आमचा पुढचा टप्पा होता ऊखीमठ. साधारण सात तासांचा प्रवास होता. सगळा रस्ता डोंगरातला असल्याने 'घाटातली वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ' असा प्रकार होता. सतत इतके तास बसमधे, तेही अशा रस्त्यावर जरा त्रासाचे, म्हणून आम्ही ब्रेक-जर्नी करायचे ठरवले. तसेही वाटेतली दोन ठिकाणे परत बघायची मला उत्सुकता होतीच. आणि नवर्याने 'तू ठरव काय ते' असे जाहीर केल्याने त्याची संमती होती.
आपल्याकडे पाच प्रयाग मानले जातात. नंदप्रयाग, विष्णुप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग. यापैकी देवप्रयाग आणि रुद्रप्रयागला आम्ही भेट दिली. दोन्ही ठिकाणी बसमधून उतरलो, हॉटेलमधे नाश्ता/जेवण केलं त्या त्या वेळेनुसार, आणि त्यांच्याचकडे सामान ठेवून प्रयागावर जाऊन आलो. ते लोक आनंदाने ठेवून घेतात सामान. दोन्ही प्रयागांवर २०१३ मधल्या पुराच्या खुणा आहेत. आसपास पडझड झालेल्या इमारती, पडलेले पूल दिसतात.
सकाळी सातला निघालेलो आम्ही, उखीमठला पोचायला दुपारचे चार वाजले. गेल्या वेळी गुलाबी आणि पांढर्या रंगाच्या बहरलेल्या झाडांनी आमचे हार्दिक स्वागत केले होते. या वेळी त्यांची जागा नीलमोहोर उर्फ जॅकरांडा आणि सिल्व्हर ओकने घेतली.
इथे थंडी आणि भुरभुर पाऊस असे दोन्ही होते. लॉजवर, समोरच्या आश्रमात मिळून २-३ मराठी कुटुंबे भेटली. त्यांच्याशी गप्पा झाल्या. चहापान झाले. रात्री समोरच्या डोंगरावरच्या गावातले दिवे फारच छान दिसत होते.
सक्काळी लवकर उठून उखीमठ गावाचा फेरफटका मारला. तिथूनच शेअर जीपने गुप्तकाशीकडे निघालो. हेच ते समोरच्या डोंगरावरचे गाव. इथे शंकराचे मंदिर आहे. त्याची आख्यायिका अशी- कौरव-पांडव युद्ध संपल्यावर ब्राम्हण हत्या आणि भ्रातृहत्या या पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी पांडव शंकराला भेटायला काशीला गेले. शंकराच्या मनात त्यांना भेटायचे नव्हते म्हणून तो नंदीच्या रूपात या ठिकाणी येऊन थांबला. पांडव त्याला शोधत इथे आले.
शंकराने जमिनीत घुसून गुप्त होण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीमाने त्याची शेपटी धरून त्याला रोखायचा प्रयत्न केला. पण शंकर निसटलाच. म्हणजे गुप्त झाला. म्हणून हे गुप्तकाशी. (नंतर शंकराचे पाय, डोकं, जटा, पोट आणि पाठ पाच ठिकाणी प्रगट झाले. ते आपले पंचकेदार!)
गुप्तकाशीहून आम्ही 'कबिल्ठा' या ठिकाणी गेलो. हे आपल्या महाकवि कालिदासाचे जन्मगाव. तिथे एका ठिकाणी त्याचा पुतळा आहे बंद खोलीत, जी कुलूपबंद असते. आणि खिडकीतून काहीही दिसत नाही. पण एक कमान आणि एक पाटी बघून आपल्याला समाधान की आपण कालिदासाच्या जन्मगावाला भेट दिली :P
तिथून कालीमठ या ठिकाणी आलो. इथे कालीमाता, काळभैरव, शंकर-पार्वती आणि बर्याच इतर मूर्त्या आहेत. इथे पुराचा बराच मोठा फटका बसल्याचे कळाले. मंदिराचा ८०*१५ मीटरचा भाग नव्याने बांधून काढला आहे. मंदिराकडे येणारा लोखंडी पूल वाहून गेला. त्याचे चेपलेले-मोडलेले अवशेष बघूनही विश्वास बसत नाही. रस्ता वाहून गेल्यामुळे जवळ जवळ ६-७ महिने इथल्या गावांचा बाकीच्या जगाशी संपर्क तुटला होता असे गावकरी सांगत होते. अजूनही रस्त्यांचे काम चालूच आहे. जवळच्याच एका गावात तर एकही पुरुषमाणूस उरलेला नाही; फक्त बायका-मुले. सगळे पुरुष केदारनाथला रोजीरोटीसाठी गेले असताना वाहून गेले.
कालीमठपासून आम्ही चालतच परत आलो. वाटेत नदी ओलांडली. झर्यांचे पाणी पीत, निसर्ग बघत आणि तीव्र चढ चढत ऊखीमठमधल्या ओंकारेशवर मंदिरात आलो. पंचकेदारपैकी केदारनाथ आणि मदमहेश्वर या केदारांची शीतकालीन गद्दी या मंदिरात असते. (पाचपैकी चार ठिकाणचे केदार थंडीत वरती बर्फ पडत असल्याने खालच्या गावांमधल्या ठरलेल्या ठिकाणी येतात आणि अक्षय तृतीया झाल्यानंतर परत आपापल्याजागी स्थानापन्न होतात.) हे मंदिर खूप प्रशस्त आणि सुरेख आहे. इथे चक्क चप्पल काढणे-घालणे करायला एक मोठी खोली, त्यात खुर्च्या आणि मोठे चप्पल स्टँड, तेही विनामूल्य ठेवले आहे.
बाणासुराची कन्या उषा आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यांचा विवाह इथे झाला होता. त्यांचा विवाह मंडप आहे इथे. उषाच्या नावाचाच अपभ्रंश होउन गावाचे नाव उखीमठ पडले म्हणतात.
देवप्रयाग
रुद्रप्रयाग
कर्णप्रयाग. इथे या वेळी नव्हतो गेलो, २०१२ मधे गेले होते.
कर्णप्रयागला कर्णाचे मंदिर आहे. तिथे या मूर्त्या आहेत. त्या अशा गमतीदार का आहेत काय माहीत :thinking:
आणि कर्णाच्या मंदिरात हा भूमीने रथाचे चाक गिळण्याचा, कर्णाला मानहानीकारक प्रसंग का घेतला असेल हेही कुतूहल आहे.
रुद्रप्रयागच्या मंदिरातले गवाक्ष
गुप्तकाशीचे मंदिर
आवडते खेळणे मिळाल्यावर मूल जसे खूश होउन हसते तसे हातात हत्ती घेउन हसणारा वाघोबा
गोमुख सारखे 'हत्तीमुख'
र्हेडॉडेंड्रॉनची फुले. नेपाळचे राष्ट्रीय फूल. याचे सरबत पण करतात.
र्हेडॉडेंड्रॉनची पालवी
कालीमठ मंदिराचा परिसर
काळभैरव
हा पुरानंतर परत नवीन बांधलेला पूल. अजून काम चालू आहे. मध्यभागी एक पत्र्याचा पाळणा लटकताना दिसतोय? त्यावर उभे राहून नट-बोल्टस लावण्याचे काम चालू होते. आधीच्या पुलाचे अवशेष पडलेले, लटकताना दिसताहेत. उजव्या बाजूला लाकडी, तात्पुरता बांधलेला पूल.
उखीमठला जाणारा रस्ता
बहुतेक गडगडत खाली आलेली कार. कारण आसपास कुठेही, कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही.
सिल्व्हर ओक आणि जॅकरांडा
कित्ती वेळ हे गोड पिल्लू आमच्याकडे चोरून बघत होतं. फक्त डोळे दिसत होते भिंतीवरून. मग जरा वेळाने मान वर केली.
ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ
मला इथेच लग्न करायचे होते. नवरा पण अनिरुद्ध नावाचा शोधला
त्या विवाह मंडपामधली सुंदर सजावट
सरबत बनवण्यासाठी र्हेडोडेंड्रॉनची फुले निवडली जात आहेत
हे ते सरबत