वेळेवर बस पणजी डेपोतुन सुटली आणि रत्नागिरीच्या दिशेने धावू लागली. सुमीत खिडकीजवळच्या सीटवर निवांत बसला होता. सहा ते साडे सहा तासाच्या प्रवासात टाईमपास करायला त्याने बर्याच मूव्हीज अपलोड करुन ठेवल्या होत्या.लॅपटॉप ऑन करत असतांनाच त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. आज जवळजवळ पाच-सहा वर्षांनी तो आत्याकडे रत्नागिरीला चालला होता. वर्ष किती झरझर निघून गेली. कॉलेजात जायला लागल्यापासून त्याला रत्नागिरीत जायला जमलेच नव्हते. मात्र आई-वडीलांकडून आत्याची खबरबात मिळत होतीच.