||अथः योगानुषासनम||.... अर्थात आता योगाचे अनुशासन- अभ्यास, स्पष्टीकरण केले जात आहे!
साधारण दोन वर्षांपूर्वी, आपणाही योगासनांची परीक्षा द्यावी असं वाटू लागलं. योगासनं म्हटली की आम्हा नागपुरकरांसमोर एकच नाव येतं "श्री जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ" (www.jsyog.org). त्याच संदर्भात मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन 'आसन प्रवेश' या प्रमाणपत्र परिक्षेची माहिती काढली. १ मे ते ३१ मे याकालावधीत हे परिक्षावर्ग असतात व त्यानंतर प्रात्यक्षिक आणि लेखी परिक्षा असं लक्षात आलं. त्या अनुशंगाने मंडळात चौकशी केली आणि २८ एप्रिल २०१५ ला प्रत्यक्ष मंडळात जाउन परिक्षावर्गात नोंदणी केली.
१ मे रोजी सकाळी ५:४५ ला मंडळात प्रवेश केला आणि त्याचक्षणी अत्यंत पॉसिटिव्ह असं काहीतरी मनात चमकुन गेलं. आजही तो क्षण आठवला की खुप वेगळं वाटतं.
प्रवेशद्वारापासुन आतल्या इमारतीपर्यंत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे अष्टांग योगाचे सोपान दर्शवणार्या पाट्या एका प्रकारे पुढचा मार्ग दाखवत होत्या. इमारतीतील आसनकक्षाबाहेर कार्यकर्ते, शिक्षक प्रसन्नतेने आम्हाला मार्गदर्शन करत होते. प.पु.श्री जनार्दन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेउन, आपापले आसन घेउन सर्व महिला-पुरुष ठरलेल्या जागी बसले आणि आमच्या 'आसन प्रवेश परिक्षा २०१५' च्या वर्गाचे औपचारीक उद्घाटन झाले. आदरणीय रामभाऊ खांडवे अर्थात आमचे गुरुजी यांनी त्यावेळी घेतलेले पहिले अवयव ध्यान आणि प्रार्थना आजही जशीच्या तशी स्मरते. त्या क्षणापासुन एका प्रकारे आपल्या अस्तित्वाचा कार्यकारण भाव समजला असे म्हणायला हरकत नाही.
रोज पहाटे बरोबर ५:५५ला मंडळात घुमणार्या शंखध्वनीने वर्गाची सुरुवात व्हायची. शिक्षिकांच्या सुरेल आवाजातील ईश्वर प्रणिधान, मग आमच्या मुख्य शिक्षिका यांनी घेतलेले अवयव ध्यान व प्रार्थना याने आसन वर्गाचा प्रारंभ होत. ७ वाजेपर्यंत प्रत्यक्ष आसनांचा अभ्यास आणि त्यानंतर एक तास व्याख्यान अशी रुपरेषा होती. प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे एक पालक शिक्षक अशी रचना केली जाते. वयोगटानुसार गट पडतात. मंड्ळातील अत्यंत अनुभवी, प्रेमळ आणि प्रेरक अशा शिक्षिका मला पालक म्हणुन भेटल्या हे माझे भाग्य.
रोजचे वर्ग आणि व्याख्यानं यातुन योगशास्त्र अधिकाधिक उलगडत गेलं. केवळ आसन किंवा प्राणायाम किंवा शुद्धिक्रिया नाही तर योग ही एक विचारधारा आहे याची जाणिव होउ लागली. कळत नकळत तो मार्ग अनुसरायचा प्रयत्न सुरु झाला. आणि उत्तम मार्ग्दर्शनाखाली 'आसन प्रवेश' परिक्षा दिली.
क्रमशः