उत्तरेकडच्या सगळ्या धाब्यांवर भाज्या पंजाबी, हरयाणवी असो की राजस्थानी, ट्रान्सपोर्टवाले पब्लिक ताव मारून खाते ते सिरकावाले प्याज! कांदे व्हिनिगरमध्ये मुरलेले असल्यामुळे कितीही खाल्ले तरी तोंडाला कच्च्या कांद्यासारखा वास येत नाही म्हणून हे जास्त प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत सगळ्या रिल्समध्ये साधीच रेसीपी बघितली होती पण सर्च करताना सगळीकडे 'जैसलमेर की रेस्टॉरंट जैसी स्पेशल ' असा टॅग लावलेला दिसला. मग तसेच शोधून करून टाकले बाबा सिरकावाले प्याज!
साहित्य:
छोटे सांबार कांदे उर्फ shallots (हे नसतील तर साधे पण अगदी लहान कांदे) - १० - १५ किंवा पाव किलो
पाणी - एक कप
व्हाईट व्हिनिगर - दीड कप
दालचिनी - एक मोठा तुकडा
तमालपत्र - दोन
काळीमिरी - सात - आठ दाणे
हिरवी मिरची - दोन उभ्या चिरलेल्या
लसूण - सोललेल्या सात आठ पाकळ्या
बिटाचे लहान तुकडे - चार - पाच (रंगासाठी)
साखर - दोन chhote चमचे
मीठ - दोन छोटे चमचे
लिंबू - १ (फक्त साल किसून घालायचं आहे)
स्पेशल मसाला:
पुदिना पावडर
काळं मीठ
हिंग
कृती:
१. लहान कांदे सोलून, शेंडा बुडखा कापून टाकायचा आणि थोडावेळ पाण्यात बुडवून धुवून घ्यायचे म्हणजे त्याला जो पांढरा चीक सदृश द्रव असतो तो निघून जातो. कांद्याना एका बाजूने X आकारात सुरीने चिरा द्यायच्या. पूर्ण चिरायचा नाही, कांदा अख्खा राहायला हवा.

२. काचेच्या/स्टीलच्या मोठ्या वाडगा / पातेल्यात पाणी आणि व्हिनिगर मिसळून त्यात वर दिलेलं सगळं साहित्य घालायचं. सगळ्यात शेवटी लिंबाची फक्त साल (lemon zest) बारीक किसणीवर किसून घालायची (लिंबू नंतर कुठेही वापरता येईल.) शेवटी त्यात कांदे बुडवायचे. कांदे पूर्ण बुडायला हवे नाहीतर थोडं पाणी जास्त घाला.

३. आता हा बोल २४ ते ४८ तास झाकून ठेवा. ह्या वेळात एक मसाला करून तयार ठेवायचा. मग मस्त गुलाबी रंगाचे सिरकावाले प्याज खायला तयार. जेवताना ताटाच्या डाव्या बाजूस!

जेव्हा खायला घेऊ तेव्हा त्याच्या चीर दिलेल्या बाजूवर हा चिमूटभर मसाला घालायचा मग आहा!!
मसाला:
तीन चार चमचे पुदिना पावडर (कोरडी वाळलेली पुदिना पानं चुरून करायची), अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा हिंग असं एकत्र कुटून तो मसाला वाटीत ठेवायचा आणि आयत्यावेळी चिमटीने कांद्यावर घ्यायचा. टॉक्क!
४. मिरची, लसूण, बीट काढून खायला घ्या. उरलेले कांदे आणि बाकी खडा मसाला (खडा मसालासुद्धा काढून टाकला तरी चालेल) पाण्यासकट एका काचेच्या बरणीत भरून, घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचे. फ्रीजमध्ये महिनाभर टिकतात. कांदे संपल्यावर पाणी टाकून द्यायचे नाही. हेच पाणी थोडे अजून व्हिनिगर घालून आणखी दोन ते तीन वेळा सिरकावाले प्याज करायला वापरता येते.
बरणी तयार!

इंद्रनील एकदा ही बरणी फ्रीजमध्ये पुढे मागे करत होता. काच असल्यामुळे मी ओरडले तर मला म्हणाला साकवले प्याज. काही कळलं नाही म्हणून मी काय?? असं जोरात विचारलं तर म्हणे सरकवले प्याज!! जी काही फुटलेय मी!! म्हणून आता आम्ही त्यांना सरकवले प्याज असंच नाव दिलंय.
