चांदण गोंदण

चांदण गोंदण : 8

दुपारी तीन वाजता त्याचा फोन वाजला. आज लकिली तो फ्री असताना तिचा कॉल आला होता. त्यानं खुशीतच हॅलो! म्हटलं. त्या मनमोकळ्या, स्वल्पविरामयुक्त हॅलो वरूनच तिनं ओळखलं की आज जरा वेळ आहे, वा वा. तिलाही मध्ये थोडा वेळ रिकामा सापडल्याने जरा पाच दहा मिनिटे तरी गप्पा माराव्यात या उद्देशाने अगदी ऑफिसच्या बाहेर येऊन तिनं कॉल केला होता. विषय तसा त्या दोघांनाही कधी लागत नाहीच. नुसतं बोलता बोलता वेगवेगळे विषय, लोक गुंफले जायचे. कधी सध्या नवीन काय करतोय किंवा इतर अपकमिंग इव्हेंट्स वर वगैरे बोलणं व्हायचं.

Keywords: 

लेख: 

चांदण गोंदण : 7

आज सकाळ काही नेहमीची उगवली नाही. तसं दोन दिवसांपासूनच वातावरण तंग झालं होतं, पण प्रश्न उत्तरादाखल बोलणं होत होतं. त्यानं जरा बुद्धीला ताण देऊन पाहिला की आपण काहीतरी मेजर चुकलोय का, काही बोललोय का, काही विसरलोय का.. पण तसं तर काहीच नव्हतं. मग ती अचानक बोलनाशी का झाली?

एरवीची तिची बडबड थांब म्हणावं इतकी असायची त्यामुळे तिला राग आला, चिडली की बोलणं बंद झाल्यावर एखादं शहरच्या शहर ठप्प व्हावं तितकी शांतता पसरते दोघांत. मग ते अंतर वेळ जाईल तसं वाढत जातं आणि ते कापून तिच्यापर्यंत पोचणं त्याला अवघड होऊन बसतं. कधी कधी तर मनातलं हे अंतर दूर करायला तो खरोखर शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलेला आहे तिच्यासाठी. आणि ती ही त्याच्यासाठी. मग नंतर सगळं इतकं सहज सोपं व्हायचं की कशासाठी इतकं ताणलं असं दोघांनाही वाटायचं. पण तो क्षण यायला खूप वाट पाहावी लागायची, तपश्चर्या करावी इतका दैवी असायचा तो क्षण.

त्याला हल्ली धीर धरवत नसे इतका वेळ तिच्याशिवाय. काल दुपारपासून एल मेसेज नाही, सकाळी ऑफिसला आल्यावर नाही. शेवटी न राहवून त्यानं तिला व्हॉट्सअप वर पिंग केलंच.
ओ शुक शुक.

(तिच्या रीड रिसीटस कायम बंद असतात. आपला सतत कुणी ट्रॅक ठेवणं तिला आवडत नाही. मुळात आपण कुणाला प्रत्येक गोष्टी साठी आन्सरेबल नाही असं तिचं म्हणणं. त्यामुळे परमेश्वराची कृपा होईल तेव्हाच मेसेज ला रिप्लाय मिळेल यावर त्याचा विश्वास.)

साधारण पस्तीस मिनीटांनी रिप्लाय आला.

काय

(स्मायली सोडा, कोणतंही विरामचिन्हं न देता शुष्क कोरडा शब्द म्हणजे लढाई मोठी आहे.)
काय करतेयस?
काम

(नेहमीची रसद पुरणार नाही. असले फुटकळ प्रश्न उत्तरं दोघांनाही वात आणतात. जेवलास का झोपलीस का असले प्रश्न विचारायचे नाहीत हे दोघांत कधी ठरलं होतं आठवत नाही पण ठरलंय.)

साधारण तीन तासांच्या शांततेनंतर तो पुन्हा सरसावतो.

काय झालंय? बोलत का नाहीयेस?
(लगेच प्रत्युत्तर)
बोलतेय की.काय होणारे मला.

आता तो गप्प. कुठून सुरवात करणार? काही बोलायची सोय नाही.

तिकडं तिला कळलंय की त्याला कळलंय कुछ तो हुआ है. पण तो ओळखू शकणार नाहीच. पूर्वीच्या राण्या कशा जाहीरपणे कोपभवनात जायच्या... मग राजा समजूत काढायला यायचा. राणी मागेल ते तिला मिळायचं. राजाला काय कमी होतं? पण राणीचा थाट राजा जपायचा. राजापेक्षा राणीचा मान मोठा ठेवायचा.

ठेवायलाच हवा ना? एवढ्या मोठ्या राजाला खूश ठेवणं, त्याचं सुखदुःख वाटून घेणं काय सोपं आहे? शिवाय सतत लढाई आक्रमणाची टांगती तलवार. राज्यात असला तरी राणीच्या वाट्याला कितीसा येत असणार राजा? त्यात आणखी वाटेकरी राण्या असतील तर बघायलाच नको. असा विचार मनात आला आणि तिनं पुन्हा स्वतःशीच तोंड वाकडं केलं. इथं तर सगळाच सुळसुळाट आहे आणि कोपभवनाचं लोकेशन पण आपणच शेअर करा! तिला अगदी वैताग आला. तिनं टाईप करायला सुरुवात केली -

परवाचा फोटो चांगला होता.
कुठला?
किती फोटो टाकलेस परवा फेसबुकवर? का मला एकच दाखवायचं सेटिंग होतं?
(सटकन तिचा पारा चढला. तो अचानक झालेल्या माऱ्याने धडपडलाच पण पटकन सावरलं त्यानं स्वतःला.)

हा, तो होय! असाच सकाळी उन्हात गच्चीवर गेलो होतो चहा प्यायला तेव्हा काढला.
(याला अजून समजलेले नाही? का हा वेड घेऊन पेडगावला जातोय? माझ्याकडूनच वदवून घेणार हा.)

हम्म. मग आता बाकीच्यांना कधी नेतोयस चहा प्यायला गच्चीत?
(मुद्दाम खोचक प्रश्न)

? कुणाला?
(हा नवा बॉम्ब! त्याला आता धोक्याची जाणीव व्हायला लागली होती.)

इतर जाऊदेत, तिला तर नेच ने.
(शेवटी तिनं एकदाचं बोलून टाकलं!)

कुणाला तिला?
(त्याचा टोटल दिल चाहता है मधला समीर झालेला!)

तीच ती, तुझ्या फेसबुक पोस्ट्सची चातकासारखी वाट पाहत असते. कायम पहिली कमेंट टाकायला टपलेली असते. अगदी भरभरून कौतुक ओसंडत असतं नुसतं!

(तिचा फणा आता पूर्ण उभारलेला.त्याला तो शब्दांशब्दातून दिसत असल्याने तो निश्चल पण शरण. पटकन कालच्या पोस्टवर कुणाची पहिली कमेंट आहे ते पाहून घेतो. आधीच्या दोन तीन पोस्ट्स वर पण तिचीच कमेंट. हिचं एकही लाईक पण नाही?! अरेच्चा. हे तर लक्षातच आलं नव्हतं. धन्य!)

Ooooo!! असं आहे काय! ( आणि हसायचे दोन तीन स्मायली)

हसतोस काय? मला हे आवडलेलं नाहीय सांगून ठेवते. मी धोपटेन तिला एक दिवस.
(ती विझत चाललेल्या रागावर मुद्दाम फुंकर घालत पेटता ठेवायच्या प्रयत्नात)

R u jealous? (डोळा मारलेला आणि डोळ्यात बदाम स्मायली)

मग? नसणार का?
(आता रागाच्या जागी रडू यायला लागलेले.)

असावसच तू जेलस! त्याशिवाय तू माझ्यासाठी किती पझेसिव्ह आहेस ते कसं कळणार?
आहेच मी पझेसिव्ह. तू फक्त माझा आहेस. तुझे सगळे फोटो माझे आहेत तुझं घर, तुझी गच्ची, तू केलेला चहा पण माझा आहे.

(तिला त्याला आताच्या आत्ता कडकडून मिठी मारावी वाटत होतं. ते सगळं पुन्हा पुन्हा वाचतांना त्याच्या गालावर हलकेच खळी उमटत होती.)

हो ग राणी माझी. सगळं सगळं फक्त तुझं आहे, तू लाईक केलं नसलंस तरी! (पुन्हा डोळा मारून दात दाखवणारा स्मायली)

असू देत, मी तुला कायमचं लाईक केलंय तेवढं पुरे आहे. ते कधी एकदा त्या ढोलीला कळेल असं झालंय.
(पुन्हा त्या दुसरीच्या आठवणीने चडफडाट.)

आहेच का अजून? मी सांगितले का तिला तसं करायला? मी कधी तिला वेगळा रिप्लाय दिलाय बघ बरं? कोण पहिले कमेंट करेल यावर कुणाचा कसा कंट्रोल असेल?
(नेहमीसारखा अत्यन्त लॉजिकल प्रश्न टाकून त्यानं तिला गारद केलं.)

ते जाउदे. आज भेटणारेस का?
हो तर! आज भेटायलाच हवं. पझेसिव्हनेस कुणाचा जास्त आहे ते बघायचाय जरा...

संध्याकाळची लाखो चमचमती गुलाबी स्वप्नं डोळ्यांत तरंगणारी आणि कालपासूनच्या रुसलेल्या ओठांवर एक खट्याळ हसू दाखवणारा एकही स्मायली तिला सापडत नव्हता या क्षणी...!

Keywords: 

चांदण गोंदण : 6

ती: आठवतं तुला..
कॉलेजमध्ये कोणता तरी इव्हेंट होता
आणि आपण मदतनीस म्हणून नावं नोंदवली होती.
शनिवार संध्याकाळी मोठी चित्र जत्रा होती आणि चिकार लोक मुलं येणार होती.
तेव्हा सगळे तास दीड तास उशीरा येणार होते आणि आपला वेळ जात नव्हता.
आख्या कॉलेजला तीन फेऱ्या मारून पण कुणी येईना.
मग तहान तहान झाली तेव्हा
आपण बर्फाचा गोळा घेतला.

तो : बर्फाचा गोळा?
अच्छा, सकाळ आणि कॅम्लिन ने आयोजित केलेला तो चित्रमित्र कार्यक्रम?

तेव्हा सगळ्यांचं पाच वाजता यायचं ठरलं होतं आणि तुझा 3 लाच मला मेसेज आला होता - मी रेडी आहे. चल. मी थांबूच शकत नव्हतो घरात.

वेळ कसा गेला खरंतर कळत नव्हतं ना? तीन नाही पाच फेऱ्या मारल्या होत्या मेन बिल्डिंगला.

तहान मात्र खरी होती. सगळीच!

एकच बर्फाचा गोळा घेतला आपण. तू तुझे ओठ लाल आणि गार करून झाल्यावर मला म्हणालीस - घे!मी या बाजूने खाल्लाय. तू इकडून खाऊ शकतोस.

सायन्स जरा कच्चं आहेच तुझं. वितळणाऱ्या बर्फ़ाला कुठली बाजू असते?

पण तुझ्या ओठावर ओठ ठेवायची तशी का होईना आलेली संधी मी थोडीच सोडणार होतो?

आणि तू तरी कुठे सोडलीस नंतर? घेतलासच की माझ्या हातून पुन्हा. दोघांचे ओठ लाल आणि गारठलेले! तरी अस्पर्शित!

ती : (वितळणाऱ्या बर्फ़ासारखं पाणी पाणी होत)
आणि मग रात्री गप्पा मारताना तू गायलेलं "वो शाम कुछ अजीब थी!"

पुढे सरकून तिचे हात हातात घेऊन त्यानं आवाज लावला -

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास-पास थी, वो आज भी करीब है
वो शाम कुछ अजीब थी...

झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख़याल था
दबी-दबी हँसी में इक हसीन सा गुलाल था
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यों लगा मुझे, के मुस्कुरा रही है वो
वो शाम कुछ अजीब थी...

मेरा ख़याल है अभी झुकी हुई निगाह में
खिली हुई हँसी भी है, दबी हुई सी चाह में
मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो
यही ख़याल है मुझे, के साथ आ रही है वो
वो शाम कुछ अजीब थी...

Keywords: 

चांदण गोंदण : 5

नव्या नव्या प्रेमाचे अलवार दिवस! नुकतंच एका केशरी संध्याकाळी भेटल्यावर काळजाचा डोह तळातून हलला आणि पाणी डोळ्याच्या काठापर्यंत हिंदकळलं. कितीतरी महिन्यांची मैत्री प्रेमात बदलत जाण्याची जाणीव सुखदही होती आणि थोडी दुखरीही. कारण त्या प्रेमात कित्येक पण होते..! खरं सांगायचं तर त्या पाण्यात बुडणार्या डोळ्यांच्या होड्यांनीच त्या दोघांना पैलतीरी सोडलं. कितीही पण परंतु असले तरी हे काठोकाठ भरलेले प्रेम कुठे सांडलं तर? ते जपायला हवं.. हळूवार.. गुपचूप. लाखात एखाद्याला मिळणारं भाग्य आहे ते.. त्याची किंमत या किंतूपरंतु वर तोलण्यात अर्थ नाही. या सुखांच्या लाटा मनात खोल दडवून ठेवायच्या..

Keywords: 

चांदण गोंदण : 4

संध्याकाळची वेळ होती. टेकडीवर मस्त गार वारा सुटला होता. वीकडे असल्यानं तुरळक वर्दळ होती. त्याला यायला जरासा उशीर झाल्याने ती अगदी चिमूटभर का होईना रुसली होती. आजचा दिवस महत्वाचा होता ना! प्रत्येक मिनीट तिला त्याच्यासोबत काढायचा होता या दोन तासातला; त्यातली दहा मिनिटं त्यानं वाया घालवली होती. पण आता रुसून आहे तो वेळ पण वाया जाईल म्हणून ती पटकन तो राग विसरून गेली. त्याला आणखी एक कारण पण होतं.. आज तो तिच्या खूप खूप आवडीचा तो स्पेशल पांढरा शर्ट घालून आला होता. इतर शर्टासारखा तो कडक नव्हता तर एकदम मऊ मुलायम होता. त्या शर्टात त्याला मिठी मारायला तिला खूप आवडायचं. एकदम मऊ, उबदार वाटायचं.

Keywords: 

चांदण गोंदण : 3

आकाशच्या लग्नाला सगळ्यांनी त्याच्या गावी जायचं ठरत होतं. ग्रुपवर प्रचंड डिस्कशन्स सुरू होती. कसं जायचं, केव्हा निघायचं, गिफ्ट काय द्यायचे, ड्रेस कोड करायचा का , अजून कुठे फिरून यायचं का असे एकामागून एक नवे विषय निघतच होते. कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच ग्रूपमध्ये एवढी भंकस चालू होती आणि मजा येत होती. सगळ्यांना जुने दिवस आठवून कधी एकदा भेटतो असं झालं होतं. मुलांना बोर होईल म्हणून त्यातही पोरींनी वेगळा ग्रुप काढून साडी नेसायची का ड्रेस, का एकदा हे एकदा ते, मग ज्यूलरी काय असे उरलेले शंभर हजार विषय चर्चेला घेतले होते. धमाल चालू होती.

Keywords: 

चांदण गोंदण : 2

आज सकाळपासूनच तिच्या जीवाची घालमेल होत होती. थोडंसं टेन्शन तर होतंच. इतके दिवस त्याची चाललेली गडबड, डॉक्टरकडे मारलेले हेलपाटे, औषधं, तपासण्या, वर खाली होणारी आईची तब्येत, रात्रीची जागरणं सगळं ती बाहेरून तरीही त्याच्या अगदी जवळ राहून पाहत होती. गेले अनेक महिने त्यांच्या संध्याकाळच्या भेटीचा विषय

Keywords: 

चांदण गोंदण : 1

घरात अजूनही गडबड चालूच होती. जिकडे तिकडे बॅगा पिशव्या अर्ध्या उघड्या , उपसलेल्या, काही सामान अजून भरायची वाट पाहणाऱ्या अन काही रिकाम्या होण्यासाठी ताटकळलेल्या. लांबचे बरेचसे पाहुणे परतले असले तरी मे च्या सुट्या असल्याने हक्काची मोठी माणसं, लहान मुलं गलका करतच होती.
घरात खूप पसारा असला, कामं असली तरी त्याचा शीण नव्हता तर घराचं ते अस्ताव्यस्त असणंच साजरं होत होतं. बाहेर रात्रभर चालू असलेल्या लाईटच्या माळा बंद करायच्या राहिल्या होत्या. लग्न होऊन तीन दिवसच झाले होते त्यामुळं सगळं घर तिच्यासारखंच नवीन आणि आनंदाने भरून गेलं होतं.

दुपारच्या जेवणानंतर सगळे हॉल मध्ये सतरंजीवर टेकायला आले होते.पंखा पाचावर गरागरा फिरत होता. काकांनी पानाच्या सामानाचे तयार तबक पुढ्यात घेतले आणि मोठ्या आवाजात काहीतरी गंमत किस्सा सांगत विडे लावायला घेतले. बाहेर अंगणात मुलं कॅरम खेळताना चेकाळली होती. आमरस पुरीचं तुडुंब जेवण झाल्याने धाकटा दीर वर खोलीत जाऊन घोरत पडला होता. तिलाही खरंतर तीव्रतेने आपल्या खोलीत जाऊन पाठ टेकायची तीव्र इच्छा होत होती पण साक्षात नवराच समोर इतर भावा बहिणींमध्ये गप्पा ठोकत बसल्याने तिनं एकटीने उठणं बरं दिसलं नसतं. मग ती तशीच एका कोपऱ्यात भिंतीला पाठ टेकून बसून इवलेसे हसत आपली दाद देत राहीली.

ती ज्या कोपऱ्यात बसली होती तिथून तिला तो एका बाजूने दिसत होता. सगळ्यांमध्ये राहून पण आपल्याला त्याला असं मनसोक्त बघता येतंय हे तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला फार मजा वाटली. गेले कित्येक दिवस शंभर माणसात तिला त्याला धड डोळे भरून बघता पण आलं नव्हतं. धार्मिक विधी, फोटो, आणि शुभेच्छा आशीर्वाद द्यायला येणारे लोक यात शेजारी उभा असलेला तो फक्त तिला जाणवत होता दिसत नव्हता. न जाणो आपण त्याच्याकडे बघायला आणि कुणी पटकन क्लिक करायला एक वेळ आली तर चिडवायला नवीन कारण मिळेल या शंकेने ती फार जपून राहत होती. कारण आता चिडवणं खूप झालं होतं गेले सहा महिने; पण ते सगळं प्रत्यक्ष कधी घडतंय याची तिला आस लागली होती. तर आता तो असा समोर होता आणि ती त्याच्याकडे बिनदिक्कत बघू शकत होती.

पांढरा शुभ्र झब्बा घातला असल्यानं तो जास्तच हँडसम दिसत होता. काहीही म्हणा झब्ब्यात पुरुषाचं जे रूप दिसतं ते टीशर्ट सूट बूट कशातच नाही. तिला आठवलं, अरे,आपण याला म्हटलं होतं की सिरीयल मध्ये दाखवतात तसं तुम्ही पुरुष घरात का छान सैल सुती झब्बे घालत नाही? तेव्हा तो खो खो हसला होता आणि म्हणाला तू पण मग तशी साडी नेसून आणि दागिने घालून बसणार असलीस तर मी पण घालेन हा झब्बा घरात! तिला साडी तशीही आवडतेच आणि नंतर ऑफिस सुरू झालं की नेसून होणार नाही शिवाय घरात बरीच वयस्कर जनता असल्याने तिने दोन दिवस साडीच नेसली होती आणि सासूबाई कडून कौतुक पण करून घेतलं होतं. आज आंघोळ करून खाली आला तेव्हा जिन्यात असतानाच त्याने का डोळा मारला होता ते तिला आत्ता कुठे स्ट्राईक झालं!ओह माय माय. तो ये बात है! इतकी बारीक गोष्ट त्यानं लक्षात ठेवलेली पाहून ती मनातून सुखावली.

काहीतरी मोठा विनोद झाला आणि एकदम हास्याची कारंजी उसळली तशी ती भानावर आली. तो वर बघून मनमोकळं हसत होता तेव्हा त्याच्या गालांचे कट्स आणखीच शार्प दिसत होते आणि वरखाली होणारा तो कंठमणी! उफ्फ. त्या कंठमण्यात तिचा कसा जीव अडकला आहे हे त्याला तिला कधीचं सांगायचं आहे. ती त्याचे एका सरळ रेषेत असणारे शुभ्र दात, हलकेच खळी पाडणारी धनुष्यासारखी जिवणी बघत आपले ओठ आता कसे दिसत असतील हे आठवत राहिली. त्या ओठांवर हे ओठ कसे दिसतील हा विचार करताना तिचा श्वास कधी रोखला गेला तिला समजलंच नाही. तसं दोन तीन वेळा किस करून झालं पण होतं आतापर्यत पण ते कुठंतरी अंधाराचा फायदा वगैरे घेऊन,चार चौघात कोपरा गाठून. तेव्हा दोघांचीच धडधड इतकी होती की हा विचार मनात आलाही नव्हता. आता कसं आपली दोघांची खोली, आपला बेड आपला आरसा आपलं बाथरूम आपला शॉवर! कुणापासून काही लपून नाही सगळं कसं हक्काचे, राजरोस, हवं तेव्हा! आपल्या विचारांची धाव पाहून तिची तीच लाजली!

आता त्यानं हात मागे घेऊन खांद्याच्या रेषेत आडवे भावांच्या पाठीवर टाकले होते. केवढे लांब हात आहेत याचे! सहा फुटी उंचीला शोभतील असेच. आणि ते भरदार पसरट गोरे गुलाबी तळहात. बरंय वरच्या बाजूने पटकन दिसत नाहीत. ते तळहात ती निमुळती बोटं तिने कित्येकदा डोळे भरून स्पर्शली होती. गाडी चालवताना, हॉटेल, सिनेमा, दुकानात बिल पे करताना वोलेत मध्ये घुटमळणारी ती बोटे, वोलेत खिशात ठेवताना त्याच्या संपूर्ण हाताचा होणारा विशिष्ट कोन, कन्यादानाच्या वेळेस त्याच्या तळव्यात सहजच सामावलेले आपले मेंदीभरले नाजूक छोटे तळहात आणि नंतर गळ्यात मंगळसूत्र घालत असताना मानेला झालेले पुसट स्पर्श तिला आताही लख्ख आठवत होते.

किती वेळ गेला कुणास ठाऊक ती अशी नुसती बसून त्याला बघत असल्याला. तिच्या लक्षात आलं तेव्हा सगळे चहा आणा चहा करत होते. ती पटकन उठली आणि उठताना बांगड्यांचा आवाज झाला तसं त्याच्या नजरेने तिला वेधलं. काल रात्रीची बांगड्यांची गंमत तिला क्षणात आठवली आणि तिचे गाल अक्षरशः गर्द गुलाबी झाले. ती झटदिशी आत पळाली आणि एका हाताने दुसऱ्या हातातल्या बांगड्या घट्ट धरल्या तेव्हा कालची त्याच्या हातांची पकड याहून किती भरीव मजबूत आणि तरीही एकही बांगडी पिचकू न देणारी आश्वासक होती हे जाणवलं. तिच्या मेंदीचा गंध जेव्हा त्याने खोल श्वासात भरून घेतला तेव्हा त्या धारदार सणसणीत नाकावर हे आता फक्त माझं आहे असा ओठाचा शिक्का तिनं उमटवला होता.

ती आत चहाचा ट्रे न्यायला आली तसं सासूबाईंनी उद्याची बॅग तयार आहे ना ग म्हणत हनिमूनला जायची आणखी डझनभर स्वप्नं पुढ्यात ओतली! आता ती इतकी अलवार झाली होती जसा तो चहाचे कप भरलेला ट्रे.. जरा धक्का लागला तर सांडेल की काय! ती नक्की काय जपत सांभाळत चालली होती ते तिलाच समजत नव्हतं. चहा देऊन झाला तसं चुलत सासूबाईंनी ओवलेला भरगच्च गजरा हातात दिला आणि तिचा श्वास गंधित झाला.. आजची रात्र मोगऱ्याची, मेंदीची, गंधभरल्या श्वासांची का सत्यात येणाऱ्या स्वप्नांची..! तिच्या समोर तिचा पांढरा शुभ्र मोगरा हसत होता फुलत होता आणि ही त्यात दोऱ्या सारखी स्वतःला विसरून गुंतत चालली होती!

Keywords: 

लेख: 

Subscribe to चांदण गोंदण
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle