तुम्हीच का ते? ज्यांच्याबद्दल
ती शेवटी बरळत होती?
तुमचीच छबी बहुदा तिच्या
डोळ्यांमध्ये तरळत होती...
तुम्ही थोडे चांदण्यातल्या
डोहासारखे दिसता का?
तुमचाच गंध पहिल्या पावसात
मातीत उमलून येतो का?
तसं असेल तर तुम्हीच ते...
ज्यांची बाधा जडून तिनं,
रात्री काढल्या तळमळून अन्
धगीत लोटलं सगळं जिणं!
शेवटी शेवटी सांगते अश्शी
लालबुंद रक्ताळलेली...!
डोळे जड मधाळलेले...
थोडी थोडी स्वप्नाळलेली...
काय होतंय?... कुणालाही
सांगू शकली नाहीच ती
अखेरपर्यंत तुमचं नाव
घेऊ शकली नाहीच ती...
फार हाल झाले तिचे...
तुमच्यापायी झुरताना...
निरोप द्यावा कुणापाशी?
तुमच्यासाठी मरताना?
फक्त म्हणाली 'जाळू नका...
नव्हतंच मुळी जे तुमचं',
भल्या पहाटे तुमची झाली...
ऐहिक सोडून कायमचं!