फिरत्या चाकांवर आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो त्याला आपण जनरली प्रवास म्हणतो. पण त्या व्यतिरिक्त हि आपल्या आयुष्यात काही प्रवास नकळतपणे घडत असतात.
आपल्या विचारांची बैठक अनुभवांनी बदलते. शरीरयष्टी बदलते. आपण कसे दिसावे या बद्दलचा प्रवास पण हळू हळू बदलत जातो.
काळ्याकडून पांढऱ्याकडे (केस) - हा एक खूप मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. भल्या भल्यांना तो शिफ्ट मारताना त्यांची स्थिती दोलायमान होते.
माझे केस अगदी अकरावीत वगैरेच हळू हळू पांढरे व्हायला लागले होते. तेव्हा ते तसेच ठेवणं फार प्रशस्त वाटलं नाही त्यामुळे माझ्या आत्याच्या नणंद बाई एक पार्लर चालवत त्यांच्याकडे जाऊन मी केसांना मेंदी लावत असे. अगदी सुरुवातीला माझे पांढरे केस नारिंगी वगैरे दिसत पण नंतर वारंवार करून त्यावर एक सुंदर कोटिंग आलं. त्या मेंदीत त्या पूर्ण अंडं मिक्स करत त्यामुळे केस धुतले कि त्याच्या विचित्र वास येत रहायचा पण मी खुश होते. मुळात माझे केस सरळ त्यातून मेंदी लावून ते खूपच सुळसुळीत झाले अजून. कोल्हापूर सोडून पुण्याला आले तेव्हा सुद्धा मी मेंदीच लावत असे. पण हळू हळू तो ट्रेंड मागे पडत गेला. पण तेव्हा केस कलर करणं हे खर्चिक काम असायचं आणि खिशात पैसे कमी... तरीही मी ते करायला लागले. मग नोकरी पक्की आणि हातात पैसे खेळायला लागल्यावर ते काम काही खर्चिक वाटेना झालं. मग नवे नवे प्रयोग म्हणजे स्ट्रिक्स करणं. वेगवेगळे रंग लावणं इत्यादी प्रयोग करून पहिले. पण मनातून कुठेतरी हे आवरण आहे आणि माझे नैसर्गिक केस हे मुळात भुरे आणि बरेचसे पांढरे आहेत हे मी पुरती जाणून होते.
असं अनेक वर्ष चाललं आणि मनात ठरवून सुद्धा काळ्याकडून पूर्ण नैसर्गिक रंगाकडे केसांची वाटचाल आता व्हायला हवी हे मनातून कळत असूनही वळत नव्हतं. त्यातच टोटल वेल बीइंग साठी मी एका होमिओपॅथी डॉक्टरांकडे गेले असता त्यांनी केसांना कलर लावणं बंद करा हे सांगितलं. आणि नेमकी मी जेव्हा त्यांच्याकडे गेले होते तेव्हा माझे केस नवा प्रयोग म्हणून पंचरंगी केले होते. ते सर्व रंग तुमच्या केसांवर उठून दिसावेत म्हणून हेअर ड्रेसर आधी तुमचे केस ब्लॉन्ड करतो आणि मग त्यावर हिरवे, निळे, जांभळे लाल असे साज चढवतो.. ( माझे कित्येक मित्र मैत्रिणी त्या काळात मला मोर म्हणायचे 🙂 )
मनात आधीपासूनच होतं कि रंग बंद करायचा त्यातून डॉक्टरांनी मला सल्ला दिल्यावर मी तो ताबडतोब आमलात आणायचं ठरवलं आणि कलर करणं बंद करून टाकलं. सुदैवाने तेव्हा माझ्या केसांना बेस कलर ब्लॉन्ड होता आणि तो बराचसा पांढऱ्या केसांशी मिळता जुळता असल्याने केस वाढत गेले आणि ते एकमेकांत मिसळून गेले. आणि एक दिवस असा उजाडला कि मी हेअर कट केला ज्यात माझे कलर केलेले सर्व केस कट झाले आणि नैसर्गिक रंगाचे केस उरले. मी समाधान पावले पण तो लुक कॅरी करणं मनाला फार जड वाटायचं. तरीही मी करत होते. मग वर्षानुवर्षे आपले केस कुरळे असावेत असं मला वाटायचं आणि तो प्रयोग करावा असं ठरवलं. ते फार सोपं गेलं कारण पर्मिंग करायला केसाला कलर असलेला चालत नाही. मग ते पर्मिंग मला इतकं सूट झालं कि माझे केस त्यात अगदी पूर्वी कलर करायची तेव्हा सुद्धा इतके चांगले दिसायचे नाहीत तितके चांगले दिसायला लागले.
मग मी तोच लुक कंटिन्यू करायचं ठरवलं. सगळी जनता जिथे स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग करून घेत होती तिथे माझा प्रवास उलटा सुरु होता. आणि तो अजून सुरूच आहे.
माझ्या एक लक्षात आलं कि पूर्वीपेक्षा मला आता पांढऱ्या केसातल्या मला जास्त लुक मिळतात. लोकांना तर ते ओरिजिनल पांढरे केस आहेत यावर सुद्धा विश्वास नाही बसत. मला लोक विचारतात कि तू हे मुद्दाम करून घेतलं आहेस का?
माझा बॉस अमेरिकेत असतो आणि आम्ही whatsapp call वर बोलतो. एकदा त्याने मला आवर्जून सांगितलं कि तू जे एन यु च्या प्रोफेसर सारखी दिसतेस 🙂
असो माझ्यासाठी हा प्रवास तसा म्हटलं तर अवघड आणि म्हटलं तर खूप सोपा होता. आजही माझ्या whatsapp चा डीपी बघून साठी ओलांडलेली एक मैत्रीण अगदी चारच दिवसापूर्वी मला म्हटली कसं जमवलंस ग? माझं तर अजून पांढरे केस कॅरी करायचं धाडस नाही होत. (हिचा मुलगा २८ वर्ष ओलांडलेला आहे)
मी इतर अनेको कारणासाठी पार्लर मध्ये गेले तर तिथे लोक मला गळ घालतात कि केस रंगवून घ्या, तुमचा चेहरा तरुण दिसतो पण केसांमुळे तुम्ही म्हाताऱ्या दिसता. मी त्यांना नम्रपणे नकार देते. कारण याचसाठी केला होता इतका अट्टहास आणि जमल्यावर पुन्हा कलर करू? बिग नो... 🙂 मी आहे त्यात खुश आहे. कारण आता मला उगीच वाढदिवस या दिवशी आहे, अमूक एक लग्न या तारखेला अटेंड करायचं आहे ते लक्षात घेऊन त्याच्या जवळपास कलर करू असे स्केड्युल ठेवावे लागत नाही. पूर्वी कलर प्रोटेक्टीन्ग शाम्पू वापरावे लागत. आता मी काहीही वापरू शकते. हा सर्वात मोठा फायदा..
आणि मुळात म्हणजे कलर्ड हेअर पेक्षा माझे जे पांढरे ओरिजनल आहेत त्याला कॉम्प्लिमेंट्स जास्त मिळतात मला.. मग असं वाटतं अरेरे! आपण आधीच का हे केलं नाही?
----------------------------------------------------------------------------------
जेव्हा मी माझ्या आयुष्यात शेवटचे केस रंगवले तेव्हाचा फोटो.

liberation thy name - No Color

