चला शिकुया कसुती ... (कर्नाटकी कशिदा)

कसुती हा आहे कानडी शब्द, कई (हात) व सुत (धागा) या दोन शब्दांपासून बनलेला. याचेच अजुन एक नाव म्हणजे - कर्नाटकी कशिदा. या शब्दाशी आपल्यापैकी अनेकांची ओळख
'रेशमाच्या रेघानी, लाल काळ्या धाग्यानी,
कर्नाटकी कशिदा मी काढला'
या लावणीमुळे झाली आहे. मी देखील त्याला अपवाद नाही. पण या प्रकारच्या भरतकामाची पहिली ओळख झाली ती माझ्या एका बेळगाव वारीमध्ये. एका काकूची मस्त भरगच्च भरलेली सिल्कची साडी पाहीली आणि आपल्याला हे काम आलेच पाहिजे असे वाटले. हा काळ म्हणजे जेव्हा कशिद्याच्या इरकली किंवा त्यासदृश साड्यांचा अजुन सगळीकडे सुळसुळाट न झालेला काळ होता. काकूची साडी तिने हुबळीहुन कोणाकडून तरी खास ऑर्डर देऊन भरुन आणली होती त्यामुळे तिथे शिकणे जमले नाही. योगायोग म्हणा किंवा माझी हा टाका शिकायची प्रबळ इच्छा म्हणा मला एक छोटेसे भरतकामाचे पुस्तक एका मैत्रिणीने बघण्यासाठी दिले होते त्यात या टाक्याची प्राथमिक माहिती मला मिळाली. त्या पुस्तकातले वाचून मी हा टाका शिकले. त्या पुस्तकाचे नाव, लेखिका, प्रकाशक वगैरे काहीही लिहुन ठेवायचे कष्ट मी घेतले नसल्याने ती कोणतीच माहिती आता माझ्याकडे नाही.

या टाक्याचा इतिहास पण अगदी खास आहे. प्रत्येक मुलगी आपल्या लग्नामध्ये नेसण्यासाठी इरकली लुगड्यावर स्वतः भरतकाम करत असे. जितके काम जास्त तितकी ही साडी खुलुन दिसे. प्रत्येक मुलीच्या साडीची ऐट निराळी. मुळ आकार जरी सगळ्यांचे सारखे असतील तरी त्यातले आतले डिझाईन कसे भरलेले आहे त्यावर तुमचे कौशल्य ठरत असे. ही माहिती मला माझ्या आज्जीने मला मी हा टाका शिकायला सुरू केल्यानंतर दिली. तिने पण स्वत:ची एक निळी इरकल साडी तिच्या लग्नाच्यावेळी केली होती. या अशाप्रकारे भरतकाम केलेल्या साड्या ही प्रत्येक स्त्रीची मर्मबंधातली ठेव असे. माझ्या आज्जीची साडी एका कोणत्यातरी घरातल्या कार्याच्यावेळी नाहिशी झाली. तिच्या त्या साडीच्या आठवणी मात्र ती नेहेमी सांगत असे.

पुर्वीच्याकाळी आत्तासारखे कार्बन पेपर, ट्रेसपेपर, वेगवेगळ्या रंगाच्या रेशिमलड्या वगैरे काहीही साधने हाताशी नसताना साडीचे धागे मोजुन घेऊन हे डिझाईन पूर्ण केले जाई. ज्यांना क्रॉस्टीच कसे केले जाते याची माहीती आहे त्यांनी एकदम तलम इरकल लुगड्याचे उभे आडवे धागे मोजुन मोठे मोठे मोटिफस मनाने तयार करुन भरतकाम कसे केले जात असेल याची कल्पना करा! त्या काळात रेशिम म्हणुन देखील साडी विणणार्‍यांकडून सूत घेतले जाई. त्यामुळे साडीमध्ये ज्या रंगाचे सूत वापरले असेल त्याच रंगाचे सूत भरतकामासाठी मिळे. एकदा साडी समोर ठेवुन कोणते आकार कुठे टाकायचे वगैरे एक कच्चा आराखडा ठरवला जाई आणि मग काम सुरु होई. एकेक साडी पूर्ण होण्यासाठी कधी एक-दोन वर्षे देखील जात.

सुलट आणि उलट बाजूने हे भरतकाम अगदी सारखेच दिसते. टाका अगदी नाजुक असतो. डिझाईनसाठी वापरले जाणारे आकारदेखिल अतिशय नाजुक असतात. आपल्या रोजच्या आयुष्यात सतत समोर दिसणार्‍या गोष्टींचा कलात्मकरीत्या वापर ही या भरतकामाची खासियत. गोपुरे, देवळे, आसने, रथ, तुळशीवृंदावन, पाळणा, सुपारी, शंख, चक्र, फुले, मोर, हत्ती, मासे, कोयर्‍या, ही आणि अशी अनेक प्रतिके या भरतकामामध्ये दिसतात. याची अजुन एक खासियत म्हणजे ही सगळी डिझाईन भौमितीय आकारात असतात.

यात ४ प्रकारचे टाके येतात -
१. गावंती - एका आड एक टाका टाकून भरतकाम करणे. सरळ रेषांसाठी हा टाका वापरला जातो. या टाक्याने भरलेले बुट्टे उलट-सुलट कसेही पाहिले तरी सारखेच दिसतात.
२. मुरगी - पायर्‍या पायर्‍यांसारखे टाके डिझाईन एका आड एक टाका टाकून भरणे. गोपुरे, रथ, चौकोनी बुट्टे या प्रकारच्या टाक्याने भरले जातात. हा टाका देखील उलट-सुलट कसाही पाहिला तरी एकसारखाच दिसतो.
३. फुली - मोठ्या मोठ्या बुट्यांमधले आतले काम बारिक फुल्या टाकुन भरगच्च केले जाते.
४. नेगी कसुती - हा यातला सगळ्यात वेगळा प्रकार. मोठे मोठे आडवे टाके टाकून संपूर्ण बुट्ट्याचे भरतकाम होते. पूर्ण झालेला बुट्टा एखाद्या कुशल विणकराने साडी बनवतानाच त्यात बुट्टे टाकल्याप्रमाणे हे काम दिसते.

काळ बदलला तसा या कलाप्रकारातही बदल झाला. काम फक्त इरकली साड्यांपुरते मर्यादित न रहाता कोणत्याही प्रकारच्या कापडांवर केले जाऊ लागले. वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे रेशीम, भरतकामाच्या रिंग, कार्बन पेपर वगैरे वापरून नविन डिझाईन बनवले गेले. पुढे यातच अजुन एक मोठा बदल झाला तो म्हणजे जाळी वापरुन काम ते मोजुन डिझाईन भरणे. हा प्रकार जुन्या प्रकारच्या अगदी जवळ जाणारा. जाळीचे टाके मोजून डिझाईन भरणे हे खुपच कौशल्याचे काम आहे. ही जाळी नंतर उसवून टाकली जाते. आणि कापडावर केलेले अप्रतिम काम पाहिल्यावर नजरसूख म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

सहा पदरी रेशमामधल्या एका धाग्याने, २-३ मिलीमिटर रूंदीचा एक टाका असे काम अतिशय नाजुक दिसते. मी स्वत: हे बुट्टे थोडे मोठे करुन बेडशीट, अभ्रे, पडदे वगैरेंवर वापरते पण त्यात नाजुकपणा, कौशल्य जवळपास नाहीच म्हणले तरी चालेल. शिकण्यासाठी क्रॉसस्टीचच्या कापडावर मोजुन डिझाईन करणे सोपे जाते.

या दिवाळीनिमित्तने आपण या टाक्याच्या प्रकार १ व २ ची ओळख करुन घेऊयात.

यासाठी लागणारे साहित्य -

साधारण १०" x १०" आकाराचा एक पांढरा/ऑफव्हाईट रंगाचे कापड
६ पदरी रेशमाची कोणत्याही आवडत्या रंगाच्या लडी (पांढर्‍या रंगावर उठून दिसतील असे कोणतेही रंग चालतील)
५ किंवा ६ नंबरची एक भरतकामाची बारीक सुई
४"-५" व्यासाची भरतकामाची रिंग
कात्री, पेन्सिल, ट्रेसपेपर, कार्बनपेपर, सहज उपलब्ध असेल तर एखादा आलेख कागद

IMG_8380

फोटो क्रमांक १ मध्ये दिलेले डिझाईन प्रिंट करुन एका ट्रेसपेपरवर छापुन घ्या.

IMG_8383

फोटो क्रमांक २ प्रमाणे कापडावर कडेने रिंग बसेल एवढी जागा ठेवुन दिलेले डिझाईन छापून घ्या.
आवडीच्या रंगाच्या रेशमाचा साधारण ९-१० इंची तुकडा कापुन घ्यावा. त्यातला एक पदर (धागा) वेगळा काढून सुई ओवुन घ्यावी.

IMG_8390

डिझाईनच्या एका टोकावर सुई वर काढुन पुढच्या कोनाजवळ खाली घालायची. पुन्हा त्यापुढच्या लगेचच्याच कोनातुन वर काढायची. असे केल्यावर फोटो क्रमांक ३ प्रमाणे दिसेल.

IMG_8392

याप्रमाणे डिझाईनमधल्या रेघा एका आड एक रिकाम्या रहातात. असे करत पुन्हा डिझाईनच्या सुरुवातीपर्यंत करुन घ्यावे. असे केल्यावर फोटो क्रमांक ४ प्रमाणे दिसेल.

IMG_8393

आता प्रथम जिथे सुई वर घेतली होती तिथेच परत वर घ्यावी पण डिझाईनच्या उलट बाजुने पूर्ण करत फोटो क्रमांक ५ प्रमाणे मागे जावे.
शेवटपर्यंत असे भरतकाम करून सुई खाली घालून डिझाईनच्या सुरुवातीला दोर्‍याची गाठ घालावी. असे केल्याने मागचे आणि पुढचे डिझाईन अगदी एकसारखे दिसते.
मधला चौकोन भरताना पण असेच करावे. मागिलबाजूला तिरका टाका घालून चौकोन पूर्ण करू नये. ज्याबाजुने पुढे करत जाऊ तसेच त्याच बाजुने मागे करत आले तर हे डिझाईन व्यवस्थित मागुन पुढुन एकसारखे दिसते.

IMG_8396
IMG_8398

फोटो क्रमांक ६ आणि ७ मध्ये दाखवल्याप्रमाणे हे डिझाईन आता दिसेल. फोटो क्रमांक ७ हा मागिल बाजुचा आहे.

IMG_8399

फोटो क्रमांक ८ मध्ये दाखवल्याप्रमाणे उरलेले डिझाईनही असेच पूर्ण करावे.

IMG_8400

तयार झालेले पूण डिझाईन फोटो क्रमांक ९ प्रमाणे दिसेल.

पारंपारिक कसुती भरतकाम साड्या, साड्यांवरचे ब्लाऊज यावर मुख्यतः केले जात असे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात नोकरी-घर-सण-वार असे सगळे सांभाळायची प्रत्येकाची कसरत चाललेली असते. साडी स्वत: भरतकाम करुन नेसण्याची कितीही जरी आवड असली तरी या सगळ्या व्यापांमधून ते करणे जवळपास अशक्य होते. अशावेळी साधा सोपा उपाय म्हणजे साडी वगैरे सारखे मोठे प्रोजेक्ट हातात न घेता लहान, आपल्या आवाक्यातली डिझाईन वापरुन साध्या साध्या कपड्यांची शोभा वाढविता येते.
नाजूक दिझाईन वापरुन करता येण्याजोगे लहान प्रोजेक्ट्स -

  • कुर्तीज
  • सलवार कमिझ
  • शर्ट
  • स्कर्ट
  • साडीवरचे ब्लाऊज
  • लहान मुलिंचे फ्रॉक्स
  • झबली, कुंच्या, टोपडी

नाजुक डिझाईन वापरून करता येण्याजोगी मध्यम प्रोजेक्ट्स -

  • ओढण्या
  • स्कार्फ
  • साडीचा पदर
  • ३ डिझाईन भरुन केलेल्या फ्रेम्स चा सेट

हेच डिझाईन जरा मोठे करुन करता येण्याजोगी प्रोजेक्टस् -

  • पडदे
  • उश्यांचे आभ्रे
  • बेडशीट
  • टी कोस्टर्स
  • टेबलमॅट्स
  • टेबलरनर
  • टेबलक्लॉथ

खाली मी केलेल्या काही प्रोजेक्ट्सचे फोटो तुम्हाला कल्पना यावी म्हणून देते आहे.

तुम्हाला करुन पहाता यावेत म्हणुन सोपी अशी काही डिझाईन्स देतेय. आलेख कागद वापरुन अशी कित्येक डिझाईन तुम्ही स्वतः कल्पना वापरुन तुम्ही बनवू शकता. मी केलेली डिझाईन मी खुप वर्षांपूर्वी पाहिलेल्या एका पुस्तकातली आठवून स्वतः काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही डिझाईन माझीच आहेत असा माझा दावा नाही. ही कला संपूर्णपणे पारंपारिक आहेत. मी वापरलेली डिझाईन्स देखील अशीच पारंपारीक असू शकतील.

(मायबोली दिवाळी अंक २०१० मधे पूर्वप्रकाशित. मी केलेल्या दोनही क्लीप्स मी परत स्वतः युट्युबवर अपलोड करुन इथे देईन. तोवर मायबोलीची लिंक चालवून घ्या प्लीज))

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle