मधमाश्यांचे अद्भुत जग - ३

मधमाशीची शरीररचना आपण समजुन घेतली. आता मधमाशीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊया.

राणी, कामकरी व नर अशा तिन जातीच्या माशा पोळ्यात असतात. प्रत्येक पोळ्याची राणी एकच असते, नर दोन तिनशे असतात आणि कामकर्‍या हजारो असतात. एका निरोगी पोळ्यात साधारण विस हजार ते ऐंशी हजार मधमाशा असतात. बाहेर फुलोरा असतो म्हणजे मुबलक अन्न असते तेव्हा पोळ्यात मधमाश्या भरपुर असतात, बाहेर हिंवाळा किंवा पावसाळा असतो म्हणजे अन्न उपलब्ध नसते तेव्हा मधमाशांची संख्या रोडावते. पोळ्यात साठलेल्या मधावर गुजराण करायची तर जास्त लोकसंख्या असुन चालत नाही.

आपण सर्वप्रथम राणीमाशीचा जीवनक्रम पाहुया.

राणी माशी (Queen Bee) :

राणीमाशी ही पोळ्याची सर्वेसर्वा असते. ती जोवर पोळ्यात असते तोवर पोळे जिवंत असते. ती पोळ्यातुन गायब झाली तर पोळे संपते. हे असे का होते हे कामकरी माश्यांचा जीवनक्रम पाहू तेव्हा समजेल. पण पोळे नसेल तर राणीचा जन्म तरी कसा होणार? म्हणजेच राणी आधी की पोळे आधी हा प्रश्न कोंबडी आधी की अंडे आधी या प्रश्नासारखाच गहन आहे.

माणसाला मधाची व पोळ्याची ओळख साधारण आठ ते दहा हजार वर्षांपुर्वी झाली हे आपण पाहिले आहे. याचा अर्थ असा की पोळे व मधमाश्या त्याआधी पासुन अस्तित्वात आहेत. पोळे आधी की राणी आधी या प्रश्नाची उकल अर्थातच तेव्हाच झाली असणार आणि ती माणसाला माहित नसणार. तर आपण आता तो प्रश्न सोडवण्याच्या भानगडीत न पडता राणीकडे वळूया. प्रथम राणीचा जन्म कसा होतो ते पाहुया.

राणीला एकच काम असते - सतत अंडी घालणे. राणी पोळेभर फिरत राहते, रिकामे सेल्स चेक करत राहते. आधी वापरलेला सेल तिच्या मनासारखा साफ झाला नसेल तर सफाई मजदुर माशीला तो परत साफ करावा लागतो. पोळ्याच्या खालच्या बाजुस असलेल्या रिकाम्या सेल्समध्ये राणी एकेक अंडे घालत राहते. अंडे पांढर्‍या रंगाचे, दोर्‍याइतके पातळ आणि तांदळासारखे दिसते. नवी राणी तयार करायचा निर्णय आधीच्या राणीने घेतला असेल तर ती राणीसाठी असलेल्या वेगळ्या सेलमध्ये अंडे घालते. त्या सेलला क्विन कप म्हणतात. हे क्विन कप पोळ्याच्या खालच्या टोकाला किंवा दोन्ही बाजुंना असतात आणि उलट टांगल्यासारखे दिसतात.

एकदा राणीने क्विन कपात अंडे घातले की बिल्डर माश्या लगेच तो कप मोठा करायचे काम हाती घेतात. कप मोठा करुन त्याचे रुपांतर क्विन सेलमध्ये केले जाते. क्विन सेल शेंगदाण्याच्या आकाराची दिसते. तिन दिवसानी अंडे उबुन अळी बाहेर येते. अळी असलेल्या प्रत्येक सेलमध्ये अळ्यांना खुराक द्यायचे काम नर्समाशी करते. पहिले तिन दिवस सगळ्यांना मध + पराग + रॉयल जेली हा खुराक मिळतो. चौथ्या दिवसापासुन इतर अळ्यांना मध + पराग हा खुराक मिळतो, याला बी ब्रेड असेही म्हणतात. राणीमाशीच्या कपात मात्र फक्त रॉयल जेली टाकली जाते. मध + पराग पोळ्याच्या वरच्या बाजुला वेगवेगळे साठवलेले असतात, रॉयल जेली नर्समाशीच्या डोक्यावरील ग्रंथीमधुन स्त्रवते. राणीमाशीही दिवसभर रॉयल जेली खात राहते, नर्समाश्या तिच्या चारी बाजुला राहुन तिला सतत भरवत राहतात. रॉयल जेली हा एक पॉवरफुल प्रोटिन खुराक आहे, ज्याच्या सेवनाने माशीत अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेली ओव्हरी तयार होते, तिचे आयुष्य इतरांपेक्षा खुप जास्त वाढते, तिच्या शरिराचा आकार इतरांपेक्षा मोठा होतो आणि तिची कोषावस्था इतरांपेक्षा लवकर संपते.

सगळ्या माशांची अळीअवस्था साधारण पाच दिवस टिकते. या अवस्थेदरम्यान राणी होणारी अळी रॉयल जेलीत तरंगत असते, तिचे शरिर जेली शोषत राहते. तिन दिवस अंडे व पाच दिवस अळी ह्या दोन अवस्था पार केल्यावर आठव्या दिवशी क्विनसेलमध्ये कोष तयार होतो. सेलचे तोंड बिल्डरमाशी मेणाने बंद करते आणि बाकिच्या माश्या क्विनसेल उबदार ठेवतात. राणीची कोषावस्था फक्त ८ दिवस टिकते. म्हणजेच अंडे घातल्यापासुन सोळाव्या दिवशी राणी जन्माला येते. बी ब्रेड खाणार्‍या अळ्यातुन कामकरी माशा व नर जन्माला येतात, त्यांची कोषावस्था राणीपेक्षा जास्त असते.

नव्या राणीला काही अपघात घडल्यास दुसरी राणी बनायला परत १६ दिवस लागतात. हा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी जुनी राणी एका वेळी ५-६ क्विन सेलमध्ये अंडी घालते. काही वेळा १५-२० क्विन सेल तयार झालेले पाहायला मिळाले आहेत. पहिल्या क्विन सेल मधुन माशी बाहेर पडली की ती लगेच इतर न उघडलेले क्विन सेल नष्ट करते आणि त्यातल्या अजुन कोषावस्थेत असलेल्या अळ्या मारुन टाकते. तिचा डंख तिला या कामासाठी उपयोगी येतो. तिच्या डंखाचे हेच एकमेव काम असते. नंतर अंडी घालताना तो गळुन पडतो. कामकरी माशीचा डंख काटेरी असतो तर राणीचा डंख काटेरी नसतो.

एका वेळी एकापेक्षा जास्त कोष उघडुन त्यातल्या राण्या जर बाहेर पडल्या तर एक तगडी राणी शिल्लक राहीपर्यंत घनघोर युद्ध होते. रणशिंग वगैरे फुंकून हे युद्ध होते. (piping and tooting)

विजयी राणी लगेच मेटींग फ्लाईटवर जात नाही. तिला दोन तिन दिवस तयार व्हायला लागतात. नर्समाशी तिला सतत रॉयल जेली खायला घालत असते व तिचे ग्रुमिंग करते. तिचा आकार दोन दिवसात बर्‍यापैकी मोठा होतो. त्यानंतर पुढच्या आठवड्यात ती मेटिंगसाठी बाहेर पडते. एका दिवसात ती अनेक वेळा बाहेर जाऊन येते. इतर पोळ्यातल्या नरमाश्यांसोबत मेटिंग करायचा तिचा सहसा प्रयत्न असतो. ड्रोन मेटींग एरीयात अनेक नरमाश्या (ड्रोन्स) राण्यांच्या शोधात उडत असतात. आकाशात उडतानाच मेटिंग होते. एक राणी सहसा २०-३० नरांसोबत मेटिंग करते. जितके जास्त नर तितकी राणीतुन जन्मणार्‍या ब्रुडची चांगली प्रत. उत्तम हवामान असेल तर मेटिंग लवकर होते, अन्यथा एका आठवड्यापर्यंत मेटिंग चालते. तिच्या मनापावेतो मेटिंग झाले की ती पोळ्यात कायमची परतते. यानंतर पोळ्याबाहेर पडायचा प्रसंग तिच्यावर येत नाही. स्वार्मिंग करायचे असेल तर ती परत पोळ्याबाहेर पडते.

नवी राणी अंडी घालु लागली की तिच्या फेरोमोन्सचा व अंड्यातुन स्त्रवणार्‍या फेरोमोन्सचा वास पोळ्यात पसरतो आणि ऑल इज नाऊ वेल हा संदेश त्या वासाद्वारे पुर्ण पोळ्यात जातो. हा वास कमी किंवा नाहिसा होणे यामुळे पोळ्याचे कामकाज थांबुन राणी बनवायचे काम हाती घ्यावे लागलेले असते. वास परत यायला लागला की पोळ्याचे कामकाज नेहमीसारखे सुरू होते. यानंतर राणी कायम अंडी घालण्याचे काम करत राहते.

तर राणीच्या जन्माची ही कहाणी. आता तिचा जन्म व्हायला काय परिस्थिती कारणीभुत होते ते आपण पाहु.

राणीचा जन्म तिन परिस्थितीत होतो.

- पोळ्यातली राणी म्हातारी झालीय आणि तिची अंडी घालण्याची क्षमता कमी झालीय.
- वसंत ऋतू सुरू झालाय, पोळ्यात भरपुर अन्न येतेय आणि भरपुर माश्या जन्माला येताहेत. त्यामुळे पोळे अपुरे पडतेय.
- राणीचा आकस्मिक मृत्यु झालाय.

वरील तिन्हीपैकी कुठलेही कारण असले तरी एकतर राणी माशी क्विनकप मध्ये अंडे घालते किंवा कामकरी माश्या उपलब्ध अंड्यातुन राणी बनवण्याची वर लिहिलेली प्रक्रिया सुरू करतात. एका अर्थाने कामकरी माश्याच राणीला जन्माला घालतात. पण त्यांना कसे कळते की आता राणीला जन्माला घालायचे म्हणून??

राणीच्या मेंडीब्युलर ग्लँडमधुन एक विशिष्ट वासाचा स्राव सतत पाझरत असतो ज्याला फेरोमोन म्हणतात. (Pheromones). हा फेरोमोन पोळ्याला एकसंध टिकवुन ठेवतो, याच्यामुळे कामकरी माश्यांच्या ओव्हरीज काम करू शकत नाहीत, याच्यामुळे कामकरी माश्यांना फक्त कामेच करायची बुद्धी होते आणि याच्यामुळे राणी माशी सतत अंडी घालत राहते.

प्रत्येक राणीचा फेरोमोन वास वेगळा असतो आणि हा वास पुर्ण पोळ्यात असतो. हा वास पोळ्यात आहे म्हणजे पोळ्यात राणी आहे असे बाकीच्या माश्या मानतात. बाहेर कामासाठी गेलेल्या माश्या हा वास सोबत घेऊन जातात आणि हा वास चेक करुनच गार्ड माश्या बाहेर गेलेल्या माश्यांना पोळ्यात प्रवेश देतात. या वासामुळेच एका पोळ्यातली माशी दुसर्‍या पोळ्यात जात नाही आणि तिने असा घुसखोरीचा प्रयत्न केला तर गार्ड माशी तिला जिवंत ठेवत नाही.

राणी म्हातारी झाली की म्हणजे तिचे वय २ ते ३ वर्षांचे झाले की तिच्या फेरोमोन ग्रंथी थंडावू लागतात. पोळ्यातला वास कमी होऊ लागतो आणि कामकरी माश्यांना कळते की आता नवी राणी जन्माला घालायची तयारी सुरु करायला हवी. नवी राणी जन्माला आली की इतर राण्यांना मारुन टाकणे हे तिचे पहिले काम असते. पण इथे कामकरी माशा जुन्या राणीला नवी राणी अंडी घालु लागेपर्यंत संरक्षण देतात. नवी राणी जन्माला येते तेव्हा तिच्या मेंडीब्युलर ग्रंथीमधुन फेरोमोन स्त्रवत नाही. दोन चार दिवसात तिच्या ग्रंथीमधुन फेरोमोन स्त्रवू लागतो पण तो फक्त नर माश्यांना आकर्षित करेल इतका मंद स्त्रवतो. म्हणजेच टेक्निकली ती राणी नसतेच. तिचे मेटींग झाले आणि ती अंडी द्यायला लागली की मेंडीब्युलर ग्रंथी पुर्ण क्षमतेने काम करु लागतात आणि कामकरी माश्यांना कळते नवी राणी कामाला लागलीय. त्या लगेच जुन्या राणीचे संरक्षण काढुन घेतात. संरक्षण गेले की नवी राणी जुन्या राणीला मारते. तिचा डंख अंडी घालताना गळुन पडलेला असतो त्यामुळे तिला एका फटक्यात जुन्या राणीला मारता येत नाही. म्हणुन नवी राणी जुन्या राणीला तिळ तिळ छळुन मारते. या विषयात संशोधन सुरुच आहे व रोज नवी माहिती हाती लागते. नवी राणी कामाला लागली की कामकरी माशा जुन्या राणीभोवती गर्दी करुन तिला गुदमरवतात आणि त्या गर्दीमुळे राणीच्या शरिराचे तापमानही वाढते. याचे पर्यवसान राणीच्या मृत्युत होते. याला बॅलिंग असे म्हणतात (Balling). कामकरी माश्या जुन्या राणीला पोळ्यातुन ढकलुन देतात असेही काही ठिकाणी दिसलेले आहे. काम न करणारे कोणीही ऐतखाऊ पोळ्यात राहु शकत नाहीत. कामकरी माश्या त्यांचा निकाल लावतात.

वसंत ऋतूच्या प्रारंभी निसर्गात भरपुर फुले असतात आणि पोळ्यात भरपुर अन्न येते. काम भरपुर वाढले की राणी अंडीही भरपुर घालते. आपण आधीच्या भागात पाहिलेय की राणी एका दिवसात ऋतुनुसार ५०० ते २००० अंडी घालते. अंड्यांतुन बाहेर येणार्‍या माश्यांची संख्या वाढली की असलेले पोळे कमी पडायला लागते व राणी स्थलांतर करायचा निर्णय घेते. अशा वेळी नवी राणी जन्माला येऊन जुने पोळे सांभाळते आणि जुन्या राणीचे सैनिक नव्या जागी पोळे बांधुन तिथे जुन्या राणीसकट प्रस्थान करतात. या प्रकाराला स्वार्मिंग म्हणतात. (Swarming). पोळ्यातल्या अर्ध्या माश्या राणीसोबत स्थलांतर करतात आणि जुन्या पोळ्यात नव्या राणीसोबत अर्ध्या माशा राहतात.

पोळ्यासाठी मनपसंत जागा मिळेपर्यंत राणी व तिची सेना फिरत राहते आणि विश्रांतीसाठी झाडावर बसते तेव्हा पोळ्याच्या आकारात बसते. झाडावर अचानक पोळे दिसायला लागले आणि एका रात्रीत ते गायब झाले अशी बातमी येते तेव्हा त्या स्थलांतर करणार्‍या माश्या विश्रांतीसाठी बसलेल्या असतात.

जर राणीचा अकस्मात मृत्यु झाला तर तातडीने नवी राणी बनवावी लागते. आकस्मिक मृत्यूची कारणे अनेक आहेत. सर्वात पहिले कारण आहे माणसाने फवारलेली किटकनाशके व तणनाशके. मधमाशांचे रोगही आहेत ज्यामुळे माश्या मृत्युमुखी पडतात. राणी मेटींगसाठी बाहेर गेली असताना तिच्यावर पक्षी हल्ला करुन तिला खाऊ शकतात. एका वेळी एकापेक्षा जास्त राण्या पोळ्यात जन्म घेतात आणि सगळ्यात प्रथम बाहेर येणारी राणी इतर राण्यांना मारते. कधीकधी या मारामारीत सगळ्या राण्या मरतात.

राणी अकस्मात नाहीशी झाली की तिचा वासही नाहीसा होतो व कामकर्‍यांना कळते की काहीतरी गडबड आहे. क्विन कप तर तयारच असतात. कामकर्‍या आधी घातलेल्या अंड्यातुन काही अंडी क्विन कपमध्ये ठेवतात आणि राणीजन्माची क्रिया सुरु होते. अपवादात्मक स्थितीत कामकर्‍या अंडी घालतात आणि त्या अंड्यातुन वर लिहिलेल्या प्रक्रियेने राणी जन्मते. राणीचे फेरोमोन्स कामकर्‍यांची ओव्हरी निष्क्रिय करुन ठेवतात. हे फेरोमोन्स पोळ्यात नसले तर कामकरी अंडी घालु शकतात. आधी लिहिलेय तसे आजही संशोधन सुरू आहे. कित्येक नव्या गोष्टी कळताहेत, कित्येक गोष्टी आधी जशा वाटलेल्या तश्या नाहीत हे कळतेय.

राणी दरवर्षी अडिज ते तिन लाख अंडी घालते. तिच्या पुर्ण आयुष्यात ती किमान दहा लाख तरी अंडी घालते. अशी किती पोळी निसर्गात आहेत आणि त्यातल्या राण्या किती लाख मधमाश्यांना दरवर्षी जन्म देत असतील. आणि तरीही मधमाश्या संपल्या अशी बातमी हल्ली सतत येत राहते. मधमाशीच्या शत्रूमध्ये माणसाचा नंबर पहिला आहे आणि वेडा राघु व इतर पक्षी, मुंग्या वगैरेचा नंबर माणसानंतर आहे. ज्या माशीवर माणसाचे अन्न अवलंबुन आहे त्या माशीचाच माणुस एक नंबरचा शत्रू आहे ही गोष्ट माणसाच्या अकलेवर किती प्रकाश टाकते, नाही??

वर
0 users have voted.