फॅमिली क्रॉनिकल्स ८ : उन्हाळी सुट्टी

शाळेचं अजून एक वर्ष सरलं...उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्या. घरातला छोट्यांचा कंपू अफ्फाट खूष तर बाकीचे दोन जीव पुढील दोन महिन्याभर गुदरणार्‍या संकटाच्या चाहूलीने हताश! गेला महिनाभर छोटे कंपनीचं काऊंट डाऊन चालू होतं ते काम आता मोठ्यांकडे लागतं...सुट्टी कधी संपणार याचं काऊंट डाऊन चालू करायचं. बच्चे कंपनीचं काऊंट डाऊन खरं तर शाळा सुरु झाल्या दिवशीच चालू होतं. नविन शाळा-वर्षाचं नविन कॅलेंडर हाती आलं की आधी सुट्ट्या बघून घ्यायच्या आणि मग शाळा संपायला किती दिवस आहेत ते मोजून घ्यायचं...हे पहिलं काम!

आमच्या बहिणाबाईंच्या लेकाने इयत्ता पहिलीत असताना - आई शाळा कधी संपणार - असं विचारलेलं. त्याला बहिणाबाईंनी उत्तर दिलेलं की अरे आत्ता तर सुट्टी संपून शाळा सुरु झाली. आता गणपतीची/ दिवाळीची सुट्टी येईल काही महिन्यांत - या उत्तरावर आमचे भाचेराव वदलेले - तसं नाही, पहिली नंतर दुसरी, नंतर तिसरी - असं किती वर्ष शिकायला लागेल??? आपल्या लेकाचा बालवयातील हा शैक्षणिक आनंद पाहून बहिणाबाई सर्द झालेल्या! आमच्याकडे युवराजांवर याच भाच्याचा जबर प्रभाव असल्याने परिस्थिती काही फार वेगळी नाहीये.

याच भाचेरावाने तिसरीत की काय एकदा शिक्षिकेने कविता म्हणून दाखव सांगितल्यावर मला येत नाही, तुम्हाला येत असेल तर तुम्हीच म्हणा - असे बाणेदार उत्तर दिलेले आहे. त्यामुळे या भाच्याशी आमच्या युवराजांशी बोलणे झाले की माझा पुढला आठवडा शाळेतून आता काय तक्रार येत्ये या चिंतेत जातो.

तर शेवटचा दिवस म्हणून दोघा युवराजांना शाळेत घ्यायला गेले...यात कौतुकाचा भाग नसून शाळेने पाठवलेल्या ईमेलनुसार लॉस्ट अँड फाऊंड सेक्शन धुंडाळायला गेलेले. कारण संपूर्ण वर्षात छोटू शेटांनी हिवाळ्यात प्रत्येक महिन्यात एक या गतीने हिवाळी जॅकेटस हरवून दाखवलेली. आणि हरवली म्हणजे अंतर्धान पावली ती! काय किमया!! आता वर्षाच्या शेवटी तरी त्यातलं एखाद-दुसरं हाती लागलं तर किती बरं या विचाराने मी शाळेत पोहोचले. अबबब! लॉस्ट अँड फाऊंड मधील जॅकेटसचे ढिगारे च्या ढिगारे बघून फक्त एवढा दिलासा मिळाला की आपले दिवटे ही युनिक कॅटेगरी नाही...फक्त फरक एवढाच की बाकीच्या दिवट्यांची जॅकेटस तिथे मौजूद होती, एवढ्या ढिगार्‍यांमधून आमचं तेवढं एकही जॅकेट हाती लागलं नाही....

दिवटी तरी काय! जॅकेटस,पाण्याच्या बाटल्या, डबे ह्यासारख्या obvious गोष्टींबरोबर डंबबेल्स?? हा व्यायामप्रेमी जीव याची देही याची डोळा बघण्याची इच्छा दाटून आली. एक तर पँटस पण दिसली. आता पँटस इथे काढून टाकून तो दिव्य कुमार्/कुमारी घरी कसा पोहोचला/ली याचा विचार मी केला नाही. आमच्या मोठेशेटांनी २ च आठवड्यांपूर्वी नविन घेतलेला चष्मा गायब करून दाखवल्याने तो देखील त्या ढिगार्‍यात शोधायचा अयशस्वी प्रयत्न मी करून बघितला. पण अर्थातच त्याने चष्मा कधीच कुठेच काढला नसल्याने (आणि तो तरीदेखील हरवल्याने!) या ढिगार्‍यात तो सापडणं शक्यच नव्हतं. तरी मी सांगतोय तुला मी चष्मा हरवला नाहीच आहे - हे तुणतुणं बाजूने चालूच होतं. ते ढिगारे उपसताना ही सगळी जॅकेटस शाळेनी सेकंड हँड विकली तरी शाळेची एक आख्खी नवी इमारत बांधता येईल हा विचार मनातून जात नव्हता!

घरी परतताना मोक्याच्या क्षणी तो प्रश्न कानावर येऊन आदळलाच. "aai, isn't middle school optional?" भर वेगात असताना माझ्या गाडीला कचकन ब्रेक लागला. "what do you mean optional?, माझा प्रतिप्रश्न! "ते नाही का, बिल गेटस, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स सगळ्यांनी मिडल स्कूललाच शाळा सोडली?"...कुठेतरी नसतं काहीतरी वाचलेलं द्यायचं सोडून, समोरचा बेसावध पाहून! ही मोठेरावांची मोडस ऑपरांडीच आहे. तरीही डगमगून न जाता मी उत्तरले, "बाबारे, यातल्या एकानेही मिडल स्कूल पासूनच शाळेला राम-राम ठोकलेला नाही...गेटस साहेब आणि तो मार्क दोघंही हार्वर्ड ड्रॉप-आऊट आहेत. आणि आपल्याला तर कॉलेज सोडायचा
पण ऑप्शन नाही...शिक्षण पूर्ण करण्यावाचून गत्यंतर नाही तुमचे, दुर्देवाने!" यावर शाळेत आपला कसा विकास होत नाहीये, शाळा सोडल्यावर आपणही गेटस साहेबांसारखे काहीतरी भव्य-दिव्य करून दाखवणार आहोत, केवळ शाळा हा प्रगतीच्या मार्गातील अडसर असल्याने असलं भरीव काम आपल्या हातून होत नाही आहे याची खंत व्यक्त करण्यात उरलेला वेळ गेला. त्याच्या दुर्देवाने वो जिस माँ का बेटा है, वो माँ मैं ही हू! काही न बोलता मी गाडी घरात आणून लावली. जेवायला पोळी- भाजी आहे म्हटल्यावर पुढली ठिणगी पेटली.

त्यावरून बाचाबाची झाल्यावर दोघांनी शस्त्र काढले - आम्ही आता भारतात मावशीकडेच रहायला जाणार आहोत. का? तर म्हणे तिथे रोज-रोज मस्त जेवण असतं...कोणी पोळी-भाजी खा म्हणून त्रास देत नाही! ह्या वाक्याला केवळ जेवणाचाच संदर्भ नसून आधीच्या शाळा सोडण्याच्या प्लॅनचा संदर्भ आहे हे मी चाणाक्षपणे ओळखलं. कारण तिथे केवळ ते वरचे भाचेरावच नाही, तर हल्ली मावशीची कन्यका शाळा सोडण्याचे प्लॅन आखत असते, तिच्याशी हातमिळवणी करून काही करता येईल का हा विचार असल्याचे मी ताडले.

कायमचं पाठवून द्यावं कार्ट्यांना तिकडे असा विचार मनात तरळून गेलाच, खोटं का बोला? पण नेमकं तिथे जाऊन सगळी कझिन मंडळी हातमिळवणी करून,आया/मावश्यांना धुडकावून सगळे जणं शाळा सोडायचे. ती भाचीबाई कसले रंगाचे फराटे मारत असते, तिचा पिकासो व्हायचा आणि आमच्या जेष्ठ कुमारांची बत्तीशी खरी ठरून ते बिल गेटस आणि कनिष्ठ कुमार गेला बाजार बिल गेटसचे अ‍ॅसिस्टंट व्हायचे - असा सगळा जामानिमा व्हायचा नेमका...आता हा जामानिमा झाला तर चांगलंच आहे...पण समस्त मंडळी मिळून लगेच एक आत्मचरित्र वगैरे लिहायची - त्यात पहिलं वाक्य टाकायची - घरात राहून आणि शाळेत जाऊन आमची प्रगती होत नव्हती. आईने घराबाहेर काढले, आम्ही मावशीकडे गेलो तिथे आमच्या कझिन्सनी पण शाळा सोडली, आम्ही पिकासो/ बिल गेटस ई.ई. झालो...हे असं काही लिहीलं तर?? झालं!!...आमची शेवटी छी-थू व्हायची...असा सगळा विचार करून मी सांगून टाकलं. काही कुठे जायचं नाही. शेवटी तह होऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवसा आड पास्ता - पिझ्झा आणि एक दिवसाआड पोळी-भाजी असा तह झाला. पण तरी त्यात मंडळींनी तहाची कल्मं अ‍ॅड केलीच - भाजी आमच्या त्यातल्या त्यात आवडीची हवी (म्हणजे कोणती देव जाणे!) - वांगं अजिबात चालणार नाही, चिकन करी/ खीमा/ पाव-भाजी ह्या भाज्याच आहेत! ई. ई.

बाकीचे पालक मुलांना कुठे-कुठे उन्हाळी शाळांना घालतात. झालंच तर ही मुलं रविवारच्या मराठी/ चायनीज अश्या कुठल्या कुठल्या शाळांना जात असतात. आजू-बाजूच्या मराठी शिकणार्‍या मुलांना बघून मी ही आमच्या कुमारांकडे तुम्हाला रवीवारच्या मराठी शाळेत घालूया, असा प्रस्ताव मांडला. मोठेशेटांनी यावर तत्परतेने - होssss असा मोठा होकार दिलेला पाहून काहीतरी गडबड आहे हे मी ओळखून चुकले. पुढील चौकशीअंती लक्षात आले की त्यांनी असा समज करून घेतलेला की एक दिवसाच्या रविवारच्या शाळेला गेलो की आपली आठवड्याभराच्या शाळेतून सुटका होईल...हा त्याचा भ्रमाचा भोपळा फोडल्यानंतर मग पुढील प्रश्न हजर झालाच. दोन-दोन शाळांना मी जाणार नाही....Choose one. Do you want me to go to English school or Marathi school? काय बोलणार!! बाबांनो, रोजच्या इंग्लिश शाळेत जा...राहू देत ती मराठी शाळा...यात इंग्लिश शाळेच्या आवश्यकतेपेक्षा ती ५ दिवस रोजचे ६.३० तास असते तर मराठी शाळा एक दिवस तीन तास असते - हा विचार आमच्या मनात येऊन गेलाच नाही, असं नाही!!

तर आता ही उन्हाळ्याची सुट्टी लागली. खरं सांगायचं तर एका परिने आमच्याकरीता पण आनंदाची गोष्ट आहे. कारण वर्षभर रोजच्या रोज शाळेतून येणार्‍या तक्रांरीना तरी सामोरं जावं लागणार नाही आता, पुढले दोन महिने! हो! शाळेमध्ये वर्गात वर्ग चालू असताना फाल्तू जोक्स करून आजू-बाजूच्यांना हसवणे (त्यामुळे समस्त मित्रवर्गात 'फनी गाय' हा किताब मिळवून रहाणे, वर तो जपण्याकरीता अधिकाधिक प्रयत्न करत रहाणे) लंच लेडीज, रिसेस टीचर्स, स्कूल-बस ड्रायव्हर यांच्याशी they are not being fair म्हणून स्वतःकरीताच नाही, तर दुसर्‍या मुलांच्या वतीने देखील वाद घालणे (ती मुलं भले गप्प् का बसेनात!). मग बस स्लीप्स मिळणे, बसमधून आठवड्याकरीता बॅन होणे - मग आपली ऑफिस वगैरे शुल्लक कामं सोडून शाळेत नेण्या-आणण्याचं भरीव काम माता-पित्यांनी करणे. त्याबद्दल चीड-चीड व्यक्त केली तर, its ok, I can stay home for a week - असं दिलासादायक, काळजाला घरं पाडणारं बोलणे - ह्या सगळ्यातून दोन महिन्यांकरीता सुटका म्हणून आनंद मानावा की ह्या सगळे वात्रट चाळ्यांना आता आपल्याला घरी सामोरं जावं लागणार याचं दु:ख - हे ठरवणं कठीणच!!

Keywords: 

लेख: