"सगळ्यांनी बारा वाजता रिवोल्युशन बारमधे जमा!" पावणेबाराला इमेल. आमची पिकोचिप कंपनी नुकतीच एका अमेरिकन कंपनीने विकत घेतली. दोन महिने भवति न भवति होऊन शेवटी डील झाले. दोन कंपन्यांचे मर्जर म्हणजे मोठ्या माशाने छोट्याला गिळणे. नोकर्या जाणार हे नक्कीच. म्हणून आम्ही सगळे छोटे मासेवाले मनातून घाबरलेले. त्यात पुन्हा राजकारण. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, कोण बळीचा बकरा वगैरे. जिथे तिथे हीच चर्चा. इमेल आल्यावर धपाधप कोट, टोप्या चढवून, काय सांगणार असतील या विचारात, घोळक्याघोळक्याने रिवोल्युशनला पोचलो.
तिथे पिकोचिपच्या बाणांच्या दिशेने जात जात, वर वर, आत आत, एका मस्त हॉलमध्ये पोचलो. एका बाजुला दणदणीत जळणारी आगोटी, इथे तिथे ठेवलेले सोफे, खुर्च्या, उंच स्टुले. रिवोल्युशनच्या मुलांनी कोट घेतले आणि लगेच हातात शॅम्पेनचा ग्लास दिला. मी माझ्या ग्लासासकट एका उंच स्टुलावर चढून बसले. शँपेनची मिरमिरीत चव घेत घेत, सगळेच लोक हळूहळू स्थिरस्थावर झाले. मग घोषणा झाल्या. आमचा जुना सीइओ, मग नवा अमेरिकन सीइओ, सगळे बोलले. खरंतर नेहमीचेच यशस्वी संवाद झाले. की आम्हाला लोक हवे म्हणून ही कंपनी विकत घेतली, लोक नाहीतर कंपनीत आहेच काय, नुसते जुने कंप्युटर! वगैरे. आजुबाजूचे चिंताग्रस्त, ताणलेले चेहरे सैलावू लागले.
भाषणे झाल्यावर बार उघडला. हवी ती दारू प्या! पार्टी! जोडीला पिझ्झा वगैरे काही बाही खाणे. लगेच शँम्पेनच्या नाजूक चषकांच्या जागी बियरचे फेसाळते उंच मग दिसू लागले. मीही स्टुलावरून उतरून गप्पा मारत फिरायला सुरुवात केली.
' तुला काही आणू का?'
' रिकामा ग्लास का?'
' तू बियर पीत नाहीस का?'
असे प्रश्न सारखेच यायला लागल्यावर बारमधून एक एल्डरफ्लावर फिझ घेऊन आले आणि गप्पा पुढे सुरू ठेवल्या. हळूहळू पार्टीचा मूड सुधारत गेला. लोक हवे आहेत या संदेशावर जवळपास सगळ्यांचा विश्वास बसला. तीनचार बियरनंतर खंजीरवाले, पाठवाले आणि बकरेवाले सगळे प्रेमाने एकत्र बागडू लागले.
इंग्लंडात लोकांशी दिलखुलास गप्पा मारायच्या असतील, तर हातात काहीतरी पेय असायला हवे हे मला सुरुवातीलाच लक्षात आले होते. पण केंब्रिजमधे पबात जाणे फारसे जमले नाही. इतर अनेक गोष्टींशी जुळवून घेताना ही एक गोष्ट जरा मागे राहिली. बाथला आल्यावर, ऑफिसमधे इंडक्शनला इतर माहितीबरोबर बाथमधल्या पबांचा एक नकाशा मिळाला. आणि उत्साही सहकार्यांचा गटही. दर दुसर्या, तिसर्या शुक्रवारी किंवा अधेमधेही कुणाला वाटले तर ऑफिसातले उत्साही लोक पबात जात. तिथेच काहीतरी खाणे, थोडे पिणे, पुष्कळ गप्पा असा दोनेक तासांचा निवांत कार्यक्रम. थोड्याच दिवसात मी या उत्साही गटाची सद्स्य झाले. मग पब ठरवताना तिथे शाकाहारी पदार्थ मिळतात का, काही नाहीतर सूप तरी आहे का, हा मुद्दा सगळे लोक विचारात घेऊ लागले.
' तू निदान अंडी तरी खायला लाग गं.'
' प्रोटिन्स कशी मिळणार!!?'
वगैरे म्हणत, पण ' तू बियर प्यायला लाग गं. नाहीतर कशाला येतेस!?' असे कोणी म्हणाले नाही. दरवेळी कोणी ना कोणी गाडी चालवणारे असे. ते न-मादक पेये घेत. ते पाहून मला पबात मिळणार्या पुष्कळ 'इतर' पेयांची ओळख झाली. हातात कसला ना कसला तरी ग्लास असल्याशी कारण.
आमचा एक सहकारी सहसा वाईन घेतो. त्याला सगळे चिडवतात. पबात जाऊन बियर सोडून दुसरे मादक-द्र्व्य(!) पिणे म्हणजे आपण इंग्रज नाही हे दाखवून देणे! तो इटालियन, त्यामुळे आनंदाने चिडवून घेतो. युरोपात इंग्रज हे बियर पिणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. इतरेजन चवीने, चिमुकल्या ग्लासातून वाईन पितात, तर इंग्रज मोठाल्या मगातून बियर, म्हणून इंग्रज जरा रांगडे, खडबडीत तर बाकी वाइनवाले गुळगुळीत, चकाचक असा समज. इंग्रज रांगडे म्हटल्यावर मी (मनात) आ वासला होता. पण आता इतक्यावेळा ही गोष्ट इतक्या लोकांकडून ऐकली आहे, की विश्वास ठेवावा म्हणते.
मी सुरुवातीला एका इंग्रज कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून रहायचे. घरमालकीण ज्युलियाशी खूप गप्पा व्हायच्या. त्यांची तिन्ही मुले शिकायला बाहेर पडल्यावर त्यांनी हे घर घेतले. 'याआधी घर बदलले ते मोठी मुलगी १६/ १७ ची झाली तेव्हा' ती एकदा म्हणाली,
' सतरा, पंधरा आणि तेरा! टीन्स!'
'... मुलांना मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जायचे म्हणजे जवळपास बरे पब्ज हवेत. त्यामुळे बदलले घर.'
'... आता तिघे बाहेर पडले, आम्हाला जरा शांत वातावरण हवे म्हणून पुन्हा बदलले. पण बाथचे पब्ज काय फार लांब नांहीत मुलांच्या दृष्टीने!'
मी (पुन्हा मनातच) आ वासलेला. मुलीला पबात जाऊन सोशलाइज करता यावे म्हणून घर बदलणारे आईबाबा म्हणजे जबरीच वाटले मला. नंतर समजलं, की हे विशेष वेगळे काही नाही. सगळे लोक असेच करतात. पुढे आम्हीही नवे घर घेतले तेव्हा ओळख करून घेताना शेजार्यापाजार्यांनी जवळ पब कुठले चांगले आहेत हे न विसरता सांगितले.
पबात जाणे हे इथल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. पब म्हणजे पब्लिक हाउस. लोकांनी भेटण्याचे ठिकाण. त्यात दारू पिणे ऑप्शनल. पण हा ऑप्शन जवळपास सगळेच घेतात. मी इंग्लंडात आले तेव्हा सुरुवातीला आगगाडीत बियरचे घुटके घेणारी मुलगी पाहून दचकले होते. दारू प्याली की लोक सरपटतात, भीतीदायक वागतात, असा माझा समज होता. तो चांगलाच खोटा ठरला. म्हणजे कोणी वाईट वागतच नाही असे नाही. पण मला अनुभव तरी सगळे चांगलेच आले. बियर पिणार्या पुष्कळ पुरूष सहकार्यांबरोबर एकुलती एक न पिणारी मुलगी म्हणून माझी काळजी करणारी एक मैत्रिण आता स्वतःच तिच्या सहकार्यांबरोबर बाहेर जायला सरावली आहे. आणि सध्याच्या औद्योगिक अनिश्चिततेच्या काळात प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी पबात जाणे हा एक मस्त पर्याय आहे असे माझ्या लक्षात आले आहे.
'बारा वाजता ऑफिसच्या पूर्व कोपर्यात जमा', आज पावणेबाराला इमेल. जमलो. यावेळी ऑफिसातच. त्यामुळे बहुतेकांच्या हाता कॉफीचे मग. माझ्या हातात घसा बसल्याने गरम पाणी! (अरेरे!)
' ... मर्जरनंतर तयार झालेल्या नव्या कंपनीचे उत्पन्न आणि लोकांची संख्या यांचे गणित जुळत नसल्याने काही लोकांना नोकर्या गमावाव्या लागतील ... ' घोषणा. लोक अवाक! परवाची स-शँपेन 'लोक हवेत' घोषणा होऊन आठवडाही झालेला नाही. पुष्कळ प्रश्नोत्तरे होऊनही नक्की कोणाच्या नोकर्या जातील काही समजले नाही. जागेवर परतताना जिन्यात एकजण म्हणाला,
'काय वैताग आहे! '
' ... खंजीर ...'
' ...बकरा ...'
'पबात जाऊया'
'कोण चाल्लंय पबात?'
'मी'
'आम्ही चाल्लोय'
'मी पण'
'कुठे, कुठे?'
'हन्टस्मन'
'हे! पब?'
'हो, हे लोक चाल्लेत हंट्स्मनला'
'ओके, हंट्स्मन'
'हंट्समन'
'हंट्समन, अबिचर्च जवळचा'
असा निरोप पसरला. आणि १० मिनिटात जवळजवळ आख्खे ऑफिस, अगदी रिसेप्शनिस्टसकट हंट्समनला पोचले. दोनेक तासांनी, चारेक बियर नंतर (आणि माझ्या दोन आल्याच्या काढ्यांनंतर) पुन्हा सैलावलेले, चांगल्या मूडमधले चेहरे दिसू लागले. ब्रिस्टलमध्ये नव्या दोनतीन कंपन्या निघाल्यात ही बातमी समजली. संपर्कांची देवाणघेवाण झाली. हंट्स्मनमधून डुलत डुलत बाहेर पडणारे घोळके शुक्रवारच्या पर्यटकांच्या निवांत आनंदी घोळक्यांत मिसळून गेले.