दुपारी तीन वाजता त्याचा फोन वाजला. आज लकिली तो फ्री असताना तिचा कॉल आला होता. त्यानं खुशीतच हॅलो! म्हटलं. त्या मनमोकळ्या, स्वल्पविरामयुक्त हॅलो वरूनच तिनं ओळखलं की आज जरा वेळ आहे, वा वा. तिलाही मध्ये थोडा वेळ रिकामा सापडल्याने जरा पाच दहा मिनिटे तरी गप्पा माराव्यात या उद्देशाने अगदी ऑफिसच्या बाहेर येऊन तिनं कॉल केला होता. विषय तसा त्या दोघांनाही कधी लागत नाहीच. नुसतं बोलता बोलता वेगवेगळे विषय, लोक गुंफले जायचे. कधी सध्या नवीन काय करतोय किंवा इतर अपकमिंग इव्हेंट्स वर वगैरे बोलणं व्हायचं.
प्रेम असतच रे तुझ्या माझ्या मनात
खुंटीवर टांगलेल्या कपड्यां सारखं!
किंवा कोपऱ्यात पडलेल्या रद्दी सारखं...
फार फार तर
To-Do list मधल्या शेवटल्या task सारखं
जरा मळलं म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा धूळ बसली म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
जरा मागे पडल म्हणून काय झालं
प्रेम तर आहे ना!
उधळून टाकावं मनातलं प्रेम...
वाढत म्हणे!
साचून राहीलं तर नितळ
पाणीही गढूळतच ना!
झटकूया का थोडी धुळ?
करुया का कोपरे लख्ख?
देउया का प्रेमाला Prior and Urgent चा कप्पा?
आज अचानक नवीनच काहीतरी जाणवलं. तुझ्या माझ्या अनेक क्षणांमधलं चंद्राचं लोभस अस्तित्व. खूप वेळ खोल विचार करत गेले तसं चंद्राचं प्रतिबिंब अधिकच ठळकपणे दिसू लागलं फक्त आपल्या दोघांच्या भावविश्वातलं. तसं पाहिलं तर या जगात आपण सतत आपापल्या व्यापातापांनी, माणसांनी वेढलेले. सतत एखाद्या भट्टीतली आग भगभगत रहावी तसा रोजचा व्यवहार, रोजची कामं, कर्तव्यं धगधगत असतात आणि तू, मी आणि आपल्यासारखे असंख्य तपस्वी ऋषीमुनी 'मां फलेषु कदाचन' (अर्थात हे जास्तच उदात्तीकरण झालं, पण 'करायचं म्हणून') वृत्तीने कर्माच्या समिधा त्या कर्तव्ययज्ञात अर्पण करत असतो.