संध्याकाळची वेळ होती. टेकडीवर मस्त गार वारा सुटला होता. वीकडे असल्यानं तुरळक वर्दळ होती. त्याला यायला जरासा उशीर झाल्याने ती अगदी चिमूटभर का होईना रुसली होती. आजचा दिवस महत्वाचा होता ना! प्रत्येक मिनीट तिला त्याच्यासोबत काढायचा होता या दोन तासातला; त्यातली दहा मिनिटं त्यानं वाया घालवली होती. पण आता रुसून आहे तो वेळ पण वाया जाईल म्हणून ती पटकन तो राग विसरून गेली. त्याला आणखी एक कारण पण होतं.. आज तो तिच्या खूप खूप आवडीचा तो स्पेशल पांढरा शर्ट घालून आला होता. इतर शर्टासारखा तो कडक नव्हता तर एकदम मऊ मुलायम होता. त्या शर्टात त्याला मिठी मारायला तिला खूप आवडायचं. एकदम मऊ, उबदार वाटायचं.
"कसला गोड आहेस तू! किती लक्षात ठेवतोस बारीक गोष्टी!"
"छोटी बातें, छोटी-छोटी बातों की हैं यादें बड़ी
भूले नहीं, बीती हुई एक छोटी घड़ी!"
त्यानं खाली वाकत तिच्या डोळ्यात बघत आणि ते किलर स्माईल देत सुरवात केली.
ती पण काही कमी नव्हती! त्याच्या ओठांवर हात ठेवून पुढे म्हणाली -
"जनम-जनम से आँखे बिछाईं
तेरे लिए इन राहों ने!"
आणि दोघंही हातात हात घेऊन खूप हसले. मॅड होते अगदी सिनेमासाठी. एकटे, दुकटे सारखे सिनेमे पाहायचे. नवे तर पाहणारच पण जुनेसुद्धा ठरवून पाहायचे यु ट्यूब आणि कुठे कुठे. हम दोनो कलर मध्ये आला होता तेव्हा हाफ डे टाकून देवला 70 एमेम वर बघायला पागल झाले होते. तीच गत फिल्म अरकाईव्हजला तिसरी मंजिलचा शो लागणार होता तेव्हाची. शम्मीचे डोळे तिथं बघणं वॉज ट्रीट टू आईज! आता त्यांना असा मोठ्या पडद्यावर शोले पाहायची आस लागली होती कारण बच्चन म्हणजे त्या दोघांसाठी स्वतंत्र सं
प्रकरण होतं. मुळात त्यांना सिनेमाचं वेड लागलंच बच्चनमुळे म्हटलं तर चुकलं नसतं. रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी ते सिनेमाशी रिलेट करायचे.त्यानं इतक्या वर्षात तिला अगदी रीतसर समजावलं होतं - नथींग इज फिल्मी! ते सगळं या जगात कुणी ना कुणी अनुभवलं असणारच त्याशिवाय ते असं जिवंत होऊन पडद्यावर साकारुच शकत नाही!
तर असं फिल्मी प्रेम खूप झालं बहुतेक म्हणून आता त्यांच्यात फिल्मी विरह पण येत होता. हो नाही करता करता चार महिन्यांसाठी तिला ऑनसाईट जावं लागणार होतं. घरी सगळे खुश होते पण चार महिने त्याला भेटता येणार नाही म्हणून तिचं पाऊल जड झालं होतं. त्याने प्रॅक्टिकल होऊन तिला खूप बूस्ट केलं होतं. आणि शेवटी एकदाची झाशीची राणी घोड्यावर बसली. उद्या तिला निघायचं होतं त्या दृष्टीने आजची भेट फार महत्वाची होती.
सगळ्या तयारीची रीतसर उजळणी झाल्यावर दोघंही जरा वेळ शांत बसले. एकमेकांचा सहवास अंतरंगात साठवून घेत. स्पर्श आपल्या तनावर कोरून घेत. आपल्या खांद्यावरचं तिचं डोकं कधीच दूर होऊ नये असं त्याला वाटत होतं तर आपल्या हातातले त्याचे हात कधीच सुटू नयेत असं तिला.
पण वेळ झाल्यावर निघावं लागणारच होतं. टेकडी उतरून खाली आल्यावर शहरी गोंगाट सुरू झाला. दिवे चमचमू लागले. दुकानं दिसायला लागली आणि तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तिनं एका कपड्यांच्या दुकानात त्याला बळजबरी नेलं. तो नको नको म्हणत असतानाच एक मस्त शर्ट त्याला घेतला. आणि ट्रायल रूममध्ये पाठवला. त्याने बाहेर येऊन दाखवल्यावर पटकन वा मस्त म्हणाली आणि आत शिरून मगाशी घातलेला त्याचा शर्ट आपल्या पर्समध्ये कोंबला.
"अग काय करतेयस? "
"बाहेर चल मग सांगते"
तो आता हा नवीन शर्ट घालूनच घरी गेल्यावर आईच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची या विचारात.
गाडीत बसल्यावर ती म्हणाली ,"हा शर्ट मी तिकडे घेऊन जाणारे!"
तो एकदम अवाक! काय डोकं आहे का काय हिचं! कुठं कुठं धावतं?
"वेडी! दिवसभर वापरलाय मी तो. दुसरा आणला असता ना घरून सकाळी सांगितले असतेस तर"
"म्हणूनच नाही सांगितलं! तू दिवसभर वापरलेलाच शर्ट हवाय मला. त्याला तुझा स्पर्श आहे, गंध आहे! जो मला तू जवळ असल्याचा भास तरी करून देईल!"
त्याचं मन अगदी भरून आलं. किती प्रेम! किती छोट्या गोष्टीत! हे असलं काही आपल्याला कधीच सुचलं नसतं. तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात आकंठ बुडाला.
मग तिकडे पोचल्यावर फोन मेसेज सुरू झाले. दुसरे दिवशी सगळा सेटप लागल्यावर तिने त्याला व्हीडिओ कॉल केला तेव्हा तिला पाहून आता जवळ मिठीत ओढावं असं त्याला झालं! तो पांढरा शर्ट तिच्या अंगावर होता! हे असं सगळं तर इथे राहून पण कधी शक्य झालं असतं कोण जाणे! आजवर सिनेमात पाहिलेलं आठवलं त्याला - हिरोईन पावसात भिजली वगैरे की हिरोचा शर्ट घालून कसली सेक्सी दिसते… इथे तर प्रेमाचा पाऊस पडत होता आणि माझी हिरोईन माझ्या शर्टात जास्त सेक्सी सुंदर दिसत होती!
" आता कळलं तुला का हवा होता मला हा शर्ट?"त्याला डोळा मारत ओठाचा चंबू करून हवेतच किस दिला त्याला.
"कसली भारी दिसतेयस!"
मग रोज कॉल सुरू झाले. रोज तिच्या सकाळी सात वाजता तो तिला झोपेतून उठवायला फोन करत असे. तिचं ते रूप तसंही त्याला लग्न झाल्यावरच रोज दिसलं असतं. इथे राहून करता न येऊ शकणाऱ्या कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी ते दोघे एकमेकांपासून लांब राहून करत होते. रोज त्याच्या रात्री झोपतानाचा गच्चीतला कॉल, त्याला ऑफिसमध्ये सरप्राईज गिफ्ट, बुके पाठवणं,त्याच्या आवडीचे पदार्थ इथे शिकून करून खाणं अशा अनेक गंमतीत ते वेळ भरून काढत होते. तो शर्ट कायम बॅकड्रॉप सारखा असायचाच कुठेतरी फ्रेममध्ये. कधी तिच्या अंगावर असायचा कधी हातात कधी मांडीवर. कितीदा रात्री एकटं वाटून खूप रडू आलं की ती त्या शर्टमध्ये तोंड खुपसून हमसाहमशी रडायची सुद्धा. तेव्हा बरेचदा तो शर्ट उशीपाशी असायचा.तिच्या बारीक झालेल्या डोळ्यांचं, लाल झालेल्या नाकाचं आणि उशिजवळच्या पांढऱ्या बोळ्याचं गणित त्याला समजलं होतं. तेव्हा मुद्दाम तो म्हणायचा " अरर! काय फडकं केलंस का काय माझ्या शर्टाचं नाक पुसायला?"
ती हसून "हो! काय करशील?" विचारायची.
शेवटी एकदाचे ते चार महिने संपले आणि ती परतली. तिला आणायला बाबा आणि दादा जाणार असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी तिला काही एयरपोर्टवर गाठता येणार नव्हतं. चार महिने काढले आपण आणि हा एक दिवस इतका जड जातोय! त्याला हसू आलं स्वतःचं. आईची म्हण आठवली - शिजेस्तोवर दम निघतो निवेस्तोवर नाही!!
दुसरे दिवशी ते भेटले तेव्हा कितीतरी वेळ गाडीतच गच्च मिठी मारली तिने त्याला. आनंदानं इतकं रडू आलं तिला की एकदम घळाघळा डोळे वाहायला लागले. त्याचा खांदा पार भिजून गेला. तो तिला पाठीवर हात फिरवत शांत करत होता.
"शहाणी माझी वेडी ती! एकटी कुठे कुठे जाऊन आली, शहण्यासारखी वागली. मग आता रडायचं कशाला"
"वेडी आहे ना, म्हणून." नाक पुसत मागे होत ती म्हणाली. पर्सची चेन उघडून तो शर्ट बाहेर काढला. त्यानं अतिशय प्रेमाने तो दोन्ही हातात घेतला आणि फुलांचा सुगंध घ्यावा तसा त्याचा गंध घेतला!
"आता यात तू आली आहेस माझ्याकडे! तुझा स्पर्श, तुझा गंध, तुझे अश्रू अमृतासारखे पिऊन हा आता अमर झाला माझ्यासाठी!"
आपल्या तारा जुळण्यासाठीच छेडल्या गेल्यात याचं तिला पुन्हा प्रत्यंतर आलं! आपण एक इमोशनल तर हा दहा आहे. नुसतं प्रॅक्टिकल असल्याचा आव आणतो. पण आत एकदम देव शम्मी शाहरुखच्या रोमान्सचा पाक भरलाय आणि वरून दिसतो माझा हा सहा फुटी बच्चन! तिने पुन्हा एकदा गच्च मिठी मारली त्याला. तो शर्ट त्या मिठीत घट्ट सापडला होता. त्या पांढऱ्या रंगात पुढच्या आयुष्याची सप्तरंगी स्वप्नं उमटली होती! त्याच्या गालावर तिने हलकेच आपले ओठ टेकवले.
गाडी निघाली. रेडिओ गात होता -
भोले-भाले, भोले-भाले दिल को बहलाते रहे
तन्हाई में, तेरे ख्यालों को सजाते रहे
कभी-कभी तो आवाज देकर
मुझको जगाया ख़्वाबों ने
मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने
सपने सुरीले सपने!