आज अचानक नवीनच काहीतरी जाणवलं. तुझ्या माझ्या अनेक क्षणांमधलं चंद्राचं लोभस अस्तित्व. खूप वेळ खोल विचार करत गेले तसं चंद्राचं प्रतिबिंब अधिकच ठळकपणे दिसू लागलं फक्त आपल्या दोघांच्या भावविश्वातलं. तसं पाहिलं तर या जगात आपण सतत आपापल्या व्यापातापांनी, माणसांनी वेढलेले. सतत एखाद्या भट्टीतली आग भगभगत रहावी तसा रोजचा व्यवहार, रोजची कामं, कर्तव्यं धगधगत असतात आणि तू, मी आणि आपल्यासारखे असंख्य तपस्वी ऋषीमुनी 'मां फलेषु कदाचन' (अर्थात हे जास्तच उदात्तीकरण झालं, पण 'करायचं म्हणून') वृत्तीने कर्माच्या समिधा त्या कर्तव्ययज्ञात अर्पण करत असतो. मनात खोल खोल कुठेतरी 'मैं हूँ ही नहीं इस दुनिया की..' वाजत असतं. तुझ्या माझ्या एकेकट्या क्षणांना मन आसुसलेलं असतं. इतकं काय काय सांगायचं, ऐकायचं साठलेलं असतं पण सामोरे आलो की शब्द स्पर्शाला शरण जातात. एकेक स्पर्श काव्य होऊन बरसतो. क्षणांची गाणी होतात आणि मग मनात पुन्हा एकदा ऐकू येतं, 'मैं हूँ ही नहीं इस दुनिया की..'
पण या दुनियेत एकच अशी गोष्ट आहे जी तुझ्या, माझ्या आणि या इतर जगात कॉमन आहे. किंवा असं म्हणू की जी 'लौकिकार्थानं' तुझीही आहे, माझीही आहे, आपल्या दोघांचीही आहे. चंद्र. हा चंद्र, सतत आपल्या सोबत, आपल्या पाठीशी उभा राहिला. कधी तर डोक्यावर बसला अन कधी थकून उशांशी निजला. तुझ्यामाझ्याशिवाय तिसरं कोण आहे आपल्या जगात त्याच्याशिवाय? कवीकल्पना म्हण, फिल्मी म्हण किंवा काहीही. नथिंग इज फिल्मी. आपण भाग्यवान की फिल्मी, चंदेरी म्हणावं असे अनेक क्षण आपल्या पदरात पडले आणि आठवणींचं वस्त्र चांदणशेला होऊन गेलं. आज मला इतक्या वर्षांच्या आपल्या सहवासातले हायलाईट्स पार्श्वभूमीला वाजणार्या गाण्यांसकट डोळ्यांपुढे दिसले! काय गंमत आहे पहा, फिल्मी फिल्मी म्हणत ती गाणी आजवर गुणगुणली, असं कधी प्रत्यक्षात घडलं तर काय बहार येईल असंही वाटलं. पण प्रत्यक्षात मात्र यापेक्षा कितीतरी रुपेरी, सोनेरी क्षण अनुभवले तेव्हा त्यांची आठवणही नाही आली. आज आठवणींच्या कॅलिडोस्कोपचा अँगल असा काही लागला की प्रसंग आणि गाणी यांचा एक बहारदार कार्यक्रमच होऊन गेला. आता त्या कार्यक्रमाचं हे रिपीट ब्रॉडकास्ट फक्त तुझ्यासाठी.
तू मला पहिल्यांदा 'लिफ्ट' दिली होतीस ती वेळ आठवते? तेव्हा तू खरंच 'जाता जाता' मला सोडणार होतास की मुद्दाम तिकडेच जात होतास हे अजूनही खरे सांगितले नाहीस. खरतर दोघांनाही एकमेकांचा वेळ थोडातरी हवाच होता. सव्वाआठची रात्रीची वेळ. एरवी कधी एकदा घरी जातो असं होऊन जातं पण त्यावेळी गोष्टच वेगळी होती. तू आणि मी फक्त दोघंच एकटे आहोत यावर पटकन विश्वासच बसत नव्हता. चंद्रही गोरामोरा होऊन वरुन डोकावून पाहात होताच. आज तो आपला चाळीतला चांभार चौकशा करणारा शेजारी झाला होता. चहा घेऊ म्हणून थांबलो. भला मोठा रस्ताक्रॉस करताना मला तर भीती वाटत होती, शिवाय तुझ्यासमोर पहिल्यांदाच काहीतरी बावळटपणा होऊ नये - तेही भर रस्त्यात, अशी धास्ती होती. शेवटी तुझ्या हाताला पुसटसा स्पर्श झालाच. तुझ्या अंगात क्षणार्धात फिरलेली लहरही जाणवली होती मला. पण तू आणि मी दोघंही 'त्या गावचे' नव्हतोच, नाही का?
वो चांद खिला, वो तारे हँसे, ये रात अजब मतवाली है
समझनेवाले समझ गए है, ना समझे वो अनाडी है
नंतर असा कितीतरी वेळा तो तुझ्यामाझ्यात येऊन बसला. गाडीतून घरी जाताना हळूच डोकावू लागला काचेतून. शेवटी एकदाचा त्यालाच साक्षीदार करुन बहाणे करणे, मनातले सत्य लपवणे, चोरुन बघणे अशा अनेक गुन्ह्यांची कबूलीही दिली. शिक्षेपेक्षा गुन्हा अवघड. नजरेने केव्हाच निवाडा केला होता शब्दांची पुढे यायची हिंमत होत नव्हती.
ऐसी उलझी नजर उनसे हटती नही
दांत से रेशमी डोर कटती नही..
ती वेळ अशीच. संध्याकाळी आठच्या सुमाराची. भर रस्त्यात, रहदारीत. पण तू, मी आणि तो वेगळ्याच टाईम अॅक्सिसवर होतो. काळजातलं प्रेम उतू जाईतो डोळ्यापर्यंत पोहोचलं होतं. एक क्षण फक्त आणि आजवर पाहिलेली सगळी वाट, आसवांनी शिंपली. असं कधी आपल्या आयुष्यात होईल असं वाटलंच नव्हतं. पण ते घडलं होतं. अनपेक्षितरित्या नैसर्गिकपणे. इतकी अनावर ओढ मी फक्त 'तू ही रे, तू ही रे.. तेरे बिना मैं कैसे जिऊं.' च्या सुरांत अनुभवली होती. मला जर आधी कळतं की, माझ्यासाठी तू -
"चांद रे, चांद रे... आजा दिल की जमीन पे तू"
पर्यंत पोहोचला आहेस तर मी केव्हाच "तोडा रे.. तोडा रे.. हर बंधन को प्यार के लिए" म्हणत तशीच धावत आले असते.
त्यानंतर तर काय दिवसाही चांदणं पसरलं आयुष्यात. क्षणांचे उत्सव झाले, सुखांचे सोहळे झाले. प्रसंग राजवर्खी होऊन कायमचे आठवणीत कोरले गेले. एकमेकांना भेटण्यासाठी कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी बेहत्तर. कर्तव्याचा दिवस एकदाचा मावळून समोरासमोर दिसलो की सारा शीण पळून जायचा. स्वप्नांच्या मऊ मऊ कापसावर पाय ठेवल्यागत सारं अलवार होऊन जायचं. तो असायचाच वरुन नजर ठेवून. माझ्यासाठी पहिलं गिफ्ट म्हणून तू तो सुंदर पण अतिशय महाग असा गुलाबी ड्रेस आणलास. मी नेहमीप्रमाणे तुला दुकानदारानं फसवलं म्हणून वैतागले आणि तू ते डावलून, हा ड्रेस घालच म्हणून हट्ट केलास. कसं काय ते सारं जमवलं हे फक्त तिघांनाच ठाऊक आहे, तू, मी आणि वरचा तो. इतका सुरेख ड्रेस घातल्यावर मी कमी सुंदर थोडीच दिसणार होते? तुझी नजरच सांगत होती ते.
चांद छुपा बादल में शरमा के मेरी जाना..
तो खरंच लपला असेल का कोणास ठाऊक. कारण तुझी नजर माझ्याकडेच एकटक आणि म्हणूनच माझे डोळे मिटलेले.
मग तुझे असे अनेक हट्ट पुरवणंच मला जास्त आवडायला लागलं. एकदा तर तू मला चंद्र्कोरीची मोठी टिकली लाव म्हणालास. म्हणजे नऊ वारी साडी, ठुशी, वाकी,नथ सगळा सरंजाम आलाच.( दुपारी दोन वाजता गजरा शोधत फिरणार्या तुझं मला हसूच आलं आणि कौतुकही वाटलं.तेव्हा प्रॉमिस केलेला कोल्हापुरी साज अजून माझ्या लक्षात आहे. ) अशा प्रकारे भर दुपारी तो आपल्या दोघात थेट माझ्या कपाळावर आणि तुझ्या ओठात उतरला.
आपलं नशीब एवढं चांगलं की 'चंद्र आहे साक्षीला', 'तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी' गाणार्या काही 'कोजागिरी' ही लाभल्या. नंतर मग मी काही काळासाठी तुझ्यापासून खूप खूप लांब अंतरावर गेले. भौतिक अंतरावर. सहवासाची सवय लागल्यावर विरहाचे आधी चटके बसतात आणि मग त्यातच गोडी मानावी लागते. तेव्हा एक दिवस तुझ्याशी फोनवर बोलताना वर आकाशात तो दिसला! आणि लक्षात आलं, अरे, आत्ता या क्षणी तू वर पाहिलंस तर तुलाही तो दिसेल! मग काहीतरी चांद्रिक केमिकल लोचा होऊन आपली दृष्टादृष्ट होईल! मी चालू असलेले वाक्य तोडून तुला पटकन वर चंद्र बघ म्हटले आणि तू पाहिलासही!! मग ते ठरुनच गेलं.
कल नौ बजे, तुम चांद देखना.. मै भी देखूंगी
और यूँ दोनोंकी निगाहे.. चांद पर मिल जाएंगी.. !
आपली इतके दिवस मजा बघणारा तो, आता आपलं 'प्रकरण' माहीत असलेला 'खास' मित्र बनला. गुप्ततेची पक्की खात्री होतीच. एकवेळ तो स्वतःला झाकून घेईल पण दोस्तांचं पितळ उघडं पाडणार नाही!
मग पुन्हा हळूहळू रोजच्या धबडग्यातही मन लागलं. आपण फक्त एकमेकांचेच आहोत असं मनात पक्कं झाल्यावर थोडी मोकळीक मिळायला लागली. व्यवहारी जगात धावल्याखेरीज भावनांचे लाड पुरवता येत नाहीत, हे ठाऊक होतंच आता तसं वागायची वेळ आली होती. पाऊस संपला होता, हिवाळा सुरु झाला होता. प्रेमाच्या झर्यांचं पाणी धो धो सोडून आता झुळूझुळू वाहत होतं. कधी चार चार दिवस भेटत नव्हतो तर कधी एकेक तास फोनवर होतो. भेट नसेल त्या दिवशी न चुकता वर त्याच्याकडे नजर जायचीच. त्याने तरी तुला पाहिलं असेल आज. प्रेमात माझी झोप कधी उडाली नाही, आणि तुला कधीकधी स्वप्नांनी झोपू दिलं नाही.
इक बगल में चांद होगा इक बगल में रोटीयां
इक बगल नींद होगी इक बगल में लोरीयां;
हम चांदपे रोटीकी चादर डालकर सो जाएंगे
और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएंगे!
आजही आणि यापुढेही दोघांचं हे असंच चालू राहणार आहे. पण मला माहीत आहे की तू आहेस, माझ्यासाठी! आणि तुलाही हे माहीत आहे की मी आहे, तुझ्यासाठी. चंद्राला तर माहीत आहेच की तो आहे, आपल्यासाठी.
मधु इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात
आपलं संपूर्ण आयुष्यच त्यानं अशी अजब मधुचंद्राची रात होताना पाहिलं आहे. आपल्या दोघांच्या आयुष्याचा अविभाज्य असा तो रुपेरी तुकडा आहे. कधी माझ्या कपाळावरच्या चंद्रकोरीची, कधी माझ्या बांगडीची आठवण देऊन तुला तो छ़़ळतो, तसाच तुझी खबरबात सांगून मला दिलासाही देतो. त्यानंच तर शिकवलं आपल्याला, कधीतरीच येतात आयुष्यात पौर्णिमा आणि अमावस्या! बाकी सारे दिवस कलेकलेनं घ्यायचे. म्हणूनच तू जेव्हा समोर येत असतोस माझ्या, मनात ऐकू येतं -
तुम आए तो आया मुझे याद,
गली में आज चांद निकला!