थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदीराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला?