आज सकाळपासूनच तिच्या जीवाची घालमेल होत होती. थोडंसं टेन्शन तर होतंच. इतके दिवस त्याची चाललेली गडबड, डॉक्टरकडे मारलेले हेलपाटे, औषधं, तपासण्या, वर खाली होणारी आईची तब्येत, रात्रीची जागरणं सगळं ती बाहेरून तरीही त्याच्या अगदी जवळ राहून पाहत होती. गेले अनेक महिने त्यांच्या संध्याकाळच्या भेटीचा विषय
पण हाच राहिला होता. आईचं ऑपरेशन करायचं का नाही यावर दोघांच्या झालेल्या चर्चा, त्यातली रिस्क, तिने परस्पर जाऊन घेतलेले सेकंड ओपिनियन आणि मग निर्णय झाल्यावर सुरू झालेली पैशाची जमवाजमव. हे सगळं त्या दोघातच कारण अजून घरी सगळं सांगायचं होतं दोघांना. तिचाच हट्ट होता की तिची इंटर्नशिप संपली आणि जॉब ऑफर हातात आली की सांगायचं.त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता.लग्न झाल्यावर जरा मोठं घर घ्यायचं म्हणून साठवलेले पैसे ऑपरेशनसाठी वापरावे लागणार होते. हे तिला कसं सांगावं या विचारात असताना तिनेच जेव्हा तोच पहिला सोर्स आहे आपला, असं म्हटलं तेव्हा त्याला आपल्या निवडीचा पुन्हा एकदा अभिमान वाटला. नंतर कित्येकदा भेटल्यावर त्याच्यात काहीही बोलायचं त्राण उरलेलं नसे आणि तीही शांत राहून कधी त्याचा हात हातात घेऊन थोपटत बसे. सगळं नीट होणारे असं निदान तिला तरी खोटं खोटं म्हणायचं नव्हतं त्याला. उलट जे होईल त्याला सामोरं जाण्यासाठी त्याची ताकद व्हायचे होते, तो कोसळला तर त्याला उभं करायला तिला खंबीर राहायचं होतं. ती थोडीशी प्रॅक्टिकल होतीच जे त्यांच्या नात्याचा तोल सांभाळायला आवश्यक होतं.
सगळ्या तपासण्या झाल्यावर आज ऑपरेशन करायचं ठरलं होतं. हॉस्पिटल खूप प्रसिद्ध होतं, डॉक्टर नामांकित होते. त्याच्यासोबत त्याचा मामा दिवसभर असणार होता शिवाय इतरही बरेच नातेवाईक असल्याने तिला काही तिथं त्याची सोबत करता येणार नव्हती. सारखे फोन आणि मेसेज करून तरी किती डिस्टर्ब करणार? आज तिचं कशातच लक्ष लागलं नसतं म्हणून इंटर्नशिप असूनसुद्धा तिनं आज रजा टाकली होती. घरी सकाळपासून पोट दुखतंय असं नाटक करून ऑफिसला जाणार नाही असं सांगून टाकलं. नाहीतर रजा टाकली आहे म्हटल्यावर बहिणीने आईने लगेच काहीतरी सिनेमा, शॉपिंगचा प्लॅन केला असता ज्यात तिला अजिबात रस नव्हता आज तरी.
लक्ष सारखं घड्याळाकडे. साडेअकराची वेळ ठरली होती. म्हणजे दोन तास आधीपासून तयारी सुरू झाली असणार. त्याने त्या गडबडीत चहा तरी घेतला असेल का नाही कोण जाणे. आपण मात्र छान चहा खारी खाऊन बसलो. तिला एकदम कसनुस झालं. त्याला मेसेज केला "आई बरी आहे का? ऑपरेशनची तयारी चालूं झाली का? तू काही खाल्लेस का? चहा सरबत तरी घे रे." एकदम खाण्याचं विचारलं असत तर त्याचं डोकं फिरलं असतं. या पण मेसेजचा काय लगेच रिप्लाय येणार नाहीये हे गृहीत होतं. अनायसे पोटदुखीचं निमित्त केलंय तर तिने आईला जेवणार नाही सांगून दिलं आणि खोलीत जाऊन पुस्तकं वाचत पडली. अचानक काय आठवलं कोण जाणे बाबांची पूजा झाल्यावर आंघोळ करून देवापुढे जाऊन रामरक्षा म्हटली आणि खूप वेळ डोळे मिटून त्याच्या आईसाठी प्रार्थना करत बसली. इकडे आईला जरा वेगळं वाटलं पण मुलगी सुधारतेय तर कशाला डिवचायच म्हणून कानाडोळा केला.
साडेतीन वाजले आणि मेसेज आला! "झालं ऑपरेशन. काही प्रॉब्लेम नाही डॉ म्हणाले. आता अर्ध्या तासात आई बाहेर येईल." तिचा जीव मोठ्या भांडयात पडला. देवाचे आभार मानले. आता पुढेही सगळं सुरळीत कर अशी विनंती पण केली. तिला आता भुकेची जाणीव व्हायला लागली होती. त्यानंही काही खाल्लं नसणार आणि तसाही बाहेरचं खाण्याचा आनंदच होता त्याचा. पाणीपुरी घेतली तरी एकच पुरी तो खायचा उरलेल्या तीच. पंजाबी आवडायचं नाही, पावाचे पदार्थ बिग नो आणि आईस्क्रीम अजिबात नाही. मग उरतं तरी काय बाहेरच्या जगात खायला?! खाण्याचे फार चोचले होते असे नाही पण त्याला साधसुध खायला आवडायचं.आज तर हॉस्पिटलमध्ये. तिथल्या वातावरणात कुणालाच अन्न घशाखाली उतरत नाही. तो तर अजिबात काही खायचा नाही आणि इतर नातेवाईकांना "खाऊन आलो" सांगून विषय मिटवेल. ते काही नाही. तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली.
आईला म्हणाली, "आई, भाजणी कुठाय थालीपीठाची?" आता ही काय नवा राडा करणार आत्ता आवरलेल्या ओट्यावर म्हणून आई वैतागली. "भाजणी तुला वाया घालवायला केली नाहिये हा. ते यु ट्यूबवर बघून काहीतरी घाट घालू नकोस" तोवर तिने डबे उचकपाचक केलेही होते. एक डबा घेऊन आईला दाखवला हीच का म्हणून? आईला थालीपीठ कसे लावायचे विचारले.
"अग पोट दुखतंय ना? "
"मला नकोय ग, ती श्रुती आहे ना तिला खावंसं वाटतंय केव्हापासून. आज घरी आहे तर घेऊन जाते ना सरप्राईज!" तिने फुल सेटिंग लावली.
मग कांदा चिरला कोथिंबीर बारीक चिरली.पीठ भिजवून मळले.तव्याला तेल लावून छान प्रेमानं थालिपीठ थापलं. मधे गोल भोकं पाडली आणि त्यात तेल सोडलं. वाफ आली आणि त्यासोबत भाजणीचा खमंग दरवळ! मनातल्या मनात ती खूश झाली. पटकन ड्रेस बदलून केस सारखे केले. कानातले घातले. त्याला कधीच आवडायचं नाही तिला बिनकानातल्याची बघायला. बाकी कशाचा आग्रह नव्हता पण त्याला तिचे कानातले बघणं आवडायचं. आरशात बघून गोड हसली आणि मान हलवून कानातले खूप गोड दिसतायत ना हे चेक केलं.
थालिपीठावर साजूक तूप सोडलं. छोट्या डबीत कैरीचे लोणचे घेतले डबा भरला आणि हॉस्पिटलकडे निघाली.
पार्किंगमध्ये आल्यावर त्याला फोन केला आणि पटकन खाली बोलावले.
"वेडी आहेस का तू? इतक्या लांब गाडी चालवत का आलीस? मी आलोच असतो ना उद्या किंवा परवा.." वगैरे रीतसर बडबड झाली.
"आता आलेय तर ये ना प्लीज खाली."
"थांब असं पटकन निघता येणार नाही इथून."
सुमारे दहा मिनिटं वाट पाहिल्यावर तो रिसेप्शनपर्यंत आलेला दिसला. अधीर होऊन तिने पुन्हा फोन केला. "समोर बघ त्या जिन्याच्या बाजूला".
तो आला.तिचे स्कार्फ मधून दिसणारे फक्त डोळे पाहिले आणि त्याची नजर त्यात अडकून पडली. तिच्या काळ्याभोर ठळक कमनीय भुवया आणि मधाळ डोळे हे कॉम्बिनेशन त्याला कॉलेजच्या दिवसांपासून वेडं करत आलं आहे.
"बस पटकन…"
आता या सिच्युएशन मध्ये ही कुठं नेतीय आणखी. मी इथे थांबणं गरजेचं आहे. वगैरे कुरबुरत बसला तो. तिच्या खांद्यावर हात ठेवले मात्र आणि त्याला आपल्या खांद्यावरचं मणाचं ओझं हलकं झाल्यागत वाटलं. त्या खांद्यावर डोकं ठेवावं का भर रस्त्यात असं वाटत असतानाच तिनं गाडी एक साईडला सावली बघून घेतली. जास्त गर्दी नव्हती अशा ठिकाणी. स्कार्फ काढून डबा वगैरे डिकीतून काढत असताना सकाळपासून काय काय कसं कसं झालं यावर बोलणं झालं. सध्या तरी ऑल ओके वाटत होतं.
बोलता बोलता तिच्या हालचाली तो निरखत होता. हिचं चाललंय काय नक्की? आणि तिनं गरम गरम थालिपीठाचा डबा त्याच्यासमोर उघडून धरला.
" खाशील ना? मी केलंय! पहिल्यांदा!"
तो बघतच राहिला. "कसं सुचतं तुला ग? आणि यासाठी तू इतकी धडपड केलीस? मी खाल्लं असतं की काहीतरी इथे"
"माहितीये ते. काय अन किती खाल्लं असतेस. नंतर बोलू आधी खाऊन मला सांग कसं झालंय. मी टेस्ट पण नाही केलंय."
क्षणभर थांबून म्हणाली -
"पहिला घास तुलाच द्यायचा होता ना."
घास तोडता तोडता त्यानं चमकून वर पाहिलं आणि नेहमीसारखं गोड, काळजात कळ उमटवणारं हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरलं.
"वेडी छबुकभावली आहेस माझी"
आणि मग तो घास तोंडात घोळवत "अम्म्म.. जबरदस्त झालंय. अमेझिंग. मला खूप भूक लागलीये ग. थालपीठ आणि लोणचं माझं जीव की प्राण आहे. हे इतकं खमंग टेस्टी लागतंय ना..! खूप खावंसं वाटतंय"
"खा की मग सगळं तुझ्यासाठीच आहे" तिला मनातून इतकं इतकं बरं वाटत होतं ना. तो एक एक घास त्याच्या घशाखाली उतरत होता आणि पोट तिचं भारत होतं. किती थकलेला दिसतोय बिचारा. धावपळ दगदगीचा शीण उतरलाय चेहऱ्यावर. आता थोडे दिवस कशावरून पण भांडायच नाही , तिनं स्वतःलाच बजावलं.
किती शहाणी मुलगी आहे ही! सतत सावलीसारखी सोबत असते आपल्या. पण ती सावली कधी पायात घुटमळू देत नाही. कधी कसला हट्ट नाही कसल्या मागण्या नाहीत. आपल्याला किती नीट ओळखते ही.चिडली की काही खरं नसतं पण मग नंतर जे काय प्रेमाचं भरतं येतं त्यासाठी तिनं पुन्हा पुन्हा चिडावं असं वाटतं. त्याला तिच्याबद्दल एकदम माया दाटून आली. डोळे भरून आले त्याचे.एक घास त्यानं तिलाही भरवला.
"तू पण नाही ना खाल्लंस काही, मला माहितेय. घरी पण भरपूर सेटिंग करावं लागलं असणार या उद्योगासाठी".
तिला एकदम आवंढा आला. हेच त्याचं सगळं जाणून असणं आणि त्याबर वागणं तिला कायम मोहवत गेलंय. ही समज, ही जाणीव उपजत असावी लागते. तिला पटकन त्याच्या मिठीत शिरावे वाटले पण गाडीवर ती बसलेली, तो समोर उभा, तिच्या हातात ते उघडलेले डबे या गणितात ते काही बसलं नसत. पण ते बहुतेक झरझर तिच्या चेहऱ्यावर उमटले असणार. त्यानं आजूबाजूला पाहून कुणी पाहत नसल्याचा अंदाज घेतला आणि पटकन खाली वाकून एकदा तिच्या कपाळावर, मग गालावर आणि हलकेच ओठावर ओठ ठेवले. तिला सगळी धावपळ क्षणात शून्य झाल्यासारखी वाटली. उत्तरादाखल ती त्याच्या अगदी जवळ आलेल्या कानात पुटपुटली - "आय लव्ह यु सो मच!! "