मराठी भाषादिन २०१६ ! - इपिगो
इपिगो! इपिगो!! इपिगो!!!
:surprise:
काय कळलं का?
हीच तर गंमत आहे. ओळखा बघु हे नाव. हे ओळखलं की ते सुरू करूच.
खाजवा जरा डोकं. मभादि जवळ येतोय ना!
आता तरी समजलं का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इटुकली पिटुकली गोष्ट, म्हणजे थोड्या शब्दातली अर्थपूर्ण कथा. मराठी भाषा दिवसानिमित्ताने आपल्या भाषेचे सामर्थ्य दाखवण्यासाठी हा 'विविध गुणदर्शन' कार्यक्रम. हा कार्यक्रम मराठी भाषा दिवसाच्या पूर्वसंध्येपासून चार दिवस चालेल (२६ फेब्रुवारी ते १ मार्च २०१६).
नियमः
१. इपिगो मध्ये जास्तीत जास्त शंभर अक्षरे असावीत. जोडाक्षर हे सोयीसाठी एक अक्षर म्हणून मोजले जाईल.
२. रोज तुम्हाला हेडरमध्ये काही शब्द सुचवले जातील. त्यातील कोणताही निदान एक शब्द अर्थपूर्ण रितीने इपिगोमध्ये यायला हवा. या शब्दाला कोणतेही प्रत्यय लावता येतील, व शब्दाची व्याकरणदृष्ट्या अचूक अशी कोणतीही रूपे चालतील.
३. इपिगोच्या खाली आपली एकूण अक्षरांची संख्या लिहावी.
४. एकेक इपिगो या धाग्यात प्रतिसाद म्हणून लिहावी. कोणता शब्द घेतला आहे ते सुरुवातीला लिहावे.
५. शेवटी आपली इपिगो पब्लिक केली तर (म्हणजे सार्वजनिक, मैत्रीण सदस्य नसलेल्यांनाही वाचता येईल अशी) चालेल का तेही लिहावे.
६. एकीने किती इपिगो लिहाव्यात यावर काही बंधन नाही.
इपिगोची संकल्पना लीलावतीनं सुचवल्याबद्दल तिला खूप खूप धन्यवाद आणि सार्वजनिक धाग्यासाठी सगळ्या इपिगो एकत्र केल्याबदल रायगडचे खूप खूप आभार.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शब्द :
शुक्रवार, २६ फेब्रुवारी : मैत्रीण, भावना, पेरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शनिवार, २७ फेब्रुवारी : नक्षी, धमाल, शिव्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रविवार, २८ फेब्रुवारी : सत्याग्रह, सवताळणे, सावली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सोमवार, २९ फेब्रुवारी
संच १ : लीला, प्रक्षालन, उमलणे
संच २ : समाजवादी, भाजणे, जिज्ञासा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मंगळवार, १ मार्च
संच १ : बुभुत्कार, समर्पण, मॅगी
संच २ : इटुकली, पिटुकली, गोष्ट (अट - एका वाक्यात एकच शब्द वापरायचा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६मभादि२०१६
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मैत्रिणींच्या शब्दसामर्थ्याने नटलेल्या ह्या इटुकल्या पिटुकल्या गोष्टी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शब्द - मैत्रीण, भावना, पेरू
मैत्रिण आयडी : अगो
मैत्रिणीने गोड बातमी द्यायला फोन केला. ही पेरुला एरवी अजिबात न शिवणारी पण आज म्हणाली "मला किनई सारखी पेरुच खायची भावना होतेय." मी म्हटले,"काय बाई तरी, बाळकोबा आत्तापासूनच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दाखवून राहिले !"
------------------------------
शब्द - मैत्रीण, भावना, पेरु
मैत्रिण आयडी : आशिका
भीतीची भावना मनात आली की स्वस्थता मिळत नाही. खिडकीतून कसलीशी आकॄती हलताना दिसतेय, या भ्रमात मैत्रीणीने रात्र जागून काढली. उजाडताच बाहेर नजर गेली, फांदीवर हेलकावे घेणार्या पेरुला आपण घाबरलो हे कळले, निश्चिंत झाली ती.
----------------------------------------
शब्द - मैत्रीण, भावना, पेरु
मैत्रिण आयडी : प्राची
अंगणातले पेरु चे झाड म्हणजे आम्हा मैत्रिणींचा गप्पांचा अड्डा...झाडाच्या फांद्या ऐसपैस पसरलेल्या
कच्चा, पिक्का , दोडा ज्याला जसा पाहिजे तसा पेरु घ्यावा आणि खावा..इतके उदंड मिळाले कि...
विकतचे पेरु घ्यायची कधी भावनाच होत नाही ...
-------------------------------------
शब्द - मैत्रीण, भावना, पेरु
मैत्रिण आयडी : monali
चिमणदाताने तुकडा तोडून कसा सगळ्यामिळून पेरू खायचो नै. तो रानमेवा. अहा. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. पण मैत्रीणींनी दिलेल्या त्या शिदोरीवर या भावनाशुन्य जगात मी मला टिकवलच. आता 'मैत्रीण' मुळे बहरतय, फुलतय हे मन.
----------------------------------------
शब्द - मैत्रीण, भावना, पेरु
मैत्रिण आयडी : प्रदीपा
" हॅलो, मावशी काल ना आमच्या शाळेत स्नेक मिळाला.. गंगाकाकांनी त्याला पकडून मारला नि पेरून टाकला शाळेतल्या रेन ट्री खाली...."
"श्री अरे, पेरून नाही पुरून टाकला म्हणावं.." इति मी,
श्री, माझी मैत्रीण भावनाचा मुलगा, वय वर्षे ५, इंग्रजी शाळेत जातो तो.
---------------------------------------
शब्द : पेरू
मैत्रिण आयडी : तेजु
१. "तुला डेन्टिस्ट व्हावं असं का वाटलं? "
"आमच्याकडे पेरूची फार मोठी बाग होती"
2. आठवतं तुला पोपटाने खाल्लेला पेरू शोधत चार तास फिरलो होतो.. न मिळाल्यावर कशी हिरमुसली होतीस तू..
दुसऱ्या दिवशी तू नसताना पोपटांचा थवा येऊन गेला आणि बागडत पेरू वेचलेस तू..
लहानपणीपासूनच माझा पोपट करत आल्येस गं तू!
3. इपिगोसाठी पंचलाईन मिळाली पण गोष्ट सुचत नव्हती...
दिवसभर दातात पेरूची बी अडकून राहिली होती.
----------------------------------------
शब्द - मैत्रीण
मैत्रिण आयडी : तेजु
पहिल्या रात्री दुधाचा ग्लास घेऊन ती आत आली.
दारापासची कुजबुज संपल्यावर म्हणाली "काय वात्रटपणा आहे? एकच ग्लास काय.. ह्यातलं अर्ध दूध मी पिणारे.. कष्ट मलाही करायचेत"
तिची दुधाची मिशी पुसताना आयुष्यभराची मैत्रीण पहिल्यांदा भेटली.
-----------------------------------------
शब्द - भावना
मैत्रिण आयडी : लीलावती
परीक्षा संपली.
भावनांची गुणपत्रिका मांडायची तिची सवय. आनंद: १०० दु:ख: ३५ भीती: १००.
निकाल लागला. आज मात्र आनंद: ० दु:ख ∞ निर्धार : १०० काही क्षणांत भावनांचा गुणफलक कायमस्वरूपी शून्यावर रिसेट झाला.
----------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : आशिका
मेंदीचा सोहळा अगदी खासच! हातावर मेंदीची नक्षी जसजशी साकारु लागली तसतशी हास्यकल्लोळाची धमालही!सर्वांत कहर केला तो शिव्यांच्या अंताक्षरीने.बायका, मुले सारे भरभरुन शिव्या देत होते.या अंगानेही मराठी भाषेचं वैभव दाखवून दिलं.
---------------------------------------------------------------
शब्दः नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : प्राची
शिव्या घालुनच प्रेम व्यक्त करण्याचे कॉलेजचे ते धमाल दिवस...
अभ्यासाच्या नावाखाली केलेली जागरण, नंतरच्या पार्ट्या , गॅद्रींगची धावपळ्ळ....
जुने फोटो बघता बघता त्याच्या मनात आठवणींचा कोलाज (नक्षी?) तयार होत होता..
-------------------------------------------------------------
शब्द : नक्षी
मैत्रिण आयडी : लीलावती
'शेवटची आठवण म्हणून … चल ना?' ती त्याला म्हणाली.
एकत्र घालवलेले क्षण, रंगवलेली स्वप्न … दोघेही नि:शब्द होते.
मागे भरतीच्या लाटासुद्धा त्यांच्या पावलांनी वाळूत तयार झालेली नक्षी पुसत होत्या.
---------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : मॅगी
"आरं गण्या येड्या, काल कै धमाल करून रायला बे वरगात? मास्तरला लै शिव्या देल्या आन तो मागंच हुबा!!" सुऱ्या म्हणाला.
गण्याच्या गालावरची मास्तरांच्या बोटांची नक्षी सगळं आधीच सांगून जात होती..
----------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : रायगड
ट्रेनमधील भांडणांनी जोर धरलेला. एकाने दुसर्याला शिव्या घातल्या. म्हणून त्याने सरळ पहिल्याच्या कानाखाली नक्षी उमटवली. या गदारोळात बाकीचे नुसती बघ्याची भूमिका घेऊन 'काय धमाल चालू आहे' अश्या थाटात बघत बसलेले.
-----------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : एव्ही
दिवाळी पहाट. कंदील, उटणं, फटाके धमाल नुस्ती!
ती रांगोळी काढण्यात मग्न.तेवढ्यात त्याने अंगणात शिव्यांची नक्षी काढली,
तिच्या नावाची चिट्ठी फडकावत.
-------------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : monali
झिंगत शिव्या देत तिच्या तनावर काठीने नक्षी काढायची, मग त्याच तनुशी धमाल. रोजचाच नेम त्याचा. असह्य होउन तिने छत न कुंकू सोडल. धमाल नाही आता त्याला. तीला नव्हती तशीही कधी. आता, तिच्यासाठी जगता येत तिला. कष्टाची भाकरी मिळवते ती.
--------------------------------------
शब्द- मैत्रीण, भावना
मैत्रिण आयडी : आशिका
'मैत्रीण' ही अशी व्यक्ती आहे की तिच्या केवळ असण्यानेच एकटेपणाची भावना दूर होते. आईच्या मायेने, बहिणीच्या समंजसपणे, हितचिंतकाच्या दूरदॄष्टीने तिने आपल्या जीवनाचं सुकाणू जणू सावरलं असतं ! अशा जीवलग मैत्रिणीला हा शब्दरुपी मुजरा !
----------------------------------------
शब्द : नक्षी, शिव्या
मैत्रिण आयडी : एव्ही
दारुड्या नवऱ्याचा संसार सांभाळत,पार्लर चालवणार्या तिच्या अंगावर मात्र शिव्यांचीच नक्षी.
----------------------------------------
शब्द- नक्षी, धमाल
मैत्रिण आयडी : आशिका
नक्षी म्हणताच मन बालपणीच्या 'धमाल' विश्वात रममाण होतं. ते समुद्राच्या वाळूत नक्षी रेखाटणं असो, वा रांगोळीतली वेलबुट्टी, भरतकामाची कशिदाकारी असो वा वहीत दडवून ठेवलेली पिंपळपानाची जाळीदार नक्षी,फक्त रम्य आठवणींचा खजिना !!
----------------------------------------
शब्द- शिव्या, धमाल
मैत्रिण आयडी : आशिका
शिव्यांची जोडी ही शापाशी नसून धमालीशीही जुळते. एखाद्याच्या तोंडात शिव्या अशा बसल्या असतात जसं नारदाच्या मुखी 'नारायण'. आमच्या एका सरांचे शिवीमय हाकारणे म्हणजे त्यांचा आनंदी मूड तर खर्या नावाने बोलवले की मूर्तिमंत जमदग्नीच भासत.
--------------------------------------
शब्द : नक्षी, शिव्या
मैत्रिण आयडी : विनार्च
नक्षीचा दिवस आणि सासूच्या शिव्या एकत्रच सुरु होतात...हल्ली वेगळीच चमक दिसते तिच्या डोळ्यात ...सासूला बाहेरचा संशय येतोय ...आता तिला कोण सांगणार ?...नक्षी तयारी करतेय ...लेकाच्या लग्नाची ...एक एक शिवी पारखून निरखून साठवतेय ...मनात
--------------------------------------
शब्द : नक्षी, धमाल
मैत्रिण आयडी : विनार्च
उंच फांदीवर बसून ती पाण्याच्या नक्षीकडे पहात होती...द्यावं का भिरकावून नी भाग व्हावं त्या नक्षीचा... धमाल येत असेल ना?...गिरक्या घेत खाली जाताना...इतक्यात तो आला...तिने झोकून दिलं स्वतःला त्याच्या सोबत.... बेभानपणे!!!
वेडी कळी... एवढा काही वारा न्हवता
------------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : अवल
आणि आठवतो तो ही दिवस राधे...
हातातली मेंदीची नक्षी दाखवायला आलेलीस; अन मी, गोपांसह शिमग्याच्या शिव्यांमधे रंगून धमाल करत होतो. तुझी रंगलेली मेंदी काळाबरोबर वाहून गेली कुठेतरी! शिल्लक राहिली ती फक्त तुझ्या कपाळावरची नक्षी...
---------------------------
शब्दः नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : अगो
"तुमने मेरे भगवानको क्यों शिव्या ?" आजी मराठमोळ्या हिंदीत घरी स्वयंपाकाला येणार्या हमीदावर सात्त्विक संतापाने ओरडली. हमीदाने काढलेली रांगोळीची देखणी नक्षी देवाला चालते पण त्या हाताचा स्पर्श नाही चालत. धमाल तर्कशास्त्र एकेक !
--------------------------------
शब्दः नक्षी
मैत्रिण आयडी : रीया
वाळूवरल्या नक्षीचा पिच्छा करताच दुसर्या टोकावर त्याला दिसलं प्रणयमग्न विंचवांचं जोडपं.तो हलकेच हसून मागे फिरणार इतक्यात तडफडणारा नर त्याच्या डोळ्यांदेखत मादीने क्षणार्धात गिळून टाकला..... आणि त्याला स्वत्:चा मधुचंद्र आठवला.
-----------------------------------
शब्दः नक्षी, शिव्या
मैत्रिण आयडी : रीया
तिच्या लग्नात धम्माल करणार्या एकेकाला मनातून खच्चून शिवी घालत घोडनवरी मांडवात आली आणि प्रथितयश वकिलीणीच्या आयुष्याचं आज खरं सार्थक झालं म्हणुन लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
--------------------------------
शब्दः नक्षी
मैत्रिण आयडी : रीया
तुझ्या मर्जीने करतेयेस् लग्न? त्याने विचारलं..... उत्तराची खर तर गरजच नव्हती. तिच्या गालांवरले वळ आणि त्यात मिसळलेली आसवांच्या ओघळांची नक्षी शब्दांशिवायही बरंच काही सांगून गेली.
---------------------------------
शब्द - नक्षी,धमाल,शिव्या
मैत्रिण आयडी : साक्षी
भुतकाळात विरलेल्या छंदाला टिचर नी हळुवार फुंकर घातली आणि क्रोशाच्या सुंदर जगात मी वावरू लागले. एकेक नक्षी पाहून मन हरवुन जाई... एकेक धागा विणुन त्याला सुंदर रूप देताना इतकी धमाल येई कि घरच्यांच्या शिव्याही कानाआड होई.
--------------------------------------
शब्दः सत्याग्रह, सवताळणे, सावली
मैत्रिण आयडी : अवल
आणि तो ही दिवस आठवतो...
तू चुलीपाशी बसून लोण्यात अपूप सवतळत होतीस अन मी खांबाच्या सावलीतून पुढे झालो. तू दचकलीस अन हातातून भांडं सटकलं. एरवी सत्याचा आग्रह धरणारा मी... तुझ्या सासूला सांगून बसलो की मीच पाडलं भांडं...
---------------------------------
शब्द : सवताळणे, सत्याग्रह, सावली.
मैत्रिण आयडी : अगो
१९३०, मार्चची भक्क दुपार. दांडीयात्रेला निघालेल्या सत्याग्रहींचा मोर्चा तिच्या गावातून पुढे निघाला होता. ते दृष्य बघताबघता सावलीला बसून ती शांतपणे चुलीवरची भाजी सवताळत होती. तिला वाटलं, संसाराला मीठ, देशाला स्वातंत्र्य... मला काय मिळेल ?? ...
--------------------------------
शब्द - सत्याग्रह, सवताळणे, सावली
मैत्रिण आयडी : विनि
जगण्याशी सत्याग्रह मांडल्यासारखं जिणं त्याचं! सोबतीची 'ती',नेहमीचं त्याच्याकडून दुर्लक्षित राहिली .तीने सवताळलेली आवडीची भाजी किंवा रोजचा चहा विसरलाचं तो.आता वळून पाहता ती सावली दिसत नाही अन डोक्याशी मध्यानीचा सुर्य तळपतो आहे.
--------------------------------
शब्द : सवताळणे, सत्याग्रह, सावली.
मैत्रिण आयडी : प्राची
पिकनिक ला जाऊ द्याव म्हणुन तिने जणु सत्याग्रह पुकारला होता.. अबोलपणे काम करणारी ती मला माझी सावलीच भासली...लक्शात आल माझी मुलगी आता मोठी झाली...
--------------------------------
शब्द : सवताळणे, सत्याग्रह, सावली.
मैत्रिण आयडी : रायगड
"सावलीत बसलेला कीडा अचानक हल्ल्याने सवताळून उठला व त्याने सत्याग्रह केला."
"गणू, चवताळून पाहिजे, कीडा सवताळत नाही."गुर्जी म्हणाले.
"ओ, गुर्जी! कीडा सत्याग्रह पण नाही करत! पण तुमी कैच्याकै शब्द देता, मग काय करणार?", गणू उत्तरला!
----------------------------------
शब्द : सवताळणे, सत्याग्रह, सावली.
मैत्रिण आयडी : monali
असे कारले कोवळे बाई सवताळुनी घ्यावे,
अस ताट भरले बाई (सर्वाना)जेवाया बसवावे.
अशी सासू मस्त बाई चवताळणे विसरावे.
असा नवरा चांगला बाई सत्याग्रह सोडावा.
अस सासर सुरेख बाई सावलीवानी जपाव.
------------------------------------
शब्द : सवताळणे, सत्याग्रह, सावली.
मैत्रिण आयडी : आशिका
तळल्या आणि गरम मसाल्यात सवतळलेली कोलंबी पानात असली की त्या पानात कुठल्याही भाजीची सावलीही पडता कामा नये. स्वर्गसुख काय हे तर रसनाच जाणे, हा स्वाद,ही चव,हेच एकमेव अंतिम सत्य आणि सारी उठाठेव या सत्याग्रहासाठीच फक्त!
----------------------------------------
शब्द : सवताळणे, सत्याग्रह, सावली.
मैत्रिण आयडी : प्राची
हुषार विद्यार्थिनी म्हणुन नावाजलेली ती ,चांगल्या नोकरीच्या "भविष्या" वर पाणी सोडून भाजी सवताळताना त्याला जीव तोडून "इतिहासा"तला दांडी सत्याग्रह समजावत होती,तो मात्र उन्हामुळे पडलेल्या सावलीशी खेळण्यात दंग होता....
तिला हसु आल स्वतःचच
----------------------------------------
शब्द : लीला, प्रक्षालन, उमलणे
मैत्रिण आयडी : आशिका
चंदन, केशर, कुंकुमादितैलं अशा सुगंधी द्रव्यांचं चेहर्यावर झालेलं प्रक्षालन, मग मऊसूत हातांचं चेहर्यावर कधी हलके तर कधी दाब देऊन केलेलं मालिश अगदी आतून उमलून आल्यागत भासणारी, मनःशांतीदायक अशी ही मालिशची लीला !
----------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : प्राची
दारुड्या बापाच्या शिव्यांना कंटाळुन ती तिरमिरीत बाहेर आली.
लक्ष्मीपुजनाच्या त्या रात्री, बाहेर सगळीकडे धमाल चालु होती..उत्साहाचे वातावरण होते
आपल्या मनावरची मरगळ झटकुन तिने रांगोळीची नक्षी रेखाटायला सुरुवात केली...
----------------------------------------------------
शब्द : नक्षी, शिव्या
मैत्रिण आयडी : प्रदीपा
शिव्या ओठात घेऊन रागातच तो गेला..ती आधीच तिथे आलेली.. बावरत तिने हातातली नक्षीदार पेटी पुढे केली. त्यात होत्या त्याने दिलेल्या भेटवस्तू, तिने प्रेमाने सांभाळलेल्या. त्याची विकेटच गेली..अश्रूंसह कोसळणाऱ्या तिला नकळत त्याने बाहुपाशात घेतलं.
----------------------------------------
शब्द : मैत्रीण, भावना, पेरू
मैत्रिण आयडी : मंजूडी
"पेरूचा पापा घेतलात का?" मी निघताना हीने विचारलं आणि आमचा निरोपसोहळा बघायला जमलेल्या तिच्या मैत्रिणी फिदीफिदी हसल्या, नेहमीप्रमाणेच.
लग्न, संसार म्हणजे केवळ एक व्यवहार समजणार्या त्यांना काय कळणार प्रेम, माया, काळजी ह्या भावना?
------------------------------------------------
शब्द : नक्षी, धमाल, शिव्या
मैत्रिण आयडी : मंजूडी
त्यांना असं फिदफिदताना पाहून वाटतं शिव्यांची लाखोली वाहावी. पण संस्कारात बसत नाही, जमणारही नाहीच. आपण फक्त हास्याची नक्षी पेरत जायचं झालं. एखाद दोन तरी शिव्या शिकायला हव्यात, बेधडकपणे हासडायला काय मस्त धमाल येईल ना?
--------------------------------------------------
शब्द : सत्याग्रह, सवताळणे, सावली
मैत्रिण आयडी : मंजूडी
हे बंडखोर विचार माझ्या सावलीसारख्या असणार्या तिला बोलून फक्त दाखवले, काय उसळली माझ्यावरच. कोलंबी सवताळताना हातातला डाव परजत म्हणाली, 'खबरदार असं काही कराल तर!'आणि मग सत्याग्रहच पुकारला जणू त्या दिवसापासून.
-----------------------------------------------
शब्द : लीला, प्रक्षालन, उमलणे
मैत्रिण आयडी : मंजूडी
अपराधप्रक्षालनार्थ काय करावं सुचत नाही. खरंतर राग व्यक्त करण्याच्या तिच्या एकेक लीलाही अनुभवत राहाव्याश्या वाटतात. पण काहीतरी करायला हवं. उमलत जाणार्या रातराणीचा सुगंध टिपत एकट्याने सोफ्यावर झोपणं कसं परवडेल?
------------------------------------------------------------
शब्द : समाजवादी, भाजणे, जिज्ञासा
मैत्रिण आयडी : मंजूडी
कसला एवढा आवाज येतोय म्हणून जिज्ञासेने खिडकीत बघायला गेलो. समाजवादी पक्षाचा मोर्चा चालला होता. तापत्या भाजत्या उन्हात काय बरं करत असावेत? 'भूख हडताल!' एवढंच काय ते नीट ऐकू आलं. पोटावर का म्हणून असा अन्याय करायचा?
--------------------------------------------------------
शब्द : बुभुत्कार, समर्पण, मॅगी
मैत्रिण आयडी : मंजूडी
एक मस्त कल्पना सुचली... गॅसवरच्या पाण्याने बुभुत्कार टाकायला सुरूवात केल्यावर पाकिटातली मॅगी आणि मसाला त्यात समर्पित केला. एक नूडल तुला एक मला करत ती माझ्यात कधी आणि कशी विरघळत गेली हे तिला आणि मलादेखिल कळले नाही.
---------------------------------------------------
शब्द - लीला, प्रक्षालन, उमलणे
मैत्रिण आयडी : विनि
माझ्या पापांचे प्रक्षालन होईल, असे वाटले होते का?जेलरच्या रुपात देवमाणूस भेटला, आयुष्य बदललं.एकेकाळी गळातल्या सोनसाखळ्या हिसकावणारे हात आता स्वत: फुलवलेल्या बागेतली उमललेली फुलं खुडतानाही थरथरतात.देवाची सारी लीला!
-------------------------------------------------------
शब्द : लीला, प्रक्षालन, उमलणे
मैत्रिण आयडी : प्राची
लीला,वय वर्षे 12,"कळी उमलताना"अख्खे वाचुनही पाळीच्या दिवसात देवाचे केल्यावर घराला पाप लागते असे आजी का म्हणते ते तिला कळत नव्हते..पापप्रक्शालनासाठी आजीलाच तीर्थयात्रेला पाठवायचा तिचा विचार होता.
-----------------------------------------------------
शब्द : जिज्ञासा
मैत्रिण आयडी : लीलावती
१,२,३,५,८,१३,२१ कळीच्या पाकळ्या उमलत गेल्या. प्रगल्भ होत असतानाच ह्या आकड्यांबद्दलच्या जिज्ञासेने घात केला. fibonacci च्या कृष्णविवरात तिने स्वत:ला कधी लोटले कळलेच नाही. कोडं अजूनही अपूर्णच पुढच्या कळीसाठी …
---------------------------------------------------
शब्द : समाजवादी, भाजणे, जिज्ञासा
मैत्रिण आयडी : आशिका
'भाजणे' हा संशोधनासाठी विषय घेऊन त्यावर काम करणे हीच जिज्ञासा होती तिची. आपले काम करताना, भाजलेले रुग्ण अभ्यासताना तिची परोपकारी वृत्ती काही स्वस्थ बसत नव्हती. समाजवादी तत्वांचा पिढीजात वारसा ती अशीच पुढे नेणार हेच खरं.
-----------------------------------------------------
शब्द : समाजवादी, भाजणे, जिज्ञासा
मैत्रिण आयडी : रायगड
"आमचे हे एकदम समाजवादी", मैत्रिण फोनवर बोलताना म्हणाली.
"काय सांगतेस?", मी जिज्ञासेने विचारलं.
"मग काय! सगळ्या समाजाशी सदैव वाद!"
तव्यावर पोळी उलटताना, तिचं ते उत्तर ऐकून फिस्सकन हसू येऊन हातच भाजला.
------------------------------------------------------
शब्द : समाजवादी, भाजणे, जिज्ञासा
मैत्रिण आयडी : प्राची
साम्यवादी कि समाजवादी त्याला त्यातला नक्की फरकही माहित नव्हता .ना जाणुन घ्यायची जिज्ञासा होती...
होती ती फक्त जिकडे पारडे झुकेल तिकडे आपली पोळी भाजुन घ्यायची महत्वाकांक्षा ...
त्यानेच त्याचा घात केला ...
----------------------------------------------------------
शब्द : बुभुत्कार, समर्पण, मॅगी
मैत्रिण आयडी : आशिका
'शिशाची घातक पातळी' या मुद्द्यावरुन झालेला गदारोळ, बुभुत्कारच जणू. असं वाटलं होतं की 'मॅगी'ची वाजली पुंगी. पण मोठी झेप घेण्याआधी जसे एक पाऊल मागे टाकतात, तसे नेस्टलेने सूचक बदल करुन केलेले समर्पण - गरुडझेपच ठरली की!
------------------------------------------------------------
शब्द : बुभुत्कार, समर्पण, मॅगी
मैत्रिण आयडी : आशिका
'सियावर रामचंद्र की जय' असे एकमुखाने बुभुत्कारत समस्त वानरसेनेने श्रीरामांचरणी आपले जीवन समर्पित केले.बुवांनी निरुपण संपवताच सर्वांची भोजनासाठी धांदल उडाली. मॅगी मसाला घालून केलेल्या पुलावाचा आस्वाद बुवा घेत होते.
--------------------------------------------------------
शब्द : समर्पण, मॅगी
मैत्रिण आयडी : चना
सकाळी जरा गडबडच झाली.. तरीही मी दोघांचा टिफीन बनवुन ऑफिसला आले!
मग दोन तासांनी ह्याचा फोन ..'अगं.. मॅगी आहे का घरात?
'हो आहे! का रे?
'नाश्त्याच्या यज्ञात समर्पण करतो तिचे'
---------------------------------------------------------
शब्द : बुभुत्कार, समर्पण, मॅगी
मैत्रिण आयडी : प्राची
किल्ल्यावरची प्रसन्न सकाळ तिला खूप आवडते.नाश्त्याला मॅगी हे ठरलेल..आजुबाजुला पक्षांचे आवाज ,खाली जंगलातला माकडांचा बुभुत्कार ,पानांची सळसळ..आणि मनात मात्र स्वराज्यासाठी समर्पण करणार्या मावळ्याचे हर हर महादेव...
-------------------------------------------------------------
शब्द : इटुकली, पिटुकली, गोष्ट
मैत्रिण आयडी : आशिका
इटुकली आशिका आजीला येऊन बिलगली.म्हणाली, "गोष्ट सांग ना आजी".आजीने प्रेमाने जवळ घेत नातीला विचारलं,"कुठली सांगू गं?" आशिकाचे काळेभोर, बोलके डोळे विचाराधीन झाले. पापण्यांची उघडझाप करीत ती उत्तरली,"ती पिुटुकली खारुताई़ची सांग".
-------------------------------------------------------
शब्द : इटुकली, पिटुकली, गोष्ट
मैत्रिण आयडी : प्राची
इटुकली अनु आईचा हात गच्च पकडुन चालली होती..नजर नुसती भिरभिरत होती..तशी ती धीट होती पण आजची गोष्टच निराळी होती. आता ती पहिलीत आली होती अन् ह्या मोठ्या शाळेसमोर तिची बालवाडी तिला पिटुकली वाटत होती....
---------------------------------------------------------
शब्द : इटुकली, पिटुकली, गोष्ट
मैत्रिण आयडी : रायगड
"बाबा, इटुकली म्हणजे काय?", चिंगीने विचारले.
"अगं पिटुकले, तुला माहिती नाही होय!", बाबा हसून म्हणाला. "ये, तुला एक गोष्ट सांगतो. त्यातून आपोआप कळेल इटुकली म्हणजे काय ते!"
-------------------------------------------------------
शब्द : इटुकली, पिटुकली, गोष्ट
मैत्रिण आयडी : विनि
"इटुकली राणी आली हरणांच्या सोनेरी गाडीत. ती दिसत होती छान पिटुकल्या चंदेरी साडीत."आता झोप गं चिऊ, गोष्ट संपली.
"आई तुला इपिगो लिहायची आहे म्हणून मला इपिगो सांगते आहेस का? मला मोठ्ठी गोष्ट हवी
--------------------------------------------------------
शब्द : लीला, प्रक्षालन, उमलणे
मैत्रिण आयडी : monali
लीला, हो तीच. कडे-कपार्यातुन भटकणे, डोंगर चढणे, भरभरुन जगणे हाच ध्यास. अचानक काय झाले कळेना, मन प्रक्षालन करते म्हणाली. परतुन आली ती राखाडी व्हेल घालुन. त्याचवेळी एक फुल मात्र चर्चच्या आवारात उमलले.
-----------------------------------------------------------
शब्द : समाजवादी, भाजणे, जिज्ञासा
मैत्रिण आयडी : monali
समाजात वाद घडवुन आणायचे, नविन विषय उकरुन ते तापत ठेवायचे. ना आव पहायचा ना ताव. केवळ स्वतःच्या जिद्दीचे घोडे पुढे दामटवायचा. लक्ष नेहेमी दुसर्याच्या तव्यावर आपली पोळी भाजण्याकडे. सोडल त्याला, शांत जगण्याच्या जिज्ञासेपोटी.
-----------------------------------------------------------
शब्द : बुभुत्कार, समर्पण, मॅगी
मैत्रिण आयडी : monali
त्याने करावं समर्पण, मॅगी ढवळत ती दृढ निश्चयाने म्हणाली. घरभर शांतता. ह्रुदयाचे ठोके ऐकावे. वंशाचा दिवा तो. हि मागणी त्यांच्या तत्वात बसत नव्हती. तीला मात्र अशक्य ते शक्य करुन हवे होते. त्यांच्या ढवळलेल्या मनातले बुभुत्कार मात्र विरवले तिने.
------------------------------------------------------------
शब्द : इटुकली, पिटुकली, गोष्ट (अट - एका वाक्यात एकच शब्द वापरायचा)
मैत्रिण आयडी : monali
इटुकली सोनाली,
पिटुकली मोनाली,
दोघी होत्या खाष्ट,
संपली इपि गोष्ट.
---------------------------------------------------------------