मी खेळ/ क्रीडा या विषयावर लिहीणं यापेक्षा मोठा जोक नाही. आयुष्यात मी कधी कुठलाही खेळ फार हौशीने खेळले नाहीये. समस्त क्रीडाप्रकारांचा मला जन्मजात कंटाळा. माझ्या मते या जगात एकच क्रीडाप्रकार - तोंड चालवणे. गप्पा मारणे हा माझ्या मते एक क्रीडाप्रकार आहे - आणि सर्वांत उत्तम क्रीडाप्रकार आहे.
मला आठवतय - फारा-फारा वर्षापूर्वी आपल्या मामीनी कुठेतरी निबंध लिहीला होता - माझा आवडता छंद - गप्पा मारणे . (कधी नव्हे ते) फार आवडलेला आणि पटलेला तो निबंध मला. (हे बहुदा मामीशी झालेलं पहिलं आणि शेवटचं एकमत!)
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्रीची जेवणं झाली की खालती मैदानावर बॅडमिंटन खेळायची एक प्रथा होती आमच्या सोसायटीत. त्यानुसार जेवणं झाली की रॅकेट वगैरे घेऊन मी खाली हजर व्हायचे. सुमारे तीन वेळा जेम-तेम ते शटल टोलावलं की माझ्या आवडत्या खेळाकडे वळायचे - गप्पा ठोकणे. मग समोरच्या मैत्रिणीला पटवायचे आणि कुठेतरी अड्डा जमवून गप्पांचा खेळ चालू व्हायचा - तासनतास!
नाही म्हणायला सचिन तेंडुलकरच्या उभरत्या काळात - ९० च्या दशकात - भारतीय जाज्वल्य परंपरेला जागून मी भक्तीभावाने क्रिकेट बघायचे पण तो खेळ म्हणून किती आणि अनेक क्रशं बघण्याकरीता म्हणून किती बघायचे हा एक कळीचा मुद्दा! सचिन, हॅन्सी क्रोनिए, कोर्टनी वॉल्श ही मंडळी विशेष क्रश. पण पुढे हॅन्सी क्रोनिए ने मॅचेस फिक्स केल्या वगैरे भानगडी झाल्यावर क्रिकेट बघणे सोडले ते कायमचे. बहुदा तोपर्यंत क्रश प्रकरणं संपली असावी त्यामुळे क्रिकेट बघण्याचा उसना उत्साह संपला असावा.
हल्ली असा उसना उत्साह आणून मी फूटबॉलच्या काळात गेम्स बघते. कारण? - हापिसात चारचौघांत बोलायला बरे पडते - पीअर प्रेशर - अजून काय! :thinking:
माझं प्रामाणिक मत आहे - कुठलाही खेळ असो - एकच प्रश्न - का बाबांनो त्या एकाच चेंडूमागे जीव घेऊन सगळेजणं धावताय? घाला थोडे पैसे आणि आणा की प्रत्येकी एकेक चेंडू! होऊन द्या की खर्च, इतकी का कंजुषी?
त्यामुळे त्यातल्या त्यात बॉल व लोकं यांचं गुणोत्तर जास्त असेल तर तो खेळ जरा बरा - असं मत! मग टेनिस, बॅडमिंटन तत्सम मंडळी त्यात येतात. बॉल नसेल तर उत्तम - मग त्यात पोहणे, धावणे तत्सम प्रकार - अशी आपली माझी चढती भाजणी आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर २-३ वर्षापूर्वी लेकाच्या एका सॉकर लीगला अॅसिस्टंट कोच म्हणून मी काय केलं - आता बोला! आयुष्यात कधी त्या सॉकर बॉलला पाय काय हात पण नाही लावला ती मी कोच! मुख्य कोच ४ दिवस बाहेरगावी गेलेला तेव्हा त्याच्या जागी कोच म्हणून मी! ती सारी चिल्ली-पिल्ली मला कोच- कोच म्हणून हाक मारायची, भरून यायचं! :P
पण एकुणातच कुठल्याही खेळात दोन पार्टीज आहेत - मग त्यात कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणारच - त्याकरीता आपण आपला (झोपणे वगैरे गोष्टींतला) मौल्यवान वेळ का घालवा - हा मला पडणारा गहन प्रश्न आहे. बरं जिंकलं कोणी एक टीम - महान! पुढे काय? हे माझे प्रश्न मी लोकभयापोटी पोटीच ठेवते - ओठी आणत नाही!
नाही म्हणायला शाळेत कब्बडी, खो-खो हे खेळ खेळल्ये मी. पण त्यात आवडीपेक्षा - टीममध्ये ढकललंय म्हणून खेळा हा प्रकार अधिक! आमची टीम हरली याचा मला ना खेद ना खंत...तेच ते - एक टीम जिंकणार-एक हरणार - त्यात काय वाटून घ्यायचंय असा आपला माझा उद्दात्त दृष्टीकोन!
अगदीच गयी-गुजरी समजू नये मला म्हणून जाता-जाता सांगून ठेवते नाही म्हणायला मला आवडतं ते - चालणं, डोंगर दर्यांमध्ये निसर्ग बघत ट्रेक्स करत फिरणं! तेवढं मात्र मी आनंदाने करते!