कालपासून फोटो टाकू की नको, टाकू की नको विचार करत होते. शेवटी मोह काही आवरेना, म्हटलं टाकावेच.
सध्या मुंबईचं अगदी जयपूर झालं आहे म्हणजे काय तर गुलाबी झाली आहे. गुलाबी थंडी वगैरे वाटेल कोणाला पण तसं अजिबात नाही. यंदा अगदी उशिराने मुंबईत छोट्या रोहित पक्षांचं (Lesser Flamingo) आगमन झालंय. त्यांच्या दर्शनासाठी सगळे हौशे-नवशे—गवश्यांची गर्दी झाली आहे.


छोटा रोहित हा पाणथळ जागी राहणारा देखणा व आकाराने सगळ्यात लहान फ्लेमिंगो आहे. हे पश्चिम भारतात कच्छचे रण व आफ्रिकेत आढळतात. ज्या प्रकारचे अन्न ते खातात त्यावरून त्यांच्या अंगावर गुलाबी रंग येतो. पाण्यातील हिरवे-निळे शैवाल (Blue-green algae) हे त्यांचे अन्न आहे.
ज्या पक्ष्यांच्या अंगावर गडद गुलाबी किंवा लालसर रंग असतो, त्यांना उत्तम आरोग्य आणि चांगल्या पोषणाचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे त्यांना लवकर जोडीदार मिळतो.
रोहित (फ्लेमिंगो) पक्षांचे प्रणयनृत्य (Courtship Dance) हे निसर्गातील सर्वात विलोभनीय आणि संमोहन दृश्यांपैकी एक आहे. जोडीदार निवडण्यासाठी आणि प्रजननाची तयारी दर्शवण्यासाठी हजारो पक्षी एकत्र येऊन अत्यंत तालबद्ध आणि शिस्तबद्ध हालचाली करतात.
या प्रणयनृत्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
सामूहिक नृत्य (Group Display): हे नृत्य एकांतात न होता शेकडो किंवा हजारो पक्ष्यांच्या थव्यातून एकाच वेळी केले जाते. यामुळे संपूर्ण थव्यामध्ये प्रजननाचे वातावरण तयार होते.
प्रमुख हालचाली (Key Dance Moves):
हेड-फ्लॅगिंग (Head-flagging): पक्षी आपली मान ताठ उंचावून डोके एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला लयबद्धरीत्या फिरवतात.
विंग सॅल्युट (Wing Salute): अचानक पंख पसरवून आतील काळे आणि गडद गुलाबी रंगाचे पंख इतरांना दाखवणे.
मार्चिंग (Marching): सगळे पक्षी एकदम मान ताठ करून, एकाच दिशेने जलद गतीने चालतात किंवा पळतात.

सध्या नवी मुंबईतील पाणथळ जागांवर हे विहंगम दृश्य अनुभवता येते आहे.
काही फोटो टाकते इथे. व्हिडिओ टाकता येणार नाही म्हणून नाहीतर त्यावरून हे प्रणयनृत्य बघता आलं असतं.

