खुप दिवसांपासुन मनात असलेली लेखमालिका फायनली आज सुरु करतेय... योगासनं शिकायला लागल्यापासुन किंवा योगाभ्यासाच्या वाटेवर चालु लागल्यापासुन योगशास्त्राबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर झाले... या लेखात "योग" (की योगा??) याबद्दल थोडसं.
योगशास्त्राची निर्मिती पतंजली मुनींनी केली, हे तर आपण जाणतोच. पण योगशास्त्राबरोबरच पतंजली मुनींनी व्याकरणशास्त्र, वैद्यकशास्त्र याही महत्वाच्या ग्रंथांची निर्मीती केली. याची महती श्लोकात वर्णिली आहे :
|| योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन|
योsपाकरोत्त्म प्रवरं मुनीनां, पतंजलि प्रांजलिरानतोस्मि||
||अथः योगानुषासनम||.... अर्थात आता योगाचे अनुशासन- अभ्यास, स्पष्टीकरण केले जात आहे!
साधारण दोन वर्षांपूर्वी, आपणाही योगासनांची परीक्षा द्यावी असं वाटू लागलं. योगासनं म्हटली की आम्हा नागपुरकरांसमोर एकच नाव येतं "श्री जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ" (www.jsyog.org). त्याच संदर्भात मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन 'आसन प्रवेश' या प्रमाणपत्र परिक्षेची माहिती काढली. १ मे ते ३१ मे याकालावधीत हे परिक्षावर्ग असतात व त्यानंतर प्रात्यक्षिक आणि लेखी परिक्षा असं लक्षात आलं. त्या अनुशंगाने मंडळात चौकशी केली आणि २८ एप्रिल २०१५ ला प्रत्यक्ष मंडळात जाउन परिक्षावर्गात नोंदणी केली.