बालवाडी ते दहावी या शैक्षणिक वर्षात माझ्या पाच शाळा झाल्या. पण त्याही आधी मी स्वतःची एक शाळा काढली होती.
मी लहान असताना काही वर्षं आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो. आम्हा भावंडात सगळ्यात मोठी चुलत बहीण विनया, मग माझे दोघं जुळे भाऊ शैलेश-महेश, त्यानंतर माझ्याहून थोडा मोठा माझा चुलत भाऊ अजय आणि सगळ्यात धाकटी मी.
मला आठवतंय तेंव्हापासून विनया हुजुरपागेत आणि शैलेश-महेश जवळच्या सोमण प्राथमिक शाळेत जायचे. माझा हक्काचा सवंगडी अजय घरातच होता. त्यामुळे बाकी भावंडं शाळेत गेली तरी मला फारसा फरक पडत नव्हता. आमच्या दोघांकडे फावला वेळही भरपूर असायचा. त्यावेळी माझ्याकडे हल्ली ज्याला ready to wear saree म्हणतात, तशी लहान मुलींसाठी मिळणारी कल्पना साडी होती. ती नेसून मी अजयला समोर बसवायचे आणि आम्ही दोघं "शाळा-शाळा" खेळायचो. मी अर्थातच शिक्षिका आणि मुलांना शाळेतून आणायला आलेली आई अशा दोन भूमिका आलटून पालटून करायचे आणि अजय कधी माझा विद्यार्थी, कधी त्या विद्यार्थ्याचा पालक किंवा शाळेतला शिपाई असायचा. शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिपाई - ही शाळेच्या संदर्भातली सगळी पात्र आम्हाला आमच्या मोठ्या भावंडांना आई/काकू बरोबर शाळेत सोडायला किंवा आणायला जायचो त्यामुळे माहिती होती. मी जेमतेम तीन वर्षांचीही नव्हते त्यामुळे आम्ही नक्की काय खेळत होतो, बोलत होतो ते आजी-आई-काकू या मोठ्यांच्या बोलण्यातूनच आठवणीत राहिलंय. आईच्या म्हणण्यानुसार शैलेश-महेशचं बघून मी आधीच ग-म-भ-न शिकले होते. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना मी ते शिकवत असे. अजयची आणि माझी ही शाळा म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली पहिली शाळा. आमच्या या खेळातल्या शाळेत मी सुखी होते. मग एक दुष्ट जून महिना आला आणि अजयला शाळेचं वय झाल्यामुळे सोमण प्राथमिक शाळेच्या लक्ष्मी बालक मंदिरात घातलं. आता माझा हक्काचा विद्यार्थी माझ्या शाळेत नव्हता. मग बाहेरच्या खोलीतल्या फरशांना माझा एकेक विद्यार्थी मानून मी त्यांना शिकवायला सुरुवात तर केली. पण आता एकटीला घरात शाळा-शाळा खेळायला मजा येईना आणि खर्या शाळेत तीन तास जाऊन आल्यावर माझ्याशी परत शाळा-शाळा खेळायचा उत्साह अजयला नसायचा. त्यातून त्यानी मला सांगितलं की मधल्या सुट्टीत माझे दोघं भाऊ शैलेश-महेश त्याला बालक वर्गात भेटायला येतात, तो रडत नाही ना हे बघून, त्याच्याशी बोलून परत त्यांच्या वर्गात जातात. मग मात्र मला माझी खोटी शाळा अजिबातच आवडेनाशी झाली. मी रडून गोंधळ घातला आणि हट्ट केला की मला पण अजय बरोबर शाळेत जायचंय.
त्या काळी एकंदरीतच आयुष्य फार सोपं होतं, आणि माणसंही सोपी होती बहुदा... त्यामुळे असेल की आई मला त्या शाळेत घेऊन गेली आणि विचारलं की “हिचं अजून वय पूर्ण नाही तरी शाळेत बसता येईल का? सगळी भावंडं शाळेत जातात त्यामुळे ही घरी फार हट्ट करत्ये.” आज कोणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल पण शाळेत अधिकृत प्रवेश न घेता मला त्या शाळेत अजय बरोबर बसायची परवानगी मिळाली. मी एकदम खूष! पण दोन दिवसांनी परत माझी रडारड सुरु! का? तर शाळेत माझं नाव पटावर नसल्यामुळे बाई माझी हजेरी घेत नसत. त्या शाळेत शिक्षिकांना बाई ऐवजी ताई म्हणायची पद्धत होती. मग आईनी शांताताईंना विचारलं की हिचं नुसतं नाव घ्याल का हजेरीच्या वेळी? त्यांनी ते आनंदानी मान्य केलं. वर्गात एक अश्विनी दाते नावाची मुलगी होती. तिचं नाव घेऊन झालं की शांताताई “मंजिरी दाते” असं माझंही नाव पुकारु लागल्या.
अजय बरोबर शाळेत जायला मिळतंय, माझी हजेरी घेतली जात्ये आणि शैलेश महेश मधल्या सुट्टीत मला भेटायला येतायत. माझ्यासाठी तर सगळीच मज्जा होती. त्या शाळेत मी इतकी लवकर आणि इतकी छान रुळले की चार दिवसांनी आईला शाळेतून घरी आणायला यायला जरा उशीर झाला, तर अजय रडायला लागला आणि मी त्याचा हात धरुन त्याची समजूत घालत होते हे दृष्य आजही मला स्पष्ट आठवतंय. मग लवकरच माझं वय पूर्ण भरल्यावर शाळेत माझा अधिकृत प्रवेश झाला.
दोन वर्षं शांताताई, गंगूताई आणि एक वर्ष चंपूताईंबरोबर लक्ष्मी बालक मंदिरातली माझी तीन वर्ष अत्यंत आनंदात गेली.
तिथली ही माझी प्रगती पुस्तकं -


मग घरात चर्चा सुरु झाल्या माझ्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशाबद्दल. जितकं सहज मला आई बालक मंदिरात बसवून आली होती तितकं आता बहुदा पहिलीत जाणं सोपं नाही असं मला काही तरी कळलं. कारण आई माझ्याकडून कसल्या कसल्या प्रशोत्तरांची तयारी करुन घेऊ लागली. हुजुरपागा - तिथे काम झालं नाही तर रेणुका स्वरुप, अहिल्यादेवी, कन्याशाळा अशी मोठी मोठी नावं माझ्या कानावर पडू लागली. एक वर्ष आधी अजय नूमवि सारख्या मोठ्या शाळेत जायला लागला होता. विनया तर आता हुजुरपागेत प्राथमिक मधून हायस्कूलला गेली होती. त्यामुळे मलाही नाही म्हटलं तरी मोठ्या शाळेत जायचे वेध लागलेच होते.
खरं तर बालक मंदिरानंतर तिथेच म्हणजे सोमण प्राथमिक शाळेत मला पहिलीत प्रवेश घ्यावा असं चंपूताईंनी सुचवलं होतं पण घरात सगळ्यांचं, विशेषतः आईचं, पहिलं प्राधान्य मला हुजुरपागेत प्रवेश मिळावा यालाच होतं. प्लॅन B असलेल्या रेणुका स्वरुप शाळेतल्या प्रवेशासाठी घेतलेला interview ही लक्षात आहे माझ्या. एका वर्गात सगळ्या मुलींच्या मुलाखती क्रमाक्रमानी चालू होती. माझा नंबर आला तेंव्हा तिथल्या बाईंनी विचारलं “तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे?” मला कळत नव्हतं की माझ्या मनातल्या ४-५ पर्यायांपैकी मी नक्की कोणता पर्याय सांगावा? शेवटी मी काहीही उत्तर न देता त्यांच्या समोरुन सरळ पळून आले आणि बाहेर उभ्या असलेल्या आईबाबांकडे गेले. त्यांना सांगून टाकलं की "मला नाही आवडली ही शाळा! ते मला मोठेपणी मी कोण होणार विचारत होते". अजूनही पन्नाशी उलटून गेली तरी "मला मोठेपणी कोण व्हायचंय?" याचं उत्तर सापडलंच नाहीये, ती गोष्ट वेगळी! त्यात कुठल्याच शाळेचा काही दोष नाही.
आईच्या सुदैवानी तिच्या इच्छेनुसार मला हुजुरपागेत प्रवेश मिळाला आणि मी इयत्ता पहिली पासून तिथे जायला लागले.
माझ्या जन्माच्या जवळजवळ ९० वर्ष आधीपासून असलेली ही मुलींची हुजुरपागा - मुलींना मॅट्रिक पर्यंत शिक्षण देणारी भारतातली पहिली शाळा - इरावती कर्वे, शांता शेळके, सई परांजपे, यासारख्या ख्यातनाम स्त्रिया या शाळेत शिकल्या - शाळेविषयी ही सगळी माहिती सतत कानावर पडत होती पण त्या वयात फार गांभिर्याने हे काहीच कळत नव्हतं. पण मी काहीही केलं तरी "मनी... हुजुरपागेत हे 'असं' वागलेलं चालत नाही..." हे वाक्य घरी विनया कडून बरेचदा ऐकू येऊ लागलं.
हुजुरपागेत पहिलीत गेल्यावर लक्ष्मी बालक मंदिरापेक्षा एकदम वेगळंच विश्व दिसलं. प्राथमिकची वेगळी मोठी इमारत होती आणि दुसरीकडे हायस्कूलची वेगळी भव्य इमारत. दोन्हीचं प्रवेशद्वारही वेगळं. खेळाची मोठी मैदानं होती. तोपर्यंत गणवेषाची सवय नव्हती. आता अंगावर पांढरा ब्लाऊज, निळा स्कर्ट, रिबिनीनी घट्ट बांधलेल्या वेण्या असा गणवेष आला. ही शाळा फक्त मुलींची होती. बसायला बाक होते. एकेका बाकावर २ किंवा ३ मुली. बाई ठरवून देतील त्या बाकावर बसायचं. आता शिक्षिकांना "ताई" ऐवजी "बाई" म्हणायचं हा देखील एक बदल होता. वर्गात बाई आल्यावर उठून उभं राहून "नमस्ते" करायचं.
कितीही नाही म्हटलं तरी मला सुरुवातीला प्रचंड दडपण होतं. जितक्या पटकन बालक मंदिरात रुळले, तशी ही शाळा फारशी आपली वाटेना. हळूहळू दडपणाला सरावून इयत्ता पहिली सुरु झाली. विनया क्वचित कधीतरी उदार होऊन मधल्या सुट्टीत तिच्या मैत्रिणींबरोबर डबा खायला मला आणि तिथे नव्यानी माझी मैत्रीण झालेल्या सुमेधाला हायस्कूलच्या आवरात यायची परवानगी देऊ लागली. (प्राथमिक आणि हायस्कूलच्या मधल्या गेट वर शिपाईकाका असायचे उभे असायचे. त्यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन त्या मोठ्या तायांच्या आवारात गेल्याचं आठवतंय)
शाळेची घंटा होण्यापूर्वी सगळ्या शिक्षिका "स्टाफ रूम" मधे येऊन बसतात, ही माहिती देखील नव्यानी कळली.
पहिलीत आमच्या शिक्षिका होत्या कांबळे बाई. त्यांच्या बद्दलची माझी आठवण म्हणजे त्यांचे केस खूप लांब होते आणि त्या रोज केस वेगळ्या पद्धतीनी बांधून यायच्या. कधी आंबाडा, कधी एक वेणी, कधी २ वेण्या, कधी त्या २ वेण्या वरती बांधलेल्या (जशा आम्ही विद्यार्थिनी बांधायचो तशा) वगैरे वगैरे.. त्या वयात मला आणि सुमेधाला रोज उत्सुकता असायची की आज बाईंनी केस कसे बांधले असतील बरं?? मग घंटा होण्यापूर्वी मी आणि सुमेधा हळूच स्टाफ रुम मधे कोणाला कळणार नाही अशा बेताने डोकावून कांबळे बाईंना बघून येऊ लागलो.
लक्ष्मी बालक मंदिरात माझी अभ्यासाची गरजेपेक्षा जास्त तयारी असेल म्हणा किंवा अभ्यास बरा असेल म्हणा, पण पहिलीत वार्षिक परिक्षेत पहिला नंबर आला. मग दुसरीपासून पुढे अभ्यास करताना हळूहळू "पहिला नंबर टिकवायचा बरं का!" या वाक्याचं दडपण जाणवू लागलं. मी तिसरीत असताना कधीतरी शाळेचं नाव रँगलर र.पु. परांजपे प्राथमिक शाळा असं झालं. हुजुरपागेत मी इयत्ता तिसरीपर्यंत गेले. इयत्ता चौथी सुरु झाली आणि १९८३ ते १९८७ ही चार वर्ष म्हणजे माझी इयत्ता चौथी ते सातवी आम्ही पुणे आणि अहमदनगरच्या मधे असलेल्या शिरुर या गावात रहायला गेलो.
खरंतर आईची अजिबात इच्छा नव्हती की कोणत्याही कारणानी माझी हुजुरपागा सुटावी. पण इलाज नव्हता. मी जेमतेम नऊ वर्षांची होते त्यामुळे मला शाळा सोडताना तसं फार काही वाईट वाटलं असेल असं वाटत नाही.
नवव्या वर्षापर्यंतचं म्हणजे १९८३ पर्यंतचं माझं शालेय जीवन आणि एकंदरीतच आयुष्य हे असं अगदी पुणेरी त्यातही सदाशिव पेठेच्या भवताली फिरणारं होतं. अर्थात आजच्या ८-९ वर्षांच्या मुलांना स्वतःच्या भवताल व्यतिरिक्त घरात बसूनही जे जग माहिती असतं, तसंही काही माझं नव्हतंच.
तिथल्या माझ्या चार वर्षांच्या वास्तव्यात माझ्या दोन शाळा झाल्या. पहिली होती लोकसेवा ट्रस्टची प्राथमिक शाळा आणि पाचवी ते सातवी विद्याधाम प्रशाला. गावात मला वाटतं एखाद दुसरीच प्राथमिक शाळा होती. आणि तिथे पुण्यासारखा प्रवेश मिळायला काहीच त्रास नव्हता. अगदी लक्ष्मी बालक मंदिरासारखंच माझं लोकसेवा ट्रस्ट प्राथमिक शाळेत प्रेमानी स्वागत झालं. केवळ ५-६ खोल्यांची ही छोटेखानी शाळा होती. इयत्ता चौथीच्या वर्गात बाईंनी मला नेलं आणि मी वर्गात बघितलं तर तिथे बसायला बाक नव्हते. सगळी मुलं जमिनीवर छोट्या बस्करांवर मांडी घालून बसलेली दिसली. वर्गात बसायला प्रत्येकानी आपापलं बस्कर घरुन आणण्याची तिथे पद्धत होती. पहिल्या दिवशी हे आम्हाला माहिती नसल्यामुळे माझ्याकडे बस्कर नव्हतं. पण वर्गातल्या एका मुलीनी तात्काळ मला सांगितलं की “ये माझ्या बस्करावर, आज आपण दोघी एका बस्करावर बसूया!” इतकं सहजगत्या आपल्याकडची एखादी गोष्ट नवीन व्यक्ती बरोबर वाटून घेता येऊ शकते याचा पहिला धडा मला त्या दिवशी शाळेत मिळाला.
चौथीतून पाचवीत जाताना मला कुठल्या शाळेत घालायचं अशी काहीच चर्चा झाली नाही. इथे आल्यापासून शैलेश महेश विद्याधाम प्रशालेत होते त्यामुळे मी ही आपसूकच तिथे गेले. पुन्हा अनेक वर्षांनी शैलेश-महेश असलेल्या शाळेत मी पण जाणार, हा आनंदही होताच. त्यामुळे असेल किंवा आजूबाजूचं साधं सरळ वातावरण दिसत असल्यामुळे असेल कदाचित - पण मोठी इमारत - खेळाची तीन मोठी मैदानं - मुलामुलींची एकत्र हायस्कूल वगैरे असं काहीही दडपण मला तिथे जाताना आलं नव्हतं. गाव इतकं लहान होतं की इकडे तिकडे फिरताना विद्याधाम मधले शिक्षक भेटले की शैलेश-महेशची बहीण म्हणून कौतुकानी विचारायचे - "काय मग येणार ना पाचवीपासून तू पण याच शाळेत?"
आमच्या सुदैवानी या शाळेत आम्हाला उत्तम नव्हे अतिउत्तम शिक्षक लाभले. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी पासून इंग्रजी आणि हिंदी हे दोन नवीन विषय सुरु होत असत. अर्थातच पाचवीत जाईपर्यंत या भाषांशी फारसा संबध येत नसे. ज्या मुलांनी पाचवीत विद्याधाममधे प्रवेश घेतला असेल, त्या सर्व विद्यार्थ्यांची इंग्रजीची तयारी केळकर सर दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत करुन घेत असत. ते देखील विद्यार्थी किंवा शाळेकडून कोणताही मोबदला न आकारता. इंग्रजी ही फार छान भाषा आहे, केवळ ती आपल्या परिचयाची नाही, आपल्याला त्याचं exposure नाही म्हणून मुलांना त्याची भीती वाटता कामा नये. सुट्टीत थोडे प्रयत्न केले तर ती भीती निघून जाईल, असा साधा विचार करुन ते हे वर्ग घेत असत. त्यामुळे पाचवीचं शैक्षणिक वर्षं सुरु झालं तेंव्हा आम्हाला इंग्रजी भाषा थोडी तरी ओळखीची झाली होती. ज्यावेळी मी स्वतः अनेक वर्षांनी भाषा शिकवण्याचं काम सुरु केलं तेंव्हा विद्यार्थ्यांना नवीन भाषेची गोडी लागण्यासाठी शिक्षकांनाही दोन पावलं पुढे येऊन प्रयत्न करावा लागतो, हे केळकर सरांमुळे कुठेतरी मनात ठसलं होतं. कोटस्थाने सर हिंदी शिकवायचे. त्यांच्या इतकं सुरेख हस्ताक्षर मी खरंच आजतागायत पाहिलं नाही. त्यांनी वर्गात फळ्यावर जे लिहिलं असेल, ते त्यांनीच तास संपल्यावर पुसून जायचं असा अलिखित नियम बाकी शिक्षकांनी केला होता. कारण पुढच्या तासाला त्यांचं हस्ताक्षर फळ्यावरुन पुसून टाकायला कोणाचेच हात धजावायचे नाहीत. आज इतकी वर्षं झाली तरी फळ्यावर लिहिलेलं ते अक्षर माझ्या लक्षात आहे. आपलं अक्षर उत्तम काढायचा प्रयत्न करायला हवा, ही प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली.
अभ्यासाच्या जोडीला चित्रकला स्पर्धा, “रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धा", गायन स्पर्धा, बी.जे. मेडिकल कॉलेज मधे होणार्या संस्कृत वक्तृत्व स्पर्धा, इतर अनेक इंग्रजी, मराठी, हिंदी वक्तृत्व स्पर्धा, नाटकं, NCC या सगळ्यामधे आपल्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, चारचौघात आत्मविश्वासानी बोलावं, वावरावं, स्वतःच्या शारिरीक आणि मानसिक क्षमता वाढवाव्या यासाठी सगळे शिक्षक अफाट परिश्रम घेत. या सगळ्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धांमधे भाग घेण्यासाठी आमच्याकडून अगदी पाच ते दहा रुपयांसारखी किरकोळ रक्कम घेऊन, त्यात पदरमोड करुन आम्हाला गाडीनी पुण्याला घेऊन जात. मराठी, हिंदी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेच्या आधी किंवा शाळेनंतर शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांबरोबर बसून, आमचं भाषण आम्हाला स्वतःला लिहायला लावत. मग त्यात बदल, सुधारणा सुचवत, ते साभिनय पाठ करुन घेत. इयत्ता पाचवी ते सातवीच्या आम्हा विद्यार्थ्यांना संस्कृत हा विषय शाळेत नव्हता. पण त्या वयोगटातली मुलं बी.जे. मेडिकल कॉलेज मधे होणार्या संस्कृत वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेत भाग घेऊ शकायची. मग त्या सगळ्यासाठी दरवर्षी करंदीकर बाई विषयाला अनुसरुन संस्कृत भाषण लिहून देत. त्याचा अर्थ समजावून सांगत आणि आमच्याकडून पाठ करुन घेत. माझ्यासारख्या घरुन संस्कृत श्लोक वगैरे पाठ करुन घेणार्या मुलांना त्याचं इतकं महत्व नसेल, पण ज्यांच्या घरची पार्श्वभूमी अशी काही नव्हती, त्या विद्यार्थ्यांच्या तोंडी पाचवीपासूनच या निमित्तानी संस्कृत भाषा बसवण्याची किती चांगलं काम या करंदीकर बाईंनी केलं असेल! स्वतःचा इतका वैयक्तिक वेळ यात देऊनही आम्हाला शाळेनी/शिक्षकांनी कधीच बक्षिस मिळवण्यासाठी दबाव आणला नाही, पण तयारीच इतकी उत्तम करुन घेत की त्यावेळी तरी पुणे जिल्ह्यात प्रत्येक स्पर्धांमधे विद्याधाम आपली विजयी मोहोर उमटवत होती.
१९८४ सालच्या "सकाळ" मधे आलेल्या बातमीचं कात्रण अजून जपून ठेवलंय. दर वर्षी हा मान विद्याधामला मिळत असे. (कात्रणात विद्याधामच्या मुलांची नावं अधोरेखित केली आहेत. कात्रणात हिंदी विद्यार्थी विभागात नाव असलेला, आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल मधला अतुल माझ्याबरोबर होता विद्याधाममधे २ वर्षं)

१९८५ च्या मे महिन्यात हरयाणात अंबाला जिल्ह्यात भरणार्या NCC च्या नॅशनल इंटिग्रेशन कँपसाठी शैलेश महेश दोघांची नावं व्ही.डी. कुलकर्णी सरांनी दिली होती. पण त्या कँपच्या नक्की तारखा कोणालाच माहिती नव्हत्या. त्या तारखा जाहीर झाल्या तोवर शैलेश महेश आणि मी सुट्टीत पुण्याला काकाकडे आलो होतो. पण या दोघांची ही संधी जाऊ नये म्हणून व्ही.डी. सर स्वतः शिरुरहून पदरमोड करुन पुण्यात आले, आमचं घर शोधून काढलं आणि या दोघांना कँपसाठी रवाना केलं.
आज आम्हा भावंडांमधे जो काही स्टेजवर बोलण्याचा आत्मविश्वास आहे त्याचं श्रेय आमच्यासाठी out of the way जाऊन इतकं करणार्या या सगळ्या शिक्षकांना आहे. मला वाटतं जिज्ञासाच्या लेखात एक वाक्य वाचलं होतं - "शिक्षक एका विषयाचा नसतो, तो मुलांचा असतो." हे विद्याधामच्या शिक्षकांसाठी किती तंतोतंत लागू होतं, हे कळायला अनेक वर्षं गेली.
पुण्यात तोपर्यंतच्या चाकोरीबद्ध जीवनात काही ठराविक प्रकारच्या घरात रहाणारी, ठराविक आडनावाची, ठराविक जीवन पद्धतीची लोकंच माझ्या आयुष्यात आजूबाजूला होती. मग तो शेजार असो, शाळेतले शिक्षक असो किंवा माझा मित्रपरिवार. पण या दोन शाळांमधे वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक उतरंडीतले लोक दिसू लागले. स्वच्छ प्रमाण मराठीत बोलणारे होते, तसेच तथाकथित प्रमाण भाषेत न बोलणारेही होते. शिक्षकही आणि बरोबरीचे विद्यार्थीही. कोणी मुलंमुली अभ्यासात अतिशय हुशार तर कोणी काठावर पास होणारे. कोणी कलांमधे प्रवीण तर कोणी खेळात. कोणाची आर्थिक परिस्थिती उत्तम तर कोणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल. अभ्यासात हुशार असणार्यांचं जितकं कौतुक केलं जायचं, तितकंच कौतुक अभ्यासेतर गोष्टीत काहीतरी वेगळं करु पाहणार्या विद्यार्थ्यांचं होतं. आर्थिक परिस्थिती, जात-धर्म, घरातलं वातावरण, तथाकथित रुप-सौंदर्य आणि मुख्य म्हणजे मार्कांच्या चढाओढीपासून जाणीवपूर्वक तिथल्या सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लांब ठेवलं. शाळेत असताना शाळेचं वेगळेपण जाणवत होतं. पण शाळा-महाविद्यालय या पठडीतल्या शिक्षणसंस्थांमधून बाहेर पडल्यावर जगात वावरताना मात्र ते वेगळेपण काय होतं हे ते अजून अजून समजत गेलं.
शिरुरशी आणि विद्याधामशी माझा ऋणानुबंध चारच वर्ष होता. १९८७ च्या जुलै महिन्यात पुन्हा एकदा आम्ही पुण्याला परत आलो. शैक्षणिक वर्षं सुरु झाल्यावर मधेच आणि आठवीसारख्या अडनिड्या इयत्तेत मला परत हुजुरपागेत प्रवेश मिळाला नाही. मग तिथून पुढेच चालत ५ मिनिटावर असलेल्या कन्याशाळेत मला घातलं. घरुन कन्याशाळेत जाताना रस्त्यावर हुजुरपागा शाळा लागायची. पहिले काही दिवस मला इथे या शाळेत परत घ्यायला शाळेनी नाकारल्याचा राग येणं, वाईट वाटणं, विद्याधाम सोडून आपल्याला यायला लागलं याची खंत, तिथले शिक्षक, मैत्रिणी सोडून अडनिड्या वयात परत नवा गडी नवं राज्य घेण्याची भीती, मनात धडधड अशी माझी अवस्था झाली होती. सुरुवातीला वाटायचं की हुजुरपागा शाळेच्या नावासाठी नाही पण हुजुरपागेत गेले असते तर निदान जुन्या मैत्रिणी, ओळखीचे चेहरे परत भेटले असते तर रुळायला सोपं गेलं असतं. पण नंतर जाणवलं की त्या अडनिड्या teen age मधे, चार वर्षाचं अंतर पडल्यानंतर छोट्या गावातून प्रमाण मराठी भाषेचा लहेजा बदलून परत आलेली मी कदाचित जुन्या मैत्रिणींबरोबर रुळू शकलेही नसते. चौथीत लोकसेवा शाळेत पहिल्या दिवशी मला तिच्या बस्करावर बसायला जागा दिलेल्या मुलीसारखंच कन्याशाळेतही पहिल्या दिवशी भाग्यश्रीनी मला अजून एका मुलीबरोबर त्यांच्या बाकावर तिसरी जागा करुन दिली. कन्याशाळा मला आवडली नाही, असं अजिबात नाही खरं तर. पण दुर्दैवानी त्यावेळी मी तिथे पूर्ण समरस व्हायचा प्रयत्नच केला नाही. "आधी पुण्यात असताना मी हुजुरपागेत होते... आणि माझी विद्याधाम शाळा तर इतकी भारी होती की काय सांगू?" या भूतकाळातच जास्त रमले. जपानी भाषेत 前向き- माएमुकी- हा चपखल शब्द आहे. तशी नव्या-जुन्याची सांगड घालून सकारात्मकता ठेवत पुढे चालत राहिले नाही. जुन्या दिवसातच रमून राहिल्यामुळे माझी नाळ तिथे नीट जोडली गेली नाही. त्यामुळे माझ्या तिथल्या आठवणी फार कमी आणि धूसर आहेत. बरं, म्हणून मी शिरुरच्या मैत्रिणींच्या खूप संपर्कात होते का? तर ते ही फारसं घडलं नाही. तिथल्याही आठवणी हळूहळू धूसर होत गेल्या. गेल्या काही वर्षात जेंव्हा WhatsApp च्या कृपेनी शाळेतल्या मैत्रिणींच्या संपर्कात आले, तेंव्हापासून गप्पांमधे ज्या आठवणी निघतात, तेंव्हा “या सगळ्यात मी कुठे होते? हे मला का आठवत नाही? ही मुलगी मला अजिबात कशी आठवत नाही?" हे प्रश्न मला नेहमी पडतात.
पण तरी पूर्वजन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार. त्यामुळे लोकसेवा शाळा, विद्याधाम प्रशाला आणि तिथले शिक्षक माझ्या आयुष्यात आले. आणि "शाळा" या विषयावर काही अमूल्य गोड आठवणी तरी मला जपता आल्या.
