नव्या नव्या प्रेमाचे अलवार दिवस! नुकतंच एका केशरी संध्याकाळी भेटल्यावर काळजाचा डोह तळातून हलला आणि पाणी डोळ्याच्या काठापर्यंत हिंदकळलं. कितीतरी महिन्यांची मैत्री प्रेमात बदलत जाण्याची जाणीव सुखदही होती आणि थोडी दुखरीही. कारण त्या प्रेमात कित्येक पण होते..! खरं सांगायचं तर त्या पाण्यात बुडणार्या डोळ्यांच्या होड्यांनीच त्या दोघांना पैलतीरी सोडलं. कितीही पण परंतु असले तरी हे काठोकाठ भरलेले प्रेम कुठे सांडलं तर? ते जपायला हवं.. हळूवार.. गुपचूप. लाखात एखाद्याला मिळणारं भाग्य आहे ते.. त्याची किंमत या किंतूपरंतु वर तोलण्यात अर्थ नाही. या सुखांच्या लाटा मनात खोल दडवून ठेवायच्या.. आतासारख्या पार वरपर्यंत त्यांचे तरंग उमटू द्यायचे नाहीत.. या जगात आपण एकमेकांसाठी आहोत ही भावनाच पुरेशी आहे.. ठरलं दोघांचं!
मग एक दिवस तिला एका लग्नाला जायचं होतं. सुंदर सोनसळी पिवळी साडी नेसून तयार झाली. केस शिकेकाईने धुतल्यामुळे तिच्याभोवती धुंद करणारा दरवळ घमघमत होता. निघाल्यावर तिने त्याला फोन केला आज भेटायचं? नेहमीप्रमाणे सगळी कामं बाजूला ठेवत तो आला. आणि पाहातच राहिला. यांत्रिकपणे गाडीचं दार उघडलं ती आत बसली. तिचं हे रूप त्याला नवीन होतं. तिला हसू गालात लपवता आलं नाही..खळी उमटलीच! त्या क्षणी तिला कळू न देता नजरेनेच फोटो काढावा आणि त्याची प्रिंट हृदयात सेव्ह व्हावी अशी काहीशी कल्पना करून त्याने डोळे क्षणभर मिटले.तोच क्षण पकडून तिने पदर सारखा करायचा निमित्त करून काळजाची धडधड थोपवायचा प्रयत्न केला. ती गाडीत आल्याबरोबर जादू झाल्यागत गाडी त्या दरवळाने भरून गेली. "छान दिसतेयस" मनातले अनेक निबंध आणि कविता काटत छाटत तो म्हणाला. पण ते पानभर वर्णन त्याच्या डोळ्यात झरझर उमटलेलं तिनं वाचलं आणि ती अक्षरशः लाजली! अशा वेळी काय करायचं असतं ते न सुचून दोघं इकडे तिकडे बघत राहिले. मग त्याने गाडी चालू केली आणि तिने गाणी! गाडी हायवेला लागल्यावर दोघंही जरा रिलॅक्स झाले. रेडिओवर ' दिलबर मेरे कबतक मुझे ऐसे ही तडपाओगे..' लागल्यावर त्यानेही सुरात सूर मिसळला आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. एक तर बच्चन तिचा आवडता, हे तिचं आवडतं गाणं.. आणि तो.. तिचा जीव की प्राण... इतकं सुंदर गातो?! आणि गाणं गात असताना तिच्याकडे सतत बघत होता.. मैं आग दिल मे लगा दूंगा वो की पल मे पिघल जाओगे! ती शब्दाशब्दाला विरघळत होती, लाजून तिचे गाल खरंच लाल होत होते.
सोचोगे जब मेरे बारे में तनहाईयों में
गिर जाओगे और भी मेरी परछाईयों में..
ती किती गुंतत गेली होती त्याच्यात हे फक्त तिलाच माहीत होतं.. आज सुंदर मी दिसतेय आणि हा फक्त शब्दांनी मला हरवतोय! हे हरणं इतकं गोड होतं की तिनं जिंकण्याचा विचारही मनात आणला नाही. त्यानं गाडी कडेला थांबवली. तिचं नाव घेतलं. फार कमी वेळा एकमेकांचं नाव उच्चारायची वेळ यायची. तिचं नावही तिला आता एकदम नवीन वाटायला लागलं. पण पापण्या उचलून त्याच्याकडे बघायची भीड होईना. तोच ड्रायव्हिंग सीटवरून नव्वद अंशात हलला आणि तिच्याकडे बघत राहिला. तिची ती अवस्था मनात साठवून झाल्यावर दोन्ही हातात तिचा चेहरा उचलला. कानाच्या मागे त्याची बोटं लागल्यावर, केसांत गुंतल्यावर सुगंधांच्या आणखी काही कुप्या उघडल्या... तिने लाजेने डोळे मिटून घेतले.. तिला आवडणारं त्याचं नाक आता तिच्या कल्पनेच्याही अलीकडे होतं.. त्याच्या उबदार श्वासांनी त्या सुगंधांना धुमारे फुटत राहिले... तिचे गुलाबी मऊ ओठ त्याच्या ओठांत सुपूर्द करत ती त्याच्या आश्वासक मिठीत हरत राहिली.. त्याचं जिंकणं अनुभवत राहिली.. आनंदाच्या लाटा डोळ्यांचे किनारे ओलांडताच त्यानं ते खारं पाणी गोड मानून घेतलं...प्राजक्ताची फुलं वेचावी तितक्या अधीरतेनं तरी हळुवारपणे तो तिच्या डोळ्यातले मोती आणि ओठांचे पोवळे वेचत राहिला... तिच्या सोनसळी साडीनं त्यांच्या आयुष्यातला एक दिवस सोन्याचा केला!