पृथ्वीचे पाणिग्रहण (अॅनिमेटेड व्हिडिओसह)

(एक जुनी कविता)

जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
तव लग्नाची खबर-बात ||१||

मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी ||२||

वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची ||३||

घुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री ||४||

थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
पोचू लागल्या गावोगावी
तव लग्नाच्या अक्षत-राशी ||५||

मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर तु त्यास ||६||

उमलूनी येई, ही पहाट
साकळलेले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट ||७||

पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी ||८||

हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी सुमने नाजूक
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तव ||९||

गाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झाली ||१०||

झर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्‍यांचे
शोभती हार वधू-वरांचे ||११||

उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी भू-वन
संपन्न होई पाणिग्रहण ||१२||
----------------------

आणि हे त्याचे अॅनिमेटेड व्हिडिओ रुपांतरण

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle