मधमाशीच्या घराची ओळख झाल्यावर आपण आता मधमाशीची ओळख करुन घेऊ. ही माहिती सर्व माश्यांना सारखीच लागू पडत असली तरी माश्यांचे आकार त्यांच्या प्रजातीनुसार लहान मोठे असतात. मधमाशीवरचे बहुतांश संशोधन अॅपिस मेलिफेरावर झालेले आहे. ही युरोपियन माशी आहे पण भारतातही आढळते. आपली भारतीय माशी अॅपिस सेरेना जिला महाराष्ट्रात सातेरी म्हटले जाते. ही मेलीफेरापेक्षा लहान आहे आणि तिच्यावर फारसे संशोधन अद्याप झालेले नाही. मधमाश्यांच्या प्रजातीबद्दल जास्तीची माहिती आपण नंतरच्या भागात घेऊया.
प्राणीजगतातील प्रत्येकाची शरीररचना सहसा नर किंवा मादी यापैकी एका प्रकारात मोडते. मधमाशीत राणीमाशी मादी आहे, ती पुनरुत्पादन करते. नरमाशी नरात मोडते, ती राणीला फलित करते. कामकरी माशी पुनरुत्पादन करु शकत नाही पण तिची शरीररचना राणीमाशीशी मिळतीजुळती असते म्हणुन तिला मादी ठरवले आहे.
आपण मधमाशीच्या शरीररचनेची माहिती करुन घेऊ.
सर्व किटकांप्रमाणे मधमाश्यांनाही डोके, थोरॅक्स म्हणजे डोके व पोट यांना जोडणारा भाग आणि पोट असे तिन भाग असतात. इतर किटकांपेक्षा मधमाश्यांना मध पोट ( honey stomach), पराग पेटी (pollen bag) आणि डंख (sting) हे जास्तीचे भाग असतात. मधपोट हे तिच्या नेहमीच्या अन्न पचन करणार्या पोटाच्या आधी असते, परागपेटी मागच्या पायांवर असते आणि डंख बुडाला असतो.
मध व पराग हे मधमाशीचे अन्न आहे. कामकरी माशी फुलातला मकरंद व पराग गोळा करत हिंडते. मकरंद म्हणजे मध नाही. फुलातल्या मकरंदात प्रामुख्याने साखर व पाणी असते. इतर घटक जसे तेल, सुगंध, अमिनो अॅसिड्स वगैरे फुलांच्या प्रकाराप्रमाणे थोडेफार असतात. परागीभवनासाठी फुलाला मधमाशीची गरज पडते आणि तिला आकर्षित करायला मकरंदात सुगंध व इतर घटक असतात.
कामकरी माशी फुलावर बसते तेव्हा ती आपल्या सोंडेने फुलातला मकरंद (nectar) ओढुन घेते. ही सोंड म्हणजे Proboscis. हिला मधमाशीची जीभ म्हणता येईल. हिचा आकार स्ट्रॉ सारखा असतो आणि आपण जसे स्ट्रॉने ग्लासातले पेय ओढुन घेतो तसे मधमाशी तिच्या सोंडेने फुलातला मकरंद ओढुन घेते.
तर माशी फुलावर बसुन मकरंद ओढुन घेते व तो चिटुकला थेंब तिच्या मधपोटात साठवते.. मकरंद फुलाच्या अगदी तळाशी असतो. तिथे घुसून तो खेचताना फुलाचे पराग तिच्या अंगाला चिकटतात. पराग चिकटावेत म्हणुन तिच्या केसांना फाटे फुटलेले असतात आणि केसांवर ईलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज असतो.
फुलांवर बसलेली असतानाच ती हे परागकण अंगावरुन झाडुन एकत्र करते आणि स्वतःची लाळ व फुलाचा मकरंद यांच्या साहाय्याने त्याची गोळी बनवुन ती आपल्या परागपेटीत ठेवते. ही झाडाझडती सुरू असताना तिच्या अंगावर चिकटलेले पराग फुलांच्या योग्य जाग्यावर पडुन परागीभवन होते आणि फुलांचे काम फत्ते होते. मधमाशीचे हे वैशिष्ट्य आहे की ती एका वेळी एकाच प्रकारच्या फुलांकडे आकर्षित होते. म्हणजे ती सकाळी बाहेर पडली की दोन मिनिटे आंब्यावर, तिथुन काजुवर, तिथुन नारळीवर असे नाचत बसत नाही. आंब्यावर जायचा हुकूम सकाळी मिळाला की ती दिवसभर आंब्यांवरच फिरत राहते. (हा हुकुम कसा मिळतो ते नंतर पाहु). त्यामुळे आंब्याचे पराग काजुवर किंवा नारळीवर पडुन फुकट गेले असे होत नाही. (हे फक्त उदाहरण आहे )
काही जातीच्या झाडांमध्ये नर व मादी भाग एकाच फुलात असतात, काही झाडांमध्ये नर व मादी फुले वेगवेगळी असतात. जिथे एकाच फुलात दोन्ही भाग असतात तिथे परागकणांची गोळी बनवताना परागीभवन होते. जिथे फुले वेगवेगळी असतात तिथे माशी आधी नरफुलाला भेट देते आणि नंतर मादीफुलावर बसते. फुलांना माहित असते की माशीला मकरंद व पराग हवेत. जिथे नर व मादी फुले वेगवेगळी असतात तिथे नरातला मकरंद जास्त सुवासिक असतो आणि चटकन उठुन दिसणारे पराग असतात. त्यामुळे मधमाशी आधी नरावर बसते आणि मग कमी सुवासिक व थोडेसेच पराग असलेल्या मादीफुलाला भेट देते. ज्या फुलाला आधीच एका मधमाशीने भेट दिलीय अशा फुलावर दुसरी मधमाशी बसत नाही. फुलाचा ईलेक्ट्रिकल चार्ज, वास आणि रुपडे पाहुन तिला लांबुनच कळते की ये फुल तो लुट गया है!!!
मादीफुलावर बसुन पराग झाडणी सुरू असताना आधीचे चिकटुनच राहिलेले नर फुलाचे पराग मादी फुलावर पडतात आणि परागीभवन होते. फुलांचे परागीभवन ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि सामान्यपणे आपल्याला त्याची शुन्य माहिती असते.
डोके, थोरॅक्स व पोट तिघांनाही असले तरी राणी, कामकरी व नर हे वेगवेगळे दिसतात आणि मानवी डोळ्यांना वेगळे ओळखु येतात.
राणी माशी (Queen Bee): पोळ्यात राणीमाशी चटकन ओळखता येते ते तिच्या लांबट मोठ्या पोटामुळे. तिच्या पोटात अंडी असतात आणि पुनरुत्पादन करण्यास आवश्यक अवयव असतात. त्यामुळे पोट मोठे असते. राणीचे आयुष्य दोन ते तिन वर्षांचे असते व ती दररोज ऋतुनुसार व फुलांच्या उपलब्धतेनुसार ५००-२००० अंडी घालते. फुले भरपुर असतील तर अंडीही भरपुर घालते, फुले कमी तर अंडी कमी. पण रोज घालावीच लागतात. हे असे का ते नंतर पाहु. तिचे पंख पोटापेक्षा आखुड असतात. म्हणजे पंख नेहमीच्याच आकाराचे असतात पण पोट मोठे असल्यामुळे ते आखुड दिसतात. राणीला डंख असतो पण त्याला काटेरी कड नसते. डंखाचा उपयोग ती प्रामुख्याने दुसर्या राणीमाशीला मारण्यासाठी करते. हे ती का करते हे नंतर पाहुया.
कामकरी माशी (Worker Bee): ही माशी दिसायला राणीमाशीसारखी असते पण पोट लहान असते. हिचा डंख काटेरी असतो. मानवी त्वचेच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे मधमाशीने डंख मारताच तो डंख त्वचेत रुतुन बसतो. मी डंखाचा प्रसाद घेतलाय. इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखे वाटुन काही कळायच्या आत डंखाच्या जागेवर जोरात हाताने झटकुन देण्याची प्रतिक्रिया पुढच्या सेकंदातच आपल्या हातुन होते. झटकली गेल्यामुळे माशीचा डंख तिच्या आतल्या काही अवयवांसहित मानवी त्वचेत रुतुन बसतो आणि माशी लांब फेकली जाते. आतले अवयव उचकटुन गेल्यामुळे बिचारी माशी मरते. आमच्या सोबत ट्रेनिंगला डहाणूच्या एक बंगाली आजी आलेल्या ज्या कित्येक वर्षे हौशी माशीपालन करताहेत. डंखाबद्दल आम्ही बोलत असताना त्या म्हणाल्या की माशीचा डंख त्वचेत रुतला की त्याच्याभोवती असे हळुहळू गोल बोट फिरवत डंख बाहेर काढायचा म्हणजे माशी मरत नाही. मी त्यांना म्हटले की तो भयंकर डंख बसल्यावर कसलीही तात्काळ प्रतिक्रिया न देता माशीला वाचवायचे प्रयत्न करण्याइतपत संतपणा माझ्यात अजुन आलेला नाहीय आणि डंख बसल्यावर जे वाटते ते पाहता यायची शक्यताही नाही.
नरमाशी (Drone) : नरमाशीचे डोळे वर एकत्र चिकटलेले असतात, शरीर जाडजुड, लांबट, कामकरी माश्यांपेक्षा मोठे असते आणि पोट चौकोनी असते. नरमाशीला डंख नसतो.
(क्रमशः)
