जुना लेख टाकत्ये इथे....
ऑगस्ट २००३ मध्ये केलेली ही ग्लेशिअर नॅशनल पार्कची ट्रीप :
उन्हाळ्यात कुठे तरी जाऊ जाऊ बेत करत होतो पण नवर्याच्या सुट्टीचं काही निश्चित होईना. काही नाही तर वॉशिंग्टन स्टेट मधल्याच ऑलिंपिक नॅशनल पार्कला तरी ३-४ दिवस जाऊन येऊ असं म्हणत होतो.पण एक दिवस नवरा ऑफिसमधून घरी आला आणि म्हणाला उद्यापासून ८ दिवसांची सुट्टी घेतल्ये.चल जाऊ कुठेतरी.आता एवढे ८-९ हाताशी आहेत म्हटल्यावर मग जरा कुठेतरी लांबच जाऊ असा विचार केला.एका मैत्रिणीला फोन केला आणि ग्लेशिअर नॅशनल पार्क, यल्लोस्टोन नॅशनल पार्क व बॅन्फ-जॅस्पर नॅशनल पार्क ही नावं मिळवली.मग गूगलायला सुरुवात केली.बॅन्फ व जॅस्पर नॅशनल पार्क कॅनडात असल्याने लगेचच मोडीत निघालं...कॅनडाचा व्हिसाच नव्हता.यल्लोस्टोन व ग्लेशियर चे नेट वर फोटोज बघितले आणि ग्लेशियर निवडलं.फोटोज तर भन्नाट होतेच पण ड्राईव्हही कमी होता - १० तास, यल्लोस्टोनला १३-१४ तासांचा ड्राईव्ह होता.
आठ दिवस जमेल तेवढं कॅम्पिंग - ट्रेकिंग करायचं ठरलं.ग्लेशिअरच्या साईट वरून पार्कातल्या कॅम्पिंगच्या साईट्सची माहिती घेतली...बर्याच ठिकाणी आयत्या वेळी first come first serve नुसार जागा मिळणार लिहिलेलं त्यामुळे तिथे जाऊन जागा मिळवू असं ठरवलं.तो स्मार्ट devices चा जमाना नव्हता त्यामुळे सर्व माहितीच्या प्रिंट्आऊट्स वगैरे काढून सामान जमवा जमव चालू केली - टेन्ट, portable stove, sleeping bags ई. प्रकार होतेच, ते घेतले, खाणं-पिणं प्रकार जमतील तितके घेतले, बॅगा भरल्या नी दुसर्या दिवशी सकाळी निघालो.आमचं सामान एवढं झालं की आम्ही सकाळी आमचं सामान गाडीत भरत होतो, तेव्हा त्याच वेळी आमचा शेजारी move out होत होता. ते लोकं त्यांचं सारं सामान ट्र्कमध्ये भरत होते.पण आमचं सामान बघून त्याने आम्हाला विचारलं, तुम्ही पण move out होताय का आज?
ट्रेकिंग करीता, वाटेत Spokane ला REI मधून शूज घेतले.नविन शूज घालून ट्रेक करण्याच्या यडचप निर्णयाचा पुढे फार त्रास झाला, ते येईलच पुढे.
मॉन्टाना स्टेट मध्ये पसरलेलं ग्लेशिअर नॅशनल पार्क त्यांच्या वेबसाईट म्हटल्याप्रमाणे खरोखरच hiker's paradise आहे. ग्लेशिअर पार्क मुख्यत्वे डोंगरा-डोंगरांवर पसरलेलं पार्क आहे. त्यामुळे सुमारे ७०० मैल ट्रेल्सचं जाळं या पार्कात पसरलं आहे. डोंगरांच्या कुशीत बसलेले तलाव, कुठे वरती कपारीत दडलेला ग्लेशिअर, तर कुठे दरीत कोसळणारे धबधबे यांना नेणारे हे ट्रेल्स. आठ दिवसांच्या आमच्या वास्तव्यात आम्ही छोटे-मोठे ४-५ डे ट्रेक्स केले. यातले अगदी संस्मरणीय ठरले ते म्हणजे - आईसबर्ग लेक आणि टू मेडिसीन लेक.
१० मैल roundtrip असणारा iceberg lake trail म्हणजे पार्कातला जेम आहे. डोंगराच्या बाजूने ridge वरून जात, मध्येच जंगलातून तर मध्येच रानफूलांनी भ्ररलेल्या मोकळ्या पठारावरून जाणारी ही ट्रेल. आजूबाजूला बर्फाच्छदित rugged mountain peaks! दूरवरच्या डोंगर उतारांवर दिसणारे lush green meadows...नी सर्वत्र भरलेली शांतता! व्दिनेत्री लावून बघितलं तर कित्येकदा त्या लांबवरच्या हिरव्यागार डोंगर उतारांवर ग्रिझली अस्वलांची कुटुम्ब दिसायची, मस्त पैकी चरतायत, पिल्लं मस्ती करतायत हे दृश्य दिसायचं. कधी एखाद्या कपारीवर माऊंटन गोट्स दिसायचे....चहूबाजूंना अवर्णनीय नजारा!
On the way to Iceberg Lake
ट्रेकर्स फार तुरळक्...वास्तविक ग्लेशियरला येणारे बहुसंख्य जणं ट्रेकिंग करतातच पण मुळात या पार्कात ट्रेल्सच एवढे आहेत की प्रत्येक ट्रेलवर एका वेळी तुरळकच लोकं भेटतात. आता अश्या वेळी या ट्रेल्सवर सर्वांत मोठा धोका असतो तो या ग्रिझली अस्वलांचा. मुळात कुठलाही वन्य जीव स्वतःहून माणसांवर हल्ला करायला येत नाही पण ही त्यांची territory आणि जर अचानक आपण त्यांना सामोरे गेलो तर भांबावून, धोका वाटून ते आपल्यावर हल्ला करू शकतात. याशिवाय जर अस्वलीण बाई त्यांच्या पिल्लांबरोबर असतील तर motherly instinct मुळे ती aggressive झालेली असते. ह्या माहितीच्या पाट्या पार्कात जागोजागी लावल्या आहेत. सर्व ट्रेकर्सना सूचना देण्यात आल्या आहेत की ट्रेल्सवर शक्यतोवर मोठ्या ग्रुपने जा, चालताना शांतपणे चालू नका, आवाज करत जा, जेणेकरून आपल्या अस्तित्वाची जाणीव अस्वलांना येईल. यामुळे त्यांना अचानक सामोरे जाऊन आपण surprise करून सोडत नाही. एकटा- दुकटा ट्रेकर्स असेल तर बरोबर शिट्या, घुंगरू लावलेल्या काठ्या, अस्वलांचा स्प्रे अश्या आवाज करणार्या गोष्टी बरोबर घेऊन जा. या गोष्टी पार्कात सर्वत्र ठायीठायी विकायला आहेत.
आम्ही दोघेच, गृप कुठून आणायचा? मग आम्ही पण दोघांना दोन शिट्या नी घुंगरूवाल्या काठ्या घेतल्या. bear spray पण घेतलाच होता आणि तो पटकन हाताशी लागेल असा बॅकपॅकच्या बाहेरच्या कप्प्यात ठेवला पण होता. चालताना आपले काठी आपटत आणि शिट्या फुंकत चालतोय आम्ही.चढताना दम लागला तरी या कार्यक्रमात खंड पडू द्यायचा नाही यावर माझा कटाक्ष्.. नवरोबा सोयीस्कररित्या विसरायचे मग त्याच्याही वाटच्या शिट्या मी मारायचे :winking: . एवढच नाही तर आवाज करत, बोलत जा अशीही सूचना रेंजर ने केलेली. त्यामुळे मोठ्याने बोलत (बोलायचं काम अर्थातच माझ्याकडे!), मध्ये मध्ये ओरडत नाहीतर गाणी म्हणत चालणारे दोन मनुष्यप्राणी असं एक दृश्य त्या अस्वलांना दिसत असणार!
On the way to Iceberg lake - wearing poncho
लांबवर दिसणारी अस्वलं बघून जितकी मज्जा वाटत होती, तितकच - "बाबांनो, लांबच असा, इथे आसपास फिरकू नका" असंही म्हणत होतो.. नशिबाने त्यांनी हे ऐकलं आणि कुठल्याही ट्रेलवर ते आमच्या भेटीस जवळ आले नाही! आता विचार केला तर हे वेडे धाडसच वाटते, पण तेव्हा ते केलेले! Bear spray असला तरी आयत्या वेळी तो वापरायला किती सुचला असता शंकाच आहे. आणि अस्वलांच्या हल्ल्याच्या कथा ऐकल्या की तर आपण तेव्हा हे का आणि कसं केलं असा विचार येतोच.
त्या १० मैलाच्या राउंड ट्रीपला आम्हाला जवळपास ८-९ तास लागले. १० मैल अंतर तसे फार नाही पण चढाई आणि सततचे शिट्या फुंकणे - गाणी म्हणणे याने परतताना आमचा बोर्या वाजवलेला त्यात नविन ट्रेकिंग शूज घालून ट्रेक करण्याचा गाढवपणा केलेला. आत जाड सॉक्स घातलेले असूनसुध्दा शूजनी अर्ध्या वाटेत चावायला सुरुवात केली. प्रथम दुर्लक्ष केलं तरी नंतर नंतर ते असह्य होऊ लागलं, शेवटचे २-३ मैल्स तर अशक्य झालं चालणं मला...शेवटी मी शूज काढून घेतले व सॉक्स वरती शेवटचे १-२ मैल चालून आले.
दुसरा तितकाच सुंदर ट्रेल म्ह्णजे ग्लेशिअर मधल्या टू मेडिसीन भागातला अप्पर टू मेडिसीन लेक ट्रेल.
साधारण ५ मैल राउंडट्रीप अंतर असलेला हा ट्रेल त्या मानाने बराच सोप्पा पण त्याच त्या ग्लेशिअरच्या स्वर्गीय सौंदर्याने पुरेपुर भरलेला आहे. एक बोट राईड घेऊन लोवर टू मेडिसीन लेकच्या दुसर्या काठावर पोहोचून हा ट्रेल चालू करता येतो.
परत एकदा निर्जन वातावरणाचा नी आजूबाजूच्या सौंदर्याचा आनंद घेत आम्ही वर पोहोचलो तोवर गारावृष्टीला सुरुवात झाली.वातावरणात गारवा पसरलेला. पण ती नि:शब्द शांतता, ते अद्भुत सौंदर्य अनुभवायला आम्ही कित्येक काळ त्या थंडीत तिथेच बसून राहिलो....परत एकदा एक वेगळीच अनुभुती होती त्या वातावरणात. झाकोळून आलेलं आकाश, गारांचा वर्षाव सर्वत्र निस्तब्धता,आणि आम्ही दोघेच - एक गूढ वातावरण निर्माण झाले होते...एकाच वेळी हे अनुभवत इथेच बसून रहावं, जाऊच नये आणि त्याचबरोबर "चल रे बाबा, पटकन जाऊया परत ह्या गूढ जागेतून" अशी माझी अवस्था झाली होती.
On the way to upper two medicine lake
Upper two medicine lake
बाकी अनेक सुंदर ट्रेल्सनी ही ग्लेशिअरची ट्रीप रंगलेली होती.रोज संध्याकाळी परतल्यावर टेंट मध्ये परतण्यापूर्वी एखाद्या लॉजच्या लॉबीमध्ये बसून एखादं कॉकटेल घेणं, इतर ट्रेकर्स शी गप्पा मारणे असा एक कल्चरल प्रोग्रॅम चालायचा.
लॉजच्या बाहेर अनेकदा लोकं त्यांच्या दुर्बिणी ट्रायपॉडवर लावून दूरवरच्या डोंगरांवरील वन्यजीवन निरखत असायचे नी जाणर्या येणार्यांना देखील बघण्याचं आमंत्रण देत असायचे...या सर्व नॅशनल पार्कस मधील हिस्टॉरिक लॉजेस हे एक वेगळेच प्रकरण आहे. ही लाकडी लॉजेस असतात तर सुंदरच, पण ह्यांचे बुकिंग वर्ष-वर्ष आधी होते. या लॉजच्या भल्या थोरल्या लॉबीज मस्त rustic सजवलेल्या असतात. संध्याकाळी थकून्-भागून आल्यावर एखाद्या लॉजच्या लॉबीत पडीक रहाणे हा एक नितांतसुंदर अनुभव आहे. फायरप्लेसच्या अवती भवती असेच ट्रेकर्स दिवसाचे ट्रेक्स आटपून ड्रिंक्स घेत बसलेले असतात्... मग एकमेकांबरोबर दिवसाच्या अनुभवांची देवाण्-घेवाण, कोणाला काय वन्य-जीवन दिसले याचे अनुभव ऐकणे-सांगणे - अश्या बोलाचालीत संध्याकाळ घालवायची नी मग जेवून टेंट मध्ये जाऊन पाठ टेकवायची!
ग्लेशिअरचा हाय लाईट म्हणजे पार्काच्या मधून जाणारा Going to the sun road! ५० मैल लांबीचा हा रोड वर वर चढत सुमारे ६५०० फूटावर पोहोचतो हा पार्काचा सर्वांत हायेस्ट पॉईंट्...इथे लोगान पास व्हिजीटर सेंटर आहे. आजूबाजूनी बर्फाच्छदीत पर्वतांनी वेढलेले हे
व्हिजीटर सेंटर आतून्-बाहेरून बघण्यासारखेच आहे. याच्या बाजूने जाणारी छोटीशी hidden lake trail आणखी वर चढून जाते नी वरच्या टोकावरून पलिकडील hidden lake नी आजूबाजूचा नजारा अवर्णनीयच!
Logan pass visitor center
Mountains surrounding the visitor center
On the way to Hidden lake trail
Hidden lake
आठ दिवसांच्या आमच्या वास्तव्यात आम्ही पार्कच्या निरनिराळ्या भागात कँपिंग केलं. यामुळे पार्क संपूर्णपणे explore करता आला, पार्कात अनेक तलाव आहेत. लेक मॅकडोनाल्डस हा सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध! पण एका संध्याकाळी आम्ही पोहोचलो - लेक बोमन या थोड्या बाजूला असलेल्या तलावावर! ती रात्र त्या तलावाच्या काठी कँपिंग करण्याचे ठरले. मग टेंट उभारून आम्ही उरलेली संध्याकाळ तलावाच्या काठावर बसून घालवली....संध्येचे शांत रंग...परत एकदा ती गूढगर्भ-नि:शब्द शांतता...समोर शांत तलाव, त्याच्याभोवती जवळपासून दूरवर पसरलेल्या डोंगरांच्या गडद ते फिकट होत जाणार्या रांगा, आजूबाजूला कोणी नाही - फक्त आम्ही!...out of this world अनुभव!
Bowman lake
camping at Bowman lake
या ग्लेशिअरच्या आम्ही दोघं इतके प्रेमात पडलो की परत पुढील वर्षी इथे यायचच हा निश्चयच केला आम्ही.
(फोटोज बारा वर्षापूर्वी analog camera नी काढलेले आहेत. तेव्हाचे प्रिंटस आहेत. तेच स्कॅन केलेत.)
भाग दुसरा: