'साथ' या शब्दानेच दिलाय दिलासा
एकटेपण नुरु देण्याचा घेतलाय वसा
मातेच्या गर्भातूनच लागतो बाळास
आईच्या साथीचा आश्वासक ध्यास
फुलाच्या सौंदर्याला सौरभाची 'साथ'
अथांग सागराला किनार्याची 'साथ'
उच्च शिक्षणाला असेल 'साथ' संस्कारांची
घडेल तरच सुसंस्कॄत पिढी उद्याची
अथक परिश्रमांना यशाची 'साथ'
निखळ मैत्रीला विश्वासाची 'साथ'
पती अन पत्नीची भावगंधित 'साथ'
सुखी संसाराचे गुपित असे यात
'साथ' असावी प्रेमळ अन हवीहवीशी
स्वार्थी जगात सापडणार नाही अशी
दिस,मास, वर्षे जशी सरावी
सहवासाची गोडी वाढत रहावी
न जावा तडा संशय, गैरसमजाच्या शस्त्रांनी
ताटातूट दोन जीवांची मॄत्यूलाही न साधावी