आकाशच्या लग्नाला सगळ्यांनी त्याच्या गावी जायचं ठरत होतं. ग्रुपवर प्रचंड डिस्कशन्स सुरू होती. कसं जायचं, केव्हा निघायचं, गिफ्ट काय द्यायचे, ड्रेस कोड करायचा का , अजून कुठे फिरून यायचं का असे एकामागून एक नवे विषय निघतच होते. कॉलेज संपल्यानंतर पहिल्यांदाच ग्रूपमध्ये एवढी भंकस चालू होती आणि मजा येत होती. सगळ्यांना जुने दिवस आठवून कधी एकदा भेटतो असं झालं होतं. मुलांना बोर होईल म्हणून त्यातही पोरींनी वेगळा ग्रुप काढून साडी नेसायची का ड्रेस, का एकदा हे एकदा ते, मग ज्यूलरी काय असे उरलेले शंभर हजार विषय चर्चेला घेतले होते. धमाल चालू होती.
आकाश म्हणजे त्या गावाच्या एके काळच्या पाटलाचा नातू. त्यामुळे लै दणक्यात बार उडणार होता. त्यानं कॉलेजात असताना वर्णनं केली होती तसाच अगदी. गावजेवण, मांडव सगळी धमाल. खूप शिकला असला तरी त्याची नाळ मातीशी अगदी घट्ट होती. मुलगी त्याच्या पसंतीची आणि लग्नाचा धमाका घरच्यांच्या पसंतीचा असं त्याचं आणि नानांचं ठरलेलेच होते. ते सगळं अगदी तसंच होताना बघून ग्रूपमध्ये सगळ्यांना उधाण आलं होतं नुसतं. काहींची लग्न झाली होती ते आपापल्या जोडीदाराला घेऊन येणार होते. आता पुढचं लग्न कुणाचं याचा अंदाज बांधणं चालूं होतं. मनातून सगळ्यांना वाटत होतं की आता तरी समरने अस्मिला विचारावं.
समर हा टू गुड टू बी ट्रू असाच उंच, देखणा,हुशार आणि श्रीमंत. पुण्यात प्रभात रोडला बंगला वगैरे. पण आई वडिलांच्या प्रेमळ धाकाने किंवा संस्कार म्हणा तो कायम नम्र असायचा. कधी त्याला गर्व नव्हता किंवा आहेत पैसे म्हणून उडवा अशी बेफिकिरी पण नव्हती. अस्मि एका साध्या मध्यम वर्गीय घरातली. स्वाभिमानी आणि मेहनती. ती खूप हुशार नव्हती पण मन लावून अभ्यास करायची. स्वतः कमवावे आयुष्यभर आणि ताठ मानेने जगावे एवढीच तिची स्वतःकडून अपेक्षा होती.
आणि नेमकी इथेच गडबड होत होती. तिला समर आणि समरला ती आवडते हे आता ओपन सिक्रेट झालं होतं. एकदा बोलता बोलता चिन्मयी बोलून पण गेली होती, कशाला एवढी मेहनत घेतेस, नंतर मस्त प्रभात रोडवर प्रभात फेऱ्याच मारणार आहेस की! हे चिडवणं तिच्या मनाला कुठेतरी लागलं होतं. ती समरवर प्रेम करत होती ते तो व्यक्ती म्हणून तिला आवडायचा म्हणून. त्याचं घरदार पैसाअडका बघून नाही. पण हे या लोकांना सांगितलं की तत्व! तत्व! म्हणून चिडवत बसतील. त्यापेक्षा तिनं गप्प राहायचं ठरवलं. बघू पुढचं पुढं. समरसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय प्रेम लग्न असल्या भानगडीत पडणारा नव्हता. त्यामुळे आता ती वेळ आली आहे असं सगळ्यांनाच वाटणं स्वाभाविक होतं.
आकाशच्या लग्नाला आधी ट्रेनने जायचं ठरत होतं पण त्यात खूप वेळ गेला असता म्हणून शेवटी गाड्याच काढायचं ठरलं. समरची एक गाडी त्यात होतीच. दुपारी तीन वाजता निघून आठ वाजेपर्यंत पोचायचा प्लॅन होता. समरच्या गाडीत पुढे नितीन आणि मागे चिनु सोबत अस्मि बसली होती. खरतर कुणी कुठं बसायचं ठरत होतं तेव्हा ती मागे मागेच घुटमळत होती आणि समरपण फिंगर्स क्रॉस करून देवा आता ही स्वाभिमानी मुलगी कृपा करून माझ्या गाडीत बसू दे असं मनातल्या मनात म्हणत होता. शेवटी चिनुने नेहमीप्रमाणे सेटिंग करून हाताला धरून तिला समरच्या गाडीत बसवले. गॉगल लावून मिरर सेट करण्याच्या निमित्ताने समरने अँगल लावून बरोबर अस्मि दिसेल असा केला. चिनुच्या ते लक्षात आले तरी तिने बाहेर बघायचे नाटक करून कानाडोळा केला.
अस्मि आज नेहमीपेक्षा थोडी वेगळी भासत होती त्याला. जास्तच सुंदर झालीये का? केस वाढवलेले दिसतायत. पण पांढरा टॉप आणि ब्ल्यू जीन्स इतका कॉमन ड्रेस का घातला हिने आज? मुद्दाम करते बहुतेक. आज मी भेटणार आहे तर छान राहा हे पण मीच सांगावं का? त्यानं पुन्हा पाहिलं तर खरतर चेहऱ्यावरून खाली ड्रेसकडे नजर जायचं कारणच नव्हतं इतकी ती गोड दिसत होती. तो मनाशीच हसला. इसका बदला हम जरूर लेंगे।
मागच्या सीटवर बसून तिला तो काय फारसा दिसतच नव्हता. मगाशी गाडीबाहेर आला तेव्हा त्याचा डेनिम शर्ट आणि तसलाच ब्ल्यू गॉगलमध्ये तो एकदम शर्टच्या ब्रँडच्या जाहिरातीतला मॉडेल दिसत होता. गॉगल एका हाताने काढून गाडीच्या टपावर ठेवून "चला रे पटपट" म्हणत होता तेव्हा तिला तसेच पटपट त्याचे फोटो काढावेत असं वाटलं. आपण याचे खूप फोटो काढायचेत - नंतर! तिनं मनाशी ठरवून टाकलं.
साडेआठला ते गावात पोचले तसं आकाश, नाना आणि काकूंनी त्यांचं भरघोस स्वागत केलं. चहापाणी झालं की लगेच आवरून या म्हणाले आज संगीत रजनी ठेवलीय.ग्रुपसाठी आकाशने काकांचा वाडाच दिला होता. मुलींना खोल्या मुलांना खोल्या मध्ये ओसरीत कडीचा झोपाळा. फार भारी बडदास्त. जेवणं झाल्यावर सगळे जवळच मंडप घातला होता तिथं पोचले ऑर्केस्ट्रा साठी.मागच्या लायनीत मुद्दाम बसले कारण गाणी कुणाला ऐकायची होती? इतके दिवसांचा भंकसचा बॅकलॉग भरायचा होता. अस्मि आता त्याच्या अगदी समोर बसली होती.आकाशी रंगाचा थोडी चमचम असणारा ड्रेस आणि गळ्यात कानात लखलख करणाऱ्या शुभ्र खड्याचा सेट! दोन भुवयांच्या मध्ये किंचीत वर एक छोटी चंदेरी बुंद ची टिकली. परीच दिसत होती एकदम. समरची नजर कित्येकदा तिच्याकडे जात होती. मगाचची कसर अशी भरुन काढली तर मॅडमनी! इतक्यात तिकडे फर्माईशी घ्यायला सुरुवात झाली. समर पाणी पिण्याचं निमित्त करून उठला आणि एका छोट्या मुलाच्या हातात चिठ्ठी दिली स्टेजवर द्यायला. पुन्हा ग्रूपमध्ये जाऊन न बसता ती दिसेल अशा ठिकाणी जाऊन उभा राहील हाताची घडी घालून भिंतीला टेकून. आणि गाणं सुरू झालं -
मेरे रंग मे रंगनेवाली परी हो या हो परियों की रानी!!
एकदम शिट्ट्या वाजल्या आणि आख्खा ग्रुप उठला. आकाशचं हे फेवरीट गाणं. कधीही गाणी सुरू झाली की हे एक हमखास असायचंच. एस पीचा असा काही आवाज तो काढायचा की मुलं सुद्धा मॅड व्हायची. आज तर त्याचं हे स्वप्नंच खरं होत होतं. नितीन अन्या चिनू अक्षु सगळे पुढे जाऊन आकाश आणि नेहाला बॉलडान्स करायचा आग्रह करत होते. अस्मिची नजर समरला शोधत होती कारण हे त्याचंच काम असणार हे तिला ठाऊक होतं. एका कोपऱ्यात तो उभा दिसला तिच्याचकडे पाहत राहिलेला. ती त्याला हातानेच ये ना! म्हणत होती तर तो नकारार्थी मान हलवत फक्त अनामिकेने तू माझ्याजवळ ये इथे! म्हणत होता. एवढ्या लोकांत!! ती एकदम गडबडली आणि पटकन त्याला पाठमोरी झाली. देवा. आता काही खरं नाही आपलं. हा विचारणार या दोन दिवसातच! तिचे कान एकदम गरम झाले!
वाड्यात परत आल्यावर कपडे बदलून झोपायची तयारी झाली. सगळे दमले होते पण पुन्हा कधी असे भेटू काय माहीत म्हणून एक डाव नॉट at होम चा खेळायचा ठरलं. सगळे मांडीवर उशा घेऊन, टेकायला आधार शोधून निवांत बसले. समरने काळा टी शर्ट आणि बरमुडा घातली होती तर तिनं लेमन यलो कलरचा नाईट ड्रेस. पत्त्यांचा पिसारा करून तो नाकावर ठेवून तो तिलाच बघत होता. ते तिलाही दिसत होतं. तिच्याकडे जेव्हा तो पत्ते मागायचा तेव्हा मुद्दाम वेळ घालवायचा. मध्येच डोळा मारायचा. आता तिलाही तिचे पत्ते सगळे उघड करावेत असं व्हायला लागलं होतं. ती रात्र स्वप्नवत आणि तळमळत गेली.
दुसरे दिवशी लग्नाची गडबड सुरू झाली. नानांनी सगळ्या मुलांना फेटे बांधायला माणूस पाठवला होता. सगळे एकसे एक दिसत होते. समर तर अगदी राजबिंडा!अस्मिने खिडकीतून पाहिलं मात्र आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला. चिनूने तिला पकडलं तितक्यात! "काय मग परीराणी, आमचा राजपुत्र चालेल ना तुम्हाला? " म्हणजे कालचं सगळं पब्लिकला कळलं होतं तर! चिनु मॅड मनकवडी आहे यार. लगेच म्हणे "ये पब्लिक है ये सब जानती है ये पब्लिक है!" गप ग म्हणून हसतच अस्मि आत धावली.
बाहेर आली तेव्हा अस्मि या जगातली सुंदर मुलगी वाटत होती. अंजिरी रंगाची काठपदराची साडी, मॅचिंग बांगड्या, गळ्यात तशाच खड्यांची चिंचपेटी, एक लांब पण नाजूक हार, थोडेसे हलणारे डूल आणि उफ्फ! त्या नाजूक नाकात मोत्याची नथ! सगळा नखरा त्या नथीत एकवटला होता. तिची हेयरस्ताईल, साडीत आणखीच कमनीय दिसणारा तिचा बांधा, मेंदीचे तळहात कशाकडे लक्षच जात नव्हतं. समर तिला पाहूनच विरघळला! नशीब आपलं की ही इतके दिवस आपल्यासाठी वाट पाहत थांबली! नाहीतर कुणीही पागल व्हावं असं पॅकेज आहे हे रूप आणि गुणांचं! आता उशीर करून चालणार नाही. एखाद्याच्या पेशन्सचा किती फायदा घ्यावा. तो स्वतःलाच सांगत होता. हेच काम आधी केलं असतं तर आत्ता तिला पटकन जवळ ओढता आली असती...!
लग्न लागलं, वाजंत्री वाजली. आहेर सुरू झाले. पंगती बसू लागल्या. गरम जिलेबी, भजी डिश मध्ये घेऊन गप्पा सुरु झाल्या. इतक्यात चिनूला आठवलं. "अरे यार! काल येताना माझ्या पायतलं पैंजण गाडीतच पडलं. नंतर घेऊ म्हटलं आणि विसरलं. चल ना अस्मि आपण आणू" अस्मि पण उठली. उठता उठता चिनुने नितीनला डोळा बारीक केला. पार्किंग जरा लांब होतं. त्या दोघी थोड्या लांब जाताच नितीनने चिनूला हाक मारली. काकू बोलवतायत. अस्मि तिथंच थांबली. चिनु परत आली आणि समरला म्हणाली तू जातोस प्लीज तिच्यासोबत? आम्ही बघून येतो आकाशला काय हवंय. समरला हेच हवं होतं. त्याला येताना बघून अस्मिने चिनुचा डाव ओळखला. हिला ना फटके द्यायला पाहिजेत.
दोघे पार्किंगकडे निघाले. एकदम अवघड क्षण.
"छान दिसतीयेस!"
"हं.." ती एकदम जपून आवरून चालत होती.
"म्हणजे कालपासूनच….!"तो बोलणं पुढे नेण्याच्या तयारीत.
"काय कालपासून?"
"सुंदर दिसतेयस ग"
"आधी दिसत नव्हते का म्हणजे?" ती मुद्दाम वेगळ्या गावाला.
"विशेष छान दिसते आहेस. झालं?" त्याची शरणागती.
"गंमत केली रे. तुमचं काय बाबा, कायमच छान दिसता!"
इतक्या सहज तिने हिशेब मिटवून टाकलेला पाहून तो चकितच झाला. म्हणजे आजवरचं सगळं बिल एका फटक्यात पेड? थांब आता हिशेबच मांडतो तुझा. ते गाडीपाशी आले. मागचं दार उघडून ती वाकून खाली पैंजण शोधत होती. ते नसणार हे माहीतच होतं तिला पण याला माहीत नाही तर नाटक करावंच लागेल ना शोधायचं. ती वाकली तशी तिची गोरी पाठ, पाठीची पन्हाळ, गोल कम्बर सगळं एकदम त्याच्या पुढ्यात आलं. ती आतूनच " नाही सापडत आहे रे!" म्हणाली तसं त्यानं पटकन तिच्या कमरेला हाताने वेढून तिला सामोरी केलं अन हलकेच म्हणाला,"पण मला सापडलंय!"
हे तिला अनपेक्षित होतं. ती फक्त पुटपुटली " समर!"
"Shsh.. "तिच्या कानाजवळ ओठ नेत तो म्हणाला " I love u dear! I love u!"
तिच्या पापण्या मिटल्याच होत्या " I love u Samar!"
त्याने अलगद तिला सीटवर टेकवले आणि तिच्या गळ्यावर ओठ टेकवले. तिचीही बोटं त्याच्या केसांत नक्षी काढायला लागली तशी त्यानं आपले ओठ तिच्या ओठात ठेवले. ती नखरेल नथ त्याच्या धारदार नाकाला लागत होती. नंतर ते ओरखडे लपवताना त्याच्या नाकी नऊ येणार होते. पण त्याची फिकीर होती कुणाला. तिची साडी चुरगळत होती, दागिने अडकत होते पण यातूनच एक नवी घडी बसत होती. आयुष्यभर मिरवावा असा दागिना घडत होता!