रत्नागिरीच्या घराची हल्ली खूप वेगवेगळ्या कारणांसाठी आठवण येते. आडोने टाकलेले किंगफिशरचे फोटो पाहिले आणि आमच्या घराच्या आजूबाजूला वावरणारे किंगफिशर दिसले. खंड्या हे त्याचे स्थानिक नाव. छोटासा डौलदार पक्षी. बेडरूममधून दिसणार्या माडावर नाहीतर हॉलमधून बाहेर असलेल्या वायरवर बसलेला असायचा. समोरच्या साचलेल्या पाण्यात मासा किंवा किटक दिसला की झूमकम सूर मारून पकडायचा आणि परत मूळ जागी येऊन खात बसायचा. व्हाइट थ्रोटेड तर दिवसाला एकदा दिसायचाच. एकदा तिबोटी पण दिसला.
अर्थात, आपला मोबाईल कॅमेरा आणि तो वापरायची अक्कल दोघांच्याही मर्यादेचे भान ठेवत काही फोटो काढले आहेत. अगदीच वाईट आहेत याची कल्पना आहे पण... हौस!!

हा तुर्रेबाज पक्षी पण दोन तीनदा दिसला. क्रेस्टेड हॉक ईगल. याचा अजून एक छान फोटो होता. तो मिळाला तर टाकेन. 
हा मलाबार पाय्ड हॉर्नबिल उर्फ धनेश. याचे घरटे घराजवळच्या एका झाडावर होते. पण त्या दिवशी हा अगदी बाल्कनीमध्ये येऊन जवळ बसला होता. अगदी हातही लावता येईल इतक्या अंतरावर होता. निवा^त फोटो काढत होतो तरी उडाला नाही. सुंदर पक्षी. दांडेली ट्रीपमध्ये खूप धनेश दिसले होते तेव्हा काही वर्षानी हा अगदी घरच्या पाहुण्ञासारखा येईल असे वाटले पण नव्हते. सुनिधीला शाळेत सोडायला जाताना भाट्यात धनेश खूप दिसले पण हा घरी आला, म्हणून याचे कौतुक.


या फोटोत दिसतोय तो ग्रेट इ^डियन हॉर्नबिल. हा घराजवळच्या झाडावर खूप उंच बसला होता. झूम केल्याने ब्लर आहे पण फोटो गोड मानून घ्या.

हा करकोचा. हा पण शिकार करताना पाहिला आहे. मस्त उडतो अचानक.

हा शिक्रा. हा क्वचित दिसायचा, पण इतका निवांत वेळ बसून असायचा की आम्ही खिडकीतून गप्पा मारत असतनाही शांत आमच्याकडे बघायचा. डेंजर वाटायचा तेव्हा.

हा चिमुकला सनबर्ड. गॅलरीअम्ध्ये नाहीतर किचनच्या खिडकीतून तणतण उड्या मारत राहतो. याची चिवचिव रेकॉर्ड केलेला व्हिडीओ पण आहे.

हे समोर बसलेले घुबड. हे या ठिकाणी किमान तीन चार तास बसून होते. थोडेसे उडायचे परत तिथेच येऊन बसायचे. हे बसलेले आहे म्हणून आम्ही सुन्याच्या रूममध्ये आवाज न करता वावरत होतो. हे आपल्याकडे असे पाहते जणून आपले सारे बोलणे याला कळत आहे.

ही ब्राह्मिणी काइट. सतत घिरट्या घालत असायची. खारी पळवणे हा तिचा लाडका उद्योग.

सर्वात शेवटी, चिमण्या!!
समोर बाल्कनीमध्ये आणि किचनच्या खिडकीलामी प्लास्टिकचे दोन डबे बांधले होते. त्यामध्ये राळे नाहीतर नाचणी ठेवायचे. चिमण्या येऊन आवडीने खातात. आता सध्या आमच्या घरात राहणार्या तन्वीने हे डबे तसेच भरून ठेवले आहेत. अजूनही चिमण्या येतात. खूप आल्या की ती मला व्हिडिओ कॉल करते. या चिमण्याँची चिवचिव ऐकत माझा दिवस छान जायचा. किचनच्या खिडकीला मिरर पॉलिश असल्याने आमचा वावर चिमण्याना जाणवायचा नाही. त्यामुळे अगदी किचनकट्ट्यावर काम करतानाही समोरच दिसायच्या. आय मिस देम...
