतो,
काही नाती archive मध्ये ठेवतो, आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकतो.
हा काळ एकटा असतो, पण रिकामा नसतो.

इथे माणूस मोडत नाही तो आतून हळूच दुरुस्त होत असतो.
कधीतरी एका विशिष्ट वयात या मेंटेनन्स मोडचं कारण स्पष्ट होतं.
आणि प्रत्येकाने कधीतरी या मोडमध्ये जाणं गरजेचं असतं.
कारण आपण आयुष्यभर स्पर्धा करत, जिवाच्या आकांताने धावू शकत नाही.
कुठेतरी थांबणं गरजेचं असतं. कुठेतरी पूर्णविराम घेणंही जगण्याचाच एक भाग असतो.
*********************************************************************************

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.