आईसलँड हे नाव मी सुमेधकडून ऐकल्याचं मला आठवतंय ते साधारण ३-४ वर्षांपूर्वी. तो म्हणाला होता की मला आईसलँडला जायचं आहे. त्याला इज्राईलपासून तर केनिया, अफगाणिस्तान किंवा अजून कुठे कुठे जायचं असं तो एरवीही म्हणतो, त्यामुळे या आईसलँडकडे मी त्यावेळी नुसतंच एका कानाने ऐकून दुसर्याने सोडुनही दिलं. मग कधीतरी फेसबुक वर फोटो पाहिले, तेव्हा अजून थोडी माहिती शोधली, छान दिसतंय सगळं, शेंगेन देशांमध्ये असाल तर वेगळा व्हिसा लागत नाही या नोंदी मात्र नकळतपणे घेतल्या गेल्या, पण विषय तिथेच संपला. एक तर माझा भूगोल कच्चा, त्यामुळे हे आईसलँड नेमकं कुठे, तिथे पर्यटनासाठी काय आहे हे काहीच मला माहीत नव्हतं.