खर म्हणजे ही कविता नाही, पण काव्यात्मक लिखाण आहे. इथे तसा काही गट सापडला नाही म्हणून कवितेखालीच लिहिते आहे. लिखाण जुनच आहे, आज फेसबुक मेमरी मध्ये आलंय म्हणून इथे पण :fadfad:
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कधी कधी भल्या पहाटे अंगणात तर कधी थोडंसं उशिरा चहाच्या टेबलाजवळ भेटायचा.
स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून येणारा तो देखणा कवडसा.
थंडीच्या दिवसात उबदार उन्हाची शाल घेऊन तांसतास घुटमळायचा अवतीभवती.
माझं गुणगुणत त्याला न्याहाळणं चालायचं.
उन्हं डोक्यावर आली की हा इथून थोडं सरकून पुढल्या घरात मग अंगणात मग फाटकाच्याबाहेर असं करत करत दिसेनासा व्हायचा.
कधी कधी रात्रीच पण करमायचं नाही बहुदा त्याला,
चांदण्यांचं हसू घेऊन यायचा बऱ्याचदा.तेव्हा तर काय भरपूर रिकामा वेळ असायचा छान गप्पा व्हायच्या.
तो त्याच्या प्रवासाबद्दल सांगायचा मीही बोलायचे काहीबाही.
घराची डागडुजी झाली, कुठे कुठे पडलेल्या फटी वगैरे बुजवल्या गेल्या, रंगबिंग देऊन झाला... मस्त वाटतंय नवं नवं...
.
.
.
कवडसा तेवढा हरवलाय मात्र!